Pandit Warade

Horror Tragedy Thriller

3  

Pandit Warade

Horror Tragedy Thriller

मला काही सांगायचंय-६

मला काही सांगायचंय-६

4 mins
191




    वेणूची परीक्षा संपली. तिला घेऊन बकुळा गावी आली. चार आठ दिवस कुणीही तिला लग्नाबद्दल किंवा आत्याचा मुला बद्दल काहीही विचारले किंवा सांगितलं नाही. तिचे पेपर्स, अभ्यास याबद्दलच चर्चा व्हायची. आबा, आप्पांनी घरात सर्वांना याबद्दल सांगूनच ठेवलं होतं. त्यांच्या शिवाय कुणीही ही गोष्ट वेणू किंवा बकुळा जवळ बोलायची नाही. असा हुकूमत होता त्यांचा. त्यामुळं कुणी काही सुद्धा बोलत नव्हतं. पण म्हणतात ना, स्त्रियांच्या पोट कुठलीही गोष्ट जास्त काळ राहू शकत नाही. एक दिवस काकूनं (एकनाथरावची पत्नी) बकुळा जवळ विषय काढलाच.

     "ताई, तुम्हाला काही कळलं का?"

      "काय गं? काय झालं?" सारं काही माहीत झालेलं असूनही बकुळानं काहीच माहीत नसल्या सारखं दाखवलं.

     "अहो, जरा आसं जवळ या जरा. भिंतीलाही कान असू शकतात म्हटलं." काकू अगदीच हळू आवाजात बोलत होती.

    "वन्स आल्या होत्या आपल्या वेणूला मागणी घालायला."

    "क्काय?" अगदीच काही माहीत नसल्याचं दाखवत बकुळा जवळ जवळ ओरडलीच.

    "होय. वेणूला सून करून घेते म्हणत होत्या. आबा, आप्पांनी होकार सुद्धा दिला." काकू सांगत होती.

    "जीजा, काका, हे काहीच बोलले नाहीत का?बकुळानं विचारलं.

     "त्या दोघांच्या समोर यांचं काय चालतं? वेणूला विचारल्या शिवाय काही करू नका म्हणून सांगितलं काकांनी. म्हणून जरा थांबलंय." काकूंनी स्पष्ट केलं.

    बकुळानं जीजां जवळ हा विषय काढलाच. तेव्हा आबा, आप्पा यांच्या पुढं कसं जाता येईल असं म्हणत त्यांनी विषय बाजूला टाकला.

   एक दिवस संध्याकाळी जेवणं आटोपल्यावर सर्वजण एकत्र बसले असता आबांनी वेणूच्या लग्नाचा विषय काढलाच.

    "मला एवढ्या लवकर लग्नच करायचं नाही." असं म्हणत वेणू तिथून उठून झोपायला निघून गेली.

    "एखादा चांगला मुलगा बघून करून टाकावं लग्न. आता किती दिवस शिकवायचं. वयात आलेल्या मुलीला किती दिवस घरात ठेवता येईल? एक ना एक दिवस तिला सासरला जावंच लागणार आहे. एखादा सुंदर, श्रीमंत, सालस, सुसंस्कृत मुलगा बघावा आणि करून टाकावं लग्न." मोठीमाय (आबांची पत्नी) म्हणाली.

   "मुलगा सगळ्यांच्या पाहण्यातलाच आहे. आपला सुरज. ताईचंही मन आहे. तिलाही वाटतं नातं नवं जुनं करावं म्हणून." आबांनी स्पष्ट केलं.

   महिला मंडळ आणि काका यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु आबा आणि आप्पा यांच्या पुढं कुणाचं काहीच चालत नव्हतं. तरी पण वेणूच्या होकारा शिवाय काही करू नये यावर सर्वजण ठाम होते.

    दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रखमा माहेरी आली. जेवणं झाल्या नंतर सर्वांना एकत्र करून तिने तो विषय काढला. वेणूने तेव्हा खूप गोंधळ घातला. 'मला लग्नच करायचं नाही, मनाविरुद्ध लग्न करून दिलंच तर मी माझ्या जीवाचं काही तरी बरं वाईट करून घेईन.' अशी धमकीच दिली. असं म्हणत तिने ठामपणे नकार दिला आणि तिथून निघून गेली. तिच्या मनाविरुद्धचा निर्णय तिच्यावर लादायला कुणीही तयार होऊ शकत नव्हतं.

   "पोरगी फारच डोक्यावर चढवून ठेवली." असं म्हणत अपमानित होऊन रखमा रागाने पाय आपटत तिथून निघून गेली.

   काकू वेणूच्या खोलीत येऊन तिला शांत करण्याच्या हेतूने तिच्या जवळ बसली.

    "वेणू, बाळ, जीवाचा असा त्रागा करून घेऊ नकोस. सर्व काही ठीक होईल." काकू तिला शांत करत होती.

    "काकू, तुम्हीही एक स्त्री आहात. स्त्रीला काही भावना असतात, तिची काही मानसिक भूक असते, शारीरिक भूक असते, हे पुरुषांना का कळत नाही गं? काकू, खरंच सांग सुरज माझ्या लायक आहे? माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तो. शिवाय शरीराने तरी धष्ट पुष्ट आहे का? मी कशी सुखी होईन त्याच्या बरोबर?" आणि ती काकूंच्या कुशीत तोंड खुपसून रडायला लागली. काकू तिच्या पाठीवर हात फिरवत राहिली.

    "रडू नकोस बाळ, मी आणि काका, ताई सर्वजण आहोत ना तुझ्या पाठीशी. आम्ही आबा, आप्पांना समजावून सांगू." काकू समजावत होती. परंतु मनात साशंक होती, 'आबा ऐकतील आपलं?' ही शंका मनात होतीच.

   घरातले सर्व वातावरण दूषित झाले होते. कुणीच कुणाशी मनमोकळं बोलत नव्हतं. काळजीने सर्वांचे चेहरे काळवंडले होते. तशातच एक दिवस राहुल घरी आला. त्याने आदराने सर्वांना वाकून नमस्कार केला. येण्याचे कारण विचारल्यावर सरळच वेणूला मागणी घातली.

   राहुलने वेणूला मागणी घातल्यावर आबांना, आप्पांना खूप राग आला. त्यांनी त्याला खूप अपमानित करून घराबाहेर हाकलले. अपमान होऊनही राहुल अगदी शांतपणे परत निघून गेला. ते पाहून वेणूचा अगदीच तिळपापड झाला. तिने सर्वां समक्ष आबा, आप्पा, जीजा यांना नाही नाही ते बोलून घेतले.

     ग्रामीण भागात अद्यापही पुरुष प्रधान संस्कृती आहे. महिलांच्या विचारांना कुणी जुमानतच नाही. महिलांच्या विरोधाला कुणीच भीक घातली नाही. तणावग्रस्त वातावरणात एक दिवस अचानक वेणू विहिरीत पडल्याची बातमी गावभर पसरली. सारा गाव हळहळला.

.             **

   "काका, खरंच सांगा, माझं काय चुकलं? मी केलेली अपेक्षा खोटी होती का? एवढी छोटीशी अपेक्षा पूर्ण हाऊ नये का? मी एकुलती एक असतांना ही स्थिती आहे तर जिथे चार पाच मुली असतील त्यांच्या मनाचा कोण विचार करत असेल? अशा किती तरुणी बळी जातील या व्यवस्थेच्या? या खोट्या प्रतिष्ठेच्या गोष्टी किती दिवस उराशी धरून बसतील हे लोकं?" वेणू तावातावाने बोलत होती. एकनाथराव ओशाळल्यागत ऐकत होते.

    "काका, मुलींनाही काही मन असतं, भावना असतात. याचे भान ठेवले पाहिजे. मला मान्य आहे, कोणतेही आई वडील मुलीचे वाईट करू इच्छित नसतात. पण खरंच चांगलं वाईट काय याचा विचार नसलेले, खोट्या अहंपणात डुंबलेले लोकं मुलीचं काय चांगलं करू शकतील? कधी तरी याचा विचार केला पाहिजे. घराण्याची अब्रू, प्रतिष्ठा या काही जीवा पेक्षा मोठ्या नसतात. हे ध्यानात घेतले पाहिजे. सर्वच गोष्ठी मोठेपणाच्या आड दडवल्या जात नसतात. मुलींना पूर स्वातंत्र्य द्या असं मी म्हणत नाही. परंतु तिच्या भावनांची कदरही करा. तिचं हिट केवळ पैशात, संपत्तीत नसतं तर तिलाही मन आहे, भावना आहेत, आवड निवड आहे. या सर्वांची सांगड घालून योग्य तो निर्णयब घेतला गेला पाहिजे." वेणू बोलत होती. एकनाथांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. अ

    "बाई, तू म्हणत्येस ते सारं खरं आहे. तू तुझ्या अन्यायाचा बदला घेतलास. अजून काही बाकी आहे का? मी अजून बाकी आहे. माझंही काही चुकलं असेल तर नक्कीच शिक्षा दे मला." भारावलेल्या स्वरात एकनाथ बोलत होता.

   "नाही काका, पुढं आणखी काही तरुणी या प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेपायी बळी जाऊ नये म्हणून माझे हे विचार तुमच्या समोर मांडायला मी या रुपात तुम्हाला भेटायला आले होते. माझ्या मनात असलेला गोंधळ कमी व्हावा, या साठी मनमोकळं करायला आले होते. माझे कार्य संपले आता. मला निघायला हवं आता." असं म्हणून परकर पोलक्यातली वेणू अचानक अदृश्य झाली.

******** समाप्त ******



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror