मला काही सांगायचंय-१
मला काही सांगायचंय-१
नाथाच्या घरी आज अगदी आनंदी आनंद होता. सर्वजण अगदीच खुशीत होते. कारणही तसंच होतं. खूप दिवसानंतर त्यांच्या घरात आज खरवस खायला मिळणार होता. त्यांची कपिली गाय पहिल्यांदा व्याली होती. तिच्या सारखीच दिसणारी कालवड दिली होती तिने. मागच्या वीस वर्षात, वेणू गेल्यापासून त्यांच्या कडे दुधाची धार माहीत नव्हती. त्यांच्या खुंट्यावर गाय, म्हैस, बकरी कधीच टिकली नाही. घरात लहान बालकांना पुरेसं दूध मिळत नव्हतं. विकतचं दूध आणलं तरी ते मनसोक्त प्यायला थोडंच मिळतं? घरच्या दुधाची बरोबरी विकतचं दूध कशी काय करणार? त्यामुळं आज घरच्या गायीच्या कोवळ्या दुधाचा खरवस खायला सर्व लहान थोर मंडळी अगदी टपून बसलेली होती. गायीला बाजरी, गूळ इत्यादी पदार्थ टाकून मेळवण तयार करून खाऊ घातलं होतं. आता निवांत पणे कोवळं दूध काढायचं होतं.
एकनाथरावांनी हात पाय स्वच्छ धुतले. एक स्वच्छ धुतलेले भांडे घेऊन गोठ्यात आले. तोवर सर्व बच्चे मंडळी तिथेच वासरा जवळ खेळत होती. गाय दूध काढतांना बिचकू नये म्हणून सर्व बालकांना घरी पाठवून दिले. गायीच्या वासराला सोडलं. गायी जवळ आणून चार घोट पाजलं आणि तोंडा समोरच्या खुंट्याला बांधलं. गायीचे स्तन स्वच्छ धुतले. पुन्हा एकदा हात स्वच्छ धुवून एकनाथराव गायी जवळ दूध काढायला बसले. गाय आपल्या वासराला प्रेमाने चाटत होती. एकनाथराव दुधाची धार काढत होते. भांड्यात पडणाऱ्या दुधाच्या धारीचा आवाज तेवढा येत होता. नाथांची समाधी लागली होती. तेवढ्यात.....
"काका, खूप दिवसा नंतर असलं कोवळं दूध काढायला मिळालं. नाही का?" या आवाजानं ते दचकले. एकनाथरावांनी आवाजाच्या दिशेनं मान फिरवली. बाजूला परकर पोलक्यात बसलेल्या वेणूला बघून ते केवढ्याने तरी दचकले. हातातलं दुधाचं भांडं डचमळलं, पण त्यांनी सावरलं. दूध सांडू दिलं नाही.
"व व व वेणू? तू इथं? का बरं आम्हाला असा त्रास देते आहेस? आबाला, आप्पाला घाबरवून हे जग सोडायला लावलंस, गेल्या पाच वर्षां पासून जीजाही अंथरुणावर खिळून आहेत. आत्ता काय माझ्या मागे लागणार आहेस का?" एकनाथराव घाबरतच तिला म्हणाले.
"घाबरू नका काका, मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. कारण मला तुम्ही लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलंय. खूप जीव लावला मला तुम्ही. आबा आणि आप्पा या दोघांच्या पेक्षा किती तरी पटीनं तुमचा जीव होता माझ्यावर. साऱ्या घराला जेव्हा मी नकोशी झाले तेव्हाही केवळ तुम्हीच माझी बाजू सांभाळून बोलता होतात. केवळ तुमच्या शब्दाखातर मला माझं प्रेमही सोडून द्यावंसं वाटलं होतं मला एकवेळ."
"होय गं बाई, खूप लळा होता मला तुझा. क्षणभर नजरे आड झालीस तर कासावीस व्हायचा जीव माझा. माझाच काय साऱ्यांचाच जीव घायाळ व्हायचा तुझ्या साठी. तू साऱ्यांचाच जीव की प्राण होतीस. पण हट्टीपणा भोवला सर्वांनाच. अचानक कुणाची दुष्ट नजर लागली कुणास ठाऊक? साऱ्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या माझ्या वेणूला स्वतःच्या हातानं दूर लोटावं लागलं. तुला दूर करतांना, अंधारात तुझा गळा घोटतांना आमचे हात का झडले नाहीत कुणास ठाऊक?" एकनाथरावांना भरून आलं होतं. कंठातून शब्द फुटत नव्हते. कोणत्याही क्षणी ढग बरसायला लागतील अशी स्थिती निर्माण झाली होती.
"काका, तुम्हाला वाटतं का माझं काही चुकलं? विचार करा काका, मी काही चुकीचं पाऊल उचललं होतं? आपल्याच नात्यातला मुलगा होता तो. काय तो मला योग्य, अनुरूप वर नव्हता? काय कमी होतं त्याच्या कडं? चांगला शिकला सवरलेला होता, स्वभावानं चांगला होता. कर्तृत्ववान होता. घरचा श्रीमंत असूनही किती विनम्र स्वभावाचा होता. केवळ मी पणा आणि अहंकार यामुळे तुम्ही त्याला नकार दिला. त्याचा अपमान केला. तरीही त्यानं कुठल्याही प्रकारचा त्रागा केला नाही. त्याने शांतपणे तुमचा निर्णय शिरोधार्ह मानला. जरा आठवा काका, मी हात जोडून, पाया पडून विनंती करत होते. का दयामाया आली नाही आबांना? आप्पांना? अपत्य प्रेमा पेक्षाही यांना यांची प्रतिष्ठा जास्त मोठी वाटत होती. माझा अपराध एवढाच होता ना, माझ्या पेक्षा पाच वर्षाने लहान असलेल्या आत्याच्या मुलाला मी नकार दिला? तो नुसताच वयानं लहान नव्हता तर शरीर प्रकृती तरी सुदृढ होती का त्याची? तो मला खरंच सुख देऊ शकला असता? काका, मी तुमची सर्वांची लाडकी होते ना? मग माझी एवढी एक विनंती मान्य केली असती तर काय आभाळ कोसळणार होतं? मी काही कुण्या ऐऱ्या गैऱ्याचा हात धरून निघून नव्हते चालले. आपल्याच नात्यातील, एका प्रतिष्ठित तरुणा सोबत रीती रिवाजा प्रमाणे लग्न करून जायचं म्हणत होते. " वेणू बोलत होती, एकनाथराव केवळ ऐकत होते. वीस वर्ष अगोदर पासूनचा भूतकाळ एखाद्या चलचित्रा प्रमाणे त्यांच्या डोळ्या समोरून सरकत होता. ते केव्हाच वीस वर्षे मागे भूतकाळात जाऊन पोहोचले होते. मागच्या पाच वर्षांपूर्वी जीजा शेतात काम करत असतांना अचानक चक्कर येऊन पडले. सर्व डॉक्टर, हकीम करून झाले परंतु ते आजवर उठून बसू शकले नाही. याला कारण वेणूच आहे हे फक्त एकनाथरावच ओळखू शकले होते.
.......*क्रमशः*

