Nagesh S Shewalkar

Comedy Others

1  

Nagesh S Shewalkar

Comedy Others

मीच खरा निष्ठावंत!

मीच खरा निष्ठावंत!

9 mins
656


                       * मीच खरा निष्ठावंत! *

         त्या शहरातील एकूणएक लहानमोठे पत्रकार अप्पासाहेबांच्या टोलेजंग इमारतीसमोर ठाण मांडून बसले होते. कारणही तसेच होते. अप्पासाहेब एका राष्ट्रीय पक्षाचे फार मोठे नेते होते. देशातील राजकारणात त्यांचा वचक होता, दरारा होता, दबाव होता. त्यांच्याशिवाय देशातील राजकारणाचे पान हलत नव्हते. ही अतिशयोक्ती नव्हे तर वास्तव होते, सत्यता होती. सर्वच पक्षात जसे त्यांचे मित्र होते तसेच शिष्यही होते. काही पट्ट शिष्यांना अप्पासाहेबांनी मुद्दाम दुसऱ्या पक्षात पाठवले होते, त्यांचा प्रवेश घडवून आणला होता. हेतू हा की, त्या पक्षात घडणाऱ्या एकूणएक घटनांची इत्थंभूत माहिती अप्पांना मिळावी. त्या माहितीच्या आधारे अप्पासाहेब स्वतःची रणनीती ठरवत असत. निवडणुका जवळ येत असताना, निवडणुकांचा प्रदीर्घ कालावधी सुरू असताना, मतमोजणी सुरू असताना आणि निवडणुकांचे निकाल लागून प्रत्यक्ष नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत अप्पासाहेबांचे विविध पक्षातील शिष्य, हस्तक, मित्र असे एक वातावरण तयार करायचे की, आगामी सरकारचे प्रमुख म्हणून पक्षाचे नेतृत्व अप्पासाहेबांकडे चालून येणार आहे. अप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. परंतु निकाल लागताच का कोण जाणे अप्पांची उमेदवारी आपोआप मागे पडायची. त्यांची इच्छा अपूर्ण राहायची. कारण ते ज्या पक्षात होते, त्या पक्षातील नेते आणि पक्षश्रेष्ठी अप्पासाहेबांच्या अशा भुमिकेवर नाराज असायचे आणि त्यामुळे अप्पासाहेबांच्या वाटेला महत्त्वाचे पद, महत्त्वाची जबाबदारी यायची नाही. काहीशा संशयाच्या भुमिकेतून त्यांच्याकडे पाहिले जायचे. पण अप्पासाहेब हार मानायचे नाहीत. पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागायचे. नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत अप्पासाहेबांनी ज्या पक्षासाठी स्वतःची सारी हयात खर्च केली होती. त्यांच्यापेक्षा वयाने, अनुभवाने,राजकीय शहाणपणाने कमी असणारे, कनिष्ठ असणारे अनेक लोक 'कानामागून आली नि तिखट झाली' याप्रमाणे अप्पासाहेबांच्या पुढे निघून गेले. इतर पक्षातून आलेले लोकही पक्षात मोठमोठी पदे मिळवून सत्तेचे विविध सोपान चढले पण अप्पासाहेब मात्र कायम दुर्लक्षित राहिले. पक्षाचे कार्य करत राहिले. निवडणुकीत पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला ते निवडून आणत राहिले. एखादे वेळी झालेला पराभव मात्र अप्पासाहेबांच्या माथी मारण्यात येत असे, पण विजयाचे श्रेय कधीच अप्पासाहेबांच्या पारड्यात पडत नसे. पण अप्पासाहेब कधी चकार शब्द बोलत नसत, कुणाची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करत नसत. वयाची साठी पूर्ण केल्यानंतर मात्र अप्पासाहेबांना आपल्यावर झालेल्या, होत असलेल्या अन्यायाची प्रकर्षाने जाणीव होत होती. मनात असलेली सल एका जखमेमध्ये रुपांतरीत होत होती.आजवर कधी मनाला न शिवलेला पक्ष सोडण्याचा, बंडखोरी करण्याचा विचार डोके वर काढत होता नव्हे पक्का होत होता. त्यांच्या अस्वस्थतेची, चालू असलेल्या घालमेलीची अंशतः, पुसटशी कल्पना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना येत होती. अप्पांनी पक्षाच्या हितासाठी इतर पक्षात सोडलेल्या माणसांकरवी त्यांनी त्या त्या पक्षाशी छुपी बोलणी सुरू केल्याची बातमी का कोण जाणे पण सुत्रांकरवी विविध माध्यमातून जनतेकडे पोहोचली. विविध माध्यमांवर चर्चा, महाचर्चा, वादविवाद, तंटे सुरू झाले.

         अप्पासाहेबांच्या निवासस्थानासमोर जमलेले विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी तिथे घडणाऱ्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवून होते. कुठे काही 'हूं' झाले की, त्याला तिखटमीठ लावून, पराचा कावळा करून सांगणाऱ्या यंत्रणाना ही कुणकुण म्हणजे एक प्रकारे मेजवानी होती.

'मी आत्ता अमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेबांच्या घरासमोर उभा आहे. सकाळपासूनच म्हणजे अप्पासाहेब अमुक पक्षाला सोडणार ही माहिती हाती आल्यापासून इथे येणारा जाणारांची गर्दी वाढली आहे. अमुक पक्षातील अनेक नेते एकानंतर एक अप्पासाहेबांच्या निवासस्थानी येत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून जात आहेत. मात्र प्रसारमाध्यमांशी कुणीही बोलत नाही त्यामुळे अजून एक गोष्ट नक्की समजलेली नाही की, येणारे नेते अप्पासाहेबांचे मन वळविण्यासाठी येत आहेत की हे नेतेसुद्धा अप्पासाहेबांचेसोबत पक्ष सोडून जात आहेत? अप्पासाहेब जर खरेच पक्ष सोडणार असतील तर ते कोणत्या पक्षात जातील? त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत? ते तमुक पक्षात जाणार? अटक पक्षाची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत किंवा नाहीत? मटक पक्षाने निमंत्रण दिल्यास अप्पासाहेब तिकडे जाणार का? सटर पक्षाशी अप्पासाहेबांची नाळ जुळेल काय? फटर पक्षाने अप्पासाहेबांना कोणती ऑफर दिली आहे? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. ज्याची उत्तरे केवळ आणि केवळ अप्पासाहेबाच देऊ शकणार आहेत परंतु अप्पासाहेब सकाळपासून घराबाहेर पडले नाहीत. एक मात्र निश्चित आज अप्पासाहेब काही तरी वेगळे निश्चितच करणार आहेत. ती बातमी प्रेक्षकांना सर्वात आधी आमच्या वाहिनीवरून कळेल हे पक्के आहे...

त्याचवेळी अन्य एका वाहिनीचा प्रतिनिधी गळा खरडून सांगत होता,

'मी आणि आमचा चमू भल्या पहाटेपासून अप्पासाहेबांच्या घरासमोर उभे आहोत. हे बघा अप्पासाहेबांच्या बंगल्याचे बाह्यरुप. सर्वात वर म्हणजे चार मजले संपल्यानंतर गच्चीवर चारही दिशांना अप्पासाहेबांच्या पक्षाचे म्हणजे अमुक पक्षाचे ध्वज फडफडताना दिसत आहेत. कदाचित तेही या बंगल्यावर शेवटची फडफड करीत आहेत की काय कळत नाही. गेली कित्येक वर्षे हे ध्वज इथे डौलाने उभे आहेत. जर अप्पासाहेबांनी पक्ष सोडलाच तर कोणत्या नवीन पक्षाचे ध्वज इथे फडकतील? एक... एक... ब्रेकिंग न्युज... आत्ताच तमुक पक्षाचे स्थानिक नेते अप्पासाहेबांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ते.. ते.. बघा तमुक पक्षाचे दोन महत्त्वाचे नेते आपणास आत जाताना दिसत आहेत. प्रसार माध्यमांशी काहीही न बोलता हे नेते आत दाखल झाले आहेत त्यामुळे एक गोष्ट आता जवळपास स्पष्ट झाली आहे की, अप्पासाहेब आता अमुक पक्षाशी घटस्फोट घेऊन तमुक पक्षासोबत हातमिळवणी करणार आहेत. तमुक पक्षात प्रवेश केल्यानंतर अप्पासाहेबांच्या पदरात काय पडणार? ही बाब अजून बाहेर आलेली नाही...'

त्याच्या बाजूला उभा असलेला अजून एका वाहिनीचा प्रतिनिधी घामाघूम झालेल्या अवस्थेत, तमुक पक्षाचे जे दोन नेते नुकतेच अप्पासाहेबांच्या घरी दाखल होते त्यांच्याकडून काही महत्त्वाची बातमी हाती लागेल या आशेने त्यांच्या वाहनाच्या मागे पळाल्यामुळे दम लागल्याच्या अवस्थेत सांगत होता, 'आत्ताच तमुक पक्षाचे जे नेते आत अप्पासाहेबांना भेटायला गेले आहेत त्यावरून एक बाब नक्कीच समजू शकते की, अप्पासाहेब तमुक पक्षात प्रवेश करणार आहेत. दोन्ही नेते आत जाऊन वीस मिनिटे झाली आहेत पण अजून 'अंदर की बात' आतच आहे, बाहेर आलेली नाही. एक एक मिनिट ... बघा. बघा. अप्पासाहेबांच्या गच्चीवर काही तरी घडते आहे कारण आत गेलेले तमुक पक्षाचे नेते आणि अप्पासाहेबांच्या विश्वासातील दोन कार्यकर्ते हे नुकतेच गच्चीवर आले आहेत. चौघेही काही तरी चर्चा करत आहेत. ते.. ते बघा ते चारही नेते गच्चीच्या चार दिशांना जात आहेत. बहुतेक त्यांच्यातील बोलणी फिसकटली आहेत म्हणून त्यांची तोंडे चार दिशांना झाली आहेत..."

तिथे अनेक वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येकजण समोर घडणाऱ्या घटनांचा आपापल्या परीने अर्थ लावून ती बातमी अधिक खमंग व्हावी म्हणून मसाला लावून 'आमच्या वाहिनीवरून पहिल्यांदा' या वेष्टनात गुंडाळून सांगत होते. एक प्रतिनिधी म्हणाला,

'सकाळपासून आम्ही ज्या गोष्टीची शक्यता वर्तवत होतो. तीच गोष्ट प्रत्यक्षात उतरत आहे. अप्पासाहेबांच्या गच्चीवर चार कोपऱ्यात झळकणारे अमुक पक्षाचे ध्वज चार नेत्यांनी मिळून खाली उतरवले असून त्याठिकाणी तमुक पक्षाचे झेंडे चढवण्यात येत आहेत. आपण गच्चीवरील हे दृश्य केवळ आमच्या वाहिनीवर बघू शकता...'

'अंदाज खरा ठरला. आमच्या वाहिनीचा कयास खरा ठरला. अप्पासाहेबांनी अखेर तमुक पक्षाशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक सांगू शकतो. अमुक पक्षाचा ध्वज उरतवून तमुक पक्षाचा झेंडा चढवल्या जातो या दोन्ही घटना खूप काही सांगून जातात...' अशा चर्चेत पंधरा-वीस मिनिटे निघून गेली. त्याच त्याच गोष्टींचे रवंथ सुरू होते. काढलेले झेंडे आणि त्याजागी चढवलेले झेंडे यांची पुन्हा पुन्हा तीच तीच छायाचित्रे दाखविण्यात येत असताना पुन्हा एकदा बातम्यांचा नुर, प्रतिनिधींचा सूर बदलला. अप्पासाहेबांच्या निवासासमोर दोन कार येऊन थांबल्या. त्याचे वर्णन करताना एक प्रतिनिधी म्हणाला,

'वातावरण पुन्हा संदिग्ध झालेले आहे. अप्पासाहेब तमुक पक्षात प्रवेश करणार हे जवळपास पक्के झाले असे वाटत असतानाच अचानक अटक पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते अप्पासाहेबांच्या महाली दाखल झाले आहेत. अप्पासाहेबांच्या तमुक पक्षातील प्रवेशाची घोषणा होणे बाकी असताना त्यांचा तमुक पक्षातील प्रवेश केवळ देखावा होता की एक चाल होती हे लवकरच स्पष्ट होईल कारण अटक पक्षाचे नेते त्यांच्यासाठी कोणते गाजर घेऊन आले आहेत हे समजायला मार्ग नाही...'

'आपण अटक पक्षाच्या आवतनावर अप्पासाहेब काय निर्णय घेणार याचा अदमास घेत असताना पुन्हा अप्पासाहेबांच्या गच्चीवर नुकतेच लावलेले तमुक पक्षाचे ध्वज उतरवण्यात आले असून तिथे अटक पक्षाचे ध्वज चढवल्या जात आहेत. याचा अर्थ काय समजावा? पक्षांचे ध्वज वारंवार बदलल्या जात आहेत. याचा अर्थ निवास्थानावर जे ध्वज डोलत आहेत त्या पक्षात अप्पासाहेब जाणार अशी शक्यता बरोबर व्यक्त होत नाही तोच दुसऱ्या अन्य पक्षाचा ध्वज इमारतीची शोभा वाढवताना दिसतो. अप्पासाहेबांच्या मनात काय घालमेल चालू आहे? ते सर्व पक्षांना खेळवत आहेत की सारे पक्ष मिळून त्यांना खेळवत आहेत? चेंडू जसा कधी या खेळाडूच्या हातात तर कधी प्रतिस्पर्धी संघाच्या कक्षात जातो त्याप्रमाणे हा ध्वजबदलीचा खेळ चालू आहे. कोणतीही शक्यता वर्तवता येत नाही. एक फार मोठी संदिग्धता, भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा खेळातून अप्पासाहेबांच्या पदरात काही पडेल की त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल हे समजणे कठीण होऊन बसले आहे...'

'आमच्या हाती आलेल्या बातमीनुसार, खास सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मटक या पक्षाचीही अत्यंत महत्त्वाची बैठक पक्ष कार्यालयात सुरू असून तिथे उपस्थित असलेल्या आमच्या प्रतिनिधीने पाठवलेल्या माहितीनुसार मटक पक्ष अप्पासाहेबांच्या वाटचालीवर, त्यांच्या निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवून असला तरीही त्यांनी दोन नेते अप्पासाहेबांच्या भेटीसाठी, त्यांना मटक पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे हे दोन विशेष दूत केंव्हाही अप्पासाहेबांच्या निवासस्थानी दाखल होण्याची शक्यता आहे...'

'राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळेच वळण घेताना दिसत आहे. अमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब तमुक पक्षात जाणार अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच ते अटक पक्षाची धुरा खांद्यावर घेणार असा कयास बांधला जात असताना मटक पक्षापाठोपाठ सटर आणि फटर पक्षानेही अप्पासाहेब त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवून राजकारणात धमाल उडवून दिली आहे...' दुसरा प्रतिनिधी विश्लेषण करत असताना तिसऱ्या वाहिनीचा प्रतिनिधी आपण एकदम ताजी बातमी देतोय या अविर्भावात म्हणाला की,

'अप्पासाहेबांच्या निवासस्थानी अशी परिस्थिती आहे की, अमुक-तमुक, अटक-मटक, सटर-फटर या सहाही पक्षाचे मोठमोठे नेते अप्पासाहेबांच्या इमारतीत डेरेदाखल झाले असून प्रत्येक पक्षाचे नेते वेगवेगळ्या दालनात बसून आहेत. ते अप्पासाहेबांची बाहेर येण्याची वाट पाहात आहेत परंतु असे समजते की, अप्पासाहेब त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा करत आहेत. त्यानंतरच ते निर्णय घेतील आणि ज्या पक्षात जाण्यासाठी त्यांनी मनाची तयारी केली आहे त्या पक्षाचे नेते ज्या दालनात बसले आहेत त्या नेत्यांसोबत बाहेर येऊन स्वतःचा निर्णय रीतसर जाहीर करतील...'

'हे काय चित्र दिसतय. अप्पासाहेबांच्या गच्चीवर अटक-मटक, सटर-फटर या चारही पक्षांचे नेते पोहोचले आहेत. प्रत्येकाने आपापल्या पक्षाचा झेंडा हातात घेतलेला असून वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांकडे बघत दोन बोटे 'v' अर्थात जिंकलो अशा अर्थाने दाखवत आहेत. काहीही अर्थ लागत नाही. अप्पासाहेब कोणत्या पक्षात जाणार हा लाखमोलाचा प्रश्न अनुत्तरीत असताना ही गच्चीवर पोहोचलेली मंडळी जास्तच गोंधळ निर्माण करीत आहेत. चारही पक्षाचे नेते गच्चीवरील एकेक कोपऱ्यात जात असून तिथे असणारा पूर्वीचा ध्वज उतरवून तिथे स्वतःच्या पक्षाचा ध्वज लावत आहेत...'

'कोणत्या पक्षात जात आहेत अप्पासाहेब? कारण त्यांच्या गच्चीवर अटक, मटक, सटर, फटर या चार पक्षांचे झेंडे फडकताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अप्पासाहेब, त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या जवळच्या कोणत्याही कार्यकर्त्याने अप्पासाहेबांच्या पुढील वाटचालीबाबत काहीही सांगितलेले नाही...'

'आले. आले. अप्पासाहेब स्वतः गच्चीवर आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची विश्वासू माणसे आहेत. अगोदर गच्चीवर पोहोचलेले चार विविध पक्षांचे नेते त्यांच्या दिशेने निघाले आहेत. ते अप्पासाहेबांशी चर्चा करत असताना अप्पासाहेबांच्या माणसांनी चारही पक्षाचे ध्वज उतरवून त्या-त्या पक्षनेत्याकडे सोपविले आहेत. याचा अर्थ अप्पासाहेब अटक-मटक, सटर-फटर यापैकी कोणत्याही पक्षात जाणार नाहीत असे समजायला हरकत नाही कारण या चारही पक्षांचे नेते खाली येत आहेत...'

'प्रश्न! प्रश्न!! प्रश्न!!! अप्पासाहेब कोणत्या पक्षात जाणार? अटक-मटक, सटर-फटर या पक्षात ते जाणार नाहीत हे जवळपास निश्चित झालेले असताना एक प्रश्न कायम आहे तो म्हणजे अप्पासाहेब अमुक पक्ष सोडणार नाहीत की तमुक पक्षात जाणार आहेत?...'

'बघा. बघा. अप्पासाहेब स्वतः इमारतीच्या दर्शनी भागाजवळ असलेल्या ध्वजस्तंभाजवळ अत्यंत दमदार पावले टाकत जात आहेत. आता ते कोणत्या पक्षाचा झेंडा हातात हाती घेणार हे लवकरच समजेल...'

'अप्पासाहेबांनी शिपायाने तबकातून आणलेला झेंडा सन्मानाने हातात घेतला आहे. अत्यंत सन्मानाने तो ध्वज कपाळावर ठेवून त्यास नमस्कार केला आहे. आणि... आणि ... तो बघा अप्पासाहेबांच्या माणसांनी तो ध्वज एका काठीमध्ये ओवायला घेतला आहे. अजूनही ध्वज पूर्णपणे उकलल्या न गेल्यामुळे काही कळत नाही की, ध्वज कोणत्या पक्षाचा आहे ते. अरे, हे काय? अप्पासाहेबांनी पुन्हा पुर्वीच्या पक्षाचा म्हणजे अमुक पक्षाचा ध्वज इमारतीवर फडकवला आहे. इतर तीनही ठिकाणी अमुक पक्षाचाच ध्वज फडकवला जातोय. याचा अर्थ स्पष्ट आहे, म्हणजे ज्याअर्थी अमुक पक्षाचा झेंडा स्वतः अप्पासाहेबांनी फडकवला आहे त्याअर्थी अप्पासाहेब अमुक पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत. एका मोठ्या प्रश्नावर पडदा पडला...'

'अप्पासाहेब गच्चीवरून इशारा करून सांगत आहेत की, मी कुठेही जात नाही. आहे तिथेच आहे... पुढे काय? अप्पासाहेबांच्या या भूमिकेकडेही कदाचित अविश्वासाने पाहिले जाईल. कदाचित अप्पासाहेब अशा घटनेतून पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून आजवर कोणतेही न मिळालेले मोठे पद पदरात पाडून घेणार आहेत की काय न कळे? त्यासाठी आपणास काही दिवस पाहावी लागणार आहे...'

           काही महिन्यांनंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अप्पासाहेबांनी त्या निवडणुकीत सारे राज्य पिंजून काढले. निवडणुका झाल्या. निकाल लागले. अमुक पक्ष प्रचंड बहुमताने निवडून आला. अप्पासाहेबांच्या परिश्रमाचे फळ पक्षाला मिळाले. पक्षानेही अप्पासाहेबांच्या मेहनतीला भरपूर प्रतिसाद देताना मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली...                                              

                                        


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy