Nagesh S Shewalkar

Comedy Others

3  

Nagesh S Shewalkar

Comedy Others

माझे माहेरःमाझे सासर!

माझे माहेरःमाझे सासर!

11 mins
1.7K


             

         माधवी ! एक नवविवाहिता! वय साधारण पंचवीस वर्षे. लग्न होऊन दोन वर्षे झाली होती. 'प्लॅनिंग' हे गोंडस कारण पुढे करून माधवी आणि तिचा पती मनोहर संततीचे मनावर घेत नव्हते. मनोहर एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीस होता. पगारही चांगला भरपूर होता. माधवीही चांगली शिकलेली होती पण मनोहरचा पगार जास्त असल्यामुळे दोघांनीही लग्न ठरताच झालेल्या पहिल्या भेटीत माधवीने नोकरी करु नये असा निर्णय घेतला होता त्यामुळे लग्नानंतर माधवी दिवसभर घरी एकटीच असायची. करमणुकीचे साधन म्हटले तर टिव्ही आणि 'रिकामटेकड्याला भ्रमणध्वनीचा आधार' याप्रमाणे ती फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, मेंसेंजर यांच्याशी खेळत बसे. व्हाट्सअपवर वैयक्तिक संबंधाशिवाय ती पंचवीसपेक्षा अधिक समूहात सक्रिय सहभागी होती. 'माझे माहेर, माहेरची माणसे, आम्ही साऱ्या भगिनी ' इत्यादी अनेक समूहावर ती कायम व्यस्त असे. सकाळी सातला मनोहर कार्यालयात गेल्यापासून ते तो सायंकाळी घरी परत येईपर्यंत ती कायम 'ऑनलाइन' असायची. आलेल्या प्रत्येक पोस्टवर ती हमखास मत नोंदवत असे. तिचे मत कधी अभ्यासपूर्ण असायचे, कधी कुणाला काही मार्ग सुचवणारे, कधी कुणाची खरडपट्टी काढणारे, कधी कुणावर स्तुतीसुमने उधळणारी, कधी कुणाचे अभिनंदन तर मध्येच कुणाचा निषेध करणारी अशी तिची मते असायची. सोबतच दिवसभरात ती स्वतःच्या पोस्टही टाकत असे. फेसबुकवरही तिच्या खूप मित्र-मैत्रीणी होत्या.

         लग्न झाल्यानंतर माधवीने मनोहरच्या वाढदिवसानिमित्त त्याची स्तुती करणारी एक पोस्ट टाकली होती. त्यात तिने लिहिले होते, 'मनोहर! माझा नवरा! माझे सर्वस्व! एक वर्षाच्या सहवासानंतर मी अभिमानाने, खात्रीने सांगू शकते की, मनोहरच्या रुपाने मला माझ्या स्वप्नातला राजकुमार, माझे सर्वस्व गवसले आहे. मनोहरसारखा सालस, प्रामाणिक, सत्शील, चारित्र्यवान दुसरा कुणी असेल असे मला तरी वाटत नाही. अमृताच्या कुपीतून अमृताचा एखादा छोटासा थेंब बाहेर पडताच जसे त्याला जपले जाते तसेच मला मनोहर पावलोपावली जपत असतो. मी कोणतीही गोष्ट सांगायला अवकाश अर्ध्या रात्री तो ती गोष्ट माझ्यासमोर आणून टाकतो. प्रियकराने प्रियेला चंद्र आणून देणे ही आता कविकल्पना राहिलेली नाही पण माझा असा विश्वास आहे की, मी जर त्याला म्हटले की, आपण आठदहा दिवस चेंज म्हणून सूर्यावर जाणून राहूया तर मनोहर लगेच तयारीला लागेल. असा जन्मोजन्मीचा साथीदार मला मिळाला हे माझे भाग्य! आय लव्ह यू मन्नू!' झाले. अशी पोस्ट टाकायला अवकाश नेटकऱ्यांना जणू कुरण मिळाले. प्रत्येक समूहावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. बहुतांशी प्रतिक्रिया त्या दोघांचे अभिनंदन करणाऱ्या होत्या. तर अनेकांनी अभिनंदन करून बरेच काही लिहिले होते. माधवीचे बाबांनी लिहिले,

'अखेर जावाईशोध कुणाचा? जावाई आहे कुणाचा? ज्यावेळी वधूवर सूचक मंडळाच्या यादीत मनोहरची संपूर्ण माहिती आणि त्याचा फोटो पाहिल्याबरोबर माझ्या तोंडातून एकच वाक्य निघाले की, बंदे मे दम है। हाच मुलगा माझ्या माधोला सुखात ठेवीन. तू आनंदी आहेस हे वाचून मी केलेली निवड किती योग्य आहे ह्याचा अभिमान वाटतो. म्हणतात ना नारळ आणि जावाई कसा निघेल काही सांगता येत नाही. माधे, तुला आठवते का, तुला आणि तुझ्या आईला सुरुवातीला मनोहर मुळीच पसंत नव्हता. काय तर म्हणे, काळासावळाच आहे, रोडच आहे, खांदेच पडलेले आहेत. पण मला माहिती होते ते तुम्हाला ठासून सांगत होतो की, मुलाच्या रंगरुपावर, शरीरयष्टीवर, देहबोलीवर जाऊ नये. पोराचे शिक्षण, त्याचा पगार महत्त्वाचा आहे. दिसायला राजकुमार असलेला मुलगा शून्य कमाई करत असेल तर.... जाऊ देत. तू खुश आहेस म्हणजे माझा जावाईशोध चुकला नाही ही समाधानाची बाब आहे.'

माधवीच्या आईने लिहिले होते, 'माधे, बघ बर. आता कशी गुणगान करतेस नवऱ्याचे आणि तेव्हा गाल फुगवून बसली होती. तुझे बाबा सांगणार आणि तू ऐकणार. तुझ्या मनात नसताना एकदा नव्हे  तर तुझे पूर्ण समाधान होईपर्यंत दहावेळा मी तुला तुझ्या बाबांना न सांगता मनोहरला भेटायला सांगितले. त्या दहा भेटीतून तुझ्या पसंतीला एकदाचा मनोहर उतरला आणि माझे घोडे गंगेत न्हाले. अग, तू तितक्यावेळी भेटून ज्या काय शंका-कुशंका-लघुशंका असतील त्या दूर केल्या पण माझ्या वेळी तसे नव्हते ग. मला चॉईसच नव्हता ग. आईबाबांनी तुझ्या बाबांचा गळा दाखवला आणि मी निमूटपणे त्या गळ्यात वरमाला घातली. जाऊ दे. असते एकेकीचे नशीब! पण मी होते म्हणून तुझे तसे काही झाले नाही ग बाई! आज तू एवढ्या आनंदाने, खुशीने, समाधानाने हे जे लिहिले आहेस ना त्याचे क्रेडिट गोज टू मी....युवर आई! तुमच्या दोघांचेही अभिनंदन.'

शालिनी ही माधवीची लहान बहीण. माधवीच्या लग्नानंतर सहा महिन्यांनी शालिनीचे लग्न झाले होते. शालिनीने माधवीच्या पोस्टवर लिहिले होते, 'तायडू, व्हाट लकी यू आर! शेवटी आमच्या जिज्जूने तुला जिंकले म्हणायचे कारण तुझ्याकडून कुणाचे कौतुक होणे ही तशी नवलाईची गोष्ट. पण खरे सांगू का, तायडे, जिज्जू आहेच तसा मायाळू, लाघवी, प्रेमळ, समोर आला की, पाहातच राहावे असा. रुबाबदार, रांगडा, मधाळ, सुंदर असाच. ताडू, तू रागावणार नसलीस तर एक सांगू का, तू पहिल्यांदा जिज्याला होकार द्यायच्या मनस्थितीत नव्हतीस ना तेव्हा मी देवाला काय प्रार्थना करत होते माहिती आहे का, देवा, तायडीने मन्याला नकार देऊ देत मी त्याला माझ्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी लग्न करेल. मनोहरचा प्रश्नच नव्हता ग, जो तुला पसंत करत होता तो, माझ्या सारख्या सौंदर्यवतीला नकार देऊच शकत नव्हता ग पण कुठे माशी शिंकली देव जाणे पण तू जिजू सोबत लग्नाला तयार झाली आणि माझा एकतर्फी प्रेमभंग झाला. ताडे, अजून एक सांगू का, खरे तर तो माझा भला मोठा स्वार्थ होता. कोणतीही बहीण असा विचार करुच शकत नाही पण म्हणतात ना, प्रेम आंधळे असते. प्रेमात सारे काही क्षम्य असते त्याप्रमाणे मी अशीही प्रार्थना करत होते की, देवा, काहीही कर पण हे ठरलेले लग्न मोडू दे. पण कदाचित माझा दुष्ट हेतू त्या ईश्वरालाही समजला असेल म्हणून तो माझी अनिष्ट इच्छा पूर्ण करत नसावा. शेवटी तुझे लग्न माझ्या एकतर्फी प्रियकराशी झाले पण मी हिंमत हरले नाही. 'कोशीश करनेवालों कि हार नही होती.' याप्रमाणे मी पुन्हा पुन्हा परमेश्वराला साकडे घालत होते की, देवा, एकदा पाव. काही तरी चमत्कार घडव. ताईचा घटस्फोट होऊ देत. पण कसचे काय तू हँडसम अशा जिजूसोबत रमलीस आणि सहा महिन्यात नवरा या नात्याने हे ध्यान माझ्या गळ्यात पडले....' शालीनीची ती पोस्ट वाचताना माधवीच्या मनात आले, 'बाप रे! पाठची बहीण पण अशी शत्रू! त्यातल्या त्यात एक बरे, या समूहात ना आपला नवरा आहे ना शालिनीचा नवरा! बरे झाले, शालिनीचे लग्न लवकर झाले नाही तर तिने माझ्या नवऱ्याला पळवायलाही कमी केले नसते.' तितक्यात माधवीच्या मावस बहिणीचा सरोजचा संदेश आला.                                                                                                                     

 तिने लिहिले होते, 'शाले, हे तुझे नाही तर माझ्या मनातले विचार तू लिहिले आहेस. माझ्याही मनात सेम असेच विचार घोळत होते. फरक एवढाच की, तू ईश्वराकडे प्रार्थना करून मनोहर मागत होतीस तर मी चक्क मनोहरला भेटून माधवीबद्दल त्याच्या मनात गैरसमज निर्माण करावा आणि त्याला लग्नापूर्वीच शालिनीसोबत घटस्फोट घ्यायला प्रवृत्त करावे. त्याच्या गळ्यात आपले सुकोमल हात घालून त्याला माझ्यासमोर गोंडा घालायला लावून आपले इप्सित साधावे असा क्रांतिकारक विचार माझ्या मनात घोळत होता. पण माझ्या चंचल दृष्टीने मनोहरपेक्षा सुंदर, आक्रमक असा मनोज हेरला आणि मी पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडले. पण खरे सांगू का, म्हणतात ना, पहिले प्रेम कधीच विसरल्या जात नाही त्याप्रमाणे आजही ह्रदयाच्या खोलवरच्या कप्प्यात मन्नाची तसबीर कायम आहे. असो.'

'माय गॉड! या माझ्या बहिणी आहेत की जन्माच्या दुश्मन! पण मला माझ्या मन्नुचा खूप खूप अभिमान आहे. ह्या दोघी त्याच्यावर इतक्या मरत असताना मन्नुने त्यांना गवत नाही टाकले... घाँस नही डाला। ...." माधवी मनात विचार करत होती पण तिचे लक्ष 'माझे माहेर' या समूहावर होते. लाईक आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत होता. ते संदेश तिला वाचावेसे वाटत नव्हते न जाणो पुन्हा एखादी बहीण असाच काही मजकूर टाकायची. माधवीच्या लहान भावाची योगेशची प्रतिक्रिया तिला दिसली. योगेशने लिहिले होते,

'ताऊ, तू खुशीत आहेस याचे क्रेडिट मला आहे बरे का. अर्थात हे तू मान्य करणार नाहीसच. ताईडे, तुला आठवते का ग, तू सुरुवातीला जिजूंना भेटायला जायचीस तेव्हा मला सोबत घेऊन जायचीस पण एक-दोन भेटीत बहुतेक तुमचा निर्णय झाला होता आणि तुम्हा दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुटू लागले. तुम्हाला माझी उपस्थिती स्पीड ब्रेकरप्रमाणे अडथळ्याची वाटू लागली आणि मग तू मला सोबत नेणे बंद केले पण तुमच्या मनात ते बीजांकुरण होण्यासाठी मी प्राथमिक मदत केली त्याचा मला सार्थ अभिमान आहे.'

'काय सांगावे बाप्पा जो तो आपलीच पाठ थोपटून घेतोय. 'मला कोण नवाजी तर घरचाच बुवाजी' असे झाले आहे सारे....' तितक्यात माधवीचे लक्ष एका संदेशाने वेधून घेतले. तो संदेश तिच्या चुलत भावजयीचा होता, 'माधवीबाई, जरा थांबा. मला वाटते तुम्ही नवऱ्याची स्तुती करताना जरा जास्तच घाई करताय. नवऱ्याचे नि सासरच्या माणसांचे वागणे म्हणजे 'कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे' असते. दहा वर्षे जरी ती शेपटी नळ्यात घालून ठेवली तरीही बाहेर येताच ती वाकडीच होते तसेच सासरच्या माणसांचे असते. माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली पण मी अजूनही तुमच्या भावाला पूर्ण ओळखू शकले नाही. तुमच्या लग्नाला तर जेमतेम सहा महिने झाले आणि तुम्ही अशी रिस्क घेताय? जळजळीत वास्तव सांगू का, 'नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले ना की, मग सुरू होतात कधीच न संपणारे चार दिवस सासूचे!' म्हणून म्हणते असा उतावळेपणा करु नका. असे भरभरून आपण बायका प्रेम करतो आणि आपले नवरे आपल्याशीच कृतघ्न होतात. नंतर मात्र आपण बायका 'आलीया भोगासी असावे सादर' अशी परंपरा, वारसा पुढे नेतो. जाऊ देत नशीब आपल्या बायकांचे.' 

'खरेच चुकले का माझे? मी मनोहरच्या बाबतीत जास्तीच अगतिक झाले आहे का? असे तर नसेल ना की, शालिनी आणि सरोज या माझ्यापासून काही लपवत तर नसतील ना? माझा मनोहर तसा भोळा आहे. 'तू मला पूर्णपणे पसंत नाहीस पण आपण तीन-चार वेळा भेटून मी काय तो निर्णय घेईन.'असे त्याला पहिल्याच भेटीत स्पष्टपणे सांगूनही तो मला भेटत गेला आणि त्या ठरवून घेतलेल्या भेटीत आमचे प्रेम जमले. तसे तर काही या दोघींपैकी कुणा एकीच्या बाबतीत मनोहरचे झाले नसेल ना? माझ्या प्रेमाच्या पंखाखाली राहून तो मला नकळत इतरत्र तर उडान भरत नसेल ना? तसे नसणारच. पण माझा मनोहर किती लोकप्रिय आहे हे मला आज समजले.या साऱ्या प्रतिक्रिया पाहून तो जाम खुश होईल. पण मी नाही दाखवणार काही. शाली आणि सरीच्या 'मन की बात' त्याला समजली आणि त्या चुलबुल मेहुण्यांच्या बाबतीत त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असेल तर उगाच त्याच्या भावनांना हवा मिळेल आणि मग नको ते होऊन बसायचे. ह्या दोघींच्या प्रतिक्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या व्हाट्सअपवर टाकू का? नको. नको. नवऱ्यांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या भावना समजल्या तर ते घटस्फोट घेतील आणि मग या दोघींना रान मोकळे व्हायचे आणि त्या नव्या जोमाने पुन्हा मनोहरला गटवायचा प्रयत्न करतील. शांत बसून काय काय होते पहावे असे म्हणत माधवीने भ्रमणध्वनी बंद केला. तिला कधी नव्हे ते काही सुचले. ती पुटपुटली,

'बहिणी माझ्या काळ्या काळ्या

होऊनी बघा कशा बावळ्या

पळवू पाहतात माझा सावळ्या!'

अरे, मी तर कविता करु लागलेय की, माझ्या बावळ्याच्या सहवासात......'

         त्यानंतर पाच-सहा महिन्यांनी माधवीचा वाढदिवस आला. मनोहरने सुट्टी घेऊन मोठ्या उत्साहाने खूप काही केले. खाणे-पिणे, फराळ-जेवण, आइस्क्रीम, भेटवस्तू, सिनेमा, लाँगड्राइव सारे काही केले. तो दिवस अत्यंत मजेत गेला. त्यामुळे एक झाले, माधवीचा तो दिवस जवळजवळ 'नो मोबाईल डे' असा साजरा झाला. दुसऱ्या दिवशी मनोहर कंपनीत गेला. तिने भ्रमणध्वनीला कवटाळले. तिच्या भ्रमणध्वनीवर लाइक्स आणि शुभेच्छांची अक्षरशः त्सुनामी आली होती. ते संदेश वाचता वाचता तिला एक भन्नाट कल्पना सुचली आणि तिने एक पोस्ट 'माझे माहेर या समूहात टाकली,

'संपले! माझ्या जीवनातील आनंदाचे, मौजमजेचे दिवस संपले! लग्नानंतरचा तो जोश, तो जोम, ते चैतन्य, ती स्फूर्ती, ते प्रेम सारे सारे एक वर्षातच संपले. काल माझा वाढदिवस होता पण मनोहरने सेलिब्रेशन तर सोडा पण साधे विश पण केले नाही. एकदाही नाही. परवा रात्री तो एक तर उशिरा आला नि पहिल्यांदा त्याचा अवतार मला काहीसा वेगळाच वाटला. आल्या आल्या मला एक शब्दही न बोलता तो पलंगावर आडवा झाला नि चक्क घोरायला लागला. माझ्यासाठी तो फार मोठा धक्का होता. पण समजावले मी स्वतःला. वाटले मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहे. झाली असेल पार्टी! उठेल बारा वाजता उठून मला विश करेन. पण कसचे काय, तो तर भल्या पहाटे उठून निघूनही गेला. जाम निराश झाले. काल वाढदिवस असूनही नाष्टा-जेवण तर सोडा पण तोंडात पाण्याचा थेंब नाही गेला. असो नशीब माझे...' असे लिहून दुःखी, रडणारी, बोंब मारणारी अशी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रे तिने टाकली आणि गॅसवरील खिचडी शिजण्याची वाट पाहावी त्याप्रमाणे ती वाट बघत बसली. काही क्षणातच फोडणीला टाकलेल्या मोहऱ्यांनी तडतड असा आवाज करून तडफडत मरण स्वीकारावे असा प्रतिक्रिया, लाइक्सचा मारा तिच्या भ्रमणध्वनीवर सुरू झाला. पहिली प्रतिक्रिया अर्थातच तिच्या आईची होती,

'वाटलेच होते मला. 'खालमुंडी नि पाताळधुंडी याप्रमाणे तुझा नवरा आहे. काय अवदसा आठवली तुला नि तुझ्या बाबांना देवच जाणे. माझी मुळीच इच्छा नव्हती पण माझे कोण चालू देते? बसले गुमानं स्वयंपाक घर या विश्वात! अजूनही वेळ गेली नाही. दे घटस्फोट नि फिरु दे त्याला मोकाट! एक तरी बरे झाले, अजून पोट्ट-पोट्टी काही जन्माला नाही घातले. ते लचांड मागे लागले असते तर काही खरे नव्हते. आम्ही येतो तिकडे मग बघू.'

पाठोपाठ आलेली तिच्या वडिलांनी अत्यंत संतापाने लिहिले होते, 'माधे, हे काय झाले? मला तुझा नवरा त्यावेळीही पसंत नव्हता, कालही नव्हता आणि आता तर मुळीच नाही. त्याला त्याच्या नोकरीची, पैश्याची फार घमेंड आहे ग. उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा ताठरपणा आहे. दुसऱ्या बद्दल त्याच्या डोळ्यात तुच्छता असते ग. पण तू आणि तुझ्या आईने माझे काही कधी ऐकलय का? सदा आपलेच ते खरे! माधवी, तुला जे काल समजले ना त्या त्याच्या सवयीबद्दल तुमचे लग्न झाले ना, त्याच्या दुसऱ्याच दिवशी समजले होते पण वाटले होईल तुझ्या सहवासात तो सुधारेल पण कसचे काय? बाळा, लग्नासारखे निर्णय असा आततायीपणा करून घ्यायचे नसतात ग. पण जाऊ दे. झाले ते झाले. एक-दोन दिवसात ये इकडे. शांतपणे विचार करून पुढील निर्णय घेऊ.'

'व्वा! हे माझे पालक! लगेच माझा संसार मोडायला निघाले. सख्खे आईवडील आणि असा रंग बदलतात? कम्माल आहे बाई...." तितक्यात तिचे लक्ष शालिनीने टाकलेल्या प्रतिक्रियेवर गेले. तशी माधवी मनाशी म्हणाली, 'ही शाली, शालू नेसून... 

'शालू हिरवा, नेसून बरवा

वाट पाहते मी ग

येणार साजन माझा!' असे म्हणत ती मनोहरची वाट पाहात नसेल ना? .'

शालिनीने लिहिले होते, 'बरे झाले, तायडे. तुझ्या लक्षात तुझ्या नवऱ्याचा हलकटपणा आला ते. मला तर त्याच्या तोंडाकडेही बघवत नसे. नात्याने भाऊजी असल्यामुळे वरवर, तोंडदेखलं बोलत होते, विनोदही करत होते. तूच कशी काय बाई, त्याची निवड केलीस ते तूच जाणो. मी तर त्याच्यासोबत लग्न तर सोड पण माझ्या सावलीलाही फडकू दिले नसते. पण अजूनही सावर. अख्खी जिंदगी पडलीय तुझ्यासमोर ती अशी एखाद्या घाण नाल्यात राहिल्याप्रमाणे किड्यासारखी वाया घालू नकोस. दे डिवोर्स नि सोड त्याचा सहवास. हो मोकळी! अजूनही तुझ्यासोबत लग्न करायला कुणीही तयार होईल.'

त्याखाली सरोजची प्रतिक्रिया होती, 'तायडूटले, सोड त्या मनोहरचा पिच्छा! असा कोणता राजकुमार लागून गेलाय. नाही तर मला एक अफलातून आयडिया सुचलीय. अर्थात तुझी संमती असेल तरच मी पुढे पाऊल टाकते. नवरा तुझा काय किंवा माझा काय अशा फेरबदलासाठी एका पायावर तयार होतात. तर मला असे वाटते की, आपण दोघींनी नवरे एक्सचेंज केले तर? कसाही तुझा संसार मोडकळीस आलाच आहे आणि मलाही भयंकर बोअर होते आहे. मग करूयात धम्माल! '

'माय गॉड! काय हे विचार! सारे जण संसार टिकवायचा, जोडायचा सोडून मोडायला निघाले की. नको ग बाई, आता जर जास्त ताणले तर माझ्या माहेरची माणसे डिवोर्स पेपर्स, वकील तर सोडा चक्क न्यायाधीशांसह अख्ख न्यायालय माझ्या घरी येऊन येतील आणि मला काही सेकंदात घटस्फोट मिळवून देतील...'

असे म्हणत माधवीने पुन्हा एक पोस्ट माझे माहेर या समूहात टाकली. त्यात मनोहरसोबत तिने साजऱ्या केलेल्या वाढदिवसाच्या प्रसंगांची अनेक छायाचित्रे होती. खाली तिने लिहिले होते, हा आहे माझ्या वाढदिवसाचा रिअलिटी शो! यापूर्वी टाकलेली पोस्ट आजच्या दिवसानिमित्त माझ्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट होते...एक एप्रिल है आज!'

काही क्षणातच एके- ४७ या रायफलमधून गोळ्यांचा वर्षाव व्हावा तसे धडाधड संदेश प्राप्त होत होते. माधवीच्या आईने लिहिले होते, 'आम्ही कुठे दोन एप्रिल समजत होतो. अग, माझे पोरी, मुर्ख आम्ही नाही तर तू बनलीस. तुझ्या वाढदिवसाच्या क्षणाची न क्षणाची माहिती माझ्या हरफनमौला, प्रामाणिक, उत्साही, जवाबदार, अष्टपैलू, एव्हरग्रीन जावयाने पाठवली आहे. अग, वेडे, माझ्या जावईबापूंनी 'माझे सासर' या नावाने एक व्हाट्सअप समूह बनवलाय. तू सोडली तर आम्ही सारे त्या समूहात आहोत. त्यामुळे परवा रात्री बारा वाजल्यापासून ते काल रात्रीपर्यंत पल पल की जानकारी हमारे जमाईबाबूने हमतक पहुंचाई है......अर्थात एडिट आणि काही क्षण डिलीट करुन. गुड बाय! हॅप्पी एप्रिल फूल ! ' तो संदेश वाचून माधवीला हसू आवरले नाही. ती जोरजोरात डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत सुटली.......भिंतीवरच्या सदा हसतमुख असलेल्या मनोहरच्या फोटोकडे बघत..... 

                                                                  


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy