नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

सहल

सहल

3 mins
132


सहल म्हटले की ते शाळेतील दिवस अजुन ही आठवतात. सर वर्गात सहलीची सूचना देतात की अमुक तारखेला सकाळी सकाळी आपणास सहलीला जायचे आहे. ज्याना कुणाला यायचे आहे त्यांनी अमुक तारखेपर्यंत नांव कळवा. ही सूचना ऐकून घरी जायचो आणि आई बाबांच्या परवानगीची वाट पहायची. परवानगी मिळाली की काय आनंद व्हायचा की फक्त उडी मारणे तेवढे बाकी राहायचे. सहलीला जाण्यासाठीच्या यादीत एकदाचे नाव समाविष्ट करायचो आणि सहलीला जायची तयारी करायचो. सहलीचा दिवस जवळ येईपर्यंत मनाचा उत्साह भरभरून असायचे. सहलीला जाण्यासाठी काय काय सामान घ्यावे याची यादी करून मग आपली बैग तयार ठेवायची. अखेर सहलीचा दिवस उजडायाचा आणि एकदाचे सहल आनंदात संपन्न व्हायची.

पण आज ही सहल म्हटले की ह्या तीन प्रश्नाची उत्तरे शोधत रहावी लागतात आणि त्याचे उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत सहलीचे महत्व वाटत नाही.

सहल का काढावी ?

बऱ्याच वेळा सहल म्हटले की आगाऊचा खर्च वाटतो आणि शारीरिक त्रास सुद्धा किती होतो ? याचे हिशेब जुळवत बसलो तर सहल नकोसे वाटते. सहलीमध्ये वेळेवर खायला मिळत नाही ना झोपायला. त्यापेक्षा आपले घरी रहाणे बरे असे विचार करणारे सुध्दा भरपूर जण असतात. त्यांना सहल नावाची प्रक्रिया क्षुल्लक आणि वेळखाऊ वाटते. पण तसे काही नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण सहलीमुळे घरातल्यापेक्षा वेगवेगळे अनुभव मिळतात ज्याचा उपयोग पुढील जीवनात होतो. सहकार्याची भावना वाढीस लागते. सहलीत कोणी जवळ नसताना मित्रच मित्राला कश्याप्रकारे मदत करतात याचे अनुभव मिळतात त्याचे संस्कार त्यांच्यावर होतात. सकाळपासून सायंकाळ पर्यंत सोबत राहिल्यामुळे एकमेकाची आवड निवड कळते. एकमेकातील मैत्री वृधिंगत होण्यास मदत मिळते. ज्या भागात सहल जाणार आहे याची प्राथमिक माहिती सुरुवातीला गोळा केल्या जाते तर सहलीनंतर त्या स्थळाची माहिती परिपूर्ण होते. कधीही विसरणार नाही अशी माहिती या सहलीमुळे मिळते त्यामुळे प्रत्येकांच्या जीवनात सहल आवश्यक आहे.

सहलीचे नियोजन -

सहलीचे नियोजन करताना तेथील परिस्थिती आणि वातावरण लक्षात घ्यावे. उन्हाळ्याच्या दिवसात थंड हवेच्या ठिकाणी सहल काढणे योग्य राहते तर पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो सहल काढणे उचित ठरणार नाही. पावसात सहल काढताना निसर्गरम्य ठिकाणी किंवा जेथे उंचावरुन पाणी खोल दरीत पडते. अशा ठिकाणी सहल काढणे उचित ठरते. सहसा डिसेंबर, जानेवारी, आणि फेब्रुवारी महिन्यात निसर्ग सहल फायदेशीर राहते. त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढते अश्या वेळी थंड हवेच्या ठिकाणी जाणे चांगले राहिल. शाळेतील मुलांची सहल आयोजित करताना त्यांच्या वयोगटानुसार स्थळ नियोजित करावे. शक्यतो दहा बारा वर्षाच्या मुलांची सहल एका दिवसाची तर बारा ते सोळा वर्षाच्या मुलाची तीन ते चार दिवसाची सहल नियोजित करावी. सहलीमध्ये मोठ्या मुलाची आणि मुलीची वेगळी व्यवस्था केले तर योग्य राहिल. मुलींसोबत शक्यतो महिला शिक्षिका असणे पालकाना आणि मुलींना सुरक्षित वाटते. सहलीत सुरक्षेची काळजी घेणे हे ही अत्यंत महत्वाचे आहे.

सहलीची तयारी -

सहलीला जायचे म्हटले की अनेक गोष्टीची तयारी करावी लागते. आपणास सकाळपासून सायंकाळपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू सोबत घ्यावे लागते त्याच सोबत एखादा ड्रेस ही ठेवावे लागते. बॅटरी एक आवश्यक बाब आहे जे की सहलीत खूप कामाला पडते त्यामुळे ते पण सोबत घ्यावे. सहलीत खाण्याचे खुप हाल होतात म्हणून थोडा फराळ सोबत असू द्यावे म्हणजे उपासमार होणार नाही. काही औषधी गोळ्याही सोबत असावेत. या सर्व गोष्टीची काळजी घेऊन सहलीला निघाल्यास त्रास कमी होईल आणि सहलीचा आनंद स्वतः सोबत इतराना ही देता येईल.

चला तर मग सुट्टीच्या काळातील सहलीचे नियोजन तयारी करू या. जाऊ या सहलीला, आनंद लुटायला.


Rate this content
Log in