संयम
संयम


पियुष हा एक अतिशय हुशार मुलगा होता. त्याचबरोबर तो ईश्वरी शक्ती मानत असे. खूप अध्यात्माची पुस्तके वाचत असे. त्यामुळे तो नेहमी सगळ्यांचे चांगलेच चिंतीत असे. सरळमार्गी होता. यश त्याच्या पायाशी असे. जमेल तितकी तो इतरांना मदत करी. सर्वांचा तो आवडीचा होता. पण तांदळात जसे खडे असत तसे त्याचा चांगुलपणा न आवडणारेही होते. तो खूप दिखावा करतो, असे त्यांना वाटे. चांगुलपणा मिळवण्यासाठी त्याचे असे नाटक चालू आहे असे वाटे. त्याचा हा मुखवटा आपण काढला पाहिजे, असे प्रथम आणी त्याच्या टिमने ठरवले.
दुसर्या दिवशी सकाळीच नित्यनेमाने पियुष देवळात गेला. तो आत गेल्यावर या चमूने त्याची चप्पल चोरली. पियुष दर्शन घेऊन बाहेर आला. पाहतो तर काय, चप्पल गायब. तो तसाच अनवाणी घरी गेला. जुनी चप्पल घालून तो शाळेत गेला. दप्तर ठेवून तो बाहेर गेला असता या चमूने त्याची अभ्यासाची वहीच गायब केली. वर्गात गुरुजी आले. अभ्यास दाखवायला पियुष वही दाखवायला गेला, वही गायब. परंतु पियुष हा प्रामाणिक व अभ्यासू मुलगा असल्याने गुरुजींनी त्याला शिक्षा केली नाही.
असे प्रकार वारंवार घडू लागल्यावर आपल्या बाबतीत हे जाणूनबुजून होत आहे हे पियुषच्या लक्षात आले. त्याने अधिकच सतर्क रहावयास सुरुवात केली. तरीही जर एखाद्याने जाणीवपूर्वक ठरवले असेलच तर तो तरी बिचारा काय करणार? हळूहळू शिक्षकही पियुषवर चिडू लागले. पण त्यांची माफी मागण्याशिवाय पियुषकडे दुसरा मार्ग नव्हता. पण तरिही तो शांत होता. त्याला खूप त्रास होत होता.
इथे प्रथम व त्याचा चमू त्याला त्रास देऊन दमले. रोज कोणता त्रास द्यायचा या विचाराने ते अस्वस्थ होऊ लागले. पियुषवर या गोष्टीचा काही परिणाम होत नाही ते पाहून ते अजूनच संतप्त होऊ लागले. परिणामी त्यांच्या हातूनच चुका होऊ लागल्या. त्या सांभाळताना त्यांची तारांबळ उडू लागली. पियुषच्या ही गोष्ट लक्षात आली. तो स्वत:हून त्यांच्या मदतीला सरसावला. तो मदतीला आला हे पाहून त्या चमूला लाज वाटली. त्यांनी स्वत:हून पियुषची माफी मागितली. त्याला आपल्या टिममध्ये येण्याची विनंती केली. पण पियुषने हात जोडून त्यांची विनंती नाकारली. पण गरज पडेल तेव्हा नक्की मदत करण्याचे आश्वासन दिले.
पियुष ने संयम दाखवला म्हणूनच हे घडले. अन्यथा एकमेकांचे द्वंद्व चालूच राहिले असते. सर्वांचेच नुकसान झाले असते.