STORYMIRROR

Pandit Warade

Horror Tragedy Thriller

3  

Pandit Warade

Horror Tragedy Thriller

मला काही सांगायचंय-२

मला काही सांगायचंय-२

4 mins
193


   साईनाथराव! ज्यांना घरात सारे जीजा या आदरार्थी नावानं साद घालायचे. साऱ्या घराचे जीजा, शेतात कामा साठी गेले होते. आबा, आप्पांच्या जाण्या पासून जीजा बरेच खचले होते. त्यामुळे ते कधीच शेतात काही काम करत नसत. एकनाथराव एका लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेलेले असल्या मुळे शेतात जनावरांचे चारापाणी करायला त्यांना जावे लागले होते. सायंकाळ झाली तरी जीजा घरी आले नाही म्हणून शेजाऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता ते एका झाडा खाली अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले सापडले. आजूबाजूच्या परिस्थितीवरून तेथे खूप झटापट झालेली जाणवत होती. सर्वजण घाबरले होते. नेमके काय झाले असावे? यावर बरीच चर्चा झाली होती. 

 "बहुतेक बैलाने मारले असावे." सखारामपंत म्हणाले.

  "अहो, तसे असते तर बैल मोकळाच असता. बैल तर बांधलेला आहे." बाबुरावांनी खोदून काढले. 

  "हो! बरोबर आहे. बैलं बांधलेले आहेत, अन् चाराही टाकलेला आहे त्यांच्या समोर. नक्कीच बैल बांधून झाल्या वरच हा सारा कार्यक्रम झाला असावा." गणपतराव.

   "अहो, बैलं चोरणारी टोळी सुटलेली आहे. आमच्या पाहुण्यांच्या गावातले बैल चोरी गेलेत म्हणे. सांगता येत नाही. चोरच आले असतील बहुतेक." बाबुराव म्हणाले. 

  "जे झाले ते झाले. काही का असेना. पण त्या आधी जीजांना दवाखान्यात न्यायला पाहिजे. बैल गाडी आणा लवकर. घ्या गाडीत." संपतराव म्हणाले तसा एकजण गाडी आणायला पळाला. तेवढ्यात एकनाथरावही तिथे येऊन पोहोचले होते. एकनाथरावांनी तिथली सारी परिस्थिती पाहिली अन् काय समजायचे ते सारे त्यांना कळून चुकले. 'हे काम त्या वेणूच्या भुताचेच असावे', हे त्यांनी मनोमन जाणले होते. कारण जीजाच्या छातीवर एक छोटासा व्रण दिसत होता, गोंदल्या सारखा. बारीक स्वरूपात परकर पोलक्यातल्या मुलीचे चित्र दिसत होते. आबा आणि आप्पा यांच्या छातीवर सुद्धा असेच चित्र उमटलेले त्यांनी पाहिले होते. एकनाथराव घाबरले परंतु मन घट्ट करत त्यांनी जीजांना गाडीत घालून दवाखान्यात नेले.

  आठ दिवस दवाखान्यात राहूनही जीजांचा आवाज परत आलाच नाही. शरीरातली शक्तीच हरवली होती. तेव्हापासून केवळ गोळ्या औषधीवर जिवंत होते. भूक लागल्यावर खायलासुद्धा खाणाखुणा करूनच मागायचेत. घरात भेटायला आलेल्या लोकांच्या विविध चर्चा ते ऐकायचे पण नेमके काय झाले ते मात्र त्यांना कधीच सांगता आले नाही. कुणी काही विचारलेच तर तो सारा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा रहायचा...

  ... जीजा शेतात आले. त्यांनी बैलांना सोडले. हौदावर नेऊन पाणी पाजले. आणून खुंट्यावर बांधले. त्यांना चारा टाकला. आणि झाडा खाली बसले. तेवढ्यात.. "जीजाs" अशी मंजुळ आवाजातली साद त्यांच्या कानावर आली. त्यांनी आजूबाजूला बघितलं. कुणीच दिसलं नाही. पुन्हा झाडाच्या मागील बाजूनं तोच आवाज आला, "जीजाss" आता मात्र जीजा जाम घाबरले होते. 

   "कोण आहेस गं? लपून का बोलतेयस अशी? समोर ये जरा. कोण आहेस ते बघतोच जरा." असं म्हणत त्यांनी रागानं झाडाच्या बुंध्याकडे पाहिलं. 

   "रागावू नका जीजा, मी तुमची वेणू आहे. मला माझ्या सुखा पासून वंचित ठेवणाऱ्या माझ्याच माणसांना मी सुख कसं भोगू देईल जीजा. तुम्हालाही मी असं स्वस्थपणे बसू देईन का?" असं म्हणत वेणू समोर आली.

   "तू आहेस होय? मेल्यावरही आमचा पिच्छा सोडणार नाहीस होय? आबांना, आप्पांना घाबरवलंस, त्यांचा जीव घेतलास. पण मी असा जीव सोडणार नाही. आता तुलाच संपवून टाकतो बघ." असं म्हणत जीजानं हातात काठी घेतली आणि तिच्या अंगावर धावून गेले. 

      ते जसे तिच्या अंगावर धावून गेले तसे त्या परकर पोलक्यातील पोरीनं जीजाच्या अंगावर उडी घेतली आणि त्यांच्या खांद्यावर जाऊन बसली. काठी उगारलेली होती जीजांनी तिला मारण्या साठी. परंतु जिला मारायचं तीच बाजूला झाल्या मुळे त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. वेणू त्यांच्या छातीवर बसली. त्यांनी उठण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु ती एवढीशी पोर भारीच जड होती. त्यांना उठताच आले नाही. त्यांनी तरीही झटापट करून सोडून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला पण व्यर्थ ठरला.

   "जीजा, घाबरू नका. तुम्हाला आबा, आप्पा यांच्या इतका त्रास नाही देणार मी. पण हे ही लक्षात ठेवा, 'मला सुखापासून वंचीत ठेवणाऱ्यांना सुखात राहण्याचा काही एक अधिकार नाही. त्यांना मी कधीच सुख उपभोगू देणार नाही'. तुम्ही माझे जन्मदाते आहात. तुम्हाला थोडी तरी दयामाया यायला पाहिजे होती माझी. परंतु आबा, आप्पा यांच्या प्रतिष्ठेच्या गोष्टी तुम्हालाही खऱ्या वाटल्या. आई वडील असूनही तुम्हा दोघांना माझी जराशीही दया आली नाही. स्वतःच्या मुलीचा गळा घोटतांना तुमचा हात जराही कसा थरथरला नाही जीजा? इतका काय गुन्हा केला होता मी तुमचा? तुमची मान खाली जाईल असं कोणतं कृत्य माझ्या हातून झालं होतं? तुम्ही केवळ तुमच्या बहिणीच्या संपत्तीचा विचार केला. तुम्हाला काय वाटलं? संपत्ती भरपूर असली म्हणजे मुलगी सुखात राहते काय? तिला भाकरी व्यतिरिक्त दुसरं काही सुख हवं असतं की नाही? केवळ अन्न, वस्त्र, आणि निवारा मिळाला म्हणजे झालं का? तिला काही शारीरिक, मानसिक तहान भूक असते की नाही? याचा विचार कुणी करायचा? जीजा, तुमच्या डोक्यात या गोष्टी घुसणारच नाही. तुम्हाला वाटलं आता तुमचं नाकच कापलं जाणार. पण जीजा, तुम्ही तुमच्या हातानं तुमची अब्रू चव्हाट्यावर मांडली. जी गोष्ट तुम्हाला झाकता आली असती ती तुम्ही जगाला जाहीर करून टाकलीत. माझा मृत्यू झाल्यावर तुम्हाला वाटलं सारं झाकलं गेलं. परंतु नाही जीजा, साऱ्या जगानं नाही नाही त्या शंका उपस्थित केल्या. माझ्या बरोबरच तुमच्याही अब्रूचे धिंडवडे काढले. जसा तुम्ही माझा गळा घोटला तसाच तुमचा पण गळा घोटावा वाटतो आहे. पण नको. कितीही झालं तरी तुम्ही माझे वडील आहात. मी लेक आहे तुमची. बापाच्या मृत्यूची कल्पनाही सहन होत नसते लेकीला. पण तुम्ही केलेल्या पातकी कृत्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे, म्हणजे याच्या पुढे माझ्या सारख्या असंख्य मुली अशा अर्ध्यातून संपणार नाही. मी तुम्हाला मारणार तर नाहीच नाही. पण सुखासुखी जगूही देणार नाही." ती कळवळून बोलत होती. जीजांकडे ऐकण्या वाचून दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. त्यांनी थोडीशी झटापट करून पाहिली, पण ती व्यर्थ ठरली. तिने त्यांच्या छातीवर जरासा भार टाकला. गळ्याला थोडेसे आवळल्या सारखे केले.

  "असाच दाबला होतात ना माझा गळा तुम्ही? कसं वाटतं आता? बरं वाटत असेल नाही का?" असं म्हणत तिने हळूच त्यांचा गळा सोडून दिला आणि क्षणात गायब झाली. जीजा बेशुद्ध होऊन जागेवर पडून होते.

*****



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror