Meghana Suryawanshi

Others

4  

Meghana Suryawanshi

Others

गर्भश्रीमंत भिकाऱ्याची चिता

गर्भश्रीमंत भिकाऱ्याची चिता

5 mins
422


       स्तब्ध चितेने क्षणार्धात पेट घेतला. राञीच्या निरव शांततेत स्मशानातील भयानक आसमंतात ज्वाला भडकेचा एकटाच काय तो आवाज. दबलेले आसु गालावरून भुमीवर प्रस्थान करायच्या आतच आटून गेले होते. चार अनोळखी सावल्यांच्या उपस्थितीत तो आत्मा पुढील प्रवासाकरीता पंचतत्वात विलीन झाला! ती एका गर्भश्रीमंत भिकारीची चिता होती! अमाप संपत्ती असूनही अहंकारापायी पैशांत भिकाऱ्यासारखे जीवन जगलेला गर्भश्रीमंत!


     कुठे एका गावात कौशल्य नावाचा व्यक्ती आपली पत्नी सुमती आणि दोन मुलांसमवेत रहात असे. लग्नास पाच - सहा वर्षे उलटली होती. पण, म्हणावी अशी समज कौशल्य मध्ये अजून काही आली नव्हती. घरी अठरावे विश्व दारिद्र्य होते आणि त्यास कौशल्यचे दारूचे व्यसन हे कारण होते. घरी सुमती हीच एकमेव कमवणारी होती. ती एका कारखान्यात काम करी. महिना सात हजार पगारात संसाराचा हातगाडा सुरळीत पेलण्याची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडली होती. कौशल्य सुमतीस रोज मारहाण करीत असे आणि सुमतीच्या पगाराचे बरेच पैसे दारूच्या नशेत उडवी. साठवण तरी कसलीच होत नव्हती उलट लहानग्या चिमुकल्यांसमवेत उपासमारीची वेळ ओढावत असे. सुमती माञ आपल्या पतीशी एकनिष्ठ होती. पत्नीची भक्कम साथ असूनही कौशल्य माञ पांगळाच राहिला. त्या दोघांत कधी कधी जोरात खटके उडीत आणि कौशल्य सुमतीस खुप मारहाण करी. या तगाद्यास कंटाळून शेजारींनी भाड्याचे रहाते घर त्या कुटुंबीयांस खाली करायला लावले. काही काळाने सुमती ज्या कारखान्यात काम करीत असे तो ही बंद पडला. लोकांची थकीत बिले न दिल्या प्रकरणी कारखान्यास कायम स्वरूपी ताळा लावण्यात आला. झाले आगीतून उठून फुफाट्यात यासारखी परिस्थिती निर्माण झाली.


दोघेही आपल्या मुलांना घेऊन मुळ गावी परतले. नातेवाईकांनी एकत्रीत येऊन कौशल्यास चांगलाच दम भरला. त्यानंतर सुमती घर आणि शेत सांभाळू लागली आणि कौशल्य कोळशाच्या खाणीत कामास जाऊ लागला. ती खाण गावापासून खूप दुरवर होती. तो दोन - तीन दिवस गावाकडे फिरकत नसे. सगळे एकदम सुरळीत पार पडत होते. हळूहळू कौशल्यास त्याच्या जबाबदारीची जाणीव होत गेली. तो दिवस रात्र काम करीत असे. चार पैसे जादा कमविण्याच्या हेतूने प्रसंगी तो वेळे पेक्षा जादा काम करी. कालांतराने त्याचे दारूचे व्यसन ही कमी आले. एकदम सुखाचे दिवस सुरू होते. आहे अशा परिस्थितीत ते सर्वजण खूप समाधानी होते. मुले ही आता शाळेत जाऊ लागली होती. दोघेही अभ्यास व्यतिरिक्त इतर गोष्टींत ही कुशल होते. त्यामुळे सगळ्याच बाजूने चिंतेचे कोणतेही कारण राहिले नाही. दोघांतील वाद ही कमी होत गेला.


      आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन यासमान काहीशी परिस्थिती झाली. आर्मी भारतीच्या जागा सुटल्या होत्या. यंदाची ही सर्वात मोठी भरती होती. कौशल्य ने आपले नशीब आजमवण्याचे ठरविले. तो भरतीच्या सर्व निकषांस पाञ होता. खाणीतील कामासोबतच त्याने भरतीची देखील तयारी सुरु ठेवली. त्याची रोज ञेधा तिरपिट उडे. रोजच्या जादा कष्टाने प्रसंगी तो बर्‍याच वेळा आजारी पडला पण मागे हटला नाही. भरतीचा दिवस जसा जसा जवळ येईल तस तसा त्याचा जीव कासावीस होई. आधीपेक्षा जास्तीत जास्त वेळ तयारीकडे कसा देता येईल हे पाहत असे. अखेरीस आर्मी भरतीचा दिवस उजाडला. कौशल्य शारीरिक, बौद्धिक, आरोग्य अशा सर्व चाचणींत सफल ठरला. काही दिवसांनी आर्मीत रूजू होण्याचे पत्र आले. कौशल्य आणि सुमतीस आभाळ ठेंगणे झाले. गावात मोठा उत्सव साजरा झाला. बर्‍याच ठिकाणी फलक झळकले. तोंड फिरवून गेलेल्या नातेवाईकांच्या पाऊलांचे त्यानंतर पहिल्यांदाच घरच्या उंबरठ्यास दर्शन झाले. सगळीकडे चैतन्याचा वसंत बहरला होता. कौशल्यने खाणीतील कामाचा राजीनामा दिला आणि आर्मीत रूजू झाला. पहिल्यांदा प्रशिक्षणासाठी पुण्यास यावे लागले. दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्याची पोस्टींग जम्मू काश्मीर येथे झाली. तो एकदम पूर्ण निष्ठेने आपली सेवा देशास अर्पण करीत होता. गावी जास्त संपर्क होत नसे. तो खर्चास लागणारे सर्व काही दोन महिन्यांतून एकदा कुरिअर ने पाठवी. सुमतीने अगदी वखुबीने ही परिस्थिती हाताळली. मुलांस कधीही वडिलांची उणीव भासू दिली नाही. कौशल्य वर्षातून एकदा काय ते घरी येत असे. वर्षे उलटली आणि कौशल्याची नेमणूक मोठ्या हुद्द्यावर झाली. मुले ही आता मोठी झाली होती.


      परंतु पाणी उलट्याच दिशेने वाहू लागले. दिवसेंदिवस कौशल्यचा पदाप्रती अहंकार वाढत चालला होता. त्याने आपल्या देशसेवेस व्यवसायाची जोड दिली. आर्मीत जे दैनंदिन सामान कमी किमतीत होते ते तो गावी जास्त किमतीने विकत. कौटुंबिक वाद ही वाढत चालले होते. ज्यादा पैसे कमविण्याच्या हेतुपायी त्याने अनेक जवळची माणसे गमावली. काही वर्षांनी कौशल्य सेवानिवृत्त झाला. मुले ही चांगल्या हुद्द्यावर कंपनीत नोकरीस होती. मुलांचे आता दोनांचे चार हात करायची वेळ आली. कालांतराने सज्जन आणि सुसंस्कृत कुटुंबातील मुलींशी दोघांचा विवाह एका मांडपात पार पडला. घरात नव्याचे नवचैतन्य नांदत होते. दोन्ही सुना स्वभावाने अत्यंत नम्र आणि मनमिळावू होत्या. घरी कौशल्य व्यतिरिक्त इतर कोणताही कलेश नव्हता. सेवानिवृत्ती नंतर बरेचजण सर्व कारभार मुलांच्या हाती सोपवून सुखात दिवस काढतात पण कौशल्य ची गंगा दिवसेंदिवस अधिकच उलटी वाहू लागली. पैशांच्या हव्यासाने त्याचाच डोळ्यात इतके प्रदीर्घ अंजन घातले की, त्याला सगळ्या गोष्टी पैशांसमोर फिक्या वाटू लागल्या. रोज वादाची भांडी फुटू लागली. वाद इतका विकोपास गेला की कौशल्य ने सर्व काही संपत्ती आपल्या नावे केली आणि घरातील इतर सर्वांना अंगावरील कपड्यानिशी कायमचे घराबाहेर हाकलून दिले! त्या प्रसंगानंतर सर्व जण शहरात परतले. सुमती आपल्या सुना आणि मुलांसमवेत राहू लागली. ती पूर्णपणे मुरगळून गेली होती. तिने सर्व काही पूर्ववत होण्यासाठी नवस केले, अर्चना केली पण काही उपयोग झाला नाही. तिने एकदा समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ही निष्फळ ठरला. कोणीही विचार केला नव्हता की देशसेवेवरील अतोनात प्रेमाचे रूपांतर पैशांत होईल. सुरवातीचे काही दिवस सगळ्यांना कठीण गेले पण नंतर सगळ्यांचा आपापल्या संसारात चांगला जम बसला होता. सुमती देखील मुलांसमवेत खुश होती. 


      कौशल्यची परिस्थिती मात्र ताटात पंचपक्वान असून ही तोंडात जाईनात अशी झाली. सुरुवातीला काही दिवस त्याने ही मौज मजेत घालवले पण आता अमाप पैसा असूनही तो काही करू शकत नव्हता. इतके सर्वकाही होऊनही त्याचा अहंकार थोडा ही डगमगला नाही. उलट अधिकच वाढत गेला. सर्वांशी संबंध तोडले. तो एकटाच राहू लागला. त्याला पेन्शन सुरू होती त्यात तो स्वतःचा उदरनिर्वाह करी. पैसे असूनही हलाखीची परिस्थिती झाली होती. वयोमानानुसार कौशल्यास पुर्वीप्रमाणे कामे होत नव्हती आणि तो इतर कोणास कामालाही ठेवण्यासाठी तयार नव्हता. कारण, त्यास स्वतःची एक कवडी ही पगार म्हणून दुसर्‍याच्या खिशात जाऊ द्यायची नव्हती. कुटूंबापासून तो कायमचा परका झाला. उदरनिर्वाहासाठी तो रोज शेजारच्या गावी जाई. दयेपोटी लोक काही फळे फुकटही देत. वयोमानानुसार शरीर ही थकले होते. बर्‍याच आजारांनी आपले घर वसवले होते. लोक कधी दयेपोटी तर कधी सहज विचारपूस करीत. पण तो तेव्हाही पैशांच्या नशेत उलट सुलट उत्तरे देई. माझ्याकडे अमूक एवढा पैसा आहे मी कोणासही देणार नाही वगेरेवगेरे.


      असेच एके दिवशी तो नेहमीप्रमाणे उदरनिर्वाहासाठी शेजारच्या गावी गेला आणि काही लोकांस तो श्रीमंत भिकारी रस्त्याच्या कडेला निपचित पडलेला आढळला. नातेवाईकांशी संपर्क न होऊ शकल्या कारणाने अखेरीस बेवारस म्हणून विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. तो पूर्वीही श्रीमंतच होता. कालही श्रीमंत होता पण, श्रीमंतीत भिकाऱ्याचे दिवस जगला आणि बेवारस भिकाऱ्यासारखा मेला. खऱ्या श्रीमंतीपासून तो कायमचा दुरावला. त्याच्या म्हणण्यानुसार आज लाखो रूपये खात्यावर असतील पण आज तो हजार रूपयांत जगमुक्त झाला. 


Rate this content
Log in