नासा ( NaSa ) येवतीकर

Action Thriller Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Action Thriller Others

पावसामध्ये रात्रीचा प्रवास

पावसामध्ये रात्रीचा प्रवास

4 mins
282


सुमारे 20 वर्षांपूर्वी ची ही गोष्ट आहे. ज्यावेळी मी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत होतो. त्याठिकाणी माझा एक रूम पार्टनर हा विदर्भातील नागपूर जवळील एका खेड्यातील राहणारा होता. त्याचे लग्न जमले होते आणि माहूर येथील आम्ही सर्व मित्र एका खाजगी गाडीने त्याच्या गावी जाण्याचे ठरविले होते. लग्न रविवारी होते म्हणून शनिवारी अर्धी शाळा होती म्हणजे दुपारी एक-दोन वाजता घरी आल्यावर सुमारे चार-पाच वाजता निघायचे होते. सर्व नऊ-दहा मित्रांना एकत्र जमण्यासाठी बराच वेळ गेला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आम्ही खाजगी जीपने यवतमाळ मार्गे नागपूरला जाण्यासाठी निघालोत. सप्टेंबरचा महिना होता. पावसाळा तसा संपल्यात जमा होता पण आकाशात कुठे कुठे काळे ढग दिसत होते. मी यापूर्वी कधी नागपूर किंवा विदर्भात प्रवास केला नव्हता त्यामुळे मला थोडी जास्त उत्सुकता होती त्यामुळे गाडीत माझी समोर बसण्याची विनंती सर्व मित्रांनी मान्य केली. 

रेणुका मातेला प्रणाम करून गाडीचा प्रवास सुरु झाला. मराठवाड्यातील खाच खळग्याचे रस्ते आणि मित्रांच्या गप्पा जोरात चालू होते. सहा-सात किमी संपले की मराठवाड्याची हद्द संपून विदर्भ सुरू होतो, याची जाणीव गाडीने करून दिली. थोड्याच वेळात आमची जीप विदर्भातील गुळगुळीत रस्त्यांवरून विमानासारखी धावू लागली असे वाटू लागले. मी विमानात कधी बसलो नाही पण चित्रपटात विमानाची धावपट्टी कशी गुळगुळीत असते हे पाहिलं होतं. 

एक-दीड तासाचा प्रवास झाला होता. सर्वाना भूक ही लागली होती. यवतमाळ जवळील धाब्यावर जेवण करता येईल याच विचारात सर्वजण होते. जीपचालकाला एक चांगले हॉटेल माहीत होते त्यामुळे त्याने सरळ गाडी त्या हॉटेलवर नेऊन थांबविली. त्या हॉटेलवर शाकाहारी-मांसाहारी सर्व प्रकारचे जेवण उपलब्ध होते. मी आणि माझ्यासोबतचे इतर दोन मित्रांनी शनिवार असल्याने मांसाहार टाळले तर इतरांनी आपल्या जेवणाचा पुरेपूर आनंद घेतला. विशेष म्हणजे त्या गाडीतले एक दोघे सोडले तर आम्ही सर्वजण बॅचलर ( एकटा जीव सदाशिव ) होतो. सर्वांची नोकरीची पहिली शाळा ही या आदिवासी तालुक्यात होती. माहूर तालुका विदर्भाला लागून असल्याने येथे अनेक शिक्षक विदर्भातील होते. गाव सोडून दोनशे-तीनशे किमी दूरवर आमची नोकरी असल्याने आम्ही सर्वजण मिळून-मिसळून राहायचो. अडी-अडचणीत एकमेकांना मदत करायचो. तन-मन-धन सर्वस्व अर्पून सहकार्य करायचो. याचमुळे तर आज विदर्भातील एका मित्राच्या लग्नाला दहाजण स्व खर्चाने जात होतो. धाब्यावर सुरेख आणि चवदार जेवण जेवताना तास-दीड तास कसे संपले हे कळालेच नाही. 

रात्री दहाच्या सुमारास आमची जीप यवतमाळ-वर्धा-नागपूर या हायवे मार्गावर पळू लागली. अर्धा तासाच्या प्रवासानंतर अचानक आभाळात विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. मी गाडीत पुढे बसलो होतो, जेवण पोटभर झाल्याने मागे बसलेले अनेक मित्र पेंगू लागले. माझी एक सवय होती, मला गाडीत झोप येत नाही. मी ड्रायव्हरशी गप्पा मारत होतो, त्याला जोरात चालवू नको असे बोलतांना वारंवार सांगत होतो. अश्या पावसात शक्यतो गाडी हळू चालवलेली बरी याचे व्याख्यान त्याला देत होतो. तो माझ्याकडे पाहून मंद स्मित करत होता. रात्रीची वेळ आणि पावसाचा जोर वाढत होता, आम्हांला ओव्हरटेक करून अनेक गाड्या सुसाट पळत होते. रात्रीचे बारा वाजत आले होते, आम्ही वर्ध्याच्या जवळपास आलो होतो, तरी पाऊस चालूच होता. एक लाल रंगांची मारोती कार आम्हांला ओव्हरटेक करून वाऱ्याच्या गतीने पुढे गेली. एक-दोन किमी काय पुढे गेली, ती लाल रंगांची कार रस्त्यावरच अक्षरशः पलटी झाली होती. मी ते दृश्य पाहिलं, माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ड्रायव्हरने बाजूने वळण घेत पुढे जाऊन गाडी थांबविली. मध्यरात्रीची वेळ, पाऊस जोरात चालू होता, मदतीला कोणीच नाही. मी गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात तोवर ड्रायव्हर म्हणाला, " सर, उतरू नका " मी म्हणालो, " गाडीचा अपघात झालाय, त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे." यावर तो ड्रायव्हर त्याला आलेल्या अनुभवावरून मला समजावित म्हणाला, " तुम्हाला लग्नाला जायचं नसेल तर खाली उतरा, यांना मदत करण्यात आपणच अडकून पडलो तर ..." पण माझे मन तयार होत नव्हते. काही वेळ गेला असेल, ड्रायव्हर म्हणाला, " सर, आपण असं करू या, वर्धा शहर 20 किमीवर आहे. आपण तेथील पोलिसांना कल्पना देऊन पुढे जाऊ या." ड्रायव्हरचे हे म्हणणे पटले, तोपर्यंत गाडीतील सर्व मित्र जागी झाले. आम्ही पुढे निघालो. पाच किमी पर्यंत गेलो की नाही समोरून पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी आम्हाला दिसली. जीपचा लाईट दाखवून त्यांना थांबण्याचा इशारा ड्रायव्हरने केला. तशी गाडी आमच्याजवळ येऊन थांबली. ड्रायव्हरने रस्त्यावर घडलेला प्रसंग सांगितला. लागलीच ती पोलिसांची गाडी सायरन वाजत निघून गेली. त्या गाडीचा अपघात मी डोळ्याने पाहिल्याने माझी तर झोपच उडाली. सर्व मित्र देखील जागे झाले. अपघाताची चर्चा होऊ लागली. ड्रायव्हरने त्याच्या जीवनात पाहिलेले अपघात सांगितले. आपण उगीच एवढ्या उशिरा रात्री प्रवासाला निघालोत याची काळजी वाटू लागली. कोणाच्याच घरी लग्नाला जात आहोत याची खबर दिली नव्हती. अनेक प्रश्न मनात घोळत होते. दीड-दोन तासांनी म्हणजे दोन-अडीच वाजता मित्राच्या घरी पोहोचलोत. त्या मित्राला आम्ही आल्याचा खूप आनंद झाला. मात्र माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. सकाळी मित्राचे लग्न वाजत-गाजत धुमधडाक्यात संपन्न झालं. दुपारी जेवण झाल्यानंतर आज रात्रीचा प्रवास टाळायचा म्हणून लवकरच परतीच्या प्रवासाला निघालोत. येतांना ती लाल कार रस्त्याच्या बाजूला केलेली दिसली. पण आज ही रात्रीचा प्रवास आणि पाऊस असला की मला हा प्रसंग आठवतो आणि अंगावर काटे उभे राहतात. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Action