जीवनाची शिदोरी..!
जीवनाची शिदोरी..!
जीवनाची शिदोरी..!
'शिदोरी' हा लहानपणीपासून प्रत्येकांच्या कानावर पडलेला शब्द आहे. बाहेरगावी जायचं म्हटलं तर आई सोबत शिदोरी घ्यायची.हें आपण बघितलेलं आहे. शिदोरी म्हणजे खाण्यासाठी सुती कपड्यात बांधून घेतलेले अन्न होय. जुन्या काळी गाठोळ्यात खाद्यपदार्थ नेल्या जात असे. शेतात जाताना सतत शेतकरी हा आपल्याबरोबर शिदोरी घेऊन जातो. जेव्हा भूक लागली तेव्हा तो खातो. पण तो प्रवासच असावं असं काही नाहीं. ' भूक नसो पण शिदोरी असो' ही म्हण कोठे जायचं असलं तर आई नेहमी म्हणायची. ही म्हण सर्वांनी ऐकलेली आहे माहित आहे. प्रवासात सोबत घेतलेले खाद्यपदार्थ म्हणजे शिदोरी. जेव्हा भूक लागली तेव्हा खाता येत होती. प्रवास कितीही लांबचा असो किंवा जवळचा पण प्रवास मात्र सुखकर होई. आणि अशा प्रवासात जेवण करण्याची वेगळीच मज्जा होती. गावाला कोणी जात असेल पुढच्या प्रवासासाठी आता आपण ही शिदोरी देतो. आपण सोबतीला काही तरी गोड खाद्य एखाद्या डब्यात किंवा कपड्यात बांधून देतो. शिदोरी हा प्रकार बऱ्याच कालखंडापासून चालत आलेला आहे. पण जीवनाची शिदोरीही अशीच असते. काही गोड आठवणी तर काही कटू आठवणी मनात साठवलेल्या असतात. आपल्या जन्मापासून चालत आलेला प्रवास हा ही शिदोरी सारखाच आहे. जीवन म्हणजे काय तर दोन शब्दांचा संगम म्हणजे सुख आणि दुःख होय. सुखात सगळे आपल्या सोबत असतात. दुःखात काही मोजके माणसेचं सोबत असतात. यालाच तर जीवन म्हणतात. म्हणजे जीवनाच्या प्रवासात खूप माणसे भेटतात. काही माणसे चांगली भेटतात. काही खूप खराब सतत टोचून बोलणारी भेटतात, तर काही आडवं बोलणारी असतात. काही माणसे आधार देतात. काही माणसे आपल्या साध्या स्वभावाचा फायदा घेतात. काही माणसे आपल्याशी खूप गोड बोलतात. काही माणसे सतत खोटं बोलतात. काही माणसे आपलं सुख आपली प्रगती बघून जळणारी असतात. काही माणसे आपल्याबद्दल आपल्या पाठी मागे नाव ठेवणारी असतात. काही माणसे सतत आपल्या कामात अडथळे आणतात. तर काही माणसे ओळखीची असूनही अनोळखी सारखी वागतात. असे असंख्य माणसांची ओळख संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात झालेली असते. आयुष्यात बरीच माणसे भेटतात. काही दूर जातात. काही माणसे मनात घर करतात. तर काही माणसे अख्या आयुष्यात न भेटलेली बरी अशीही असतात. ती माणसे म्हणजे शत्रुत्व असणारी होय. आपण समाजात जितकं मिसळू किंवा मिसळण्याचा आपला स्वभात तितकीच जीवनात वाढलेली माणसांची संख्या होय. यात मात्र सर्वच माणसे विश्वास ठेवण्यासारखी नसतात. एखादयावर आपण खूप विश्वास ठेवतो आणि ऐनवेळी तोच धोका देऊन जातो. दिलेला शब्द पाडतांना दिसत नाहीं. लहानपणीपासून भेटलेली असंख्य मित्र मैत्रिणी आपले शेजारी काही काळ सोबत असलेली, काही शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेली, तरीही मात्र मनामध्ये कोठे तरी बालपणीच्या त्या आठवणी साचलेल्या असतात. एखाद्या मित्राने आपल्याला केलेली मदत. त्याची परतफेड म्हणून आपणही केलेली त्याला मदत. आपण बोललेले धन्यवादाचे दोन शब्द मनामध्ये आपुलकीची भावना तयार करतात. बऱ्याचदा आयुष्यामध्ये अशीही लोक भेटतात की जी वयाने मोठी असतात किंवा वयाने लहान असतात तरीसुद्धा हक्काने ती आपल्याला मदत करत असतात. सतत आपल्याला कोणत्याही कामांमध्ये मार्गदर्शन करत असतात. आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम असते. काही माणसे अशी असतात की जे जीवनाच्या सुरुवातीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असतात. रोज जरी भेटणं झालं नाही तरीसुद्धा फोनच्या माध्यमातून सतत संपर्कात असतात. प्रत्येक वेळी एकमेकांच्या तब्येतीची काळजी घेतली जाते. आपल्याबद्दल विचारल्या जाते. असे मित्र, अशी माणसे, जीवनात असली की जीवन खूप छान वाटायला लागते. संपूर्ण आयुष्य आंनदात जाते. तब्येत खराब असली की ते फोन करून विचारतात. एखाद्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात न बोलावता ही येतात. दुःखात साथ देतात मनाला हिम्मत देतात. कोणत्याही कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करतात. आपण कामात असलो किंवा आपण मोबाईलवर ऑनलाइन नसलो कीं कॉल करून विचारतात की तू ऑनलाईन का नाहीं. बऱ्याच दिवसापासून व्हाट्सअँपवर स्टेटस दिसले नाही, हे विचारण्या करिता सुद्धा आपल्या जवळचे जिवलग मित्र कॉल करून विचारत असतात. जीवनाची शिदोरी काय तर हीच तर आहे. 'मनापासून निःस्वार्थ भावनेने प्रेम करणारी माणसे' सोबतच आपल्या संस्काराच्या रूपामध्ये आपल्या मुलांमध्ये आपण रुजवलेली संस्कार हीच आहे आपली अख्या आयुष्याची शिदोरी. प्रवासात पोटाला लागणाऱ्या खाद्यपदार्थाची शिदोरी वेगळी आणि आयुष्याची शिदोरी वेगळी पण या दोन्ही शिदोऱ्या ज्याच्याजवळ असतात त्याचा प्रवास हा सुखकर होतो. जीवनाचा हा प्रवास सुखकर झाला ही पाहिजे. 'एखादा जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा जो प्रवास असतो त्याला जीवन म्हणतात' आणि प्रेमाची आपुलकीची जिव्हाळ्याची माणसे शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असणे म्हणजे जीवनाची शिदोरी म्हणायला हरकत नाहीं.
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
