Nagesh S Shewalkar

Comedy

4.5  

Nagesh S Shewalkar

Comedy

मी स्वयंपाक करतो

मी स्वयंपाक करतो

8 mins
384


      माझा आणि घरकामाचा त्यातल्या त्यात स्वयंपाकाचा छत्तीसचा आकडा! चहाच्या कपाची ने - आण करण्यासाठीही मी कधीच स्वयंपाकघरात गेलो नाही. स्वयंपाक घरात जायचे नाही हा घेतलेला वसा काहीही झाले तरी गेली साठ वर्षे मी खाली टाकलेला नाही! अगदी चाळीस वर्षांपूर्वी लग्न झाले तेव्हा बायकोला घेऊन नोकरीच्या गावी राहायला गेल्यावरही तिची स्वयंपाक घरातून सुटका होत नसे. तीही अगदी न कुरकुरता 'स्वयंपाकघर हे विश्वची माझे!' याप्रमाणे सारे आनंदाने करीत होती... आहे!

      त्यादिवशी सकाळी सकाळी भ्रमणध्वनीवरून एक सूचना आली, 'अग'चा वाढदिवस! म्हणजे दोन दिवसांनी बायकोचा वाढदिवस होता. दोन दिवस आधीच आठवण व्हावी म्हणून मी गुगलमहाराजांना तशी विनंती केली होती. तेही बिचारे न चुकता दोन दिवस आधी सूचना देत होते. आमचे नवीन लग्न झाले त्यावेळी हे भ्रमणध्वनी वगैरे काही नव्हते त्यातच आमची स्मरणशक्ती म्हणजे... बायकोचा वाढदिवस विसरू नये म्हणून मी दरवर्षी दिनदर्शिका विकत घेतल्याबरोबर बायकोच्या वाढदिवसाच्या तारखेच्या रकान्यात तसे लिहून ठेवत असे.

      नुकतीच बायकोने साठी ओलांडली होती. आम्हाला एक मुलगा नि एक मुलगी! दोघेही सहकुटुंब परदेशात स्थायिक झालेले! बायकोची एकसष्टी साजरी करावी तर वयोपरत्वे शरीरात ठाण मांडून बसलेल्या आजारांमुळे ते कष्ट, ती धावपळ सोसवणार नाही यामुळे मी तो विचार रद्द केला. मी मनातल्या मनात एक योजना आखली. बायकोला कानोकान खबर लागू दिली नाही. फक्त एवढेच सांगितले की, एकसष्टी नाही तर नाही. आपण रात्री बरोबर बार वाजता केक कापूया. हो-ना करीत एकदाची बायको तयार झाली आणि अस्मादिकाचा जीव भांड्यात पडला.

        बायकोच्या लग्नाचा आदला दिवस. चिरंजीवाने आणि कन्येने आईला काही तरी घ्या म्हणून पाठवलेल्या पैशातून बरीच खरेदी केली. बाहेरच जेवण करून रात्री साडेनऊच्या सुमारास घरी पोहचलो. बायकोला गुडघेदुखीचा आजार असल्यामुळे तिला रात्री गोळी घ्यावीच लागे. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तर मी साडेआठला उठत असे. रात्री बारा वाजता केक कापल्यानंतर मी तिला ती गोळी दिली. तिनेही ती गोळी घेतली कारण दिवसभर फिरणे झाल्यामुळे तिला गोळी घेणे आवश्यकच होते. माझ्या योजनेसाठी तिने ती गोळी उशिरा घेणे गरजेचे होते कारण जितक्या उशिरा ती गोळी घेईल तितक्या उशिरा उठणार होती.

      सकाळचे पाच वाजत असताना मी उठलो. पुटपुटलो, 'चला. बायकोचा वाढदिवस. तशी ती उशिराच उठणार आहे. ती उठल्यावर तिला गरमागरम जेवण देऊन आश्चर्याचा धक्का देऊया...' दुसरे मन हसत हसत म्हणाले, 'अहो, सुगरणराव, तुम्ही म्हणे स्वयंपाक करणार. तोही बायकोच्या एकसष्टीचा! चांगलीच षष्ठी होईल...'

   मी चहा करून घ्यावा म्हणून स्वयंपाक घरात गेलो. फ्रीज उघडले. पातेले काढून ओट्यावर ठेवत असताना झाकण काढताच आत दूध दिसताच जग जिंकल्याचा आनंद झाला. दूधाचे पातेले ओट्यावर ठेवून पातेल्याचा शोध घेतला. शोधक नजरेने पातेले हेरले. ते गॅसवर ठेवले. लायटर घेतला. दोनचार वेळा प्रयत्न केल्यानंतर गॅस सुरु होताच दुधाचे पातेले त्यावर ठेवले. साखरपत्तीचा शोध सुरू झाला आणि एका डब्यात पत्ती दिसली. किती टाकावी समोर प्रश्न येताच पाच चमचे पत्ती दिली टाकून! साखरेचा डब्बा सापडेना. इकडे चहा ऊतू जाण्याच्या मार्गावर होता तसा दुसऱ्या मनाने टोमणा मारला,'व्वा! भाई, व्वा! बायकोवरील प्रेमाप्रमाणे दूधही ऊतू जातेय.' तितक्यात एका बरणीत गुळ दिसला आणि विचार आला, गुळ आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून गुळ वापरायला बायकोच्या वाढदिवसापेक्षा दुसरा कोणता मुहूर्त चांगला असणार?' असे पुटपुटत हातात येईल तेवढा गुळ काढून पातेल्यात टाकला. चहाकडे लक्ष ठेवून बसलो. भदभद असा आवाज येत होता म्हणजे चहा चांगला शिजतोय तर... काही वेळाने चिमट्यात पातेले पकडून उतरवत असताना चहाकडे पाहिले तर चहा नासला होता. कदाचित शेवटी टाकलेला गुळ दुध-पत्तीला पचला नसावा...

     काय स्वयंपाक करावा, सौभाग्यवतीला काय आवडते असा विचार करीत गॅसच्या ओट्याला टेकून उभा राहिलो. तसे दुसरे मन म्हणाले,'जन्मात कधी बायकोला म्हणालास काय की आज तुला आवडते तो स्वयंपाक कर म्हणून. तिने बिचारीने आजन्म तुझ्याच आवडनिवडी जपल्या...' तिकडे दुर्लक्ष करून मी मनातल्या मनात करावयाचे पदार्थ ठरवले. भजे करावे म्हणून मी अगोदर भज्यासाठी पीठ शोधले. तेव्हा एका मोठ्या बरणीत पीठ दिसले. हेच असणार भज्याचे पीठ म्हणून तो डब्बा काढला. किती घ्यावे पीठ? खाणारी तोंडे दोनच! त्यात आजारापेक्षा पथ्य भारी म्हणून मी एक ताट काढले त्यात अंदाजाने पीठ टाकले. तांब्यात पाणी भरून पिठामध्ये टाकताना पाणी भडकन पडले. ताटातील पीठ घेऊन बरेचसे पाणी बाहेर पडले. पुन्हा थोडे पीठ टाकले. त्यात मीठ टाकले, तिखट टाकले, हळद टाकली. अर्थात सारे काही अंदाजाने! अचानक आठवले भज्याला कांद्याशिवाय का मजा येणार आहे? मग कांद्याचा शोध घेऊन सहा-सात कांदे काढले. ते चिरायला घेतले. पहिल्या कांद्याचे दोन मधोमध काप करावे म्हणून विळीवर कांदा फिरवला आणि जीव गेल्यागत झाले. त्याविळीने कांद्याला सोडून एक 'अकलेचा कांदा' हाती लागलाय म्हणून माझ्या हाताचे रसरशीत चुंबन घेतले. हळद टाकून रुमालाने ती जखम बांधली. कांदे चिरून होताच भजे तळण्यासाठी पातेले घेतले. गॅस पेटवून पातेले वर ठेवावे म्हणून लायटर हातात घेतला. तो दाबून गॅस सुरू केला पण 'पहले गेंद आई, बल्ला बाद मे घुमा' याप्रमाणे गॅस आणि लायटर यांची भेट होतच नव्हती. अनेकवेळा खटखट केल्यानंतर शेवटी दोघांची गळाभेट झाली. आनंदलेल्या जाळाने थेट माझ्या चेहऱ्याकडे धाव घेतली. चेहरा असा भाजला म्हणता पण तिकडे निर्धाराने दुर्लक्ष करून पातेले गॅसवर ठेवले. पातेल्यात कांदे टाकावे म्हणून सहा कांद्याचे काप ठेवलेले ताट उचलत असताना लक्षात आले की, तेल टाकावे लागेल. तेलाचा शोध घेताना कोपऱ्यात ठेवलेली पाच लिटरची कॅन दिसली. अत्यानंद झालेल्या अवस्थेत ती कॅन उचलली. तापलेले पातेले तडतड आवाज करीत होते म्हणून गडबडीने ती तेलाची बरणी पातेल्याच्या वर धरली आणि काय सांगू. त्या बरणीतल्या तेलाने पातेले सोडून ओट्यावर आणि खाली फरशीवरही धाव घेतली.

'अरे, बाप रे! हे काय झाले?...'असे पुटपुटत वरच्या दोरीवर वाळत घातलेले फडके घेऊन ओटा पुसायला सुरुवात केली. एक दोन वेळा हात फिरवून झाला असेल नसेल तितक्यात फरशीवर पसरलेल्या तेलाने डाव साधला. माझा पाय घसरला आणि मी पडता पडता गॅसच्या ओट्याचा आधार घेतला. धडपडत उठलो. बराच वेळ घासघासून फरशी, ओटा पुसला पण तेल पूर्ण पुसल्या जात नव्हते. तसाच उठून पुन्हा हळूच पातेल्यात तेल टाकले. त्यात कांद्याच्या फोडी टाकल्या. विचार केला, कांद्याच्या फोडी शिजेपर्यंत पीठ भिजले का ते पहावे. म्हणून पिठाकडे पाहिले त्यातले पाणी तसेच होते. पुन्हा विचार केला, भिजायला वेळ लागेल तोवर पोळीचे पीठ काढून भिजायला घालूया. म्हणून खाली वाकून दोन डब्यांपैकी एक डब्बा उचलला. उठताना पाय घसरत असताना सावरलो. डब्बा वर ठेवला. पीठ घ्यावे किती हा यक्षप्रश्न पुढे उभा राहिला. शेवटी त्यातील मोठ्या चमच्याने आठ- दहा चमचे पीठ टाकले. डब्बा पुन्हा खाली ठेवत असताना डब्बा सटकला आणि सारे पीठ पसरले. अगोदर सांडलेले तेल आणि पडलेले पीठ यांची घट्ट मैत्री जडली.

तिकडे दुर्लक्ष करून मी पुढील चढाईला निघालो. पिठात पाणी टाकावे म्हणून तांब्या हातात घेतला तर अचानक ठसका लागला. काही क्षणातच खोकून खोकून जीव मेटाकुटीला आला तेव्हा लक्षात आले, 'अरे, तेलात टाकलेले कांदे...' खोकतच गॅसवर ठेवलेल्या पातेल्यात पाहिले तर कांद्याच्या सगळ्या फोडी काळ्याकुट्ट झाल्या होत्या. मी धडपडत गॅस बंद केला. भिजत घातलेल्या भज्याच्या आणि पोळ्याच्या पिठाकडे पाहिले तर पाणी शिल्लक होते. ते पाणी आटेपर्यंत कुकर लावावे म्हणून कुकर शोधून काढले. दाळ-तांदळाचे डब्बे शोधले. पुन्हा किती माप घ्यावे हा प्रश्न वाकुल्या दाखवत होता. वाटी हुडकत असताना एक पातेले दिसले. मागचा पुढचा विचार न करता पातेले भरून तांदुळ एका डब्यात आणि तेवढीच दाळ दुसऱ्या पातेल्यात ओतली. एकानंतर एक दोन्ही डब्बे नळाखाली धरून सांडेपर्यंत पाणी भरून घेतले. दोन्ही डब्बे कुकरमध्ये ठेवले. कुकरचे झाकण लावून दुसरा स्टो पेटवून त्यावर कुकर ठेवले. अचानक आठवले की, आपण गोड काय करावे हा विचारही केला नाही. लगेच बाहेर आलो. दुधाच्या पिशव्या आल्या होत्या. त्या आत आणून एका पातेल्यात रिकाम्या केल्या. गॅसचा तिसरा स्टो पेटवला. त्यावर दुधाचे पातेले ठेवले. दोघांनाही साखरेचा आजार असला तरीही आज मस्त गोड खायचे म्हणून साखरेच्या डब्याचा शोध घेत असताना एका बरणीवर लक्ष गेले. हातात घेऊन पाहिले आणि आनंदाने चित्कारत पुटपुटलो, 'साखर नाही तर नाही. साखरेचे पीठ सही...' लगोलग अर्धी बरणी त्या दुधात रीती केली आणि भज्याच्या पिठाकडे पाहिले. ते बऱ्यापैकी घट्ट झाले होते. ते हलके हलके चुरायला सुरूवात केली. ते होताच पोळीच्या पीठाचेही ताट घेतले आणि ते पीठही दाबून दाबून एकजीव केले. तितक्यात कुकरमधून वाफ जायला सुरूवात झाली ते पाहून आनंद झाला कारण बायको अनेकदा म्हणाली होती की, कुकर बिघडलंय. शिट्ट्या न होता वाफ जातीय. आपण लावलेल्या कुकरमधून वाफ जात आहे याचा अर्थ कुकर बरोबर होतंय. पूर्ण वाफ जाऊ द्यावी मग बंद करावे तोवर भजे तळावेत हा विचार करीत असताना आठवले की, बरणीतले तेल तर सांडले आहे आणि कांद्याच्या फोडीचीही राख झाली आहे. भजे रद्द! आजकाल सौभाग्यवतीला खोकला सतावतोय. तेलकट खाऊन खोकला वाढण्यापेक्षा भजे न खाल्लेले बरे असाच हा 'भजे' झालेल्या भज्यांचा विचार असावा. तिकडे कुकरने वाफ प्रसवणे थांबवले होते. पुन्हा खोकल्याची उबळ आली. काही क्षणातच खोकल्याने उग्र रुप धारण केले. खोकला का येतोय हे समजत नव्हते. तितक्यात दारावरची घंटी वाजली. 'यावेळी कोण कलमडलंय' हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो. खोकतच दार उघडले आणि अंतर्बाह्य शहारलो. भीतीची एक वेदना सर्रकन शरीरात संचारली. दारात कामवालीबाई उभी होती. मला तसे खोकताना पाहून 'काय झाले हो काका?' असे विचारत ती आत आली आणि खोकल्याने तिचेही जोरदार स्वागत केले. तोंडाला पदर लावून खोकलतच ती आत पोहोचली. मीही तिच्या पाठोपाठ निघालो. खोकला अनावर झालेला असताना मनात एक चूक लक्षात आली की, मी माझ्या नियोजनात या बाईला गृहीत धरले नव्हते. तिला आज सुट्टी द्यायला हवी होती. आत जाताच तिने अगोदर गॅसची सारी बटणे बंद केली.

"काका, असे कसे कुकर लावले? कुकरला शिट्टी लावलीच नाही तर कुकर होईलच कसे? दाळ, तांदूळ जळाल्याने वास सुटलाय आणि हे काय कांदे करपून कोळसा झाला की हो. हे पीठ कशासाठी..."

"ते..ते.. भजे करायचे होते..."

"हीः हीः हीः... " फिदीफिदी हसत ती पुढे म्हणाली, "काका, भजी करायला बेसनाचे पीठ घ्यायचे सोडून रवा घेतलाय तुम्ही. आणि हे काय? हे.. हे.. दूध नासलं की..."

"नासलं? नाही गं. ताजे दूध आहे. बासुंदी करायची म्हणून तापायला ठेवले होते. हे काय साखरही टाकली.."असे म्हणत मी तिला ती बरणी दाखवली. तशी ती सातमजली हसत म्हणाली,

"काका, हे साखरेचे पीठ नव्हे तर मीठ आहे. दूध नासणारच की...हे काय भिजवलंय. काका, भजे, बासुंदीचा बेत करताय आणि भाकरी करताय?"

"म्हणजे? हे भाकरीचे पीठ आहे तर..." असे म्हणत मी कपाळावर मारून घेत पुटपुटलो,

'करायला गेलो एक नि झाले भलतेच ...' असे पुटपुटत मी मागे वळलो तर आमच्या सौभाग्यवती सत्कारमूर्ती दारात एक हात कमरेवर ठेवून आणि एका हाताने पदर तोंडावर घेऊन हसत असताना त्यांचे लक्ष मी सांडलेले तेल पुसण्यासाठी घेतलेल्या कपड्याकडे गेले. लगबगीने तो कपडा उचलून ती किंचाळत म्हणाली,

"बाई गं! अहो, हे माझे पैठणीवरचे ब्लाऊज होते हो. मुद्दाम इथे वाळत घातले होते हो..." ते ऐकत मी काहीही न बोलता मान खाली घालून तिथून काढता पाय घेतला...

                                                                    ००००              


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy