'मास्टर आणि मार्गारीटा' ' - एक अंश
'मास्टर आणि मार्गारीटा' ' - एक अंश


कोंबड्याचा जय असो!
लेखक: मिखाइल बुल्गाकव;
भाषांतर : आ. चारुमति रामदास
मानसिक ताण सहन नाही करूं शकला रीम्स्की आणि 'शो' संपल्यानंतरच्या औपचारिकतांची वाट न बघतां आपल्या ऑफ़िसकडे धावला. तो टेबलाशी बसून सुजलेल्या डोळ्यांनी समोर पडलेल्या जादुई नोटांकडे बघूं लागला. फिनडाइरेक्टरची बुद्धि निर्बुद्धीपर्यंत पोहोचली होती. बाहेरून सारखा हल्ला ऐकूं येत होता. लोकांचे थवे वेराइटी थियेटरमधून बाहेर निघंत होते. फिनडाइरेक्टरच्या कानांत अचानक पोलिसच्या शिट्टीचा आवाज आला. ही शिट्टी कधीच सुखद घटनेची सूचना देत नाही. पण जेव्हां शिट्टीचा आवाज पुन्हां ऐकूं आला आणि त्याच्या मदतीला आणखी एक ज़ोरदार, जास्त शक्तिशाली, लांब शिट्टी आली, मग रस्त्यावरून विचित्रसा हो-हल्ला, रानटीपणे हसण्याचे, छेड काढण्याचे आवाज ऐकूं आले, तेव्हां फिनडाइरेक्टर समजून गेला की पुन्हां काहीतरी लफ़डा झालेला आहे. इच्छा नसतांनासुद्धां त्याच्या डोक्यांत हाच विचार चमकला, की ह्याचा संबंध नक्कीच काळ्या-जादूच्या जादुगार आणि त्याच्या सहायकांनी दाखवलेल्या किळसवाण्या प्रयोगाशीच आहे. तीक्ष्ण कानांचा फिनडाइरेक्टर बिल्कुल चूक नव्हता.
जसंच त्याने सादोवायाकडे उघडणा-या खिडकीतून बाहेर बघितलं, त्याचा चेहरा वाकडा-तिकडा झाला आणि कुजबुजण्याऐवजी फुत्कार करंत तो म्हणाला, "मला माहीत होतं!"
रस्त्यावर लावलेल्या लैम्प्सच्या तीव्र प्रकाशांत त्याने आपल्या अगदी खाली, फुटपाथवर एका महिलेला पाहिलं. ती फक्त जांभळ्या रंगाच्या अंतर्वस्त्रांमधे होती. हाँ, तिच्या डोक्यावर टोपी आणि हातांत छत्री होती.
ह्या बावरलेल्या महिलेभोवती, जी कधी खाली बसंत होती, तर कधी पळायचा प्रयत्न करंत होती, रानटीपणे हसणा-यांची, छेड काढणाऋ-यांची गर्दी होती. गर्दीचं प्रचण्ड, किळसवाणं हास्य चालूंच होतं. ह्या हास्याने फिनडाइरेक्टरला आपल्या पाठीच्या कण्यांत थण्ड लाट वाहंत असल्याचा अनुभव झाला. महिलेच्या जवळंच एक माणूस डोलंत होता, जो आपला कोट काढायचा प्रयत्न करंत होता, पण बावचळल्यामुळे त्याला बाहींत अडकलेला हातंच बाहेर काढतां येत नव्हता.
किंकाळ्या आणि प्रचण्ड हास्य एका दुस-या जागेवरूनपण ऐकूं आलं – डाव्या प्रवेश द्वाराजवळून. तिकडे डोकं वळवल्यावर ग्रिगोरी दानिलविचला दुसरी महिला दिसली, गुलाबी अंतर्वस्त्रांत. ती रस्त्यावरून फुटपाथवर उडी मारायचा प्रयत्न करंत होती, म्हणजे प्रवेश द्वारांत शरण घेता येईल, पण गर्दी तिचा रस्ता रोखंत होती आणि आपल्या हावरटपणा आणि फैशनची ही सावज, गरीब बिचारी, जिला फागोतच्या फर्मने ठगलं होतं, ह्याक्षणी फक्त एकंच विचार करंत होती, की जमिनींत सामावून जावं. पोलिसवाला त्या दुर्दैवी महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करंत होता. शिट्टी वाजवंत तो पुढे येत होता आणि त्याच्या मागे-मागे होते टोप्या घातलेले काही टारगट लोकं. हेच तर हसंत होते, तिची छेड काढंत होते.
मिशा असलेला एक मरतुकडा कोचवान पट्कन पहिल्या निर्वस्त्र महिलेजवंळ आला, त्याने आपल्या हडकुळ्या, मरियल घोड्याला तिच्याजवळ थांबवलं. मुच्छडचा चेहरा आनंदाने उजळला. रीम्स्कीने आपल्या कपाळावर हात मारला, तिरस्काराने थुंकून तो खिडकीपासून दूर झाला.
थोडा वेळ टेबलापाशी बसून तो रस्त्यावरून येणारे आवाज ऐकंत राहिला. आतां अनेक ठिकाणांहून शिट्ट्यांचे आवाज ऐकूं येत होते. मग हळू-हळू त्यांचा जोर कमी होत गेला. रीम्स्कीला आश्चर्य वाटलं, की हा सगळा लफ़डा खूपंच कमी वेळांत संपला.
हात-पाय हालवायची, जवाबदारीचा कडु घोट पिण्याची वेळ येऊन ठेपली होती. तिस-या अंकात टेलिफोन दुरूस्त करून झाले होते; टेलिफोन करायचा होता, ह्या सगळ्या भानगडीची सूचना द्यायची होती, मदत मागवायची होती, ह्या लफड्यांतून बाहेर पडायचं होतं, लिखादेयेवच्या डोक्यावर खापंर फोडून स्वतःला वाचवायचं होतं वगैरे, वगैरे...थू...थू...सैतान! वैतागलेल्या फिनडाइरेक्टरने दोनदां टेलिफोनच्या रिसीवरकडे हात नेऊन मागे घेतला. तेवढ्यांत ऑफिसच्या ह्या मृतप्राय शांततेत फिनडाइरेक्टरसमोरचा टेलिफोन आपणहूनंच वाजूं लागला; तो थरथरू लागला, बर्फासारखा गारठला. 'मी खूपंच हवालदील झालोय,' त्याने विचार केला आणि रिसीवर उचलला. उचलतांच जणुं त्याला विजेचा शॉक बसला आणि त्याचा चेहरा पंढराफटक पडला. रिसीवरमधून एका महिलेचा शांत, पण रहस्यमय कामासक्त आवाज कुजबुजला:
"कुठेही फोन करूं नकोस, रीम्स्की! परिणाम वाईट होईल!"
रिसीवर शांत झाला. रीम्स्कीला अनुभव झाला की पाठीच्या मणक्यावर असंख्य मुंग्या चालताहेत; रिसीवर ठेवून त्याने माहीत नाही कां आपल्या मागे असलेल्या खिडकीतून बाहेर बघितलं. नाजुक पानांने अर्धवट झाकलेल्या मैपल वृक्षाच्या फांद्यांमधून, ढगाच्या पारदर्शी आवरणांतून डोकावंत असलेला चंद्र दिसला. न जाणे कां, रीम्स्की ह्या फांद्यावरून नजर नाही काढूं शकला आणि जसा-जसा तो त्यांच्याकडे बघंत होता, एक अनामिक भीति त्याला वेढून घेत होती.
मोठ्या प्रयत्नाने त्याने चंद्राच्या प्रकाशांत न्हायलेल्या खिडकीपासून आपला चेहरा दूर केला आणि खुर्चीतून उठू लागला. फोन करण्याचा प्रश्नंच नव्हता. ह्या क्षणी फिनडाइरेक्टरच्या डोक्यांत फक्त एकंच विचार होता – लवकरांत लवकर ह्या थियेटरमधून बाहेर पडायचं.
तो बाहेरचा कानोसा घेऊं लागला: थियेटर सामसूम होतं. रीम्स्कीला समजलं की बरांच वेळापासून दुस-या मजल्यावर तो एकटांच आहे. ह्या विचाराने त्याला पुन्हां एक बालिश, अदम्य भीतिचा अनुभव झाला. तो ह्या विचाराने थरथरू लागला की आता त्याला निर्मनुष्य कॉरीडोर्समधून आणि पाय-यांवरून एकटंच जावं लागेल. वैतागून त्याने टेबलावर समोरंच पडलेले जादूचे नोट आपल्या ब्रीफकेसमधे कोंबले, स्वतःवर थोडंफार नियंत्रण ठेवण्यासाठी खाकरंत घसा स्वच्छ केला, पण खोकला सुद्धां अशक्त-सा, भसाडाचं निघाला.
त्याला भास झाला की ऑफिसच्या दाराखालून एक कुजका दमंटपणा त्याच्याजवळ येतोय. फिनडाइरेक्टरच्या पाठीवर शहारे आले. तेवढ्यांत अचानक घडाळ्याने बारा टोले मारायला सुरुवात केली. टोल्यांच्या आवाजाने फिनडाइरेक्टर शहारला. जेव्हां त्याला बंद असलेल्या दाराच्या भोकांतून विलायती चावी फिरण्याचा आवाज ऐकूं आला, तेव्हां तर त्याच्या हृदयाची धडधड देखील थांबली. ओल्या, थण्डगार हातांत ब्रीफकेस घट्ट धरलेल्या रीम्स्कीला वाटलं की जर ही सरसर आणखी काही वेळ चालूं राहिली तर त्याच्या स्वतःवरचा ताबा सुटेला आणि तो जोराने किंचाळेल.
शेवटी कोणाच्या तरी प्रयत्नाने दार उघडलं आणि आवाज न करता आत आला वारेनूखा. रीम्स्की जसा उभा होता, तसांच बसून गेला, कारण की त्याचे पायंच त्याला जुमानंत नव्हते. एक मोट्ठा श्वास घेऊन त्याने खुशामदी थाटांत मंद हास्य केले आणि हळूंच म्हणाला, "अरे देवा, तू मला कित्ती घाबरवलंस!"
हो, त्याच्या अश्या अचानक येण्याने कोणीपण घाबरलंच असतं, पण रीम्स्कीला त्याच बरोबर आनंदसुद्धा झाला. ह्या गुंतागुंतीचा कमीत कमी एक तार तरी मोकळा झाला होता.
"सांग, सांग, लवकर सांग!" रीम्स्कीने हा तार पकडंत भसाड्या आवाजांट म्हटलं, "ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे?"
"माफ़ कर..." आगंतुक दार बंद करंत खोल आवाजांत म्हणाला, "मला वाटलं की तू निघून गेलास," आणि वारेनूखा टोपी न काढतां येऊन रीम्स्कीच्या समोरच्या खुर्चीत बसून गेला.
वारेनूखाच्या उत्तरांत असा काही बेजवाबदारपणा होता जो, जगांतल्या सर्वोत्तम सेस्मोग्राफला टक्कर देऊं शकणा-या रीम्स्कीच्या संवेदनशील मनाला खुपला. असं कां? जर वारेनूखाला असं वाटंत होतं, की फिनडाइरेक्टर निघून गेलाय, तर तो त्याच्या ऑफिसमधे कां आला? त्याचं स्वतःचं ऑफ़िस तर आहे? ही झाली पहिली गोष्ट. दुसरी ही, की तो कोणत्याही प्रवेश द्वाराने आला असतां, तरी कोणच्या न कोणच्या चौकीदाराशी त्याचा सामना झालांच असतां, त्यांना तर आदेश दिलेला होता, की ग्रिगोरी दानिलोविच आणखी काही वेळ आपल्या ऑफ़िसमध्ये थांबणार आहेत.
पण तो जास्त वेळ ह्या विचित्रतेबद्दल विचार नाही करूं शकला. मुख्य मुद्दा हा नव्हता.
"तू फोन कां नाही केलास? ही याल्टाची भानगड काय आहे?"
"तेच, जे मी म्हणंत होतो," किंचित विव्हळंत वारेनूखा म्हणाला, जणू त्याचा दात दुखतोय, "तो पूश्किनोच्या बारमधे सापडला."
"पूश्किनोत? म्हणजे मॉस्कोच्या जवळंच? पण टेलिग्राम तर याल्टाहून आला होता!"
"कुठला याल्टा? कसला याल्टा? पूश्किनोच्या तार मास्टरला दारू पाजली आणि दोघंही मस्ती करायला लागले, 'याल्टा'च्या नावाने तार पाठवणं अशीच खोडी होती."
"ओ हो...ओ हो...बरंय, बरंय..." रीम्स्की बोलंत नव्हतां – सुरांत गात होता. पिवळ्या प्रकाशांत त्याचे डोळे चमकू लागले. डोळ्यांसमोर बेशरम स्त्योपाला नौकरीवरून काढून टाकण्याचं मनोरम चित्र तरळूं लागलं. मुक्ति! लिखादेयेव नावाच्या ह्या पीडेपासून सुटका होण्याचं स्वप्न फिनडाइरेक्टर न जाणे कधी पासून पाहत होतां! कदाचित स्तिपान बग्दानोविचला सस्पेण्ड होण्याहूनही जास्त शिक्षा मिळेल...
"व्यवस्थित सांग!" रीम्स्की पेपरवेटची खटखट करंत म्हणाला.
वारेनूखा व्यवस्थितपणे सांगू लागला. जसांच तो तिथे पोहोचला, जिथे फिनडाइरेक्टरने त्याला पाठवले होते, त्यांनी लगेच त्याला बसवून त्याचं बोलणं ऐकायला सुरुवात केली. कोणीही, नक्कीच, हे मानायला तयार नव्हतं, की स्त्योपा याल्टांत असूं शकतो. सगळ्यांनाच वारेनूखाचं म्हणणं पटलं की तो पूश्किनोच्या 'याल्टा'त असूं शकतो.
"पण सध्यां तो कुठे आहे?" वैतागलेल्या फिनडाइरेक्टरने मधेच टोकंत त्याला विचारलं.
"आणखी कुठे असूं शकतो…" एडमिनिस्ट्रेटरने तोंड वाकडं करून हसंत म्हटलं, "स्पष्टंच आहे, नशा उतरवणा-या केंद्रांत!"
"बरं, बरं, धन्यवाद!"
वारेनूखा सांगत होता. जसा-जसा तो सांगत होता, रीम्स्कीच्या डोळ्यांसमोर लिखादेयेवच्या दांडगाईची साखळी खुलंत गेली. ह्या साखळीची प्रत्येक कडी आधीच्या कडीहून जास्त भयंकर होती. दारू पिऊन पूश्किनोच्या टेलिग्राफ-ऑफ़िसच्या लॉनवर टेलिग्राफ-क्लर्कसोबत डान्स करणं – फालतूश्या हार्मोनियमच्या चालीवर! आणि धिंगाणा तरी कसला घातला! भीतीने थरथरणा-या महिलांच्या मागे धावणं, 'याल्टा'च्या वेटरशी मारामारी! 'याल्टा'च्या फरशीवर हिरव्या कांद्याच्या पाती फेकून दिल्यांत! पांढ-या ड्राय 'आय दानिला' दारूच्या आठ बाटल्या फोडून टाकल्या! टैक्सीवाल्याचं मीटर तोडून टाकलं, कारण की तो स्त्योपाला आपली गाडी द्यायला नाही म्हणाला. ज्या नागरिकांनी मधे पडायचा प्रयत्न केला, त्यांना पोलिसांत देण्याची धमकी दिली! नुसता सैतानी नाच!
स्त्योपाला मॉस्कोच्या थियेटरशी संबंधित सगळेच लोक ओळखंत होते, आणि सगळ्यांना माहीत होतं, की तो चांगला माणूस नव्हता. पण हे, जे एडमिनिस्ट्रेटर त्याच्याबद्दल सांगंत होता, ते तर स्त्योपासाठीसुद्धां भयंकर होतं. हो, भयंकर! खूपंच भयंकर...!
रीम्स्कीची बोचरी नजर एडमिनिस्ट्रेटरच्या चेह-याला जणु छेदत होती आणि जसा जसा तो पुढे बोलंत गेला, त्याचे डोळे जास्त उदास व्हायला लागले. जशी-जशी एडमिनिस्ट्रेटरची गोष्ट फुलंत गेली आणि रंगंत गेली...तसा तसा फिनडाइरेक्टरचा त्याच्यावरचा विश्वास कमी होत गेला. जेव्हां वारेनूखाने सांगितलं की धिंगाणा घालणा-या स्त्योपाने त्या लोकांचासुद्धां विरोध केला, जे त्याला मॉस्कोला घेऊन जायला आले होते, तेव्हां फिनडाइरेक्टरला पूर्ण विश्वास झाला की अर्ध्या रात्री परंत आलेला एडमिनिस्ट्रेटर अगदी खोट बोलतोय! धडधडीत खोटं! सुरुवातीपासून शेवट पर्यंत फक्त खोटं!
वारेनूखा पूश्किनोला गेलेला नव्हता, आणि स्त्योपापण तेथे नव्हता. दारूच्या नशेंत तार पाठवणारा क्लर्कसुद्धां नव्हता; बारमधे फुटलेल्या बाटल्याही नव्हत्या आणि स्त्योपाला दोरखंडाने बांधलंसुद्धां नव्हतं...असं काहींच झालेलं नव्हतं.
जसाच फिनडाइरेक्टर ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला, की एडमिनिस्ट्रेटर खोटं बोलतोय, त्याच्या सम्पूर्ण शरीरांत भीतीची लाट पसरली – डोक्यापासून पायांपर्यंत. त्याला पुन्हां असा भास झाला की दुर्गंधियुक्त दमटपणा खोलीत पसरंत चाललाय. त्याने एडमिनिस्ट्रेटरच्या चेह-यावरून एका मिनिटासाठीसुद्धां नजर दूर नाही केली, जो आपल्याच खुर्चीत वाकडा-तिकडा होत होता, आणि सतंत निळा प्रकाश फेकणा-या लैम्पच्या सावलीतून बाहेर न पडण्याचा प्रयत्न करंत होता. एका वर्तमानपत्राने तो जणु त्रास देणा-या ह्या प्रकाशापासून स्वतःला वाचवंत होता. फिनडाइरेक्टर फक्त हाच विचार करंत होता की ह्या सगळ्याचा अर्थ काय असूं शकतो? निर्मनुष्य इमारतीत इतक्या उशीरा येऊन तो धादांत खोटं का बोलतोय? एका अनामिक भीतीने फिनडाइरेक्टरला हळू हळू वेढून घेतलं. रीम्स्कीने असं दाखवलं की वारेनूखाच्या हालचालींवर त्याचं बिल्कुल लक्ष नाहीये, पण तो त्याच्या गोष्टीचा एक शब्दही न ऐकतां फक्त त्याच्या चेह-याकडे टक लावून बघंत राहिला. काहीतरी विचित्र होतं, जे पूश्किनोमधल्या गोष्टीहूनही जास्त अविश्वसनीय होतं आणि हे होतं - एडमिनिस्ट्रेटरच्या चेह-यांत आणि सवयींत झालेला बदल.
त्याने आपल्या टोपीचा बदकासारखा कोपरा चेह-यावर कितीही खेचला, ज्याने चेह-यावर सावली पडंत राहिली, किंवा लैम्पच्या प्रकाशापासून स्वतःला वाचवण्यासाठी वर्तमानपत्राला कितीही फिरवंत राहिला – तरीही फिनडाइरेक्टरला त्याच्या चेह-याच्या उजव्या बाजूला नाकाच्या जवळ मोट्ठा निळा डाग दिसलांच. शिवाय नेहमी लाल दिसणारा एडमिनिस्ट्रेटर एकदम पांढरा फटक पडला होता आणि माहीत नाही कां, ह्या दमट रात्री सुद्धां त्याच्या मानेवर एक जुना रेघारेघांचा स्कार्फ गुंडाळलेला होता. तसंच आपल्या अनुपस्थितीत तो मिटक्या मारण्याची आणि चोखण्याची घाणेरडी सवंय पण शिकून गेला होता; त्याचा आवाज सुद्धां बदलला होता, पहिल्यापेक्षां जाडा आणि भसाडा, डोळ्यांत चोरी आणि भीतीचं अजब मिश्रण होतं – इवान सावेल्येविच वारेनूखा नक्कीच बदलला होता.
आणखी पण काही होतं, जे फिनडाइरेक्टरला खूपंच उद्विग्न करंत होतं. ते काय होतं, हे त्याला आपलं जळजळंत असलेलं डोकं लढवून आणि निरंतर वारेनूखाकडे बघंत राहूनसुद्धां समजलं नव्हतं. त्याला फक्त येवढंच कळंत होतं की हे काहीसं अजून पर्यंत न बघितलेलं, अप्राकृतिक असं होतं, जे एडमिनिस्ट्रेटरला चांगल्याच ओळखीच्या जादुई खुर्चीशी जोडंत होतं.
"शेवटी त्याच्यावर काबू करण्यांत यश आलं, आणि त्याला गाडींत कोंबलं," वारेनूखाची भिणभिण चालूं होती, तो वर्तमानपत्राच्या आडून बघंत होता आणि हाताच्या पंजाने निळा डाग लपवंत होता.
रीम्स्कीने आपला हात पुढे केला आणि टेबलावर यंत्रवत् बोटं नाचवंत इलेक्ट्रिक घण्टीच बटन दाबून टाकलं. त्याच्या हृदयांत धक्क झालं. त्या रिकाम्या बिल्डिंगमधे घण्टीचा कर्कश आवाज ऐकूं यायला पाहिजे होता, पण असं नाही झालं. घण्टीचं बटन निर्जीवपणे टेबलांत घुसंत गेलं. बटन निर्जीव होतं आणि घण्टी बिघडवली गेली होती.
फिनडाइरेक्टरची लबाडी वारेनूखापासून लपू नाही शकली. त्याने डोळ्यांने अंगार ओकंत दरडावंत विचारलं, "घण्टी कां वाजवतोयंस?"
"अशीच वाजली," दबक्या आवाजांत फिनडाइरेक्टरने उत्तर दिलं आणी तिथून आपला हात उचलंत मरियल आवाजांत विचारलं, "तुझ्या चेहर-यावर हे काय आहे?"
"कार घसरली, दाराच्या हैण्डलवर आदळलो," वारेनूखा ने त्याची नजर टाळंत म्हटलं.
"खोटं! खोटं बोलतोय!" आपल्याच विचारांत मग्न फिनडाइरेक्टर म्हणाला आणि त्याचे डोळे विस्फारले, आणि तो खुर्चीच्या पाठीला चिकटून गेला.
खुर्चीच्या मागे, फरशीवर एकमेकांत गुंतलेल्या दोन सावल्या पडल्या होत्या – एक काळी आणि जाड, दुसरी पातळ आणि भूरी. खुर्चीची पाठ, आणि तिच्या टोकदार पायांची सावली स्पष्ट दिसंत होती, पण पाठीच्या वरती वारेनूखाच्या डोक्याची सावली नव्हती, अगदी तशीचं, जशी खुर्चीच्या पायांखाली एडमिनिस्ट्रेटरच्या पायांची सावली नव्हती.
"त्याची सावली पडंत नसते!" आपल्याच विचारांत रीम्स्की पिसाटासारखा ओरडला. त्याचं सर्वांग थरथरूं लागलं.
वारेनूखाने डोळ्यांच्या कोप-यातूंन पाहिलं, रीम्स्कीचं घाबरणं आणि खुर्चीच्या मागे लागलेली त्याची नजर बघून तो समजून गेला की त्याचं बिंग फुटलंय.
वारेनूखा खुर्चीतून उठला, फिनडाइरेक्टरनेपण असंच केलं, आणि दोन्हीं हातांत ब्रीफकेस घट्ट धरून टेबलपासून एक पाय दूर सरकला.
"दुष्टाने ओळखलंय! नेहमीपासूनंच हुशार आहे," रागाने दात-ओठ खात फिनडाइरेक्टरच्या चेह-यासमोर वारेनूखा पुटपुटला आणि अचानक खुर्चीतून उडी मारून पट्कन विलायती कुलुपाचं बटन खाली केलं. फिनडाइरेक्टरने बगिच्यांत उघडणा-या खिडकीकडे सरकंत हताश होऊन पाहिलं. चंद्राच्या प्रकाशांत न्हायलेल्या ह्या खिडकीला चिटकलेला एका नग्न मुलीचा चेहरा आणि हात त्याला दिसला. मुलगी खिडकीचा खालचा बोल्ट उघडण्याचा प्रयत्न करंत होती. वरचा बोल्ट उघडलेला होता.
रीम्स्कीला भास झाला की टेबल लैम्पचा प्रकाश कमी होत चाललाय आणी टेबल झुकतंय. रीम्स्कीला जणु बर्फाच्या लाटेने वेढून घेतलं. त्याने स्वतःला सांभाळलं, नाहीतर तो पडलांच असता. उरल्या-सुरल्या ताकदीने ओरडायच्या ऐवजी तो फक्त कुजबुजत्या स्वरांत म्हणाला, "वाचवा..."
वारेनूखा दाराकडे लक्ष ठेवंत त्याच्यासमोर उड्या मारंत होता, हवेंत बराच वेळ झुलंत होता. वाकड्या-तिकड्या बोटांनी रीम्स्कीला खुणा करंत होता, फुत्कार करंत होता, खिडकींत उभ्या असलेल्या मुलीला डोळा मारंत होता.
मुलीने चट्कन आपलं लाल केसांचं डोकं वेन्टिलेटरमधे घुसवलं आणि हाताला शक्य तितकं लांब करून खिडकीच्या खालच्या चौकटीला खरचटूं लागली. तिचा हात रबरासारखा लांब होत गेला आणि त्याच्यावर मृतप्राय हिरवंटपणा पसरला. शेवटी हिरव्या मृतप्राय बोटांनी बोल्टचं वरचं टोक पकडून फिरवलं. खिडकी उघडूं लागली. रीम्स्की अत्यंत अशक्त आवाजांत ओरडला, भिंतीला टेकून त्याने ब्रीफकेसला आपल्या समोर ढालीसारखं धरलं. तो समजून चुकला की समोर मृत्यु उभा आहे.
खिडकी पूर्णपणे उघडली, पण खोलींत रात्रीची ताजी हवा आणि लिण्डन वृक्षांच्या सुवासाऐवजी तळघराचा दुर्गंध घुसला. मृत मुलगी खिडकीच्या चौकटीवर चढली. रीम्स्कीला तिच्या छातीवर सडल्याचे डाग स्पष्टपणे दिसले.
आणि ह्याच वेळेस अकस्मात कोंबड्याचा प्रसन्न आरव बगिच्यातून तरंगंत आला. तो शूटिंग गैलरीच्या मागे असलेल्या त्या लहानग्या बिल्डिंगमधून आला होता, जिथे कार्यक्रमांसाठी पाळलेले पक्षी ठेवलेले होते. एक मोट्ठा, प्रशिक्षित कोंबडा आरवला आणि त्याने संदेश दिला की मॉस्कोत पूर्वेकडून सूर्योदय होत आहे.
रानटी आवेशामुळे मुलीचं तोंड विकृत झालं, ती गुरगुरली, आणि दाराजवळ असलेला वारेनूखा किंचाळला आणि हवेतून फरशीवर आला.
कोंबडा पुन्हां आरवला; मुलीने दातांची किटकिट केली आणि तिचे लाल केस उभे झाले. कोंबड्याची तिसरी आरोळी होतांच ती वळली आणि उडून गायब झाली. तिच्या मागे-मागे वारेनूखापण उडीमारून आणि हवेंत सपाट होऊन, उडणा-या क्यूपिड सारखा, हवेंत तरंगंत हळू-हळू टेबलाच्या वरून खिडकीतून बाहेर निघून गेला.
बर्फासारखा पांढरा फट्ट, एकही काळा केस नसलेला म्हातारा, जो काही वेळापूर्वी रीम्स्की होता, दाराकडे धावला, चावी फिरवून, दार उघडून अंधा-या कॉरीडोरमधे पळूं लागला. पाय-यांच्या वळणावर भीतीने विव्हळंत, चाचपडंत त्याने विजेचं बटन शोधलं आणि पाय-या प्रकाशांत न्हाऊन गेल्या. पाय-यांवर हा थरथरणारा म्हातारा पडला, कारण त्याला असं वाटलं की पाठीमागून वारेनूखाने त्याच्यावर उडी मारलीय.
खाली आल्यावर त्याने लॉबीमधे स्टूलवरंच बसल्या-बसल्या झोपलेल्या चौकीदाराकडे पाहिलं, रीम्स्की चोरपावलांनी त्याच्या जवळून गेला आणि मुख्य दरवाज्यातून बाहेर धावला, रस्त्यावर आल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. तो इथपर्यंत शुद्धीवर आला की दोन्हीं हातांनी डोकं धरल्यावर त्याला टोपी ऑफ़िसमधेंच विसरून आल्याची जाणीव होऊं शकेल.
स्पष्टंच आहे, की तो टोपी घ्यायला परंत नाही गेला, आणि एक दीर्घ श्वास घेऊन जवळच्या सिनेमा हॉलच्या कोप-यावर दिसंत असलेल्या लाल लाइटकडे धावला. एका मिनिटातच तिथे पोहोचला. कोणीच कार नव्हतं थांबवंत.
"लेनिनग्रादच्या ट्रेनवर चल, चहासाठी देईन!" आपलं हृदय पकडून मुश्किलीने श्वास घेत म्हातारा म्हणाला.
"गैरेजमधे चाललोय..." ड्राइवर तुच्छतेने म्हणाला आणि त्याने गाडी वळवली.
तेव्हां रीम्स्कीने ब्रीफकेस उघडून पन्नास रूबल्सची नोट काढली आणि ड्राइवरच्या समोरच्या खिडकीजवळ नाचवली.
काही क्षणातंच घरघर करंत कार विजेसारखी सादोवाया रिंगरोड वर धावली. म्हातारा सीटवर डोकं टेकून बसला आणि ड्राइवरच्या जवळच्या आरशांत रीम्स्कीने बघितली ड्राइवरची प्रसन्न नजर आणि आपली बावरलेली नजर.
स्टेशनच्या इमारतीसमोर कारमधून उडी मारून समोर दिसला त्या पांढ-या ड्रेसवाल्या माणसाला ओरडून म्हटलं, "फर्स्ट क्लास! एक! तीस देईन!" त्याने ब्रीफकेसमधून नोट काढले, "फर्स्ट क्लासचं नाही तर सेकण्ड क्लासच दे! ते सुद्धां नसलं तर ऑर्डिनरी दे!"
त्या माणसाने चमकत्या घड्याळाकडे बघून रीम्स्कीच्या हातांतून नोट खेचून घेतले.
ठीक पाच मिनिटांनी स्टेशनच्या काचा लावलेल्या गुम्बदाखालून लेनिनग्रादवाली गाडी निघाली आणि अंधारांत लुप्त झाली. तिच्याच बरोबर रीम्स्कीसुद्धां गायब झाला.