Meghana Suryawanshi

Others

4.3  

Meghana Suryawanshi

Others

चेटकीण

चेटकीण

4 mins
226


      घनदाट अरण्यात दुरवर पश्चिमेस इन मीन दोनशे लोकांची वस्ती असलेले ते छोटेसे खेडेगाव होतं. फक्त अंतरानेच दूर नाही सगळ्याच गोष्टीं पासून अनोळखी असलेला आणि स्वतःच्या चालीरीतींना जोपासत रहाणारा तो एक आदिवासी पाडाच होता. कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. तेथील रहिवाशांना अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजा सोडल्यास इतर मुलभूत गरजांची माहिती देखील नव्हती. जंगलातील संपत्ती वर त्यांची आणि कुटुंबाची गुजराण होत असे. जुने विचार, परंपरा, चालीरीती हे सगळं त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. जीवनात काही अडचणी आल्यास त्यांना एकच गोष्ट कळत होती ती म्हणजे काळी जादू! पाड्यात सगळेच अज्ञानी. वस्तीत पुर्णपणे पुरूषप्रधान संस्कृती होती. तिथे महिलांस दुय्यम दर्जा प्राप्त होता. परंपरागत चालत आलेल्या या प्रथे मुळे एका प्रकारे अहंकारी भावना पुरूषीय सत्तेत निर्माण होत गेली. जुन्या विचारधारेनुसार गावात कोणतीही अमंगल गोष्ट घडली तरी स्ञी ला जबाबदार धरले जाई. स्ञी चे अस्तित्व फक्त तिच्या पती सोबत असते, तो वरच तिला काय तो मान सन्मान मिळे. नाहीतर त्याच्या माघारी ती स्त्री वरून चेटकीण, अमंगली, अपशकुनी बनून जाई!

      पाड्यात एक वरियन नावाची विधवा स्त्री होती, जिचा पती रामा काही महिन्यांपूर्वी साप चावून मेला. पण कदाचित साप चावून मेला, त्यापेक्षा अंधश्रद्धेने बळी घेतला हे म्हणणे उचित राहिल. योग्य वेळी योग्य उपचार करण्या ऐवजी कोणत्या तरी मांत्रिकाच्या तोटक्याने त्याच्या जीवनाचा अंत झाला. त्यानंतर तो मांत्रिक कुठे गायब झाला कोणास ठाऊक! पण लोक आज ही तो तांत्रिक एक दैवाचा आशिर्वाद होता, पण रामाच्या अंगातील काळ्या सावलीने त्याचा जीव घेतला या अंधाऱ्या विचारांत आहेत. रामा एकप्रकारे वेगळ्या विचारसरणीचा मनुष्य होता आणि त्याने बायकोलाही कधी कमी लेखले नाही. पाड्यात एकमात्र तो एकटाच कधी कोणामध्ये भेदभाव करत नसे. एकभाषी व्यक्तीमत्व असल्याने पूर्ण गावाने त्यांचे कुटूंब वाळीत टाकले होते. आणि रामाच्या माघारी वरियन ची परिस्थिती आणखीच बिकट होत गेली. लोकांच्या नजरेला नजर देणे अवघड झाले. लोक एक विधवा स्त्री म्हणून तिच्याकडे जायला ही घाबरायचे. एवढ्या साऱ्या लोकांत असूनही ती एकटी पडली. बोलायला काय ते फक्त कुटी मधील भिंतीच. अशा भयाण परिस्थितीत वरियन आपले जीवन जगत होती.लोकांचे टोमणे सहन करीत ती दिवस काढत होती. 

      एके दिवशी पाड्यातील रंगाप्पा च्या मुलीचा विवाह ठरला. तो विवाह नाही तर कोवळ्या जीवाच्या जीवनाचा नाश होता. मुलीचे वय अवघे सहा वर्षे आणि नवरा मुलगा वडीलांच्या वयाचा! आतापर्यंत असे खुप विवाह झाले होते, त्यांना हा विवाह काही नवीन नव्हता. स्ञी च्या मनाचा कधीही विचार केला जात नसे. सगळ्या गोष्टी कमी दिल्या जाई पण, स्त्री ने माञ शरम, संस्कार जपणे, सहन करणे या गोष्टी पुरूषांपेक्षा जास्त करायच्या. पण या वेळी असे न घडू देण्याचे वरियनने मनाशी पक्के केले. इथून पुढे बालविवाहची प्रथा मोडीत काढायचा मानस तिने केला. भले ही आपली वस्ती इतर सोयी सुविधांमध्ये मागे असेल पण असा अन्याय कोणावर न होऊन देणारी बाई होती ती. एक विधवा म्हणून तिला लग्नास आमंत्रण दिले नव्हते, पण तरीही ते थांबविण्यासाठी ती लग्न कार्यास गेली. तिथे तिला पाहून सर्वांचा तीळपापड झाला. एका विधवेने मंगलकार्यात प्रवेश करणे म्हणजे अगणित अशुभ गोष्टींस निमंत्रण देणे! या सर्व प्रकाराने मुलाकडील मंडळी लग्न मोडून निघून गेली. एका अर्थाने हा बालविवाह होता होता राहिला. पण सर्व इतक्यात थांबणारे नक्कीच नव्हते. आज एक बालविवाह मोडला, परत कशावरून होणार नाहीत. लोकांच्या रागेची कारण बनलेल्या वरियन ला वस्ती मधून कायमचे हद्दपार करण्यात आले. बदलावाचे विचार आणि स्वतःच्या नशीबाची फाटकी झोळी घेऊन ती एका गावात पोहचली. ती पूर्णपणे एकटी होती. काही समजत नव्हते कुठे जावे. ती शहरात भटकू लागली. तिच्या नजरेने हेरले की आपल्या पाड्यात आणि या शहरात जमीन आस्मानाचा फरक आहे. अनेक नवीन गोष्टी तिला साद घालत होत्या. आजन्म न पाहिलेल्या अगणित गोष्टींचा अनुभव तिला मिळणार होता.

       स्वतःची गुजराण कशी करावी या विचारांत ती दारोदार कामाकरता विचारू लागली. अखेरीस तिला एका घरी काम मिळाले. एखाद्याचे नशीब कधी फळाळेल काही सांगता येत नाही. तिला ज्या घरी काम मिळाले ते घर एका थोर विचारवंताचे होते. जुन्या चालीरीतींचा पायंडा पाडून तो पिढीजात जपणे हे त्या गृहस्थांना कधीही मान्य नव्हते. ते जीवनात महिलांना पुरूषांसमान दर्जा प्राप्त होण्यासाठी अहोरात्र झटत होते. अशा गृहस्थाची सेवा म्हणजे देवाची सेवा! वरियन ने देखील कधी देव दगडात नाही तर क्रांतिकारी विचारांत पाहिला होता. कालांतराने त्या गृहस्थांस वरियन मध्ये एकप्रकारे समाज बदलाव ची उमेद दिसली. तिच्या कायम तर्क करण्याच्या स्वभावाने त्यांनी हेरले की, एक दिवस तर्क ने फरक लगेच येईल. आज एक वरियन आहेत, उद्या अशा हजारो वरियन पुरूषांसमोर आपला हक्क मागण्याकरीता उभ्या रहातील. तिच्या स्वप्नांना उंच भरारी देण्याकरीता तिला आपल्या चळवळीत सहभागी करुन घेतले. काळाच्या ओघात ती प्रत्येक विचारधारेतील फरक, त्याचा जीवनावर होणारा परिणाम आणि बदलाव कशाप्रकारे आणायचा ते शिकली. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो ते एक खरे आहे. नवीन बदलाव ची उमेद घेऊन जगताना तिला खुप सार्‍या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. कधी प्रसंगी इतर विचारवंतांसोबत तुरूंगाची हवा खावी लागली. पण ती कधीही डगमगली नाही.

     तिची चळवळ तिच्या वस्तीमध्ये देखील पोहचली. ज्या इतर स्ञिया पुरूषीय सत्तेस घाबरून अत्याचार सहन करीत होत्या त्यांना वरियन ने आपल्या बाजूस केले. कधी प्रेमाने तर कधी हट्टाने विचार पटवून दिले. वस्तीने स्वतःमध्ये बदल करण्यास खुप वेळ घेतला. आज वरियन च्या वस्तीमध्ये प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र आहे. आता वस्तीमध्ये बालविवाह देखील होत नाहीत. पायातील बुटांप्रमाणे समजल्या जाणार्‍या महिलांचा कद डोक्यावरील पगडी समान झाला. त्यांना प्रत्येक अधिकार मिळाला ज्याच्या त्या हकदार आहेत. एका अर्थाने वरियन चे बदलाव चे स्वप्न पुर्ण झाले. पण तिचे विचार एका वस्ती पुरते कधीही मर्यादित राहिले नाहीत. ती आजही इतर ठिकाणी बदलाव घडवून आणण्याकरीता अहोरात्र झटते. एका अमंगली, चेटकीण स्ञी पासून क्रांतिकारी स्ञी बनण्याचा वरियन चा प्रवास सर्वांची प्रेरणा बनून गेला. 


Rate this content
Log in