Sanjay Phadtare

Children

4.0  

Sanjay Phadtare

Children

माझा कंदिल

माझा कंदिल

2 mins
216


ही माझी सन १९६९ सालची आठवण आहे. त्यावेळी मी चौथीत शिकत होतो.माझे वडील खरसुंडी ता.आटपाडी जि.सांगली येथील रयतच्या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते.श्री सिद्धनाथाच्या पावन भूमीत कोरडवाहू पण वीज नसलेल्या या छोट्याशा गावात दर रविवारी आठवडी बाजार भरायचा.वडील शाळेच्या कामानिमित्त कधीतरी सांगलीस जात.मी त्यावेळी आवर्जून सकाळी वडिलांमागे एसटी थांब्यापर्यंत जात असे.वडील मला गावी जातांना पाच,दहा पैसे द्यायचे.या पैशातून गोळ्या किंवा काहीवेळेस सुट्टीत प्रति तास दहा पैसे भाड्याची सायकल फिरवीत असे.मात्र आईच्या सांगण्यावरून मी ते पैसे साठवून ठेवू लागलो.

   आमच्या घरी 'एचएमव्ही' कंपनीचा सहा बॅंडचा रेडिओ होता.रेडिओच्या मागे बांबूच्या नळीत एव्हरेडी कंपनीचे मोठे सहा सेल बसवायची वडिलांनी सोय केलेली होती.सेल उतरले की महिन्यातून एकदा बदलले जात.रेडिओ व ब्याटरीचे सारे सेल आम्ही साठवून ठेवत असू.तसेच पेपरची रद्दीसुध्दा नीट साठवून ठेवत असे.खरसुंडीत श्री सिद्धनाथ देवस्थानाची चैत्र व पौष महिन्यात मोठी यात्रा भरत असे.या यात्रेत खिलार बैलांची विक्री पंचक्रोशीत प्रसिद्ध होती.यात्रेत पितळी व तांब्याच्या भांड्याना कल्हई लावणारे येत असत.ते कल्हई साठी जुने सेल कथिल म्हणून विकत घेत.सेल व रद्दी विक्री आणि साठवलेल्या पैश्यातून यात्रेत मी छोटा कंदील विकत घेतला.हीच माझ्या आयुष्यातली पहिली वहिली खरेदी होती.रोज सायंकाळी हौसेने त्या कंदीलाची काच साफ करीत असे.त्यामुळेच घरातील इतर दिवाबत्तीची कामे हौसेने करायची सवय मला लागली होती.

    शालेय अभ्यासक्रमात तसा मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो.गावच्या पेठेत कापड दुकानात बत्तीच्या उजेडात सैन्यदलातून निवृत्त झालेले पी. डी.कटरे हे गृहस्थ विद्यार्थ्यांना मोफत शिकवत असत. त्यांचे शिकवणीस जाताना मी विकत घेतलेला छोटा कंदील घेऊन जात असे. माझ्या या कंदीलाचे माझ्या मित्राना फार अप्रूप वाटायचे.कटरे गुरुजींनी माझ्या कंदीलाबाबत चौकशी करताच तो मी कसा खरेदी केला हे त्यांना सांगताच त्यांना माझे फार कौतुक वाटले.गुरुजींनी पैशाची बचत करून योग्य विनियोग कसा करायचा यासाठी माझा आदर्श घेण्याबाबत इतर विद्यार्थ्यांना सल्ला दिला.माझ्या या कौतुकाचा मलाही फार आनंद वाटला.

  आजकालच्या विजेच्या झगमगाटात कालबाह्य झालेल्या माझ्या कंदिलाची आठवण आवर्जून येते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Children