हाव
हाव
१७) सुविचार - जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात
सदू चे कुटुंब खूप छोटे मध्यमवर्गीय होते. त्याचे आईवडील पोटापण्यापुरते कमवत असत.त्यात ते समाधानी होते. त्यांचे नातेवाईक सर्व श्रीमंत होते.त्यांच्याकडे कार ,घरी नोकरचाकर त्याला त्यांचा खूप हेवा वाटत असे. आपणही असेच श्रीमंत असावे असे त्याला वाटे. तो ती गोष्ट आईवडिलांकडे बोलून ही दाखवत असे. पण देवाने आपल्याला मुबलक अन्न वस्त्र निवारा दिला आहे ना ते मोठे समज असे सांगून त्याची समज काढली.पण वय लहान असल्याने त्याला आईवडिलांचे म्हणणे पटले नाही.
तो चांगल्या गुणांनी पदवीधर झाला. त्याला असे वाटत होते की आपल्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी. गुण चांगले होते. पण तसे शक्य नव्हते .त्याला नोकरी यायची पण त्याची स्वप्ने पूर्ण करणारी नव्हती. नोकर्या नाकारून नंतर त्याची अशी स्थिती आली की त्याला नोकरीच मिळेनाशी झाली. उपासमार होण्यापेक्षा मिळत होते ते स्वीकारायला हवे होते असे त्याचे एक मन म्हणत असे तर दुसरे मन म्हणे याला काय जीवन म्हणायचे. एेशारामात आपण कधी जगायचे. अाणी मग तो कमी वेळात श्रीमंत व्हायचे मार्ग शोधू लागला. या विचारात त्याचा तो कधी चुकीच्या मार्गाला गेला ते त्याचे त्यालाच समजले नाही. पैसा, श्रीमंती, गाडी या डोळ्यावरच्या पट्ट्यांनी चांगले वाईट समजणे त्याच्या पलिकडे होते.आईवडिलांनी मित्रांनी त्याला खूप समजावले. पण छे!काही उपयोग झाला नाही.
तो मदमस्त आयुष्य जगत होता. गाडी, हॉटेल्स, कपडे चैनच चैन . अगदी लहानपणापासून पाहिलेले स्वप्न तो जगत होता. जाणून बुजून नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना श्रीमंती दाखवत असे. सर्वांना त्याचा हेवा वाटत होता.पण खोट्याचे दिवस नेहमीच कमी असतात. खरे चिरकाल टिकणारे असते. तो त्याच्या चुकीच्या कामात फसला. पोलीस मागे लागले. नातेवाईक काय पण सर्वच लोकांपासून तोंड लपवायची पाळी आली. चूक कळली पण वेळ निघून गेली होती.
तो पकडला गेला. त्याच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. अायुष्याचाही.म्हणूनच कधीही श्रीमंत होण्याचा शॉर्टकट शोधू नये.