Meghana Suryawanshi

Children

4.5  

Meghana Suryawanshi

Children

मदत

मदत

4 mins
308


     महाविद्यालयाची प्रथम सत्र परीक्षा झाली होती. त्यानंतर मिळालेल्या पंधरा दिवसांच्या सुट्टीनंतर द्वितीय सञ सुरू झाले. पहिल्या सञापेक्षा कालावधीने लहान असणाऱ्या या सत्रात विद्यार्थ्यांस अभ्यासापेक्षा जास्त करून महाविद्यालयीन कार्यक्रमांची ओढ असते. जानेवारी सुरू होताच साप्ताहिक कार्यक्रमांचे वेळापत्रक कधी जाहीर होतेय असं होतं. मग ते सात - आठ दिवस फक्त मनोरंजन आणि विरंगुळ्याचे! पण, मी या साप्ताहिक कार्यक्रमांत कधीही साडी डे व्यतिरिक्त इतर कोणताही मनोरंजक दिवस साजरा केला नाही. तशी मला कधी शाळा आणि महाविद्यालयीन कार्यक्रमांत कधीच जास्त रुची राहिली नाही. शाळेनंतर कधीही वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग नोंदविला नाही. रोज वेगवेगळे पोशाख करून जाण्याचा खुप कंटाळा येई. त्यापेक्षा मी घरी राहूनच सुट्टीचा आनंद घेत असे. तशी या महाविद्यालयातील साप्ताहिक कार्यक्रमांची ओळख प्रथम डिप्लोमा ला आल्यावरच झाली. आज काय तर टाय आणि फेटा डे, उद्या स्कूल डे तिथंपासून वार्षिक स्नेहसंमेलन. 


      त्या वर्षी माझे डिप्लोमा अभियांत्रिकीचे शेवटचे वर्ष होते. आतापर्यंत कोणत्याही वर्षी कार्यक्रमांत सहभागी झाले नव्हते. त्या वर्षी पहिल्यांदाच मैत्रिणींच्या हट्टापायी साडी डे साजरा केला. माझ्या पसंदीचा महाराष्ट्रीयन काष्टा साडी पोशाख होता. तरीही सुरूवातीस काही दिवस कधी आवरायचे आणि जायचे या विचारांनी या आळशी व्यक्तीमत्वास नको वाटे. पण, परत जसा जसा साडी डे खुपच जवळ येत गेला तसे कुतूहल वाढू लागले. मग प्रत्येकाच्या घरी जाऊन नऊवारी साडी च्या निवडी पासून ते शृंगारासाठी दागिने खरेदी पर्यंतची सगळी तयारी. अखेर साडी डे आला, त्यादिवशी सकाळी अगदी लगबगीने आवरायला घेतले. साडीची रोजची सवय नसते त्यामुळे त्या दिवशी कसेतरीच वाटते. स्वतःचे दर्शन इतरांना जास्त होण्याऐवजी आरशालाच जास्त होते. मग साडी जरा वर झाली आहे किंवा जरा सैल वाटतेय गं, इकडे अशी का दिसतेय? अशा खुपसाऱ्या तक्रारींची आईकडे सरबत्ती होई. पिनांचे दुकान त्यादिवशी प्रत्येक मुलीकडे भेटेल. कधी सवय नसल्याने नीट पटपट चालताही येत नसे. सगळे लक्ष साडी सावरण्याकडे जाई. त्यातच आमचे महाविद्यालय गावाच्या बाहेर होते, घरापासून अगदी खूपच लांब. इतर वेळी महाविद्यालयाच्या बस न्यायला येत असत पण यावेळी त्यांना सुट्टी होती. मग काय महामंडळाच्या गाडीची कधी नव्हे ती सवारी! सकाळी लवकर आवरून बसस्थानकावर आले. त्यातच महाविद्यालयीन मुली नटल्यावर लोक पहिल्यांदाच नारी जातीला पाहिलय असे पाहत असतात. बस येण्यास जवळपास पाऊण तास होता. तोपर्यंत एकटीच अशी साडीत बसणे माझ्यासाठी कठीण झाले होते. विरंगुळा म्हणून स्थानकावर फिरावे तर ते ही अवघड. मग तिथेच एका बाकावर फोनमध्ये लक्ष घालून बसले. इतर वेळी फोनमध्ये बातम्यांचे अॅप फक्त नावापुरते होते,बहुधा पहिल्यांदाच ते उघडण्याचे कष्ट त्यादिवशी माझ्याकडून झाले होते.


       बातम्या वाचत असताच डोळ्यांसमोर इवलासा लहान हात पैशांनी भरलेली ताटली घेऊन आला. नजर लगेच बातम्यांमधून वर गेली. समोर एक चार-पाच वर्षे वयोगटातील एक लहान सुंदर मुलगी उभी होती. तिला नीट पहायच्या आतच तिच्या बोलीतून, ताई पैसे द्या ना काही खाल्लेले नाही अशी बोबडी केविलवाणी विनंती निघाली. तत्क्षणी मनात विचारांचे वादळ उभे राहिले. मी बॅगेतून दहा रूपये काढले आणि ताटली मध्ये ठेवणारच तत्क्षणी, थांब कृपया पैसे देऊ नको अशी विनंती कानी आली. बाजूला वळून पाहिले असता लक्षात आले की, माझ्या वयाचाच एक महाविद्यालयीन तरुण मला तशी विनंती करीत होता. रूपावरून तरी चांगल्या घरातील वाटत होता. हातात आयफोन असणाऱ्या मुलाने मला त्या मुलीस पैसे देणे नाकारण्याचे जरा मला खटकलेच. माझ्यासाठी तो अनोळखीच होता. जसा तो बोलला की मी नाहीत दिलेले, तसं काही पैसे देण्याकरीता कोणाला श्रीमंतीचा माज आड यावा का? या विचाराने मला राग आला. मी त्या तरूणास चार उलटसुलट शब्द सुनावले. त्यावर त्याचे काहीच उत्तर न पाहून आणखीच राग आला. तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला शांतपणे प्रश्न केला की, तु का पैसे देत आहेस? मी रागातच म्हटलं ऐकू नाही का आले ती काय बोलली ते? तिला भुक लागली आहे. असचं कोणास उपाशी ठेवून नजरअंदाज करणे मला तरी नाही जमणार. त्याने परत मला एक प्रश्न केला ज्या प्रश्नाने माझी बोलती बंद झाली. तो असा की, पैसे खाऊन तिची भूक मिटणार आहे का?


      मला पुढे काय बोलावे काही उमजत नव्हते. मी शांत बसले. तो बोलू लागला - "ही मुलगी खुपच लहान आहे. तिला हे पैसे किती आहेत हे ही बहुधा कळत नसेल. तिच्यासाठी हे फक्त कागदाचे तुकडे आहेत, जे आणण्यासाठी कोणीतरी तिचा वापर करीत असेल. त्यांना ही भुकेलेली आहे किंवा नाही यावरून फरक नाही पडत. त्यांच्यासाठी पैसा सगळे काही असतो. मदत करावी पण योग्य मदत करावी. ही भुकेलेली आहे तर तू पैसे नाही काहीतरी खायला दे. मदत करण्यापूर्वी मदत मागणार्‍याला ओळखायची समज आपल्याकडी हवी.


लहान मुलांना कधीही पैशाची सवय लावू नये आणि थोरांना मदत करण्यापूर्वी चार वेळा विचार करावा. धडधाकट माणसाला भीक देऊन आणखीच लाचार बनवू नये. चार पैसे कमवण्यासाठी तो नक्कीच पात्र आहे. पण, पैसे देऊन आपण त्यांना भिकारी बनवतो. पैसे अपंगास दे जे त्याला पात्र आहेत. प्रसंगी खायलाही दे. मला काय म्हणायचे आहे हे तुला नक्कीच समजले असेल " त्याचे ते विचार ऐकून माझे मन एकदम शांत झाले. यावर मी एक ही प्रश्न उपस्थित करू शकत नव्हते. मला ही त्याचे विचार पटले, आणि नंतर मी त्या मुलीस पैसे देण्याऐवजी खाण्यास दिले. तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे ते निरागस हास्य पाहून मला ही एकप्रकारे वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याची उमेद मिळाली. एका अनोळखी तरूणाने मला खूप चांगला पाठ तेव्हा शिकवला होता. आतापर्यंत मी मदत करत आले होते पण योग्य मदत केली नव्हती.


      वाट पहाण्याची वेळ संपली. गाडी बसस्थानकावर आली आणि मी स्वतःसोबत मदतीचा एक उत्तम धडा घेऊन बसमधून कार्यक्रमास निघून आले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Children