मित्र असावा असा!
मित्र असावा असा!
रात्रीचे बारा वाजत होते. रावसाहेब दिवाणखान्यात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग, संताप, चिड यासोबत काळजी आणि चिंता असे विविध भाव स्पष्टपणे दिसत होते. मधूनच असहायताही दिसत होती.
"अहो, तुम्ही शांत व्हा. येईल तो एवढ्यात...."
"कसा शांत बसू? रात्रीचे बारा वाजताहेत आणि आपले सुपुत्र अजून घरी आलेले नाहीत. परीक्षा चालू आहे. उद्या गणिताचा पेपर आहे. इतर मुले अभ्यासातून क्षणभरही विश्रांती घेत नाहीत आणि आपला दिवटा अभ्यास सोडून गावभर भटकतोय."
"परीक्षा चालू आहे म्हणूनच थोडे धीराने घ्या. त्याला काही बोलू नका. नाही तर करायचा तेवढा अभ्यास तो करणार नाही. आणि मग..."
"ही..ही..हीच आपली असहाय्यता.... याचाच तो फायदा घेत आहे. एकुलता एक म्हणून त्याला हवे ते सारे एका क्षणात देत आहोत. गाडी काय, लॅपटॉप काय, पॉकेटमनी काय..."
"त्याच्या मित्रांना तरी फोन लावून बघा...." बोलत असताना रावसाहेबांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरही चिंतेचे भाव होतेच.
"आहे का त्याच्या एका तरी मित्राचा फोन? दिलाय का तुझ्याजवळ? एकाही मित्राचा नंबर नाही. कोणाला म्हणून विचारावे? बरे, एखादा क्रमांक सापडला तर काय विचारावे त्याला? सांगावे... आमचे चिरंजीव घरातून पळून गेले म्हणून..."
"अहो, भलतेच काही तरी बोलू नका..."
"मग काय करु? कोणाचे घरही माहिती नाही."
"वन्सकडे गेला का ते विचारता का?"
"ताईकडे? यापूर्वी तो तिच्याकडे कधी गेलाय हे तुला तरी आठवते का? मावशीकडे, मामाकडे अधूनमधून जातो मात्र आत्या, काका ही घरे वर्ज्यच आहेत. ठिक आहे, बोलून बघतो...." असे म्हणत रावसाहेबांनी क्रमांक जुळवला.
"हॅलो, मी रावसाहेब बोलतोय..."
"का रे, काय झाले? एवढ्या रात्री? सारे ठिक आहे ना?"
"तसे सारे ठिक आहे. ताई, राजा आलाय का ग तुझाकडे?"
"राजा? माझ्याकडे? रावू, सहा महिने झाले असतील राजाला माझ्याकडे येऊन. अरे, अनेकदा घरासमोरून वेगाने गाडी पळवत निघून जातो. त्यामुळे उडालेली धूळ घरात येते पण हा घराकडे बघतही नाही. काय झाले? केव्हापासून गायब....म्हणजे घरात नाही? भांडण वगैरे करून निघालाय का? मनासारखे पैसे दिले नाहीस का तू? तुझी बायको घालून पाडून बोलली का? त्याची परीक्षा चालू आहे ना..."
"हो ना. उद्या गणिताचा पेपर आहे..."
"मग बरोबर आहे. गाडी उडवण्याच्या नादात अभ्यास झाला नसेल. आजूबाजूची विहीर.... म्हणजे कसे आहे, परीक्षेच्या काळात आजकालची मुले अशाच कोणत्या ठिकाणी..."
"ताई, काय बोलतेस तू हे? ठेवतो...."असे म्हणून रावसाहेबांनी फोन बंद केला आणि लगेचच त्यांच्या लहान्या भावास फोन लावला.
"मी बोलतोय..."
"दादा? एवढ्या रात्री? काय झाले? तसेच महत्त्वाचे काम असल्याशिवाय अशावेळी तू फोन करणार नाहीस. काही टेंशन आहे का?"
"अरे, राजा, दुपारी जेवण करून बाहेर पडला तो अजून आला नाही.."
"काय?एवढा वेळ कुठे गेला? त्याच्या मित्रांकडे ..."
"नाही ना. कुणाचा नंबर नाही की, कुणाचा पत्ता माहिती नाही."
"दादा, रागावू नकोस पण आपण पालक हीच तर चूक करतो. कसे आहे, आजकाल या मुलांवर बारीक लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे मित्र कोण, ते काय करतात, कुठे जातात....त्यांचे राहणीमान, चालचलन साऱ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती ठेवावीच लागते.अधूनमधून मुलांच्या मित्रांना भेटावे लागते. बरे,ते जाऊ दे. मी येतो आत्ता.."
"नको. नको. एवढ्या लांब नको."
"बरे, त्याचा काही ठावठिकाणा लागला की मला लगेच कळव. ठेवतो..." म्हणत पलिकडून फोन बंद झाला. रावसाहेबांनी पत्नीकडे पाहिले. ती फोनवर बोलत होती.
"हॅलो, मंगल, मी ताई..."
"ताई? तू? काय झाले ग? "
"मंगे, राजा तुझ्याकडे आलाय का ग?"
"नाही. पंधरा दिवसांपूर्वी आला होता. त्याची परीक्षा सुरू झाल्यापासून मात्र भेटला नाही ग. मीच तुला उद्या फोन करणार होते, त्याचे पेपर कसे चालले आहेत ते विचारण्यासाठी. आज होता का ग पेपर? कशाचा होता? आजचा पेपर देऊन गेलाय ना? ड्रॉप वगैरे घेतला नाही ना? ही आजकालची पोरे ना, नापास होण्याची नामुष्की नको म्हणून गॅप घेतात. ताई, मला सांग ड्रॉप काय नि नापास काय ? परिणाम तर एकच ना, वर्ष वाया जाणार. वर्षभर उंडारतात नि मग ड्रॉप घेऊन स्वतःच नापास झाल्याचे जाहीर करतात. आपला राजाही असाच. हे तर नेहमी म्हणतात की, भाऊजी, राजाला एवढी सवलत देतात कशी? केव्हाही पहा राजा आपला मित्र-मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये नाहीतर कॉफी शॉपमध्ये. ताई, ती कॉफी म्हणजे का स्वस्त असते. दीड-दोनशे रुपयाला एक कप म्हणे. घरी आला म्हणजे माझ्या सोन्याला विचारतो, हा सिनेमा पाहिला का, तो सिनेमा पाहिला का? वर फुशारकी मारतो कसा, मी की नाही प्रत्येक सिनेमा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहतो. रेकॉर्ड आहे म्हणे त्याचे. बरे, त्याचे मित्र तरी माहिती आहेत का? 'हे' मला एक-दोन वेळा म्हणाले की, राजाची दोस्त कंपनी म्हणजे निव्वळ मवाली, गुंड वाटतात. बरे, भाऊजी तर ओरडले नाही ना त्याच्यावर? भावोजींचा राग म्हणजे जणू जमदग्नी! लाड-लाड करतात नि मग एकदाच सारे ओरबाडून काढतात.आजकालच्या मुलांसोबत ना मित्रांप्रमाणे वागावे लागते. त्यांच्या कलाकलाने घ्यावे लागते. बरे, आता ठेवते. हे सकाळी ऑफिसला गेले की, दुपारी येईल तुझाकडे..." म्हणत मंगलने फोन ठेवला. रावसाहेबांच्या दिवाणखान्यात फेऱ्या चालूच होत्या. मधूनच दारापर्यंत जात होते. दूरवर नजर लावून राजाचा मागमूस घेत होते. लगेच प्रचंड निराशा व्यक्त करताना हाताच्या मुठी एकमेकांवर आदळत होते. कधी हातावर हात, कधी हाताची घडी छातीवर घट्ट आवळत, दाणदाण पावले टाकत परत येऊन सोफ्यावर बसत मान टेकवून डोळे लावून घेत होते. दुसऱ्याच क्षणी उभे राहून पुन्हा फेऱ्या मारत होते. त्यांची पत्नी त्यांच्याकडे चिंतायुक्त नजरेने पाहात होती. काही तरी आठवल्यासारख्या मनःस्थितीत रावसाहेबांनी पुन्हा एक फोन लावला. ते म्हणाले,
"पांढरे सर ना? माफ करा हं, एवढ्या रात्री तुम्हाला फोन केला...."
"रावसाहेब, ते जाऊ देत. काय झाले, राजूला काही अडचण आहे का? माझ्या माहितीनुसार त्याचा सारा अभ्यास झाला आहे. त्याला काहीच प्रॉब्लेम नसावा आणि उगीच एवढ्या उशिरापर्यंत जागतोय. आता ..."
"सर, अडचण त्याला नाही. मला आहे. राजू दुपारी बाहेर गेलाय. तो अजून आला नाही. मला वाटले, त्याला काही प्रॉब्लेम असेल म्हणून तो तुमच्याकडे आला असेल म्हणून फोन केला...."
"नाही हो. खरेतर आमच्या क्लासमध्ये वीस-पंचवीस फायनल टेस्ट झाल्या आहेत आणि प्रत्येक वेळी राजूने जवळपास पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत. येईल एवढ्यात तो. टेंशन घेऊ ..." असे म्हणून पांढरेंनी फोन बंद केला. 'काय करावे आणि काय नाही' अशा अवस्थेत सोफ्यावर काही क्षण टेकलेल्या रावसाहेबांनी पुन्हा एक क्रमांक जुळवला.
"हॅलो, भाऊजी. रावसाहेब बोलतोय..."
"का हो, सारे कुशल मंगल आहे ना? असा अचानक फोन केला म्हणून काळजी वाटते...." तिकडून बायकोच्या भावाने विचारले.
"एक विचारायचे होते, राजा, तुमच्याकडे आलाय का?"
"राजा! राजा माणूस तो. आमच्याकडे कसचा येतोय? काय झाले? केव्हापासून घरी नाही? परीक्षेचे काही टेंशन नाही ना? कसे आहे, आजकालची मुलं वर्षभर अभ्यास करीत नाहीत. परीक्षा जवळ आली की, मग यांना पुस्तकाची, अभ्यासाची जाग येते. एखादा पेपर अवघड गेला की, आईबाबांनी रागाचे अस्त्र
उचलू नये म्हणून ते हे असे महाअस्त्र सोडतात. रावसाहेब, मी काय म्हणतो, रात्रीचा एक वाजतोय टेंशन घेऊ नका. शांत झोपा. सकाळी नाहीच आला तर मला फोन करा. मग बघू काय करायचे ते." असे म्हणत त्यांनी फोन ठेवला.
"काय म्हणाला हो, दादा?"
"ज्याचे जळते त्याला कळते. झोपा म्हणाले निवांत...." रावसाहेब वैतागून बोलत असताना मोटारसायकलचा तो चिरपरिचित आवाज ऐकू आला. दोघांच्याही मरगळलेल्या शरीरात जणू प्राणवायूचे आगमन झाले. रावसाहेब धडपडत असताना त्यांना पत्नीने हलक्या आवाजात आठवण दिली,"अहो, जरा दमाने..."
तितक्यात राजा आत आला. आईबाबांना जागे असलेले पाहून त्याने विचारले,"हे काय, झोपला नाहीत अजून? दारही सताड उघडे होते. तुम्हाला जागरणाचा त्रास होतो ना..."
"कुठे होतास हे मी विचारणार नाही. कारण तू 'मी मित्राकडे होतो' असेच सांगणार. थांब. इकडे आण तो मोबाइल. तुझ्या मित्रांनाच विचारतो..." म्हणत रावसाहेबांनी राजाच्या हातातला मोबाइल जवळजवळ हिसकावून घेतला. त्यांनी त्या भ्रमणध्वनीवर नजर टाकली. योगायोगाने तो अनलॉक होता. रावसाहेबांनी त्यातला एक नंबर स्वतःच्या मोबाइलवर जुळवला.
"मी राजाचा बाबा बोलतोय...."
"क...क...काका, तुम्ही?"
"राजा तुझ्याकडे आला होता का?"
"ह..ह..हो. आला होता. काय झाले काका? आम्ही अभ्यास करत होतो. आत्ताच निघाला आहे. पाच-दहा मिनिटात पोहोचेल..." म्हणत त्याने फोन बंद केला. पाठोपाठ रावसाहेबांनी दुसरा क्रमांक जुळवला. राजाचा मित्र म्हणाला,
"अहो, काका, कशाला टेंशन घेताय? दुपारपासून आम्ही सोबत होतो. अर्ध्या तासापूर्वीच इथून निघालाय. येईलच ...ठेवतो."
"एक मिनिट....मला सांग, तुम्ही कोण कोण सोबत होता?"
"मी आणि राजा! कसे आहे काका, आमचे तसे खूप मित्र आहेत. पण ते सारे दूर राहतात. मी आणि राजा जवळ राहतो. उद्या गणिताचा पेपर आहे. तसा दोघांचाही अभ्यास झालाय म्हणून निवांत गप्पा मारत बसलो होतो..." रावसाहेबांनी फोन बंद करून राजाकडे पाहिले आणि पुटपुटले,
'इंटरेस्टींग..' राजाने नजर वळवली आणि रावसाहेबांनी अजून एक क्रमांक जुळवला.
"हे काय काका, तुमचा राजावर अविश्वास ? अहो, तो एक स्कॉलर मुलगा आहे. उद्या गणिताचा पेपर आहे. त्याला एक शंका होती.आता राजाचा प्रॉब्लेम आम्हाला कसा सुटणार? म्हणून मग आम्ही चार-पाच मित्र मिळून पांढरेसरांकडे गेलो. त्यांनी राजाची शंका एका मिनिटात समजावून सांगितली. सर म्हणाले, तुम्ही आलाच आहात तर एक गेस प्रश्नपत्रिका देतो. इथेच बसून सोडवा. तुम्हाला सांगतो काका, सर्वात आधी आणि सर्वच्या सर्व प्रश्न अचूकपणे राजाने सोडवले त्यामुळे सरांनी आमची इतरांची चांगलीच हजेरी घेतली आणि अख्खी प्रश्नपत्रिका समजावून सांग. आत्ताच सरांच्या घरातून बाहेर पडलो. राजाने गाडीला किक् मारली आणि तुमचा फोन आला. दोन मिनिटांपूर्वी केला असता ना तर त्याच्याशी बोलता आले असते. पण काका, तुम्ही त्याचा फोन का नाही लावत..."
"अरे, दहा वाजल्यापासून पंचवीस फोन लावले. पण उचलतच नाही...."
"बरोबर आहे. कसा उचलणार? पांढरेसरांकडे फोन 'सायलेंट' करावा लागतो. पण आता लावा."
तितक्यात राजाने विचारले, "बाबा, तुम्ही कोणा कोणाला फोन करता?"
"समजेल. पण तुझे मित्र मात्र लय भारी आहेत...." असे म्हणत रावसाहेबांनी पुन्हा एक क्रमांक जुळवला. त्यांनाही का कोण जाणे त्या फोनाफोनीत मजा येत होती. बऱ्याच वेळाने फोन उचलल्यावर रावसाहेब म्हणाले,"मी राजाचा बाबा बोलतोय... राजा आहे का रे तिथे?"
"क...क..काका, राजा आहे ना, पण झोपलाय हो. थांबा उठवतो हं. र...र...राजा, अबे, उठ. तुझ्या बाबांचा फोन आहे...." तो मित्र राजाला उठवण्याचे नाटक करत असताना मनोमन हसत राजाकडे पाहिले. त्याने मान वळवली आणि आश्चर्य झाले. पलिकडून डिट्टो, सेम टू सेम आवाज आला,
"बाबा, हे काय, आईला सांगूनच मी आलो होतो. आईने सांगितले नाही का? आई पण ना..."
"मित्र असावा तर असा! अहो, मित्रदेवा, वास्तवात या. राजा तुमच्या शेजारी नाही तर इथे माझ्यासमोर आहे...."
"म..म..मेलो..." असे म्हणत त्या मित्राने फोन ठेवला. रावसाहेब अत्यंत आश्चर्याने सोफ्यावर टेकले. त्यांनी केलेले सर्व फोन राजाच्या फोनवरून क्रमांक घेऊन स्वतःच्या फोनवरून केले होते. कुणी काही बोलणार तितक्यात राजाचा फोन वाजला. त्यावर 'स्वीटी' हे नाव पाहून त्यांनी राजाकडे पाहिले आणि पटकन स्वतःच उचलला. तिकडून आवाज आला,
"हाय स्वीट हार्ट! आहेस कुठे? अरे, आत्ताच रत्न्याचा फोन होता. तुझ्या बाबांनी त्याला फोन करून तुझी चौकशी केली म्हणे. त्याने आपल्या 'कॉफी कट्टा' ग्रुपवरही टाकले आहे. पण कोण काय सांगणार? आज आपण दोघेच दुपारपासून एकत्र होतो हे फक्त मीनीला नि अजयलाच माहिती होते. आज्याकडून रत्न्याला आपल्याबाबत समजले. त्याने मला फोन केला. पोहोचलास का घरी? काही टेंशन तर नाही ना? तुझे बाबा रागावले नाहीत ना? मला काळजी वाटतेय रे. राजा, माय लव, आपण घरी सांगायला हवे होते रे. बरे झाले. मला सुचले आणि मी माझ्या घरी फोन करून सांगितले की, बारा वाजता येते म्हणून. राजा, काही म्हण पण आजचा दिवस ना...तुझी सोबत म्हणजे ना...बरे, झोप आता. उद्याच्या पेपरसाठी 'बेस्ट..बेस्ट...बेस्ट लक ' हं...."
"थँक्स! आणि तुलाही राजाच्या बाबाकडून त्रिवार बेस्ट लक बरे..."
"म..म..म्हणजे..."
"मी राजाचा बाबा बोलतोय..."
"बाप रे! सॉरी, काका!..." म्हणत तिने फोन कट केला.
"व्वा! राजा, वा! मान गए! नंबर वन मित्र आहेत तुझे. सारेच सांगत होते, राजा माझ्यासोबत होता. एक मित्र म्हणाला की, पांढरेसरांकडे गेलो होतो. आणि सौभाग्यवती, तुम्हाला सांगतो, एक जण तर चक्क राजाच्या आवाजात बोलला. राजा इथे नसता तर मग मीही त्याच्या नाटकी परंतु परफेक्ट आवाजाला भुललो असतो..."
"बंड्या....बंड्याच असेल तो. उद्या भेट म्हणावे..."
"अरे, नाही. प्रत्येकाने तुला सांभाळून घेतले. सारेच खोटे बोलले पण त्या खोटे बोलण्यातही मित्राबद्दलची काळजी आणि प्रेमापोटी सत्यता होती. म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सारे माफ असते तसे सच्च्या मैत्रीतही सारे क्षम्य असते. तुझ्या आत्याने, मामाने, काकाने, मावशीने सर्वांनीच आम्हाला आणि तुला दुषणे लावली, उपदेशाचे डोस पाजले परंतु तुझ्या सर्व दोस्तांनी तुला सांभाळून घेतले अगदी पांढरेसरांनीही तुझ्यावर अत्यंत विश्वास दाखवला. हे सारे खरे असले तरीही एक प्रश्न ....तसा तो सुटलाय पण तरीही तू अगदी खरे खरे सांगशील की दिवसभर कुठे होतास?"
"ब..ब..बाबा, आज नवीन सिनेमा लागलाय. आज अकरा ते एक पेपर होता. म्हणून दुपारच्या तीनच्या शो ला गेलो होतो.."
"अरे, पण उद्या.."
"आई, गणिताचा पेपर आहे. पूर्ण तयारी झाली होती म्हणून गेलो. सहा वाजता सिनेमा सुटल्यावर बाहेर जेवण केले. थोडा टाइमपास केला. अजून एक नवीन सिनेमा लागला होता म्हणून नऊच्या शो ला आम्ही गेलो..."
"आम्ही? स्वीटी?" रावसाहेबांनी विचारताच त्यांच्या हातातला भ्रमणध्वनी घेऊन खोलीकडे गडबडीने जाताना राजा हसत म्हणाला,
"ह..ह...होय. गुड नाइट..." पाठोपाठ रावसाहेबांचे दिलखुलास हसणे ऐकू आले.