ओलावा
ओलावा
📌 दोन व्यक्तींचा एकमेकांच्या संपर्कातून जोडल्या गेलेला संबंध म्हणजे त्यांच्यातील नातेसंबंध! म्हणजे असं म्हणता येईल का कि त्यांच्यातला संपर्क टिकून असेल तर त्यांचं नातं टिकून आहे?, अन्यथा ते नावापुरतं उरलं आहे? आणि संपर्क म्हणजे देवाण-घेवाण, सर्वच कॅटेगरी मधली. आत्मिक, भावनिक, व्यावहारिक, वेळेची देखील. ती झाली की नातं जोडल्या जातं आणि ती सातत्याने होत राहिली की ते नातं टिकतं. रक्ताची नाती जोडावी लागत नाहीत पण टिकवावी ती ही लागतातच की! माणूस जन्माला येताना ती घेऊनच येतो. हळूहळू एक एक नातं उलगडत जातं. ते कसं जोपासावं हे तो नकळत शिकत जातो. कसं?, तर त्याच्या आजूबाजूच्या माणसांकडूनच! मुख्यत्वे मोठ्यांकडून. ह्याच बाबतीत नव्हे तर सर्वच गोष्टी मुलं आपल्या मोठ्यांना पाहून पाहून जास्त आत्मसात करत असतात. नुसतच पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही. कारण त्यावर बाहेरच्या संगतीचा परिणाम होऊ शकतो. पण संस्कार तुम्हाला सुज्ञ बनवतो. आणि संस्कार हे घडवावे लागतात. सांगून शिकवता येत नाहीत अथवा नुसते देता येत नाहीत. जेवढा तुमच्या संस्कारांचा पायवा मजबूत तेवढा तुमच्या भोवतालच्या विपरित गोष्टींचा परिणाम कमी. त्यापासून पूर्णपणे वाचून राहणे अशक्य आहे पण त्यासोबत कसे डील करायचे हे कळते. त्यामुळेच तर लहानपणापासून आपण ठरवत असतो ना की मैत्रीचे नाते कुणासोबत करावे आणि कुणासोबत नाही. मोठं झाल्यावर ह्याचा सर्वात जास्त कस लागतो तो पती पत्नीच्या नात्यात!!
आज समाजात पती-पत्नी नातं न टिकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मग ते लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो अथवा लिव्ह इन रिलेशनशिप असो. पर्सनल स्पेसचं महत्त्व अवास्तव वाढलं आहे. आधीच धावपळीचं झालेलं जीवन मग ह्यात वेळ कुठे उरतोय दुसऱ्यासाठी. त्यात भरीस भर स्मार्ट फोन! एकमेकांमधील संवाद आणि सहवास हरवत आहे. नात्याला गंध, स्पर्श, चव सापडत नाही आहे. संवेदना उथळ होत चालल्या आहेत. नातं बेरंगी भासायला लागलं की ते निव्वळ बंधन वाटायला लागतं. त्यामुळे रक्ताच्या नात्यांमध्ये सुध्दा तर कोरडेपणा यायला लागला आहे. निखळ मैत्री सुद्धा रुजने कठीण होते आहे.
जग हे बदलत असतं, त्यानुसार त्या त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती देखील. त्यामुळे बदलणाऱ्या नातेसंबंधांचे स्वरूप देखील आपल्याला नाकारता येणार नाही. मला वाटतं, आपण आपल्या नात्याला पुरेसा वेळ देऊन त्यातील ओलावा अबाधित ठेवण्याचा तेव्हडा प्रयत्न करत रहावा...
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना*
