मधमाशी
मधमाशी
सुविचार - बचत कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावे.
अनाजीराव हे सुरतमधील प्रख्यात व्यापारी होते. त्यांचे सुरत शहरात सुजाण नागरिक म्हणूनही नाव होते. मनाने अतिशय दयाळू होते.परंतु लग्नाला बरीच वर्षे झाली तरी त्यांना मूलबाळ नव्हते. बरेच उपासतापास केले. जो सांगेल ते करत असत. एव्हड्या संपत्तीला मालक हवा ना? त्यांच्या तपश्चर्येला यश आले. त्यांच्या घरी एक गोंडस बाळ जन्माला आले. जन्मत:च त्याच्या चेहर्यावर श्रीमंतीचे तेज होते. दोघेही उभयतां खूप खूश होते. बाळास काय करू काय नको असे त्यांना होई. नवसाचं बाळ म्हणून काळजी घेतली जायची तसेच तो जे मागेल ते क्षणात हजर होई. कोणत्याही गोष्टीची कमतरता त्याला भासत नव्हती. आहे ते त्याचेच आहे. आपण काय पैसा घेऊन वर जाणार आहोत. विराज नाव ठेवले होते. तो नावाप्रमाणेच राज करत होता. हळूहळू विराज मोठा होऊ लागला. मित्रमंडळीही वाढत होती. असतील शिते तर जमतील भूते असे म्हणतात ते खोटे नाही.त्याप्रमाणे त्याला लूटणारी मित्रमंडळीही वाढू लागली. आपल्या खजिन्यातील बराचसा पैसा आपले लाडके चिरंजीव वाया घालवत आहेत . ते अनाजीरावांच्या लक्षात येऊ लागले. प्रथम त्यांनी त्याला प्रेमाने समजावून सांगितले. पण त्याने श्रीमंतीचे बाळकडू प्यायले असल्याने लक्ष दिले नाही. त्याची उधळपट्टी चालूच होती. उलटपक्षी पेसे दिले नाही तर काहीतरी विपरीत परिणाम होईल याचीही भिती वाटत होती.विराज लहानपणापासून ऐशारामात राहिल्याने त्याला काही फरक पडत नव्हता दु:ख म्हणजे काय? इच्छा झाली आणि गोष्ट मिळाली नाही असे झालेच नव्हते.
पण अनाजीरावांना आपली चूक कळली होती. पण खूप उशीर झाला होता. आपण काहीतरी ठोस करायलाच हवे हे त्यांना पटत होते.
खूप विचारअंती त्यांनी मनाशी काहीतरी ठरवले. त्यांनी विराजला बोलावले. आणी आपण धंद्यात नुकसानीत गेलो आहोत. घरदार सगळे गेले असून जी काही पुंजी उरली आहे त्य
ात खेडेगावात जाऊन आपल्याला रहावे लागेल . हे ऐकून विराज खूप चिडला. रडला पण काही वेळाने शांत झाला. मन मानत नव्हते. गरिबीतून श्रीमंती कधीही चालते पण श्रीमंतीतून गरिबी कधीही परवडत नाही.
त्यांनी आपले सामान सुमान बांधले. गावी जायला निघाले.विराजला ते सहन होत नव्हते. वडीलांचा खूप राग ही येत होता. त्याच्या चुकीमुळे आपल्याला असे दिवस काढावे लागणार. एसी नाही.कोणतीही छानछौकी नाही.त्याला ते जड जात होते पण पर्याय नव्हता.
गावी आले खरे.पण विराज चा जीव खूप गुदमरू लागला.तो एकदा घरातून बाहेर पडला वाट मिळेल तसा चालू लागला .आपण कुठे चाललो आहोत तेच त्याला कळत नव्हते .तो गर्द रानात शिरला दमला व एका झाडाखाली बसला .थोड्या वेळाने त्याचे लक्ष झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याकडे गेले .एवढे मोठे पोळे. मधमाश्या सतत जाऊन मध आणून गोळा करत होत्या. त्याचे ते काम अविरत चालू होते. थोडा थोडा संचय करुन त्यांनी खूप मध गोळा केला होता. विराजच्या मनात आले. मध गोड असतो तो खाऊन फस्त केला तर एव्हडे मोठे पोळे झाले नसते.आपण आजपर्यंत बाबांना दोष देत होतो. पण आपण मोहावर ताबा ठेवून पैसे उधळण्यापैक्षा त्यातील थोडे तरी साठवले असते तर!आपल्याकडेही मोठी रक्कम असली असती. आपण बाबांना मदत करु शकलो असतो. पण आता हा विचार करुन काय उपयोग?तो तेथेच झोपी गेला. मनी वसे ते स्वप्नी दिसे. स्वप्नात त्याला तो वडिलांच्या खांद्याला खांदा मिळवून काम करताना दिसला. मधमाशा प्रमाणे थोडे थोडे पैसे जमा करून ते लोक पुन्हा श्रीमंत झाले. पण यावेळी त्याने बचतीचा मार्ग अवलंबला होता. त्याला खऱ्या अर्थाने जागा आली. तो उठून घराकडे पळत सुटला. इथे त्याची शोधाशोध सुरु झाली होतीच . त्याला पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी सर्व सत्य गोष्टी बाबांना सांगितल्या. मधमाश्यांप्रमाणे आपणही बचत करावी असे ठरले. मधमाशांनी त्यांच्या आयुष्यात बचतीचा संदेश देऊन आमूलाग्र बदल करून आणला .