Meghana Suryawanshi

Others

3.8  

Meghana Suryawanshi

Others

आजची स्त्री कशी असावी?

आजची स्त्री कशी असावी?

4 mins
147


        स्त्री....स्त्री... समस्त त्रिकालांत आपल्या अस्तित्वाची प्रेमळ छाप पाडणारी आणि आपल्या कर्तव्यांत तसूभरही कमी न पडता प्रत्येक मनं जपणारी निसर्गाची देण! मुलगी, आई, बहीण, मैत्रीण, बायको, आजी, मावशी, मामी, काकी, मावशी अशा नानाविध रूपांत इहलोकीवर अवतार घेतलेल्या दुर्गा! आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरूषांसमवेत काम करताना प्रगतीपथावर आहे. सहाजिकच पूर्वकाळा पेक्षा स्त्रीस समाजात उच्च स्थान प्रदान केले गेले आहे. हे सारं काही अभिमानास्पद असले तरी सारं काही ठराविक गोष्टींपुरते मर्यादित आहे. शिल्पकार होऊन ती इतरांच्या जीवनास आकार देत गेली मात्र स्वतःच्या मूर्तीची जडणघडण करण्यास विसरून गेली. परिस्थिती कायम नाण्याप्रमाणे दोन्ही बाजू दर्शवत रहाते. एक बाजू अभिनंदनपात्र ठरते तरी दुसरी कीव पात्र! आजवर समस्त कालांमध्ये स्त्रीस एका वेगळ्या नजरेने तथा विचारांनी पाहिले गेले आहे. सर्वच ठिकाणी असे म्हटले तर ते चुकीचे ठरेल. एकवेळी जमिनीवर बागडणारी ती आसमंतात चंद्राला गवसणी घालून येते परंतु, काही वेळ तिच्यातील प्रबळ आत्मिक शक्ती कमजोरीच्या तराजूत तोलली जाते. पाच दिवसांच्या मासिक पाळीच्या आणि प्रसुतीच्या वेदना सहन करणारी स्त्री एक दुर्बल घटक म्हणून समजात दुय्यम स्थान प्राप्त करण्यासाठीच जन्माला येते का? 


     एका सामान्य व्यक्तिमत्वास कायम सामाजिक पटलांमागे सारले गेले अथवा एका विशिष्ट नजरेतून त्यांची अत्यंत जपणूक केली गेल्याने स्त्रिया बऱ्याच गोष्टींपासून वंचित राहिल्या. स्त्री आणि पुरूष हे दोन्हीही सम हक्क, विचार तत्सम सर्वच गोष्टींस समान पात्र ठरतात. ज्यावेळी स्त्री आणि पुरूष हे फक्त नैसर्गिक विभिन्नतेच्या छायेत मोडतात, दोघांमधील इतर सर्व गुण अथवा दोष समान आहेत हे समजणारी तशी मानसिकता समाजासोबत स्वतः स्त्रीमध्येदेखील असावी. मुलगी म्हणजे पित्याच्या शरीराबाहेरील चालते बोलते हृदयच जणू! परक्याचे धन म्हणत म्हणत माहेरील सर्वांच्या प्रेमाची आणि घरच्या खुशींची चावी बनून जाते. बघता बघता अंगाखांद्यावर खेळणारी बाहुली भातुकलीच्या खेळामधील नवरीसम दृष्टीस भासू लागते. लहानपणी अंगात भिनभिनणारा अल्लडपणा कळत्या वयासोबतच जबाबदारींची जागा घेतो. मग बऱ्याच घटकांवेळी एवढ्या इतर जाती असतानादेखील कायम "स्त्रीच्या जातीने कसे वागावे?" हे. हे अगदीच चूक असे म्हटले तर बरोबर नाही. स्त्रीने वेळेनुसार स्वमध्ये बदल करायला हवाच. पण असा बदल जो तिच्या आणि इतरांच्याही हिताचा असेल. सामाजिक घटकांनी बऱ्याच अंशी स्त्रीस एक अबला किंवा दुर्बल मानसिकतेने पाहिले परंतु, तिने तरी स्वतःस कधीच अशा नजरेने पाहू नये. आत्मनिर्भरतेच्या वाट्यावर तिने टाकलेले पहिले पाऊल एक दिवस तिला नक्कीच उच्च स्थान प्राप्त करून देईल. सर्वच गोष्टींत तिने परावलंबी राहू नये, वेळ पडेल तेव्हा स्वावलंबी बनून स्वतःच्या इच्छा स्वतः पूर्ण कराव्यात. धडधाकट मानसिकतेला कधीही भावनिक कुबड्यांचा आधार घेऊन आपल्या जीवनाची दोरी पूर्णपणे इतरांच्या हाती देऊ नये. 


     आजची स्त्री रणसम्राज्ञी राणी लक्ष्मीबाईंसम अश्वारूढ होऊन तलवारीचे सपासप फटकार काढीत दुश्मनांचे शीर धडावेगळे करणारी नसेल ही कदाचित परंतु, नयन निखाऱ्यांनी दुष्टास भस्मसात करणारी नक्कीच असावी. स्त्री एक स्वतंत्र व्यक्तीमत्व, निसर्गाने कोणत्याही बंधनांच्या बाहुपाषांत जखडून न ठेवता मुक्तविहार करण्यासाठी आणि एका पर्वाची साक्षीदारसम बनवलेली जीवंत मूर्तीमंत दाखला म्हणजे स्त्री! क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याने स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. स्त्रीच्या हातात ज्ञानाची चार पुस्तके आली खरी पण, आज प्रत्येक स्त्री जग व्यवहाराची शिदोरी नक्कीच बाळगून असली पाहिजे. स्त्रीने कसे वागावे, बोलावे अथवा रहावे याची ना कोणत्या शाब्दिक ग्रंथात पहायला भेटेल, खरे माणसाने स्वतःच्या विचारांची चौकट निर्माण करून स्त्रीस आपसूकच त्यात कैद केले. ती कशी असावी, तिने कसे रहावे या सर्वांचे मोजमाप बहुधा जास्ती इतरांकडूनच केले गेले असावे. तिची चाल एकवेळ लाजरी असेल, मान झुकवी असेल पण त्या चालीत तिने पेललेल्या जबाबदाऱ्यांचा अभिमान नक्कीच असतो. आजवर ती कायम इतरांसाठी जगत आली, कधी तरी एकदा तिने स्वः ला पहावे, स्वःला ओळखावे. अंतरंगात डोकावून स्वः अस्तित्वाचे सखोल मापन करून स्वतःची यथोचित सांगड घालून नवीन कार्यास चालना द्यावी. मग ती स्वः बदलावची असो अथवा सामाजिक बदलावातील कार्यांची.


      महिला या रचनेचे नाव ऐकताच माया, स्नेह, वात्सल्य या भावना समोर येतात परंतु त्या सोबतच शक्ती संपन्न स्त्री ही समोर उभी रहाते. खरे आजवर तिने स्वतःला नीट ओळखलेच नाही. काही वेळेस आपल्यातील शक्तीचा परिचय करून देण्यास विसरून जाते. आज प्रत्येक महिलेस खऱ्या अर्थाने सबला म्हणून स्वतःमध्ये बदल करावयाची गरज आहे. ती आपल्या अधिकारांसाठी झगडणेही शिकली आहे. आजच्या स्त्रीने सिद्ध केले आहे, की त्या एकमेकांच्या शत्रू नाहीत तर सहकारी आहेत. परिस्थिती सोबत आत्मविश्वास ढळू न देता आपले मत ठामपणे मांडण्याची कसब असणाऱ्या स्ञीस समाजात स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळविण्यास कोणीही रोखू शकत नाही. ती फक्त काही वेळेस च नव्हे तर प्रत्येक वेळेस अन्यायाविरुद्ध लढणारी असावी. स्त्रीवरील अन्यायास जबाबदार कोण? समाज, ती की तिच्यातील भिती? स्त्रीच्या शरीरात जे गुण आहेत त्यांचा वापर तिच्याकडून नीट केला गेला, तर ते अभिषाप न ठरता वरदान ठरतील.


      एकंदरीत पाहता आजची स्त्री कशी असावी? यातील "कशी असावी?" या प्रश्नाचे मूल्यमापन अनेक मार्गाने केले जाऊ शकते. प्रत्येकाचे मत आणि अनुभव या तत्सम विचारांस चालना तेव्हा मिळेल जेव्हा तिला स्वतःमध्ये झालेल्या बदलाचा अभिमान वाटेल. बदल ही काळाची गरज आहे आणि तिच्यातील बदल तिला कोणत्याही गोष्टींपासून वंचित ठेऊ शकत नाही हे जेव्हा तिला उमजेल तेव्हा ती स्वतः तिचे भविष्य घडवेल. 


Rate this content
Log in