Meghana Suryawanshi

Others

3  

Meghana Suryawanshi

Others

नंदनवन

नंदनवन

3 mins
278


      रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात चार दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्यास कोणास आवडणारे नाही? इहलोकीच्या नंदनवनात वेळ घालविण्यास कोणी ही तयार होईल. रस्त्यावरून जाताना आई बोलली, ते बघ अबोली गुलाब अगदी तसेच आहे जसे पुर्वी आपल्या अंगणात होते आणि मन काही काळासाठी आम्ही अनुभवलेल्या भुतकाळातील नंदनवनाच्या शोधार्थात निघून गेले. 

     आता आम्ही बंगल्यात रहात आहोत. पण त्याच जागेवर पुर्वी तीन खोल्यांचे टुमदार कौलारू घर होते. एकामागे एक अशा ओळीने तीन खोल्या आणि कायम विविध फुलांच्या सड्याने सजलेले अंगण. घरात अगदी सुरुवातीस लहान दिवाणखाना होता, मध्ये शयनगृह आणि सगळ्यात शेवटी मग स्वयंपाकघर. घराच्या दोन्ही बाजूंस दरवाजा होता. स्वयंपाकघरात एक पोटमाळा होता. जुन्या आणि वापरात नसणार्‍या सर्व वस्तूंचे पोटमाळा हे माहेरघर बनले होते. शयनगृहात एका भिंतीमध्ये देवांसाठी छोटेसे देवघर होते आम्ही त्यास दिवळी म्हणायचो. अंगणास चहूबाजूंनी विविध रंगीबेरंगी फुलांचे आणि वेगवेगळ्या चवदार व रसाळगोमट्या फळांच्या आरसपानी सौंदर्याचे वरदान लाभले होते. घर वगळता आसपास झाडां व्यतिरिक्त एक ही मोकळी जागा राहिली नव्हती. घरामध्ये आम्हा सर्वांनाच तसा झाडांशी खुप लळा आहे पण, त्या मध्ये जास्तीकरून माझ्या आजोबांस झाडांसोबत वेळ घालविण्यास खुप आवडतो. सेवेतील निवृत्तीनंतर त्यांचा बराचसा वेळ झाडांची निगा घेण्यात जाई. झाडे लावण्यापासून ते त्यांची निगा घेण्यापर्यंत सगळी कामे ते करीत. 

     अंगणात रंगीबेरंगी गुलाब, लिली, डेलिया, झेंडू, मोगरा, कुंदा, ब्रम्हकमळ, शेवंती, अबोली, मखमली, मेफ्लॉवर, जास्वंद अशी बरीच सारी फुलझाडे होती. सोबतीस आंबा, चिकू, रामफळ, सिताफळ, पेरू आणि नारळ अशा चवदार आणि रसाळ फळझाडांची साथ होती. वैयक्तिक म्हणाल तर अंगणातील ब्रम्हकमळ आणि गौरी च्या फुलांची रोपे मला अत्याधिक प्रिय होते. गौरी ची फुले असे नाव कारण गणेश चतुर्थीच्या काळात साधारणतः आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यांत ते बहरायचे, म्हणून बाल गणेशांच्या प्रिय माता पार्वतींचे नाव बहुधा त्या फुलरोपांस देण्यात आले असावे. लाल, गुलाबी, जांभळी व अबोली अशा विविध रंगीबेरंगी गौरीच्या फुलांनी प्रवेशिका दोन महिन्यांकरीता एकदम सुशोभित शृंगारात न्हाऊन जायची. अंगणातील प्रवेशिकेच्या आसपास सगळीकडे गौरीचीच रोपे होती. जणु कौलारू महालात प्रवेश करण्यापुर्वी प्रवेशद्वारामध्ये स्वागतासाठी रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या अंथरल्या आहेत. तिथे एका बाजूस जवळच एक उंच माडाचे झाड होते. त्या माडाचा ओफा बऱ्याच रोपांचे माहेरघर बनून गेला होता. त्यातच कुंद्यांच्या फुलांचा ताटवा, सोबतीस रामफळाचे छोटे झाड आणि त्यास चारचांद लागतील असा ब्रम्हकमळचा वेल माडाच्या झाडावर चढविला होता. आम्हा सर्वांचेच ब्रम्हकमळाच्या प्रती आकर्षण कधीही कमी होणारे नाही. त्या काही दिवसांच्या हंगामात आम्हा सर्वांनाच उत्सुकता रहायची. राञी उमलणाऱ्या ब्रम्हकमळाच्या दर्शनासाठी दिवसभर उत्सुकता लागून राही. राञीच्या मंद वाऱ्याच्या संगतीने पसरणारा त्याचा गंध काही हरणाच्या कस्तुरी पेक्षा कमी वाटत नव्हता. ते उमलल्यानंतर आई त्या वेलाची पुजा करी, त्या राञी गोडधोड भोजन असे. राञी टपोऱ्या चांदण्यात अंगणात जेवण करायची एक वेगळीच मजा असे. चांदण्यांच्या छताखाली आणि फुलांच्या नंदनवनातील जेवणास राजभोजनाची सर येऊन जाई. 

     ब्रम्हकमळाच्या संगतीस हिरव्या मफलरीवर पसरलेली इवल्याशा लहान पांढऱ्या चांदण्यासम कुंद्याची ठेवण होती. एक ही दिवस असा गेला नाही की, आम्ही केसांत तारकांचा हार माळला नाही. त्या पांढऱ्या तारका तोडण्यात आम्हा लहानग्यांत भांडण लागे, आणि कधी ते भांडण सोडवित असताना आई कडून भर उन्हात उभे रहायची सजा मिळत असे. हातांच्या विविध नकलांनी उन्हात तयार झालेल्या मजेशीर सावल्या पाहण्यासमोर सजा फिकी वाटे. विविध प्रकारच्या गुलाबांमध्ये घराच्या मागील बाजूस लावलेल्या माठातील अबोली गुलाबाप्रती आकर्षण जरा जास्तच होते. फुलांप्रमाणेच त्यावरील इवल्याशा पाहुण्यांच्या घरट्यांत डोकावून पहायची गंमतच निराळी! तिथेच जवळ असणाऱ्या अबोलीच्या फुलांच्या वाळक्या बी ने भरदिवसा कधीही दिवाळीची आतषबाजी होत. तांबूस पिवळ्या रंगाच्या मखमलींची चादर आणि त्यात पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूंचा ताटवा. लाल जास्वंदींचे आच्छादन हिरव्या पाचूंवर लाल रेशम पसरल्यासम भासे. इवले इवले लहान बटन गुलाब, सदैव वाऱ्याच्या संगतीस डुलत असलेले! वर्षातून एकदा मे महिन्यात फुलणारे लालरंगी मे फ्लॉवर लहान मुले मागे धावतात त्या रूईच्या बीप्रमाणे वाटे. 

     एकंदरीत काही वर्षांकरिता नंदनवनाचा सहवास लाभून गेला. कधी एक वेळी आवड पेक्षा जास्त स्वप्ने आणि गरजा किमती बनून रहातात. बालपण तरी अशा सुंदरशा नंदनवनात निघून गेले पण भविष्येतील गरजांनी त्या नंदनवनाची जागा घेतली. एके दिवशी बघता बघता सारे नंदनवन एकसाथ डोळ्यांसमोर भुईसपाट झाले. सिमेंटच्या महालाने नंदनवनाची जागा घेतली .आज ही आमच्याकडे बरीच सारी फुलझाडे आहेत. पण पुर्वीसारख्या कौलारू महालासमोरील नंदनवनाची सय सिमेंटच्या कुंडींतील फुलझाडांस नाही. 


Rate this content
Log in