नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

आला थंडीचा महिना

आला थंडीचा महिना

2 mins
204


आला थंडीचा महिना

पावसाळा संपला की हिवाळ्याला सुरुवात होते. दिवाळीच्या सणाला हिवाळ्याची चाहूल लागते. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतांना जी थंडी वाजते ती सांगते की, चला हिवाळा महिना सुरू होत आहे. तसं पाहिलं तर हिवाळा हा सर्वांसाठी आल्हाददायक आणि आनंदी असते. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर नुकतीच शाळा सुरू झालेली असते. अश्या या थंडीत बाल गोपाळाना सकाळी लवकर उठावे वाटत नाही. बघता बघता शाळेची वेळ होते. सकाळचं कोवळं ऊन खाताना वेळ कसा निघून गेला हेच कळत नाही. उन्हात गेलं की ऊन लागते आणि सावलीत बसलं की थंडी वाजते अशी अवस्था या महिन्यात अनुभवायला मिळते. तिकडे शेतकरी देखील आपल्या शेतात रब्बी पिकांची तयारी करतो. खरीप पिके घेऊन अनेक शेतकरी थंडी पडण्याची वाट पाहत असतात. सीमेवर देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांना डोळ्यांत तेल टाकून पहारा द्यावा लागतो कारण याच थंडीचा फायदा घेऊन शेजारील शत्रू आपल्या देशात घुसखोरी करण्याची शक्यता असते. राजकारणी लोकांना देखील हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली असते. नवीन लग्न झालेले जोडपे गुलाबी थंडीची मजा घेण्यास आतुरलेले असतात. सकाळी सकाळी योगासन करणारे तसेच मोकळ्या हवेत फिरायला जाणारे यांना हे हवामान खूप अनुकूल वाटते. सकाळचा गार वारा अंगावर घेत ही मंडळी थंडीचा खरा आनंद घेत असतात. याच महिन्यात सीताफळ, पेरू व बोरं यासारखी आंबट गोड फळांचा मोसम सुरू होतो. ही फळे खाल्याने सर्दी नि खोकला लागू शकते पण ही फळे खाल्ली तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे अति न खाता ही फळे प्रमाणात खावी लागते. एकूणच हा हिवाळा महिना लाभदायी, आरोग्यदायी आणि हितकारक वाटत असले तरी याच हिवाळ्यात अनेक आजार त्रास देत असतात. विशेष करून लहान मुलांना सर्दी, पडसे आणि खोकला यासारखे आजार लवकर होऊ शकतात. म्हणून या काळात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वेटर, हातमोजे व पायमोजेचा वापर करणे गरजेचे असते. तसेच थंड पदार्थ खाणे टाळणे आवश्यक असते. वयोवृद्ध लोकांचे अनेक जुने आजार याच काळात आपले डोके वर काढतात. आला थंडीचा महिना, शेकोटी पेटवून पेटवा, मला लागलाय खोकला ह्या गाण्याची महती याच काळात कळायला लागते. 



Rate this content
Log in