मेहंदीच्या पानांवर
मेहंदीच्या पानांवर
मेहंदीच्या पानांवर..!
मेहंदीच्या पानांवर
मन अजून झुलते गं
जाईच्या पाकळ्यास
दवं अजून सलते गं
वरील गाण्याच्या ओळी ऐकल्या तर खरचं मन मेहंदीच्या पानांवर झुलायला लागते. जाईच्या पाकळ्यांना ज्याप्रमाणे दवं सलते त्याचप्रमाणे मेहंदी ही मानवी मनाला खूप आकर्षित करते. मेहंदीचं नाव ऐकताच डोळ्यासमोर नक्षीदार कलाकुसर छबी मेहंदीची दिसून पडते. मेहंदी काढणे हेही एक कला आहे, आणि ही कला प्रत्येकाला अवगत असेल,असं काही नाही. मेहंदी ही टिपक्यांच्या रूपात जरी हातावर काढल्या गेली तरी सुद्धा त्या मेहंदीचा रंग लाल, तपकिरी हा होतोच. नक्षीदार मेहंदी हातावर जेव्हा काढली जाते तेव्हा ती दिसायला सुंदर आणि नक्षीदार कला पाहून मन आंनदीत होते. मंगल प्रसंगी असो किंवा सण समारंभात, एरवीही हातावर मेहंदी लावूने लग्न झालेल्या स्त्रियांना, लहान मुलींना, तरुण मुलींना एकंदरीत सर्वच स्त्रियांना खूप आवडते. मग ती मॉडर्न स्त्री असो किंवा साधीसुधी राहणारी एखादी तरुणी असो. मेहंदी हातावर काढणे सर्वांनाच आवडते. मेहंदीचा सुगंध मनाला वेड लावून जाते. मेहंदीचा रंग तपकिरी कधी लाल भडक होतो तर कधी काळपट होतो. तो रंग मनाला आकर्षित करतो. मेहंदीची डिझाईन आता वेगवेगळ्या पद्धतीने काढली जाते. स्त्रियांना मेहंदी ही हवीहवीशी वाटणारी आणि मेहंदीचा रंग हा खुलून दिसावा यासाठी ही स्त्रिया बरेच प्रयत्न करत असतात. मेहंदी खुलून दिसावी अशी स्त्रियांची इच्छा असते.मेहंदी ही सौंदर्य प्रसाधनांसाठी प्राचीन काळापासून वापरात असलेली एक वनस्पती आहे. मेहंदी ही सणांना व लग्न समारंभात हातावर व पायावर काढण्यात येते. मेहंदी ही मेहंदीच्या झाडांच्या पानापासून तयार करतात. मेहंदी भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. स्त्रिया या वनस्पतीचा उपयोग फार पुरातन काळापासून सौंदर्यप्रसाधनासाठी करत आहेत. अनेक सणांमध्ये धार्मिक कार्यक्रमात मेहंदीची कलाकुसर हातावर काढण्यात येते. हिरवी मेहंदी ही केसावर ही लावली जाते. हिरव्या मेहंदीमुळे केसांना नॅचरल ब्राऊन रंग येतो. आणि केस आकर्षक दिसतात. लग्न समारंभात वेगवेगळ्या विधी पैकी एक म्हणजे मेहंदी, वधू आणि वराच्या हातावर आणि पायावर लावली जाते. लग्नात मेहंदी लावण्याच्या विधिला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मेहंदी लावल्यामुळे वधूच्या सौंदर्यात भर पडते. तेज येते.तिच सौंदर्य वाढते. मात्र याशिवाय आणखीनही काही महत्त्वाचे कारणे आहे. भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. भारतातील विवाह हा एक सामाजिक सणासारखा आहे. ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या परंपरा आणि विधीचे पालन करून सहजीवनाला सुरुवात करतात. लग्नात मेहंदी लावण्याची प्रथा प्रचलित आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा विधी केला जातो. यामध्ये वधूच्या हातावर आणि पायांवर मेंदी लावून सुंदर डिझाईन बनवल्या जातात हा विधी वधू आणि वरांच्या कुटुंबाचे सदस्य आणि मित्र परिवार याद्वारे केला जातो. सौंदर्याच्या दृष्टीने मेहंदी हा स्त्रियांचा अलंकार म्हणून उल्लेख आहे. ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. मेहंदी हें प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की मेहंदीचा रंग जितका उजळ डार्क तपकिरी असेल वधूचा जीवन साथीदार तितकेच तिच्यावर प्रेम करेल. असे म्हणतात. हे किती खरे आहे, मात्र याबद्दल शंका आहे. मेहंदीच्या चमकदार रंग वधू आणि वरामध्ये खूप भाग्यवान आहे असे मानले जाते. लग्नाच्या वेळी वधू आणि वर या दोघांवर खूप दडपण असते. मेहंदीची प्रकृती थंड असल्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते म्हणून वधूवरांना मेहंदी लावली जाते. हें त्या मागचे कारण आहे.इतकेच नाही तर मेहंदीचा उपयोग प्राचीनकाळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता असा ही उल्लेख आहे. आपली मेहंदी अगदी उठून आणि खुलून दिसावी ही स्त्रियांची इच्छा असते. काही उपाय केले तर मेहंदी अधिकचं खुलून दिसू शकते. मेहंदी सुकल्यानंतर सुकलेल्या मेहंदीवर साखरेचे पाणी कापसाच्या मदतीने मेहंदीच्या हातावर लावावे. यामुळे तुमची मेहंदी हाताला अधिक काळ टिकून राहील. मेहंदी कोरडी झाल्यानंतर मेहंदी काढून टाकावी पण पाण्याने हात धुण्याआधी थोडा वेळ मेहंदीवर पेन किलर बाम लावा. बाम मेहंदीवर लावल्या नंतर आपल्या मेंदीचा रंग गडद होतो. हा एक साधा सोपा घरगुती उपाय आहे. याशिवाय तव्यावर एक ते दोन लवंगा गरम करत ठेवा जशा लवंगा गरम होऊ लागतील तसा त्यातून धूर येण्यास सुरुवात होईल त्या लवंगाच्या धुरीवर आपला मेहंदीच्या हात धरा असं केल्याने हातावरील मेहंदी अजून रंगेल. मेहंदी रंगवण्यासाठी हातावर नारळ तेल देखील लावले जाते. तेलाच्या घर्षणामुळे मेंदीचा रंग चढतो. मेहंदी पूर्ण झाल्यावर सामान्य स्त्रिया पंखा लावतात किंवा कुलरच्या समोर बसतात. मेहंदी यामुळे सुकवल्या जाणार पण ही मेहंदी सुकवण्याची योग्य पद्धत नाही. तुमची त्वचा मेहंदीचे रंग शोषून घेईन. मेहंदी सुकेल पण तिचा रंग डार्क होणार नाही. नैसर्गिक पद्धतीने मेहंदी सुकवण्यासाठी अर्धा तास लागू शकतो पण हे तुमच्या मेहंदीच्या डिझाईनवर अवलंबून आहे. जर तुम्हाला मेहंदीचा रंग डार्क हवा असेल तर संयम ही बाळगावा लागेल. जशी मेहंदी सुकायला थोडा वेळ घेते पण जेंव्हा मेहंदी रंगते तेव्हा रंग आणि गंध मनाला आनंद देऊन जाते..!
मंगल प्रसंगी एरवीही
मेहंदी हातावर सजते
मेहंदीच्या गंधात मन
आपले कायमच रमते
आठवणी असावं सुखद
आयुष्य आपल रंगवते
प्रत्येक क्षण गंधाळणे
आपल्या हातात नसते
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
