Shubhangee Dixit

Drama Crime

3  

Shubhangee Dixit

Drama Crime

गुप्तहेर आकांक्षा - भाग एक

गुप्तहेर आकांक्षा - भाग एक

6 mins
391


आज राजमाने कुटुंबियांसाठी खूप खास दिवस होता. विलास राजमाने यांची पत्नी वैजयंती यांचा आज पन्नासावा वाढदिवस. रात्री वाढदिवसाची पार्टी असल्याने बंगल्यावर गडबड चालू होती. सोहम आणि आर्या बेडरूममध्ये आपल्या आईसाठी सरप्राईज प्लान करत होते. संध्याकाळी सात वाजता हळू हळू पाहुणे येण्यास सुरुवात झाली. सर्वजण आले तेव्हा सौ. राजमाने म्हणजेच वैजयंती या आपले पती विलास यांच्या समवेत हॉलमध्ये आल्या. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. सोहम आणि आर्या पुढे आले. आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आर्याने आईला घट्ट मिठी मारली.


सौ. वैजयंतीसाठी आणलेला केक हॉलच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. वाढदिवसाच्या समारंभाला सुरूवात झाली. सौ. वैजयंती यांनी हलक्या हाताने केक कापला. त्यानंतर केकचा एक पीस त्यांनी आपले पती विलास यांना भरविण्यासाठी हातात घेतला परंतु विलास यांनी तो केकपीस खाल्ला नाही. तो पीस ते वैजयंती यांना भरवणार तोच पूर्णतः अंधार झाला. लाईट काही क्षणच गेली होती परंतु जेव्हा लाईट आली तेव्हा सर्वांनी जे पाहिलं ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वैजयंती जमिनीवर पडल्या होत्या आणि त्यांच्या ओठांतून फेस येत होता. सर्वजण पाहतच राहिले. काही वेळाने त्यांचे लक्ष तिथे जवळच बेशुद्ध पडलेल्या राजमाने यांच्या घरात काम करणाऱ्या सदानंद यांच्यावर गेले. ते जमिनीवर बेशुद्ध पडले होते आणि कपाळावर झालेल्या जखमेतून रक्त येत होते. काहीजण तिकडे धावले. वैजयंती आणि सदानंद यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. सदानंद तर शुद्धीवर आले पण, वैजयंती यांना शुद्ध आली नाही. तसेच त्यांचे ओठही निळसर पडले होते.


आर्याची मैत्रीण अपूर्वाही तिथे होती. तिने आपल्या मोबाईल वरून एक कॉल केला आणि म्हणाली, "लवकर ये. मी तुला ऍड्रेस पाठवते. इथे खूप गडबड झाली आहे. काकी बेशुद्ध पडल्या आहेत." काही वेळाने पोलीसही आले. पोलीसांनी तपास आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. इन्स्पेक्टर प्रधान सूचना देत होते मार्कींग वगैरे कुठे करायची?? कशी करायची ते सांगत होते. तोच अपूर्वाची बहिण आकांक्षा तिथे आली. अपूर्वाने आर्या, सोहम आणि विलास यांच्याशी आकांक्षाची ओळख करून करून दिली. आकांक्षा एक खाजगी गुप्तहेर होती. तिने आधीही दोन तीन केसेस सोडवल्या होत्या.

आकांक्षा विलास यांच्याशी बोलत असताना इन्स्पेक्टर प्रधान तिथे आले आणि म्हणाले की, "अच्छा!! आपण इथेही आहात का?? मला वाटतं की ही केस पोलिसांची आहे त्यामुळे आपण यामध्ये हस्तक्षेप करू नये."

आकांक्षा इन्स्पेक्टर प्रधानांकडे वळून म्हणाली, "मला माहित आहे. मी तुमच्या चौकशीमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही परंतु आपली सर्व चौकशी झाल्यानंतर मला एकदा पुन्हा सर्वांची चौकशी करायची आहे. त्यासाठी परवानगी आहे ना??"

"ऑफ कोर्स व्हाय नॉट??" असं म्हणून इन्स्पेक्टर प्रधान तिथून बाजूला झाले. काही वेळाने इन्स्पेक्टर यांनी सर्वांची चौकशी करण्यास सुरुवात केली. केक कोणी ऑर्डर केला होता आणि नक्की काय घडले हेही सर्वांना विचारले. सदानंद यांनी सांगितले की, 'कोणीतरी अंधारात धावत गेलं. जाताना मला धक्का लागल्यामुळे माझं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्यामुळे मला जखम झाली.' काही वेळाने ॲम्ब्युलन्स आली आणि जे काही पुरावे समोर होते ते सर्व फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये पाठवण्यात आले.


चौकशीमध्ये इन्स्पेक्टर प्रधानांना असे कळले की, केक विलास राजमाने यांनी ऑर्डर केला होता. प्रथम संशयित असल्याने त्यांना अटक करण्यात आलं. आकांक्षाला यामध्ये काहीतरी वेगळं वाटत होतं. संशयित म्हणून विलास राजमाने यांना अटक करण्यात आली तसेच आकांक्षाला बजावण्यात आले की 'आपण खाजगी गुप्तहेर असलात तरी पोलिसांच्या संमतीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून सर्वकाही तपास करावा' तिकडे कारागृहात विलास राजमाने सतत म्हणत होते की, 'मी माझ्या पत्नीचा खून केला नाही' परंतु, त्यांचे कुणीही ऐकायला तयार नव्हते.


आकांक्षा विचार करत होती की खरे काय आणि खोटे काय?? तिने विलास राजमाने यांची कारागृहामध्ये भेट घेतली. आपण केक मागवला होता का?? असे तिने विचारले त्यांनी हो असे उत्तर दिले. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर समजले की त्या केकमध्ये विष होते पण ते विष फक्त वैजयंती यांच्या ओठांना लागले होते आणि अन्ननलिकेमध्येही होते. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली होती. आकांक्षा अजूनही विलास यांच्याशी बोलत होती, तोच फॉरेन्सिक रिपोर्ट घेऊन इन्स्पेक्टर प्रधान आले.


"आता तर सिद्ध झालं. फॉरेन्सिक रिपोर्ट कधीही खोटं बोलत नाही. जसं एक गुन्हेगार बोलतो." विलास यांच्याकडे रोखून पहात इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले.

"तुम्ही चुकत आहात इन्स्पेक्टर प्रधान. गुन्हा सिद्ध होण्याआधी प्रत्येक आरोपी हा निर्दोश असतो. ते फक्त एक संशयित आहेत. गुन्हेगार नाहीत. हे तुम्हालाही माहित असेलच. नाही का??" आकांक्षा म्हणाली.

"आय नो. आय नो. पण. फॉरेन्सिक रिपोर्टचं काय?? यामध्ये स्पष्ट लिहलं आहे की, केकमधून विषबाधा झाली आहे हे." इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले.

आकांक्षाने रिपोर्ट पाहिला. रिपोर्टमध्ये वैजयंती यांच्या ओठांवर आणि अन्ननलिकेमध्ये विष होते. ते विष म्हणजे सिंथेटिक पॉईझन होते. डिटेल्ड पोस्टमॉर्टम रिपोर्ट सकाळी येणार होता.

"विलास काका, आपण केक मागवलात तेव्हा तो हॉलमध्ये आणण्याआधी नक्कीच किचनमध्ये काही वेळ ठेवला असणार हो ना??" आकांक्षाने विचारलं.

"हो. काही पाहुणे येणार होते. त्यामुळे केक काही वेळ किचनमध्ये ठेवला गेला होता आणि तिथे कोणीही नव्हतं." विलास राजमाने म्हणाले.

"घरातले नोकर तर होते ना तीन नोकर आहेत ना??" इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले.

"हो. पण ते असं का करतील?? तो सदानंद तर वीस ते पंचवीस वर्ष झाले आहे. आमच्याकडे काम करत आहे. कोणी असं का करेल?? आमचं कोणाशीही वैर नाही. माझं आणि वैजयंतीचंही नाही." असं म्हणून विलास यांनी दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि ते रडू लागले. आकांक्षाने विलास यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती कारागृहाबाहेर आली.

"मला नाही वाटत की वैजयंती यांचा मृत्यू सिंथेटिक पॉईझनने झाला असावा" आकांक्षा असं म्हणताच इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले,

"असं का वाटतं तुम्हाला??"

"कारण, जर विष पूर्ण शरीरात पसरलं असतं तर पूर्ण शरीर निळं पडलं असतं. बोटांची नखंही निळी पडली असती पण, रिपोर्टमध्ये असं काहीच सांगितलं नाही. फक्त ओठ आणि अन्ननलिकेमध्येच विष आहे." आकांक्षा विचार करीत म्हणाली.

"सो...तुमचं काय मतं आहे मग मॅडम??" इन्स्पेक्टर प्रधान अजून काही माहिती मिळते का या उद्देशाने म्हणाले.

"काही नाही. आपण मला डॉक्टर वाळिंबे कॉल लावून द्याल प्लीज?? मला एक शंका त्यांना विचारायची आहे." आकांक्षा. म्हणाली. डॉक्टर वाळिंबे हे फॉरेन्सिक डॉक्टर होते. इन्स्पेक्टर प्रधानांनी कॉल केला.


"हॅलो डॉक, आकांक्षा बोलतेय. कसे आहात??" आकांक्षाने विचारलं. डॉक्टर वाळिंबे यांना ती डॉक्टर न म्हणता डॉक म्हणत असे. आकांक्षाच्या वडिलांचे शाळेतले मित्र होते ते.

"मी मस्त. पण हा प्रधानचा मोबाईल नंबर आहे. तू या नंबरवरून.."

"डॉक, मला एक शंका आहे."

"ती कोणती??"

"वैजयंती यांच्या अन्ननलिकेमध्ये साठलेलं सिंथेटिक पॉईझन जर त्याच्या शरीरातही गेलं असतं तर पूर्ण शरीरात निळं पडलं असतं का?"

"हो. नखांवरूनच समजलं असतं. पण, आकांक्षा, सिंथेटिक पॉईझनची मात्रा इतकीही नव्हती की त्याने मृत्यू येईल." डॉक्टर वाळिंबे म्हणाले.

"म्हणजे??" आकांक्षाने विचारलं.

"म्हणजे असं की..केकमध्ये जितकं मिली ग्रॅम विष होतं म्हणजे ०.७० मिली ग्रॅम..त्यामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकत नाही." डॉक्टर वाळिंबे म्हणाले.

"असं??" आकांक्षा विचार करीत म्हणाली, "ओके डॉक, थँक्यू."

मोबाईल इन्स्पेक्टर प्रधानांना देत आकांक्षा म्हणाली, "माझा अंदाज खरा ठरला. सिंथेटिक पॉईझन शिवाय वैजयंतींना दुसरं कोणतं तरी विष दिलं गेलं असावं??"

"हम्म...खुप कठीण केस आहे." इन्स्पेक्टर प्रधान विचार करत म्हणाले.

"कदाचित नाही किंवा कदाचित हो. उद्या मी पुन्हा क्राईम सीनवर जाईन. तिथे पुन्हा नीट शोध घ्यावा लागेल. काहीतरी क्ल्यू नक्की सापडेल." आकांक्षा म्हणाली.

"तुम्ही जाऊ शकत नाही मिस आकांक्षा. कारण तिथे पुरावे असतील तर ते नष्ट होऊ शकतात. यासाठी..." इन्स्पेक्टर प्रधान नकार देत म्हणाले.

पण त्यांना पुढे बोलू न देता आकांक्षा म्हणाली,

"इन्स्पेक्टर प्रधान, मी तसं काहीच करणार नाही. हे आपल्यालाही माहीत आहे. आपण सोबतच जाणार आहोत. उद्या भेटू नऊ वाजता राजमाने यांच्या बंगलो जवळ."


दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर प्रधान सोबत दोन कॉन्स्टेबल आणि आकांक्षा असे चौघेही राजमाने यांच्या बंगलोवर आले. क्राईम सीन असल्याने बंगला आधीच सील केला होता. आकांक्षाने काही क्ल्यू मिळतो का? हे पाहण्यास सुरूवात केली. जिथे सदा काका पडले होते. तिथे अजूनही काही रक्ताचे थेंब भिंतीवर होते. आकांक्षाने मॅग्नीफायिंग ग्लासमधून ते थेंब नीट पाहिले. तिला हसू आलं. नंतर ती किचनमध्ये गेली. इन्स्पेक्टर प्रधान आणि दोन्ही कॉन्स्टेबल शोध घेत होतेच. बराच वेळ आकांक्षा किचनमधून बाहेर न आल्याने इन्स्पेक्टर प्रधान किचनमध्ये आले. पाहिलं तर आकांक्षा बेशुद्ध पडली होती. तिच्या हातात एक कागदही होता. इन्स्पेक्टर प्रधानांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला परंतु ती शुद्धीवर आली नाही...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama