नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

चॉकलेट हिरो

चॉकलेट हिरो

2 mins
86


माझ्या काळातला म्हणजे ऐंशी व नव्वद च्या दशकातील रोमँटिक व चॉकलेट हिरो म्हणजे ऋषी कपूर. त्याचे चित्रपट मला खूप आवडायचे. बॉबी या चित्रपटापासून त्यांनी आपल्या चित्रपट करियरला सुरुवात केली. त्याअगोदर बाल कलाकार म्हणून श्री 420 या चित्रपटात त्यांना पहायला मिळाले. त्यांनी जवळपास 92 चित्रपटात काम केले. अर्ध्या चित्रपटात ते एकटेच हिरो होते तर काही चित्रपटात सह नायकाची भूमिका केली होती. चित्रपट सृष्टीतल्या सर्वांसोबत त्यांनी काम केले होते. अमिताभ, विनोद खन्ना, कमल हसन, अनिल कपूर अश्या अनेक नायकासोबत त्यांचे चित्रपट चमकले. ऋषीकपूर आणि श्रीदेवी यांचा नगिना हा चित्रपट खूपच गाजला होता. श्रीदेवी ह्या चित्रपटात मुख्य होती तरी आपल्या अभिनयाची छाप त्यांनी पाडलीच. डिंपल कपाडिया सोबत बॉबी नंतर त्यांनी सागर हा सिनेमा केला होता. तो ही खुप गाजला. पद्मिनी कोल्हापूरे सोबत केलेला प्रेमरोग हा सिनेमा गाण्याने खूपच आवडला. जुही चावला सोबत बोल राधा बोल ने एका वेगळ्या ऋषी कपूरला पाहायला मिळाले. दिव्याभारती सोबत दिवाना, जयाप्रदा सोबत सरगम, माधुरी दीक्षित सोबत प्रेमग्रंथ, मीनाक्षी शेषाद्री सोबत दामिनी मध्ये त्यांनी लक्षात राहण्याजोगे काम केले आहे. अमर अकबर अँटनी मधील अकबरची भूमिका कोणी ही विसरू शकत नाही. श्रीदेवी सोबतचा आणखी एक सिनेमा जे की प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात राहण्याजोगा ती म्हणजे चांदणी चित्रपट. आम्ही मित्रांनी दुपारच्या शाळेला डुम्मा मारून चांदणी चित्रपट पाहण्यासाठी व्हिडिओ थिएटरला गेलोत. एक रुपया काही तरी तिकीट होते आणि मोठ्या रंगीत टीव्हीवर व्हिडिओ कॅसेट द्वारे तेंव्हा चित्रपट दाखवले जायचे. पहिलाच शो होता आणि खूप गर्दी होती. हातात पुस्तकं आणि वह्या, कोणी पाहू नये म्हणून त्याला लपविण्याचा आमचा प्रयत्न. तिकीट काढलोत आणि चांदणी चित्रपट पाहून बाहेर पडलोत. त्यादिवशी संपूर्ण दिवस आणि रात्र त्या चित्रपटातील गाणे, ऋषी कपूर आणि श्रीदेवी याशिवाय काहीच दिसत नव्हते. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलोत. एकाच वर्गातून चार पाच जण गायब झाल्यामुळे गुरुजीच्या नजरेतून आम्ही चुकलो नाही. आम्हांला वर्गात उभं करण्यात आलं. चांदणी चित्रपट पाहायला गेलेले कळल्यावर गुरुजींना अजून राग आला. त्यांनी आम्हाला खूप बोललं. आम्ही शरमेने मान खाली घालून ऐकत होतो. त्यादिवशी गुरुजींनी एवढं काही बोलले होते की, त्यानंतर शाळा बुडवून कधीच चित्रपट पाहिला नाही. पण ऋषीकपूरमुळे मी त्या चित्रपटाकडे शाळा बुडवून गेलो पण त्याच चित्रपटाने एक शिकवण दिली की, असं शाळा बुडवून कोणते कार्य करू नये. आज ऋषीकपूर हयात नाहीत. एक दिग्गज कलाकार निघून गेल्यामुळे चित्रपट सृष्टी खरंच पोरकी झाल्यासारखी वाटते. ऋषिकपूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली ....!



Rate this content
Log in