माणूस जपा
माणूस जपा
बोरिवलीला राहणारी सुशीला. जन्मापासून काही ना काही आजारपण .पण आईवडिलांनी कसेबसे जगवले. मिळकतीचा बराचसा भाग तिच्या आजारपणातच जायचा. तरिही तिचा जीव महत्वाचा होता. हळूहळू ती मोठी होऊ लागली . तिला अनेक स्थळे येऊ लागली. पण आजारपणाच्या भितीमुळे ती लग्नाला उभे राहण्यासच घाबरत असे. त्यामुळे वय वाढत गेले. इतर भावंडाची ही लग्ने थांबली. शेवटी एक दिवस तिच्या आईने तिला समजावले. लग्नाला तयार झाले. एक छानसे स्थळ ही आहे. अखेर आई-वडिलांसाठी ती तयार झाली. होणारा नवरा चांगला व्यावसायिक होता. छोटेच कुटुंब. ती मोहोरून गेली. आता आपल्या आयुष्यात खूप काही चांगले घडणार या विचारात खूप खूश झाली. आनंदाने लग्नाच्या तयारीला लागली. मोठ्या थाटामाटात लग्न लागले. घरातील सर्व निश्चिंत झाले. इतर भावंडाचीही आता लग्न उरकणे गरजेचे होते.
तिचा संसार सुरु झाला. तिला नीटनेटकेपणा , नटणे मुरडणे, फिरायला जाणे , खरेदी करणे खूप खूप आवडत असे. त्याप्रमाणे तिचे पती सुरेन तिला देत असत. हळूहळू एकापाठोपाठ एक भावंडाची लग्नेही झाली.
सगळे कसे खूश होते. एकंदरित सुशिला खूप खूश होती. की आजारपणाने ही दडी मारली.आईवडील ही खूश होते. तिच्या संसारवेलीवर दोन मुलांनी ही आगमन केले.
कुठेतरी तिच्या या आनंदाला नजर लागली. सकाळीच दरवाजावर माणसे आली. काहीबाही बडबडू लागली. मग तिला उमजले. की सुरेन हा कर्जबाजारी आहे. खोटे होते सारे. माहेरची परिस्थिती चांगली होती. तरिही तिने कोणालाच कळू दिले नाही. पण कोंबडे झाकले तरीही आरवल्याशिवाय रहात नाही. हळूहळू माहेरच्यांना कळू लागले जोतो जमेल तशी मदत करू लागले. तिला ते मान्य नव्हते.
ती परत खंगू लागली. आजारी पडू लागली. मुलांनी त्यातूनही जेमतेम शिक्षण घेतले. परिस्थिती आवाक्यात येईना. सुरेन काहीच कमवत नव्हता. तिने अनेक छोटे मोठे धंदे केले पण यश येईना
आभाळ फाटले. ठिगळ कोठे लावणार ?कर्जाचे डोंगर वाढले. आणी हळूहळु सासर माहेरचे लांब होऊ लागले. माणूसकीचा अंत झाला. तिलाही मदत मागणे लाजिरवाणे वाटू लागले. एका ताटात जेवलेली, एका घरात वाढलेली भावंडे स्वत:च्या संसारात मग्न झाली. तिची व्याकुळता कोणापर्यंत पोहोचलीच नाही.
एके दिवशी सकाळी तिने भावंडाना फोन केला. तब्येत बरी नाही. तिचे नेहमीचेच असे वाटून सगळ्यांनी हो ला हो दिला. काळजी घे सांगितले. माणूसकी , प्रेमाचा अंत झाल्याचे तिला जाणवले. हॉस्पिटलचे बिल म्हणजे मुलांच्या डोक्यावर वाढते कर्ज.माऊलीने सरळ ह्या व्यस्त मंडळीपासून काढता पाय
घेतला. गेली या स्वार्थी जगातून , आजारातून निघून गेली.
आणि सगळे जागे झाले. आपले माणूस निघून गेले. मग आत्मपरिक्षण सुरु झाले नोकरी, कुटुंब,संसार ह्या सगळ्यात आपण आपल्या माणसाला विसरलो. प्रेम विसरलो. तिला हात द्यायला हवा होता आत्मविश्वास वाढवायला हवा होता. पण छे!खूप उशीर झाला.आता परत येणे नाही.
म्हणूनच माणूस जपा. ती गेल्यावर जागे होण्यापेक्षा शब्दांचा हात द्या.