माहेरघर
माहेरघर
बाबांच्या नौकरी निमित्त बऱ्याच शहरातली बरीच घरं अनुभवायला मिळाली. अनुषंगाने शेजारी आणि वेगवेगळ्या शाळाही. प्रत्येक घराशी आठवणींचा ऋणानुबंध आहे. बरेच किस्से कहाणी आहेत. जणू त्या शहरांशी नाळ जोडल्या गेलीय. बाबांनी स्वतःचं घर बांधलं नाही कधी. निवृत्ती नंतर ते आजोबांच्या घरात राहिला आले. ते आजोबांचं घर म्हणजे माझं माहेरघर. अर्थातच त्या घराचं अन् माझं नातं माझ्या मनाच्या विसाव्याचं! पण त्याचे अनेक पैलू आहेत खरं तर. मी लहान असताना आई गरोदर & बाबांची बदली झाली. बाबांनी आम्हाला आजी आजोबांकडे ठेवलं. मला तिथल्या शाळेत घातलं. माझा भाऊ जन्माला आला. काही महिन्यांचा झाल्यावर आई त्याला घेऊन बाबां सोबत गेली. बाबांची परत लवकरच दुसऱ्या शहरात बदली होणार होती. माझ्या शाळेत सारखा व्यत्यय नको म्हणून मला आजी आजोबांकडेच ठेवलं. लहानपणापासून सणवार, उन्हाळा, सुट्यांमध्ये जायचो म्हणा त्या घरी. पण आता त्या घराशी माझी गट्टी पक्की व्हायला सुरवात झाली. वर्षभरात बाबांची परत बदली झाली आणि मग ते मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. सुट्यांमध्ये येणे जाणे चालायचेच. काही वर्षांतच आजी वारली. आजोबांचा हट्ट म्हणून बाबांनी परत आम्हाला त्या घरी ठेवले & ते अप-डाऊन करायचे. घराशी गट्टी होतीच पण त्या उमलत्या वयात माझ्या अप-डाऊन चा ते घर साक्षीदार बनलं. बारावी नंतर आर्किटेक्चर साठी बाहेर पडले. पण त्या घराची ओढ अशी की थोडे दिवस झाले नाही की मी निघाली त्याला भेटायला, त्याच्या कुशीत विसावयाला. ते ही मला बघून खुश होत असेलच. आताही होत असेल, मला तिथे गेल्यावर माझ्या कोशात शिरताना पाहून. ते माझ्या मनाच्या सर्वात जवळ असलेलं घर. त्यानेच तर जवळून बघितलंय मला निरागस हसतांना, मला मोठं होताना, मला बदलताना, मला कुढत रडतांना, माझे गुपित दडवतांना आणि मला परिपक्व होताना. ते आता मोडकळीस यायला झालंय. त्याच्या रीडिवेलप्मन्ट चं चाललंय. गरजेच आहे. मीच बघतेय तो कारभार. पण का कुणास ठाऊक मनाला कुठेतरी रुखरुख लागलीय त्याचं रूप पालटण्याची. आजोबांची इच्छा होती माझं लग्न त्या घरातून व्हावं. पण सासरचे तयार झाले नाहीत. त्या घराची देखील इच्छा अपूर्ण राहिली असेल का!?...
