विषय -तोच खरा दानशूर
विषय -तोच खरा दानशूर
१६)सुविचार-गरिबी असून जो दान करतो तोच खरा दानशूर
प्रथम आणी प्रथमा हे दांम्पत्य राजापूर नावाच्या गावात रहात होते. ते खूप गरीब होते.पण ते अतिशय समाधानी होते. काही वेळेला त्यांच्या घरी खायला काहीच नसायचे .पण त्यांनी कधीच कोणाकडे हात पसरला नाही.पाणी पिऊन झाोपायचे. त्यांच्या शेजारी राहणारा राजाराम खूप श्रीमंत होता. तो त्याच्या गरिबीला खूप हासत. पण कधी कुठलीच मदत करत नसे. उलट त्यांना नावे ठेवी. फुकटचे सल्ले देई. असे करा तसे करा. मग तुमची परिस्थिती सुधारेल.पण वास्तवात त्यासाठी पैशाचे भांडवल हवे असायचे ते बाकी तो देत नसे.त्याच्यामुळे इतर शेजारीही त्यांना नावे ठेवत. हसत असत.पण प्रथम दाम्पत्य त्याकडे लक्ष देत नसे .आलिया भोगासी असावे सादर .याप्रमाणे करत असत. त्यामुळे ते सुखी होते.
एके दिवशी सकाळीच एक गरीब भिकारी भीक मागत राजाराम च्या घरी आला. तो कळकट मळकट भिकारी पाहून राजाराम भडकला. त्याच्या अंगाला ही खूप घाण वास येत होता.त्याने त्याला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. भीक मागावी लागू नये म्हणून काय काय करावे याचे ज्ञान तेव्हडे दिले.पण साधे एक घोट पाणीही दिले नाही. कुत्सितपणे हसून त्याला हाकलवून दिले.
तो तसाच खाली मान
घालून तिथून निघाला. निघताना फक्त एकच म्हणाला अशी परिस्थिती तुम्हांवर ना येवो.शेजारी म्हणजे प्रथमच्या घराजवळ तो आला.त्यावेळी प्रथम जेवायला बसायच्या तयारीतच होता.गरिबी भूक याची जाणीव असलेल्या भिकार्याची दया आली. त्याने त्याला घरात घेतले. अंघोळीस पाणी दिले. आपल्या वाटणीचे जेवण दिले.तो तृप्त झाला जाताना मनाशीच म्हणाला "तूच खरा दानशूर.गरिबीतही माझ्या पोटात अन्न दिलेस सुखी भव. तुझी परिस्थिती लवकरच सुधारेल . तुझ्याकडे इतके पैसे येतील की तू स्वत:उपाशी न राहता दुसर्याचे पोटही भरू शकशील.
त्या गरीब अतिथीचा आशिर्वाद फळाला आला. प्रथम च्या लांबच्या नातेवाईकाचे निधन झाले. त्याचे कोणीच नसल्याने त्याची सारी संपत्ती प्रथम ला मिळाली. भांडवलासाठी पैसा मिळाल्याने त्याने स्वत:चा धंदा टाकला.मेहनत सच्चाईच्या जोरावर तो श्रीमंत झाला.इकडे राजाराम गरीब होत गेला. तो प्रथम कडे आला. तो श्रीमंत कसा झाला. भिकार्याचे आशिर्वाद फळाला आल्याचे त्याने सांगितले. राजारामने त्याला शोधून काढले. त्याला तो घरी जेवायला बोलावू लागला. त्याने नकार दिला. व गरिबीतही जो दान करतो तोच खरा दानशूर असतो. त्याला न्याय ईश्वर देतो.मी नाही. असे म्हणून त्याला त्याने उडवून लावले. राजाराम तिथून खाली मान घालून निघून गेला.