नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories Others Children

माझी शैक्षणिक सहल

माझी शैक्षणिक सहल

6 mins
212


जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने शैक्षणिक सहलीत आलेला अनुभव सांगत आहे,

माझी शैक्षणिक सहल. माझे नाव माधुरी, मी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत सातव्या वर्गात शिकत आहे. आमची शाळा म्हणजे गरिबांची शाळा, होय गरिबांचीच शाळा होती. कारण या शाळेत सर्व मुले गरीब घरातील होते. कुणाचे आई-वडील शहरातल्या मोंढ्यात काम करत होते, कुणाचे आई-वडील घर बांधकाम करणारे होते, कुणाची आई कपडे-भांडे घासणारी होती तर कुणाचे आई-वडील मोलमजुरी करून जगणारे गरीब कुटुंबातील होते. त्यांच्याकडे पैश्याची चणचण होती. दुपारच्या वेळी शाळेत मिळणारी खिचडी त्यांना पंचपक्वान्न पेक्षा भारी वाटायचं. आम्हांला शिकविणारे सर-मॅडम देखील खूप चांगले होते, त्यामुळे ते कधीही आम्हांला पैश्याची जाणीव भासू दिली नाही. आमच्या शाळेत सर्वच मुलांचे वाढदिवस शाळेकडून साजरे केले जात. सर-मॅडमचा वाढदिवस देखील शाळेत साजरा होत असे आणि त्यानिमित्ताने मुलांना वही-पेन आणि खाऊ वाटप केल्या जायचं. शाळेत सातवीचा हा शेवटचा वर्ग होता. आम्ही पास झाल्यावर ही शाळा सोडून पुढील शाळेत जाणे भाग होते. आमच्या वर्गाचे जे वर्गशिक्षक होते, त्यांच्याकडे सर्व मुलांनी सहलीला जाण्याचा तगादा लावला. सरांनी मुलांना आर्थिक बाब समजावून सांगितली, एका मुलास साधारणपणे दोनशे-तीनशे रु. खर्च येईल. तुम्हा मुलांना ते शक्य नाही. तेव्हा काही मुलानी जवळील ठिकाणी सहलीला जाऊ असे सुचविले तेव्हा सरांनी परत आर्थिक बाब सांगितली. कुठेही जर जायचे ठरविले तरी शंभर रु. तरी खर्च येणारच. पैसे म्हटले की आमच्या समोर प्रश्नचिन्ह यायचे ? पण यावर्षी सहलीला जायचं म्हणजे जायचं असे आम्ही सर्वांनी ठरविलं आणि सरांना सांगितलं, " सर, आम्ही पैश्याची जुळवाजुळव करतोत, तुम्ही सहलीचे तेवढं बघा." सरांनी कसेबसे होकार दिले.

दुसऱ्या दिवशी सरांनी मुख्याध्यापका सोबत चर्चा केली आणि वर्गात सूचना आली, ' आठ दिवसानंतर आपल्या शाळेची शैक्षणिक सहल नांदेड येथील गुरुद्वारा पाहण्यासाठी जाणार आहे, तेव्हा ज्यांना या सहलीला यायचे आहे, त्यांनी दोनशे रु. आपल्या वर्गशिक्षकाकडे जमा करावे.' सूचना ऐकून सर्व मुले आनंदी झाली, एकमेकांत चर्चा करू लागली. मी मात्र गप्प बसून होते, कारण मला दोनशे रु. मिळणे खूप अवघड गोष्ट होती. सहलीला कोण कोण येणार ? म्हणून सर यादी करू लागले. सर्वांनी आपापले नाव लिहून दिले. माझे हात वर झाले नाही. सरांनी मला विचारलं, " माधुरी, तुला सहलीला यायचं नाही का ? " यावर मी नकारार्थी मान हलविली. का येणार नाही असे सरांनी मला विचारलं त्यावेळी मी म्हणाले, " माझ्याकडून दोनशे रु. देणे होणार नाही." तेव्हा सरांनी बघू या काही तरी करता येईल म्हणून यादीत माझे ही नाव घातले. सायंकाळी घरी गेल्यावर आईला सहलीविषयी विचारणा केली तर आई देखील पैश्याची अडचण सांगितली. त्यादिवशी रात्री मी चुपचाप झोपी गेले. कदाचित सहलीला जाणे होणारच नाही अशी खूणगाठ बांधून घेतली होती.

दुसऱ्या दिवशी काही मुलांनी सहलीचे पैसे जमा केले. तिसऱ्या व चौथ्या दिवशी उर्वरित मुलांनी कसेबसे करून पैसे जमा केले. तरी देखील दोन गाडीत बसू शकतील असे मुले भरती होत नव्हती. त्यावेळी शाळेने उर्वरित पाच ते सहा मुलांचे पैसे भरून सहल घेऊन जाण्याचं ठरविले, त्यात माझा ही क्रमांक होता. मला कसे तरी वाटत होते, पण सरांनी माझी समजूत काढली आणि मी सहलीला तयार झाले.

आमची सहल रविवारी सकाळी आठ वाजता निघणार होती. शनिवारी मुख्याध्यापक व सरांनी काही सूचना दिल्या. आपल्यासोबत थोडा फराळ आणि एकवेळच्या जेवणाचा डबा घेण्याचे सांगितले. त्या सूचनेनुसार आईने बेसन-भाकर आणि मुरमुरे करून दिले. सकाळी आठ वाजता आम्ही सर्वजण शाळेत जमा झालो. दोन जीप सहलीसाठी करण्यात आले होते. एका जीप मध्ये सर्व मुले आणि दोन सर होते तर आम्ही सर्व मुली आणि दोन मॅडम एका गाडीत बसलो. एकदाची आमची शाळेची सहल सुरू झाली आणि मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होते. गाडीत बसल्यावर माझ्या मैत्रिणी बोलत होत्या, मी पन्नास रु. घेतले, मी शंभर रु. घेतले असे म्हणत होते. हे खरेदी करणार, ते खरेदी करणार याची चर्चा रंगात आली होती. मी मात्र गप्प होते, माझ्याजवळ तर एकही रुपया नव्हता, त्यामुळे खरेदी करण्याचा प्रश्नच नव्हता.

मी बाहेरच्या विश्वात रममान झाले. रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे वेगात उलट्या दिशेने पळत होते, रस्त्यांवरील बोर्डावर जे लिहिलेलं दिसायचं ते वाचून काढत होते. जीपमध्ये छान गाणे चालू होते, मुलींच्या गप्पा रंगात आल्या होत्या, आमचे दोन्ही मॅडम आपल्या मोबाईलमध्ये डोके खुपसून बसले होते. आमची जीप मुदखेड ओलांडून बारडच्या दिशेला वळली. बारड येथील शीतलादेवी पोचम्माचे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार असे सांगण्यात आले. उन्हाळा चालू झाला होता तरी बारडचा परिसर हिरवेगार होता. शेतात ऊस, हळद आणि केळीच्या बागा दिसत होत्या. थंडगार वाऱ्याची झुळूक सुखावून जात होती. बारड येथील शीतलादेवी पोचम्माचे दर्शन घेतांना मन प्रसन्न झाले. मी खूप लहान असतांना येथे आले होते, याची जराशी आठवण झाली. खूप अभ्यास करून मला यश मिळू दे अशी प्रार्थना तेथे केली. त्यावेळी सकाळचे दहा वाजले असतील. कोणीही घरून काहीही खाऊन आले नव्हते त्यामुळे सर्वाना भूक लागलेलीच होती. सरांनी याच ठिकाणी जेवण्याचे सर्व मुलांना सांगितले. बारड येथे येणारे भाविक येथेच स्वयंपाक तयार करून पोचम्माला नैवेद्य दाखवून जेवण करतात. त्यामुळे जेवण्यासाठी उत्तम व्यवस्था होती. आम्ही सर्वांनी गोलाकार बसून जेवणाचा डबा उघडलो. मनाचे श्लोक म्हणून जेवायला सुरुवात केली. सर्वांनी पोटभर जेवण केलोत आणि अर्ध्या एका तासात पुढील स्थळ दाभड सत्यगणपती कडे जाण्यासाठी निघालो.

भोकर तालुक्यातील दाभड या गावात सत्य गणपतीचे मंदीर असून प्रत्येक संकष्ट चतुर्थीला भाविकांची खूप गर्दी असते आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे असे मॅडमने गाडी चालू असतांना माहिती दिली. काही वेळात आम्ही सत्य गणपतीला पोहोचलो. नवसाला पावणारा गणपती आहे म्हणून मी गणपतीला साकडं घातलं की, देवा मला खूप बुद्धी दे आणि यश दे. सरांनी तेथे देखील मुलांना काही खरेदी करू दिले नाही आणि गुरुद्वारा पाहण्यासाठी आमची जीप निघाली. नांदेड शहरात यापूर्वी ट्रेन ने आले-गेले पण शहर कधी डोळ्याखालून बघता आले नाही. त्यामुळे माझे डोळे बाहेरचे दृश्य बघण्यात व्यस्त होते. उंच बिल्डिंग, खूप सारे गाड्या आणि माणसे देखील तेवढेच बघून जरा आश्चर्य वाटत होते.

काही वेळात नांदेडच्या प्रसिद्ध गुरुद्वारा मध्ये पोहोचलो. डोक्यावर रुमाल असल्याशिवाय गुरुद्वारा मध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ओढणी डोक्यावरून खाली सरकणार नाही याची काळजी घेण्याविषयी मॅडमने अगोदरच सूचना दिली होती. पांढरा शुभ्र तो महाल आणि सोनेरी रंगाचा कळस मला भव्य-दिव्य वाटले. माणसाची गर्दी असून देखील नांदेड शहरात जो गोंगाट होता तो गोंगाट किंवा आवाज ऐकू येत नव्हता. सर्वत्र नीरव शांतता होती, त्या शांततेत पंजाबी भाषेतील भजन कानावर पडत होते. त्याचा अर्थ समजत नसले तरी आवाज खूप गोड वाटत होता. शिखांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंघजी यांच्या समाधीचे स्थळ असलेले गुरुद्वाराचे दर्शन घेतांना मन समाधान झाले. अगदी शांततेत दर्शन घेऊन आम्ही त्या परिसरात थोडा वेळ फिरलो. तेथील लंगरचा आस्वाद घेतला आणि गुरुद्वाराच्या बाहेर पडलो. मुलांना खरेदी करण्यासाठी याठिकाणी संधी देण्यात आली. ज्यांनी पैसे आणले त्यांनी खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी केली. माझ्याजवळ पैसे नसल्याने मी बाहेरच एका बाकड्यावर बसून राहिले. आमचे मॅडमचे लक्ष माझ्यावर गेले, त्यांनी मला जवळ बोलावून घेऊन काहीतरी विकत घेण्याचे सांगितले. पैसे नाहीत असे म्हटल्यावर मॅडमने काही हरकत नाही, घे तुला जे हवं ते. मला मग मॅडमने कानातले रिंग घेऊन दिले. सरांनी सर्वाना उसाचा रस पाजविले. मग आमची जीप काळेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी निघाली. गोदावरी नदीच्या काठावर विष्णुपूरी गावाजवळ प्रसिद्ध असे महादेवाचे हेमाडपंथी काळेश्वर मंदीर आहे. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा सण होता, त्यामुळे तेथे जोरात तयारी चालू होती. काळेश्वर चे दर्शन घेऊन तेथे असलेल्या अथांग पाण्याकडे वळलो. तेथे एक होडी होती. एका मुलास तो पन्नास रु. म्हणत होता पण सरांनी तडजोड करून प्रत्येकी 20 रु. प्रमाणे बोलून आम्हा सर्वांना त्या होडीत बसविले. विष्णुपुरी जलाशयात मधोमध पर्यंत घेऊन जाऊन त्यांनी परत आणले. होडीत बसण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. खूप मजा आली. सायंकाळचे सहा वाजता आमची जीप परतीच्या प्रवासाला निघाली. दिवसभर फिरून फिरून सारेच जण थकून गेले होते. त्यामुळे गाडी सुरू होताच सारेच पेंगू लागले, माझ्याही डोळ्याला डोळा कधी लागला हे कळलेच नाही. सायंकाळी आठ वाजता आमची सहल परत आमच्या शाळेत आली आणि आम्ही घरी गेलो. त्यादिवशी माझ्याकडे एकही रुपया नसताना देखील माझी शैक्षणिक सहल आनंदात संपन्न झाली त्यामुळे माझ्या शाळेचा, माझ्या शिक्षकांचा मला खूप अभिमान वाटला. अशी सहल पुन्हा अनुभवायला मिळालेच नाही.


Rate this content
Log in