Anil Kulkarni

Abstract

2.6  

Anil Kulkarni

Abstract

मावळत्या दिनकरा...

मावळत्या दिनकरा...

2 mins
192


प्रिय मावळत्या दिनकरा...

तू मावळतानां, ढळला रे ढळला दिन सखया.

 संध्याछाया भिवविती हृदया.


या ओळी हमखास ज्येष्ठांना आठवतात. तुझं जाणं मनाला हुरहूर लावतं.पण तू अस्ताला जात नाहीस तर, तू एका वेगळ्याच विश्वात प्रवास करतोस. फिरत्या रंगमंचावर तुझी वाटचाल वाखाणण्यासारखी आहे. विश्रांती हा शब्द तुझ्या शब्दकोशात नाही.तुझ्यापासून शिकण्यासारखं खूप आहे. तुझ्या अस्तित्वावर, अवस्थेवर मानवाने कविता केल्या आहेत. तुझ्यामुळे सृष्टी आहे. सृष्टी आहे म्हणूनच,आमची दृष्टी तृप्त आहे. पृथ्वीवरच्या सृजनाचा, विनाशाचा तू साक्षीदार आहेस. जीवन मृत्यूचा साक्षीदार आहेस. तुझ्या तापमानावर सगऴी सृष्टी नाचते.सूर्योदयाचं रूप घेऊन पुन्हा तू सकाळी येतोस.


सूर्योदय म्हणजे नवीन आशा-आकांक्षा. सूर्यास्त म्हणजे अस्ताची जाणीव. पण हे कायम राहत नाही. जीवनात ही घडी अशीच राहू दे म्हणलं तरी बदल होतोच. घडी तशीच राहत नाही. आयुष्य मार्गक्रमण करीत करीत हळूहळू आयुष्याचा सूर्यास्त व्हायला लागतो. हे सगळं असलं तरी सूर्योदय आणि सूर्यास्त, जन्म आणि मृत्यू अटळआहेत. सूर्योदयाशी निगडित आशा, आकांक्षा, भावना वेगळ्या असतात. सूर्यास्ताची निगडीत भावना वेगळ्या असतात. सूर्योदय आयुष्यात प्रसन्नता घेऊन येतो, आशा घेऊन येतो. सूर्यास्ताच्या वेळेस थोडी वेगळीच रूखरुख लागते. संपत आल्याची जाणीव होते सूर्योदय ते सूर्यास्त यामध्ये जे जीवन भरभरून जगलें, ते समाधानाने सूर्यास्ताकडे पाहतात.


पण सूर्योदय ते सूर्यास्त या प्रवासात ज्यांच्या अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात, ते अतृप्तच असतात. काही लोकांना जीवनाच्या प्रवासात इतकं समाधान मिळतं की आता नेत्र मिटावेत आणि प्रभू च्या चरणी विलीन व्हावं असं वाटतं. सूर्यास्त आणि मृत्यू अटळ आहेत. सूर्यास्त आणि मृत्यू स्वीकारावाच लागतो. हताशपणे पाहण्याच्या आणि भोगण्याचा या क्रिया आहेत. सूर्योदय जसा सृजनाचा सोहळा आहे. तसं सूर्यास्तसुद्धा तृप्तीचा सोहळा आहे. सूर्यास्त शांततेची जाणीव करून देतो. सूर्यास्त होतो तो सुद्धा रंगाची उधळण करूनच. सृष्टीला वेगळ्या रंगात बुडवून तो निरोप घेतो.

माणसे एकमेकांच्या प्रेमात अशीच बुडतात.


सूर्यास्तानंतर कालरात्र आहे, उष:काल आहे पुन्हा सुर्योदय आहे हे माहीत असतं. मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. जीवन म्हणजे अनुत्तरीत प्रश्नांची मालिकाच होय. उत्तर शोधता शोधता जीवन संपून जातं. माणसाने विज्ञानाचा आत्मा शोधला. पण विज्ञानाला अजून आत्मा शोधता आला नाही. ज्ञान, विज्ञान अजून तरी आत्म्याभोवतीच घुटमळत आहे. जीवन संपतं म्हणजे जाणीव संपते. अनेकांच्या जाणीवा जिवंतपणीच संपतात.

जाणिवांना सुद्धा खतपाणी लागतं. जाणीवांच विकसित होणंच, जगायला प्रवृत्त करतं. जाणिवांचा सूर्योदय आणि सूर्यास्त आपल्याच हाती आहे.जाणीवा संपत चालल्या सारखी परिस्थिती सभोवताली आहे, तरीही निराश व्हायचं नाही, कारण जाणिवेचासुद्धा सूर्योदय होतोच. जाणिवांचंसुद्धा थोड्या वेळासाठी लॉकडाऊन होतं. जसं सूर्यास्ताचं ही लॉकडाऊन सूर्योदयापर्यंतच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract