निष्काळजी
निष्काळजी
तो मार्च महिना होता. सायंकाळी मुसळधार पाऊसाच्या आगमनाने तपत्या सुर्याच्या अहंकारास जणू कोणी चिमटाच काढला होता. दिवसभर कडक ऊनाने तप्त वसुंधरा आता कुठे जरा थंडावली होती. त्यावेळेस मी अभियांत्रिकी डिप्लोमा च्या शेवटच्या वर्षात होते. मार्च महिना हा परीक्षांचा हंगाम म्हणूनच पाहिला जातो. दहावीच्या परिक्षांची सुरूवात आणि बारावीच्या झंझावाताचा अंत कधी नजीक येतो कळत नाही. आमचेही प्रात्यक्षिक सुरू होते. परीक्षेच्या काळातच काय ते पूर्ण वेळ कॉलेज केले असेल, नाहीतर एव्हाना भिंतींना सवय झालेलीच होती, मास्तरांच्या हातावर तुरी देऊन पळणाऱ्या हायची!
सायंकाळच्या सहा वाजल्या होत्या. वरूणराजांचे आगमन अगदी उत्साहात झाले होते. वसंताचे स्वागत अगदी मनमुराद स्वागत चालले होते. धो धो कोसळणाऱ्या पावसाने चतुष्पाद आणि लतावेली अगदी आनंदून गेले होते.परंतू, आमच्या सारख्या द्विपादांचे मात्र, वाऱ्याला आव्हान देत उडणारी छञी सांभाळत झपाझप अंतर काटण्याचे चालले होते. चालता चालता आम्ही आमच्या जुन्या शाळेजवळ येऊन पोहचलो. माध्यमिक पर्यंतचे शिक्षण विटा हायस्कूल, विटा या शाळेतून झाले. मग लगेच शाळेच्या आठवणींची गोड गप्पा रंगल्या. त्या गप्पा,"अगं माझे बाय काइ वक्त झालाय गो?". साधारण सत्तर ते ऐंशी च्या दरम्यान चे वय असावे त्या आजींचे. मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला छञी घेऊन बसल्या होत्या.
आम्ही सांगितले सव्वा सहा झाल्या आहेत. त्यांच्या सुरकतलेल्या चेहऱ्यावर आणखीनच चिंतेची सुरकुती उमटली. त्यांनी स्वरात प्रश्न केला, 'माझा नातू हाय दहावीत आता. पेपर कधी सुटल? कवाचा आत गेलाय अजून बाहेर आला नाय' आम्ही उत्तरलो, 'आजी पेपर तर कधीच सुटलाय, बाकी परगावची मुलंही केव्हाची घरी पोहचली असतील' पुढे त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडेनात. चेहर्यावर चिंतेची सुरकुती आणि डोळे आसवांनी भरलेले. रस्त्यावर सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतलेली. आम्हास ही काही उमजत नव्हते. या परगावी आजी घरी कशा जाणार? आम्ही शाळेत असणाऱ्या शिपायाकडे मदत मागितली. त्यांनी जरा धीर दिला आणि पोलिसांशी संपर्क साधत त्या आजींस घरी जाण्यास मदत केली. आम्ही घरी आलो. माझ्या मनात सारखे हेच प्रश्न घुटमळत होत, आजींना कोणी असेच सोडले की त्या चुकून तेथे राहिल्या होत्या.
ही मुद्दाम केलेली चुक की नकळत घडलेला हलगर्जीपणा ते काही कळण्यास मार्ग नाही.
