Pandit Warade

Horror Tragedy Thriller

3  

Pandit Warade

Horror Tragedy Thriller

मला काही सांगायचंय-३

मला काही सांगायचंय-३

5 mins
208


मला काही सांगायचंय-३

    दहा वर्षापूर्वी आप्पांचा मृत्यू अशाच अज्ञात कारणांमुळे झाला होता. गावातल्या लोकांसाठी जरी कारण अज्ञात असले तरी एकनाथरावांना मात्र मृत्यूचे खरे कारण कळालेले होते. हे सारेच काम वेणूच्या भुताचे असले पाहिजे. या विषयी त्यांच्या मनात किंचितही किंतु नव्हता.

   आबा गेल्यानंतर घराचा कारभार आप्पा सांभाळत होते. जीजा आणि एकनाथराव (काका) शेतीतील कामधंदा पहात होते. बाजारहाट, लग्न, मौत, घेणे देणे इत्यादी सर्व कार्यक्रम आप्पा अगदी चोखपणे कुणालाही नाव ठेवायला जागा राहणार नाही याची काळजी घेत पार पाडत असत. आबांचा मोठा मुलगा शिक्षण पूर्ण करून मुंबईलाच स्थायिक झाला होता. आप्पांचा मुलगा पुण्याला तर एकनाथरावचा मुलगा नाशिकला शिक्षण घेत होता. जीजा त्यांच्या शिक्षणाला व्यवस्थितपणे पैसा पुरवत होते. वेणू गेल्यापासून त्यांचे स्वतःचे अपत्य नव्हते तरी ते कधीच कुण्या मुलाला परकं समजत नव्हते.

    एक दिवस आप्पा बाजाराला गेलेले होते. जीजा आणि काका शेतात काम करत होते. तेव्हा अचानक एका पाहुण्यांचा निरोप आला म्हणून जीजाला अंतिम संस्कारासाठी जावे लागले. त्याकाळी फोनची सुविधा नव्हती. घरी निरोप ठेऊन ते त्या गावाला निघून गेले. जीजा गेल्यावर पुन्हा लगेच आणखी एक पाहुणा आला म्हणून एकनाथरावांनाही दुसरीकडे जावे लागले. शेतात बैलांना बांधून चारा टाकून एकनाथराव गावाला गेले. आप्पा बाजारातून आल्यावर त्यांना निरोप कळला. ते बैलांचा चारापाणी करायला शेतात निघून गेले. जीजा आणि एकनाथराव दोघांनाही त्या त्या गावाहून यायला बराच उशीर झाला होता.

   आप्पांनी शेतात जाऊन बैलांना पाणी पाजले. दुसऱ्या शेतातून हिरवा चारा कापून आणला. तो बैलापुढं टाकला आणि ते घराकडे परत फिरले. तेवढ्यात.. "आप्पा, मला एकटीला सोडून निघून जाणार? तुमच्या लाडक्या वेणूला घेऊन नाही जाणार घरी?" या आवाजाने ते दचकले. आबांच्या मृत्यूचा अनुभव गाठीशी असल्या मुळे त्यांनी मागे फिरून न पाहता जोराने घराकडे चालायला सुरुवात केली. ते पुढं चालत होते, मागून आवाज येत होता. आप्पा चालत शेताच्या बाहेर पाऊल टाकणार एवढ्यात एक परकर पोलक्यातील पोरगी समोर रस्ता अडवून उभी असलेली दिसली. ती रस्त्यातच असल्यामुळे थांबण्या शिवाय पर्याय नव्हता.

   "आप्पा, तुमची लाडकी लेक सासरहून एकटी आलीय. रात्र झालीय, अंधार पडलाय, तिला सोबत घेऊन नाही जाणार?" ती मुलगी विचारत होती.

    "कोण कुणाची लाडकी. माझी कुणी मुलगी नाही. आमच्या नशीबातच मुलगी नव्हती. जा बाजूला सरक माझा रस्ता सोड." आप्पा जरा गुस्स्यातच बोलत होते.

    "अस्सं? आपल्या ताटातून वेणूने एक तरी घास खावा म्हणून हट्ट धरून बसणारे, वेणूने घास घेतला नाही तर जेवण न करणारे आप्पा हेच का? घशाखाली घास उतरतो आता तुमचा? खोट्या प्रतिष्ठे पायी माणूस एवढा निष्ठुर होऊ शकतो?" तिचा प्रश्न आप्पांना विचार करायला लावणारा होता.

   "हा विचार त्यांच्या मनाविरुद्ध वागतांना तुझ्या मनात यायला हवा होता. त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढतांना विचार करायला हवा होता." आप्पांच्या मनात दहा वर्षां पूर्वीची घटना ताजी झाली होती.

   दहा वर्षांपूर्वी त्यांची सर्वांची लाडकी वेणू बारावीची परीक्षा चांगले मार्क्स मिळवून पास झाली होती. आता तिचे लग्न करावे म्हणून घरात विचार विनिमय सुरू होता. तिच्या आत्याचा मुलगा सर्वांना परिचित होता. तो वयाने तिच्या पेक्षा लहान होता. परंतु गडगंज संपत्तीचा एकटाच वारसदार होता. एकनाथराव नको नको म्हणत असतांनाही सर्वांनी ते स्थळ पसंत केले होते. परंतु वेणूने स्पष्ट शब्दात आपली नाराजी प्रगट केली होती. शिवाय गावातल्या एका तरुणावर प्रेम असल्याचे सांगितले होते. एक दिवस तो तरुण मागणी घालायला सुद्धा आला होता. वडील नसलेल्या त्या गरीब तरुणाला वेणू देणे म्हणजे आपला अपमान वाटला होता आबा, आप्पा, जीजा यांना. तो निघून गेल्यावर अति लाडाने पोरगी बिघडली असे वाटून तिचं मन वळवण्याचा प्रयन्तही झाला. परंतु ती मानायला तयार होत नव्हती म्हणून रात्री उशिरा या तिघा भावांनी तिला मारण्याचा कट केला. जीजांनी तिचे हातपाय घट्ट पकडून ठेवले. आप्पांनी तिचा गळा आवळून जीव घेतला. आणि आबांनी तिला विहरीत फेकून दिले. सकाळी सकाळी अर्धा भरलेला पाण्याचा हंडा, पाण्यात पडलेला पोहरा, आणि आत वेणूचा मृतदेह अशा अवस्थेत विहिरीवर आलेल्या बायांना दिसला. साऱ्या गावात बोंब झाली. पाणी भरायला गेलेल्या तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली.

  तरी पण, 'फारशी कधी पाण्याला न जाणारी वेणू एकटीच कशी गेली?' म्हणून शंका घेतली गेली. परंतु मोठ्या घरच्या गोष्ठी सहज पणे झाकल्या जातात तशी ही घटना झाकली गेली.

    "आप्पा, आठवतो तो दहा वर्षांपूर्वीचा काळ तुम्हाला? काका नको नको म्हणत होते, मी विनवणी करत होते. परंतु आबा आणि तुमच्या डोळ्यात रक्त उतरले होते तेव्हा. जीजांनाही स्वतःच्या मुलीला मरण्याच्या कटात सहभागी व्हायला काहीच वाटलं नाही. तुम्ही देवा सारख्या माणसाला, काकांनाही पापाचे भागीदार बनवले. तुम्हीच गळा आवळला होता ना माझा? कसं वाटत होतं तेव्हा? लढाई जिंकल्या सारखं वाटलं असेल नाही?"

    "बस्स! बस्स कर वेणू. आपल्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न होता. त्यासाठी आम्हा चौघा भावामध्ये एकटी असलेल्या मुलीला मारतांना कमी का यातना झाल्या असतील आम्हाला? पण खानदान, घराणे याच्या नाव लौकीका साठी ते कृत्य करावेच लागले आम्हाला. आणि आता त्याचा काहीही पश्चाताप होत नाहीय मला तरी." आप्पांनी निक्षून सांगितले. तसे क्रोधयुक्त होऊन वेणूने त्यांच्या अंगावर उडी मारली. बेसावध आप्पा तसेच मागे पाठीवर पडले. परकर पोलक्यातली वेणू त्यांच्या छातीवर बसलेली होती. हळू हळू तिचे रूप बदलत गेले. डोळ्यातून अग्नी ज्वाला निघत होत्या. दोन दात ओठाच्या दोन्ही कोपऱ्यातून बाहेर आलेले, हत्तीच्या दातां सारखे दिसत होते. चेहरा भेसूर दिसत होता. ते रूप पाहूनच आप्पा बेशुद्ध व्हायची वेळ आली.

    "कसं वाटतं आप्पा? भीती वाटते ना आता? असाच दाबला होता ना माझा गळा त्यावेळी तुम्ही?" असं म्हणत तिने दोन्ही हातांनी त्यांचा गळा दाबायला सुरुवात केली. आप्पा जोर एकवटून उठण्याचा प्रयत्न करत होते. परंतु वेणूच्या सैतानी शक्तीपूढे त्यांचे काही एक चालत नव्हते. शेवटी त्यांनी हात पाय खोरून जीव सोडला. वेणूने त्यांच्या छातीवर काही तरी कोरल्या सारखे केले आणि निघून गेली.

    जीजा आणि काका उशिरा घरी आल्यावर आप्पा अजून शेतातून आले नसल्याचे कळले. ते दोघेही आप्पांना शोधायला शेतात गेले. पाहतात तो आप्पा निपचित पडलेले सापडले. त्यांना गाडीत घालून घरी आणले गेले. आणि सर्वांनी एकच आक्रोश केला. पाच वर्षांपूर्वी आबांचाही असाच विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या छातीवर परकर पोलक्यातील मुलीचे चित्र होते. तसेच आज आप्पांच्या छातीवर दिसले होते. आप्पांच्या चितेच्या अग्निज्वालांमध्ये वेणूचा हसरा चेहरा एकनाथरावांनी पहिला होता. एकनाथांना पाच वर्षांपूर्वीचा आबांचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता.

.... *क्रमशः*



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror