मला काही सांगायचंय-४
मला काही सांगायचंय-४
मला काही सांगायचंय- ४
एकनाथला पाच वर्षांपूर्वीची आबांच्या मृत्यूची घटना डोळ्या समोर स्पष्ट दिसत होती. आबांच्या मृत्यूच्या घटनेच्याच वेळी एकनाथला या घराण्याच्या अधोगतीचा काळ आलेला दिसत होता. त्याला कारणही तसेच होते. आबांच्या मृत्यूच्या पाच वर्षे अगोदर, चौघा भावां मिळून एक असलेल्या, एका निष्पाप बलिकेचा वध, खोट्या प्रतिष्ठेपायी, धनाच्या लोभापायी, केला गेला होता. तिची काही एक चूक नसतांना, तिच्या मनाविरुद्ध होत असलेल्या लग्नाला तिने विरोध केला होता म्हणून, घराण्याचे नाव खराब होईल म्हणून, तिचे बंड मोडीत काढून तिला मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली होती. ज्या हातांनी तिला सजवून, पतीच्या घरी जाण्या साठी निरोप द्यायला पाहिजे होता, त्या हातांनीच तिला या जगातून कायमचा निरोप दिला होता. त्यावेळचे तिचे ते रुदन, ते कळवळणे, एकनाथला डोळ्या समोर स्पष्ट दिसत होते. त्याचे संवेदनशील हृदय विदीर्ण होऊन फाटत होते. तिच्या मुखातून तळतळाट भरलेले ते शब्द अगदी स्पष्टपणे आठवत होते. ....
किती करा वार तुम्ही, मला करा ठार तुम्ही
जायची ती गेली अब्रू, कशी टाळणार तुम्ही?
प्रतिष्ठेचे भूत मोठे, डोक्या वरती बैसले
घात हा निश्चित आहे, कसा रोखणार तुम्ही?
एकनाथांनी तेव्हाच ताडले होते, आता आपल्या घराण्याची अधोगती निश्चित आहे. त्यानंतर दरवर्षी छोट्या मोठ्या घटना घडत गेल्या.
पहिल्याच वर्षी त्यांची भली मोठी, खूप दूध देणारी गाय एका साधरणशा आजाराने मरण पावली. दुसऱ्या वर्षी विहिरीचा एका बाजूला कठडा कोसळला. पाण्यात खूप माती पडली. दोन तीन मोटारी लावून पाणी उपसून गाळ काढावा लागला होता.
एका वर्षी विहिरीचे पाणी अचानक गायब झाले. उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी देणारी विहीर जानेवारी मध्येच आटून गेली. परिणामी रब्बीच्या पिकाला पाणी कमी पडले. पीक पाण्या अभावी वाळून गेले. एकनाथांनी आबा आप्पांना बोलून दाखवले,
"विहीरीचे पाणी आपोआप गेलेले नाही. याच विहिरीत आपण वेणूला मारून टाकले होते. तिचे भूत इथून पुढे आपल्याला अशाच प्रकारचा त्रास देणार आहे. "
"गप बस. तुझं आपलं काही तरीच वेगळं असतं. भूत वगैरे काहीच नसतं. माणूस मेला की संपला. त्याचं मागं काहीच शिल्लक राहत नाही. भूत प्रेत हे सारं काही माणसाच्या भित्र्या मनाच्या कल्पना आहेत." आबा म्हणाले होते.
"हो नाहीतर काय? जमिनीतल्या पाण्याला कुठे तरी रस्ता मिळाला की ते निघून जातं. जसं गेलं तसं ते परत येऊ शकतं." असं म्हणत आप्पांनी ही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही असं समजून एकनाथ ने मौन राहणेच पसंत केले होते.
अशाच छोट्या मोठ्या घटना घडत गेल्या, नुकसान होत गेले. परंतु आबा, आप्पा, जीजा यांच्या वर काहीच परिणाम झाला नाही. वेणूच्या हत्येमुळे हे सारे घडत आहे हे मानायला आबा, आप्पा, आणि जीजा बिल्कुलच तयार नव्हते. आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
एक दिवस आबा शेतात काम करत होते. आप्पा, जीजा आणि एकनाथ सुद्धा होते. परंतु ज्वारीचे खळे झाल्यामुळे ज्वारीच्या पोत्यांची एक गाडी भरून दिली होती. ती रिकामी करून आणण्या साठी या तिघांनाही घरी पाठवून आबा एकटेच शेतात थांबले होते. राहिलेले ज्वारीचे पोते शिवून ठेवायचे होते, गाडी परत येईपर्यंत. दिवाळी एक दोन दिवसावर आलेली होती. दुसऱ्या दिवशी दिवाळीचा बाजार करायचा होता. सर्वां साठी नवीन कपडे आणि फटाके आणायचे बाकी होते. वेणू गेल्यावर सुरुवातीची दोन वर्षे तर दिवाळीच साजरी केली नव्हती. मागच्या दोन वर्षांपासून मात्र कशी का होईना दिवाळी साजरी करायला सुरुवात केली होती. आबा मनाशीच दिवाळी बाजाराचा हिशेब करत होते, पोते शिवायचे कामही सुरू होते. दिवस पूर्णपणे बुडाला होता. अंधाराचे साम्राज्य पसरायला सुरुवात झाली होती. आबा आपल्याच धुंदीत पोते शिवत होते. तेवढ्यात....
एक हलकासा गारठा भरलेला हवेचा झोत आला. त्याबरोबर एक मंदसा सुगंध चहूकडे पसरला. आबांनी आजूबाजूला बघितले. वातावरणात अचानक बदल झाला होता. काळोख वाढला होता. आबांना काय होतंय ते कळेना. आपण शेतात आहोत हेही ते थोडक्यात विसरायला लागले होते.
"आबा, घरी नाही का चालायचं? किती उशिरापर्यंत काम करायचं आता?" आपल्या लाडिक आणि मंजुळ आवाजात आवाज देत वेणू आली होती. तिने छानसे, हिरव्या रंगाचे परकर आणि पोलकं घातलेले होते. आबा तिच्या कडे पहातच राहिले. आपण आपल्या हाताने तिला विहिरीत टाकल्याचेही ते विसरले. त्यांच्या मनाला भुरळ पडल्या सारखे झाले होते. ते एकटक नजरेने वेणू कडे पहात होते. आज तिचे रूप फारच लोभस दिसत होते.
"आबा, चला ना. घरी नाही का चलायचं? सर्वजण जेवायला वाट पाहताहेत तुमच्या. आज दिवाळीची पहिली अंघोळ आहे ना. सर्वांची अंघोळ झाली, तुम्हीच बाकी आहात. चला, मी छान पैकी सुगंधी उटणे आणले आहे तुम्हाला लावायला." तिचा प्रेमळ आवाज.
"खरं की काय? म्हणूनच हा सुगंध येतो वाटतं? मी तरीच म्हणालो की, हा सुगंध कोठून येतोय? मी विसरलोच होतो पहिल्या अंघोळीचं. बरं झालं तू आलीस." असं म्हणत त्यांनी अंगातले बाजूला काढून ठेवलेले कपडे अंगावर चढवले. आणि पायात बूट घालून तयार झाले.
"चला आबा, आज मी माझ्या या हातांनी माझ्या आबांना उटणे लावून अंघोळ घालणार. अशी अंघोळ की, सर्वजण जन्मभर विसरणार नाहीत. चला." आणि ती पुढे निघाली सुद्धा. तिच्या मागे आबाही एखाद्या आज्ञाधारक मुलासारखे चालत निघाले.
"आबा, मला दिवाळीसाठी नवीन ड्रेस आणला की नाही अजून?" तिचा एक सहज प्रश्न.
"अगं, उद्या बाजारला जायचंच आहे. अस्सा झक्कास ड्रेस आणतो माझ्या छकुली साठी की इतरांनी पहातच राहावं." आबाच्या हृदयात प्रेम मावत नव्हतं.
"आबा, तुमच्या साठी पण नवीन कपडे घ्यायला लागतील आता नाही का?" वेणूच्या या प्रश्नावर आबा थोडेसे चमकले परंतु दिवाळी मुळे ती असं म्हणत असेल असे वाटून ते चूप बसले.
नंतर बराच वेळ कुणी कुणाशी बोलत नव्हतं. ती पुढे अन् आबा मागे असा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. रस्ता घराकडे न जाता विहिरीकडे जातोय याचंही भान त्यांना राहिलं नव्हतं.
बराच वेळ चालत ते त्यांच्या विहिरी पाशी आले होते.
"आबा, विहिरीत पाणी कितीक आहे हो. अंघोळीसाठी ताजं पाणी काढावं म्हणते मी." तिची ही सूचना आज्ञा समजून आबा विहिरीच्या काठावर उभे राहून आत डोकावू लागले. ते जसे काठावर उभे राहिले. तसा वेणूचा अवतार बदलू लागला. चेहरा भयावह बनत चालला. डोळे अंगार ओकू लागले. मान गरगर चहू बाजूंनी फिरू लागली. हात लांब होत गेले. हाताचे पंजे हळू हळू त्यांच्या गळ्या भोवती आवळल्या जाण्या साठी त्यांच्या कडे लांबवले गेले. एका क्षणात तिचे राकट हात त्यांच्या गळ्या भोवती आवळले गेले. या अचानकच्या हल्ल्याने आबा बावरले. त्यांनी मागे वळून पाहिले. मागे वेणू वेगळ्याच रुपात दिसली अन् ते एकदम दचकले. त्यांनी मागे फिरायचा प्रयत्न करून पाहिला.
"आबा, काही फायदा नाही आता. निमूटपणे विहिरीत उडी मारायची. मला असंच ढकललं होतं ना? आठवतं का आबा काही? पाच वर्षांपूर्वी आप्पांनी आपल्या हातांनी माझा गाला आवळला आणि तुम्ही मला पाण्यात फेकलं. तसंच आज तुम्हाला मी पाण्यात फेकणार आहे." तिने आबांच्या गळ्यावरचे हात सोडले आणि कमरेभोवती विळखा घातला. एका झटक्यात तिने आबांना आपल्या कडे ओढलं. त्यांच्या छातीवर एक चुंबन घेतलं. तिने चुंबन घेतलं त्या जागी परकर पोलक्यातल्या मुलीचं चित्र त्यांच्या छातीवर उमटलं. तिने दोन्ही हातांनी आबांना उचललं. एखाद्या चेंडूसारखं उचलून धाडकन पाण्यात फेकलं. विहिरीतील पाणी पार वरपर्यंत उडालं होतं. ती मोठ्यानं हासत बाजूच्या झाडीत शिरली. तिच्या त्या भेसूर हासण्यानं क्षणभर सारं रान हादरलं.
गाडीतले पोते उतरवून घरात नीट नेटके लावून आप्पा, जीजा आणि काका परत शेतात आले. खळ्यावर आबा नव्हते. दोन पोते शिवलेले होते बाकी तसेच होते. आबा कुठं गेले असतील? हा प्रश्न तिघांच्याही मनात एकाच वेळी आला होता. परंतु आप्पा म्हणाले,
"कदाचित संडासला गेले असतील. येतीलच. तोवर आपण हे पोते शिवून घेऊ." आणि ते पोते शिवायला लागले सुद्धा. मात्र का कुणास ठाऊक जीजा आणि काकांना थोडंस विचित्र वाटायला लागलं होतं. 'आपल्याला गाडी घेऊन घरी जायला खूप वेळ झाला. आपण गाडी रिकामी करून परत आलो. एवढ्या वेळात दोनच पोते कसे शिवले जातील? आणि आबा असं अर्धवट काम सोडून कुठे जाणार नाहीत. नक्कीच काही तरी वेगळं असल्याचं एकनाथाचं अंतर्मन सांगत होतं. जीजा आणि काकांची नजरानजर झाली. तसे ते दोघेही आप्पांना म्हणाले, ...
"आप्पा, इथे काही तरी वेगळं घडलं असावं असं आमचं अंतर्मन सांगतंय. आपण आबांचा शोध घेतला पाहिजे." असं म्हणत त्यांनी हातातलं काम टाकून इकडे तिकडे पहायला सुरुवात केली. तेवढ्यात एक टिटवी कर्णकर्कश आवाजात ओरडत विहिरीकडे उडत गेली. एकनाथाने हा इशारा समजून विहिरीकडे जायला सुरुवात केली. विहिरीत डोकावून पाहताच......
"आप्पाsss, जीजाsss," असा जोरात हंबरडा फोडला. आत आबांचे प्रेत तरंगत होते. या तिघांच्या आक्रोशाने सारं रान हादरलं. आजू बाजूच्या खळ्यावर आवाज गेला. आजूबाजूचे सारे शेतकरी धावून आले. एक दोघांनी या तिघांना सावरले, बाकीच्यांनी दोरखंड विहिरीत सोडून दोघांना विहिरीत उतरायला सांगितले. कुणी बॅटरीचा प्रकाश झोत विहिरीत सोडला. अथक प्रयत्नां नंतर आबांचं प्रेत बाहेर काढण्यात आलं, दवाखान्यात नेण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात फक्त 'श्वासोच्श्वास बंद पडून मृत्यू' हे कारण निश्चित करण्यात आलं होतं. आबांच्या रूपानं पहिला बळी घेतला गेला होता. सारा गाव हळहळत होता.
क्रमशः

