बालपण
बालपण
आज मी जेव्हा मोठा झालो आणि मागे वळून पाहतो तर मला लहानपणीचे ते सारेच दिवस जशास तसे आठवतात. माझे बालपणीचे मित्र आणि त्यांच्या सोबत केलेली धिंगामस्ती आठवले की आज ही वाटते की परत एकदा लहान व्हावे आणि पुन्हा पुन्हा तेच करावे. बाबांचा राग आणि आईची माया आज नाही पहायला मिळत. क्रिकेट खेळायला जाऊ नको अशी बाबांची तंबी असायची तरी सुध्दा क्रिकेट खेळायला जायचो आणि मागच्या दाराने हळूच घरात प्रवेश मिळवायचा. बाबांना ही बातमी कळू नये ही विनंती अर्थातच आईजवळ असायची. क्रिकेट खेळाबरोबर विटीदांडू, गोट्या खेळण्याचा ही खूपच नाद होता त्यामूळे अभ्यासाचे तीन तेरा होत होते ती गोष्ट वेगळी. माझी खोडी काढणारी आणि माझ्या मागे अभ्यास कर म्हणून सतत पिरपिर करणारी माझी छोटी ताई. तिच्यामुळे मी नाईलाजाने अभ्यासाला बसायचो कारण ती मला बाबांना सर्व सांगते म्हणून भीती घालत होती. मी शाळेत जायला शिकलो तिचा हात धरूनच. एके दिवशी शाळेत गुरुजींनी एका मुलाला छड़ीने खूप मारले, त्याची पँट ओली झाली. हे जेंव्हा मी पहिलो आणि शाळेत जाणार नाही म्हणून घरीच रडत बसलो त्यावेळी माझ्या ताईनेच मला ओढत शाळेत नेल. कदाचित तिने जर मला त्यादिवशी असे केले नसते तर मी शाळा शिकलो असतो की नाही हे मला माहीत नाही. लहानपणी मला फक्त एकच ध्यास ते म्हणजे खेळणे. गल्लीमध्ये माझ्याच वयाची पोरांची संख्या भरपूर होती त्यामूळे खेळण्यासाठी कुणाला शोधण्याचे गरज पडत नव्हते. रविवारचा पूर्ण दिवस क्रिकेट खेळण्यात जायचं. बाजूच्या गावाचा क्रिकेटचा संघ कधी आमच्याकडे यायचा तर कधी आमचा संघ त्यांच्या गावाकडे जायचो. त्यावेळी सायकल खूप कमी होते त्यामुळे चालत आणि पळत जाण्यात खूप मजा यायची. शाळेला सुध्दा असेच चालत पळत जावे लागायचे. आमचे काही मित्र शाळा बुडवून चित्रपट पहायला जायचे आणि शाळा सुटणार त्या वेळेला आमच्या सोबत घरी परत यायचे. माझी कधी हिम्मत झाली नाही तसे करण्याची परंतु मित्राच्या आग्रहाखातर मी एक - दोनदा गेलो असेन शाळा बुडवून चित्रपट पहायला. जेंव्हा मी गेलो तेंव्हा मला खूप पश्चाताप व्हायचं. अपराधीपणाची भावना मनात असायची सोबतच गुरुजींची भीती सुध्दा होती. लहानपणीचा संपूर्ण काळ हसत खेळत कधी संपला हे कळलेच नाही आज जेंव्हा मागे वळून पाहतो किंवा लहानपणीचे अल्बम मधील माझे फोटो मी पाहतो तेंव्हा मला हसू येते आणि क्षणातच आसू पण येते.
आज ही वाटते की परत एकदा लहान व्हावे आणि खूप खेळावं खूप मजा करावा.
आज बालदिन त्यानिमित्ताने परत एकदा लहानपणीच्या आठवणीना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न करतांना मन हलका झाल्यासारखे वाटते.