मी आहे ना ...!
मी आहे ना ...!


होय, माणसाच्या मनात २४ तासात साठ हजार विचार येतात त्यापैकी ७० टक्के विचार भयावह व नकारात्मक असतात. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणूस विचार करतो. आज काम पूर्ण होईल की नाही ? याची अनामिक भीती मनात घर करून राहते. व्यक्ती परत्वे भीती बदलत राहते. विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती, ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना बॉसची भीती, महिलांच्या मनात वेगळीच भीती. मुळात ही भीती आपल्या मनात लहानपणापासून बिंबवले जाते. अगदी लहान बालकांना उगीचच त्यांच्या मनात भीती निर्माण केल्या जाते. शोले चित्रपटातील एक डॉयलॉग आजही आठवते त्यात गब्बर म्हणतो, ' पचास पचास कोस दूर पर जब बच्चा रोता है तो माँ कहती है, बेटा सो जा वरणा गब्बर आ जायेगा ' म्हणजे मुलांच्या मनात अनामिक भीती घालण्याचे काम नकळत आपल्याकडून घडते. जे की त्या मुलाच्या मनात चिरकाल टिकून राहते. ज्या विषयी मनात भीती निर्माण झाली त्याची अजून जास्त भीती वाटते. लहान असतांना घरातील मंडळी आम्हा लहान मुलांना म्हणायचे की, तिकडे चिंचेच्या झाडाकडे जाऊ नका, तेथे भूत आहे. बस्स त्या झाडावर भूत आहे म्हटल्यावर तिकडे कधी जायचेच नाही आणि यदाकदाचित गेलोच तर त्या झाडाजवळ गेलं की मनात उगीच भीती निर्माण व्हायचं. अंधारात चालायला आज ही भीती वाटते. कुणी सोबत असेल तर ठीक अन्यथा तोंडात रामनामचा जप आपोआप चालू होतो. मनात असलेल्या या भीतीमुळे देवाचे नामस्मरण नकळत येते. संकटे कितीही येवो त्यास न भीता त्याचा सामना करणारे जीवनात यशस्वी होतात. असे म्हटले जाते ' डर के आगे जीत है '.
व.पु. काळे यांच्या शैलीत बोलायचं झालं तर ते म्हणतात की, “वार झेलायला उभं राहीलं, की मारणार्याचं बळ जातं ”. वार न झेलता भित्र्या भागूबाईसारखे पळायला लागलो तर शत्रूचे बळ आणखीन वाढते. तानाजी धारातीर्थी पडल्यावर आपल्या सहकारी मावळ्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सूर्याजी म्हणाले होते, खिंडीचा दोर कापलेला आहे तेव्हा एक तर लढा किंवा मरा असे म्हटल्यावर सारे मावळे शत्रूवर तुटून पडले कोंढाणा जिंकला. मावळयाच्या मनातील भीती संपविणे गरजेचे होते. शोलेमध्ये गब्बरसिंग जीवनाचे सार सांगुन गेलेत, “जो डर गया, वो मर गया” खरंच आहे ते. भुतांच्या गोष्टी ऐकून आपले मुलं अजून डरपोक होतात. म्हणूनच आपल्या लेकरांना साहसी बनविण्यासाठी शूरवीरांच्या गोष्टी सांगायचे, धाडसी लोकांचे वर्णन ऐकू घालायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांची आई रामायण व महाभारतातील शौर्याच्या गोष्टी सांगत असे म्हणूनच बाल शिवाजीच्या मनात स्वराज्य स्थापनेची ताकद निर्माण झाली. आपल्या मुलांच्या मनात एखाद्या गोष्टीविषयी भीती निर्माण करण्याऐवजी त्याची सत्यता सांगावी म्हणजे भीती निर्माण होण्याच्या ऐवजी आत्मविश्वास निर्माण होईल. ज्याप्रमाणे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सांगतात ' भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.' त्यामुळे भक्त प्रत्येक संकटाला बेधडकपणे सामना करतात. प्रत्यक्षात तिथे स्वामी समर्थ असतात किंवा नाही याची कल्पना नाही मात्र आपल्या मनात जो आत्मविश्वास निर्माण होतो, त्याचमुळे हे सारे शक्य होते.
आपल्या घरातील सर्वच सदस्यांना स्वामी समर्थांसारखे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास दाखविल्यास ते प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. मी आहे ना ....! एवढं तीनच शब्द आपल्या सहकार्यांना काम करण्याचे बळ निर्माण करतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात आणि मनातील भीती घालवितात.