काही क्षण....
काही क्षण....
कसे, कोठून, कधी, केव्हा या प्रश्नांनी वैचारिक मनाचा सैरभैर प्रवास सुरू झाला. वयाच्या टप्प्यांत नवनवीन प्रश्नांची टुमदार बंगले मनरुपी शहरात घर करीत गेले, आजही घरबांधणीचे काम सुरूच आहे. बांधणी डगमगेपर्यंत ते तसचं राहील ही! कधी मनात प्रश्न येतो की, काही क्षणांकरीता विना विचारांचे मानवी आयुष्य कसे असेल? आणि नेमके या विपरीत होते. म्हणजे विना विचारांच्या आयुष्याच्या कल्पनारम्य विचारांचेही ढिगारे आपसूकच उंचीच्या स्पर्धा करू लागतात. स्तब्ध मानसिक मेघांच्या पायघड्या ओलांडून स्वःचेच गरूड उंच झेपावते. काही वेळेस उंच झेप स्वःचीच स्तुती करण्यास प्रवृत्त करते. नकळत आपणच हरभऱ्याच्या झाडावर जातो परंतु, कधी नकळत विपर्यास होऊन जातो. बरेचसे का? हे कधी तरी धारदार प्रश्निक बाणांनी समोरच्यास ठेच पोहोचविणारे ठरतात.
प्रत्येक पाऊलांवरील समारंभास ते अनाहूत पाहुण्यांगत नकळत पणे येतातच. आले म्हणून नाक मुरडण्यासारखे त्यात गैर असे काहीच नाही. पण येतात सगळा गोतावळा घेऊनच! क्षणोक्षणी संकोच! एक साधा विचार मांडण्यामागे त्याची कुंडली बघणारे आणि भविष्य ठरविणारे हजारो विचार. विचाररूपी वडास इतक्या पारंब्या फुटाव्यात की, पारंब्यातून अंकूर फुटून अरण्य बहरावे. त्यास जोड ती काय वाटेल? या काळजीची. कसे बोलू? आणि ठिक राहील काय? विना विचारांच्या मानवी आयुष्यास खुळ्याची कल्पना असं लोक नक्कीच ठरवतील. कसा दिसेल विना विचारी मनुष्य? एखाद्या स्तब्ध शिल्पासारखा की गगनी मुक्तविहार करणाऱ्या विहंगासारखा? कसे ते पेल्यातल्या जलासारखे जीवन? अथांग सागराचा भाग होण्याची स्वप्ने पाहत असलेले आणि छोट्या पेल्यात सामावलेले ते जीवन! आरंभ कोठून करावा यापेक्षा जास्ती त्याचा शेवटच समोर दिसू लागतो.
हास्य, क्रोध, तळमळ, उदासीनता, प्रेम, द्वेष अशा विविध साजने शृंगारीत व कधी मृगजळ तर कधी दलदलीत कोंडणारा श्वास! ते कलाकार आणि आपण त्यांच्या दोऱ्यांत अडकून नाचणारे सजीव कटपुतले! खरेच काही क्षणांकरीता कसे असेल विना विचारी आयुष्य? काळजी, क्रोध, हास्य, मत्सर सगळं काही क्षणांकरीता फक्त एक भावविश्व! काही क्षणांकरीता झालेला स्वतःचा मठ्ठ पुतळा स्वतःस तरी अनुभवता येईल का?
ना कल्पना संपतात, ना विचार. बस्स आपसूकच पुर्णविराम द्यावा लागतो!
