Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

लग्न माझ्या बायकोचे

लग्न माझ्या बायकोचे

18 mins
252


        'राजवाडा' हे नाव सार्थ ठरविणाऱ्या त्या प्रशस्त बंगल्यातील दिवाणखान्यात सोन्याचे आवरण असलेल्या घड्याळाने सकाळचेसात वाजत असल्याची जाणीव मंजूळ स्वरात करून दिली आणि पाठोपाठ घरातील चार सदस्य चहानाष्टा करण्यासाठी दिवाणखान्यात पोहोचले. पाटील, त्याच्या सौभाग्यवती, त्यांचा मुलगा अभय आणि त्यांची सून अमिता ही सारी मंडळी टेबलाभोवती बसली. अभय आणि अमिता या दोघांचा मुड रोजच्यासारखा प्रफुल्लीत, आनंदी वाटत नव्हता.

काही तरी वेगळं घडलंय असं दोघांच्याही चेहऱ्यावरून वाटत होतं. पाटलांनी प्रश्नार्थक नजरेने बायकोकडे पाहिलं. परंतु पत्नीच्या चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसताच पाटील जागेवरच शांत बसलेले असताना अभय म्हणाला, 

"आई, बाबा, मी एक निर्णय घेतलाय..." त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आता अमिता ठामपणे म्हणाली, "अभय, तू एकटयाने नाही. आई बाबा, आम्ही एक निर्णय..."

"तेच ते.. " अभय बोलत असताना पाटलांनी विचारले,

"अरे, पण काय निर्णय घेतलाय?"

"अहो, एक महिन्याने दोघांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे परदेशात फिरायला जायचा बेत असेल. "

"आई, जरा ऐकून घे ना. लग्नाच्या वाढदिवसाला कदाचित आम्ही एकत्र नसू." अभय म्हणाला.

"म्हणजे? तुझी काही महत्वाची बैठक आहे का? त्यामुळे तुला बाहेरच्या देशात जावे लागणार आहे का? मग चांगलेच आहे की, अमितालाही घेऊन जा. बैठक आणि वाढदिवस दोन्ही होईल."

"पाटलीन बाई, थोडे सबुरीने घ्याल का? विषय वाटतो तेवढा सोपा वाटत नाही. काय झाले पोरांनो?" पाटलांनी विचारले.

"काही नाही बाबा. आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा..."

"काऽय? घटस्फोट? पण का? जेमतेम अकरा महिन्यांचा संसार तुमचा आणि तुम्ही असा निर्णय घेऊच कसा शकता?"

"आई. पूर्ण विचार करून आम्ही ठरवलय की, यापुढे आम्ही एकत्र संसार नाही करू शकणार." अभय शांतपणे म्हणाला.

"तुम्ही एकमताने ठरवलय म्हटल्यावर प्रश्नच मिटला. परंतु तरीही कारण कळू शकेल का?"

"बाबा, अकरा महिने एकत्र राहून आमच्या हे लक्षात आलय की, आमच्या दोघांचे विचार परस्पर समान आहेत. एक सारखी विचारसरणी घेऊन आम्ही दोघे आजीवन एकत्र नाही नांदू शकणार. सांगतो. तुमच्याही लक्षात आलेच असेल की, आमची मतं किती एक सारखी आहेत. अकरा महिन्यात आमचे एकदाही मतांतर झाले नाही. मतभेद झाले नाहीत. मी एखादी गोष्ट सुचविली की, अमीने त्यास लगेच होकार द्यावा.."

"आणि मी काही करूया, नवीन काही आणू या म्हटले की, हा अभू लगेच मान डोलावतो. मतभिन्नता, मतभेद, भांडण तर सोडा परंतु एकमेकांच्या 'हो' ला साधा 'ना' असा साधा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आमच्या संसारामध्ये एक प्रकारचा अळणीपणा, तोच तोच पणा आला आहे. साधं टिव्ही पाहण्यावरून आमच्यामध्ये वाद होत नाही. तू-तू, मै-मै होत नाहीत."

"अरे, पण संसार, लग्न म्हणजे काय तुम्हाला बाहुला बाहुलीचा खेळ वाटला? एवढे मोठे आयुष्य कसे काढणार आहात? दृष्ट लागावी अशी तुमची आणि..." सौ पाटील वाक्य अर्धवट सोडले.

"तेच झालेय आमचे. दृष्ट लागलीय...आई, दुसरा एक निर्णय मी.. सॉरी! बाबा, आम्ही दोघेही पुन्हा... मी माझ्या मैत्रिणीशी आणि अनिता तिच्या जीवलग मित्राशी लग्न करणार आहोत."

"काय? दुसरा घरोबा? दोघेही? अरे, दोघांनाही लग्नापूर्वीच मित्र-मैत्रीण होती तर मग त्यांच्याशीच का नाही लग्न केले? त्याचवेळी स्पष्ट सांगितले असते तर आम्ही दोन्ही कुटुंबानी लग्न लावून दिले असते दोन्ही घराणे तुमच्या प्रेमविवाहाच्या आड आली नसती. " पाटील म्हणाले.

"तेंव्हा फक्त एकमेकांचा परिचय होता. प्रेम वगैरे नव्हते. आता घट्ट प्रेमाची नाळ जुळलीय. आम्ही एकमेकांना धोका वगैरे दिलेला नाही. तशी जाणीव होताच आम्ही नि:संकोचपणे कबुली दिली."

"आणि दोघांनीही कोणताही वाद न चालता, एकमेकांच्या मतांचा आदर करून, चिडचिड-संताप न करता विभक्त होऊन आपापल्या प्रेमी सोबत एकत्र नांदण्याचा निर्णय घेतलाय. आज अकरा वाजता आम्ही वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज देणार आहोत..."

"तुम्ही दोघांनी परस्पर सारे ठरवलय म्हटल्यावर काही बोलण्याची गरजच नाही. अमिता, तुझ्या आई-वडिलांना हे सारे माहिती आहे?"

"नाही बाबा. वकिलांकडे जाण्यापूर्वी आम्ही तिकडे जाऊन त्यांना सारे सांगणार आहोत." असे सांगून अमिता-अभय त्यांच्या खोलीत निघून गेले.

"अहो... अहो, हे काय? तुम्ही त्यांना काहीच कसे म्हणाला नाहीत? तुम्ही त्यांना थांबवायला हवे होते. जन्मोजन्मीचे नाते असे सहजासहजी..."

"तोडता येतात! अभय-अमिताने ते करून दाखवले. एक बरे झाले, अजून कोणत्या... संततीच्या मोहपाशात अडकण्यापूर्वी ते वेगळे होताहेत. शिवाय दोघांनी समंजसपणे निर्णय घेऊन लगेच आपापले मार्गही निवडले आहेत. एकमेकांना दोष न देता, आनंदाने विभक्त होताहेत तर त्यांना एकत्र ठेवण्याचा अट्टाहास आपण का करावा? आपल्या हट्टामुळे का त्यांची मनं जुळणार आहेत की, ते म्हणतात तसे त्यांच्यामध्ये मतभेद होणार आहेत? कशी भिन्न, मजेशीर परिस्थिती आहे. इतर जोडपी भांडणे होतात, एकमेकांची मतं पटत नाहीत म्हणून विभक्त होतात. इथं मात्र भांडणे होत नाहीत, मतं जुळतात म्हणून घटस्फोट घेतात " पाटील पत्नीला समजून सांगत असताना अभय-अमृता त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आले...

"आम्ही जाऊन येतो." अभय म्हणाला.

"खरेच दोघांचाही निर्णय झाला का रे?"

"हो आई. सगळं ठरलंय. आता बदल होणार नाही." अभय आणि दोघे घराबाहेर पडले.

       तिकडे अमिताचे आईबाबा सकाळचा नाश्ता करत असताना अमिताची आई म्हणाली,

"अहो, दिवस कसे भर्रकन जातात ना, पहा ना पाहता पाहता अमिताच्या लग्नाला वर्ष होतंय..."

"खरे आहे, सौभाग्यवती! दिवस भुर्रकन उडून जायला एक महत्त्वाचे कारण म्हणजे अमिताच्या सासरचे लोक! ती मंडळी आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली आहे. अकरा महिन्यात अमिताने कधी ना नवऱ्याची तक्रार केलीय ना सासू-सासऱ्याची! आनंदाचे दिवस असे पटकन निरोप घेतात. वर्ष होत आहे लग्नाला. वाढदिवस साजरा करावा लागणार. सासूबाई, कंबर कसा. लेक-जावयाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस..."

"अहो, ते कुठे इथे वाढदिवस साजरा करतील? जातील विमानात बसून उडत उडत... दूरदेशी! आपल्याला काहीही करण्याची गरज नाही..." अमिताची आई बोलत असताना तिथे अमिता आणि पाठोपाठ अभयचे लग्न झाले. त्यांना तसे अचानक आलेले पाहून अमिताच्या आईने काळजीने विचारले,

"काय झाले, अमू? असे अचानक कसे आलात? सारे ठीक आहे ना? अभय, नाष्टा करणार का?"

"नाही आई. आमचा नाष्टा झालाय."

"मग काय लग्नाच्या वाढदिवसाचा काही कार्यक्रम ठरवलाय का? बाहेर जाऊन या कुठेतरी..."

"बाबा, आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय.... आम्ही घटस्फोट घेत आहोत..."

"का..य? घटस्फोट? अमे, शुद्धीवर आहेस का? असा विनोद करावा कसा वाटला तुला?"

"आई, मी विनोद करीत नाही. आम्ही एकमेकांपासून विभक्त होऊन दुसरे लग्न करायचा निर्णय घेतला आहे."

"व्हा...ट? अभय, ही काय म्हणतेय?"

"ती बरोबर बोलतेय. आम्ही दोघांनी मिळून तसे ठरवले आहे..."

"पण का? सोन्यासारखा संसार तुमचा. महत्त्वाचे म्हणजे इतरांना आदर्श ठरावा अशी तुमची जोडी असताना हे..."

"ए..ए..एक मिनिट! तू ते दुसऱ्या लग्नाचे काय म्हणत होतीस?"

"अभय त्याच्या मैत्रिणीसोबत आणि मी माझ्या मित्राशी लग्न करणार आहोत."

"आम्ही लग्नाच्या बंधनातून मुक्त होत असलो तरी एका नव्या नात्याने आम्ही एकत्र येत आहोत... मैत्रीच्या! हे मैत्रीचे बंध आम्ही कायम जपणार आहोत."

"हे..हे.. काही एक पटण्यासारखे नाही. माझ्यासाठी सारे डोक्याबाहेरचे आहे. पण हा असा निर्णय घेण्याची गरज काय?"

"आहे, बाबा. आहे. बरे, आम्ही वकिलाकडे जात आहोत. जाण्यापूर्वी तुमच्या कानावर आमचा निर्णय घालावा म्हणून इकडे आलो आहोत. येतो आम्ही. चल, अभय..." अमिता अशा आवाजात म्हणाली की, जणू ते घटस्फोट घ्यायला नव्हे तर एखादा सिनेमा पाहायला जात आहेत. त्या दोघांना प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकवून दोघेही तिथून निघाले. जाताना दोघांनीही एकमेकांचे हात हातात घेतलेले पाहून अमिताचे बाबा म्हणाले,

"अग, हे दोघे घटस्फोट घ्यायला निघाले आहेत की, हनिमूनचे पॅकेज ठरवायला चालले आहेत?"

"अहो, मला तर वाटते की, हे दोघे मिळून आपली विकेट घेत आहेत. दोघांमध्ये आजपर्यंत कधीही भांडण झाले नाही, वादविवाद झाला नाही आणि तरीही सरळसरळ घटस्फोट? कुणाशीही याबाबतीत चर्चा केली नाही, साध्या शब्दाने सांगितले नाही. वकिलाकडे जातानाही दोघांच्याही चेहऱ्यावर दुःखाचा, संतापाचा लवलेशही नाही. म्हणून मला वाटते..."

"तू म्हणतेस तसे असेल ना तर देवच पावला. यांच्या आत्ताच्या वागण्यावरून, त्यांची ही तऱ्हा पाहून कुणालाच ही गोष्ट खरी वाटणार नाही की, हे दोघे घटस्फोट घेत आहेत.."

    तिकडे काही वेळात अभय-अमिता त्यांच्या वकिलाकडे पोहोचले. त्या दोघांना पाहताच त्यांच्या शेजारी बसलेल्या महिला वकिलाशी परिचय करून देताना वकील म्हणाले,

"अभय आणि अमिता, या अस्मिता नाईक, समुपदेशन तज्ञ आहेत. मा. न्यायालयापुढे आपली केस सादर करण्यापूर्वी या तुमच्याशी चर्चा करतील. तुम्हाला या निर्णयपासून..."

"एक मिनिट वकिलसाहेब, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आमचा निर्णय झालाय. आम्हाला आता कुणी त्यापासून परावृत्त करू शकणार नाही." अभय म्हणाला.

"अभयचे बरोबर आहे. आम्ही हसतखेळत हा निर्णय घेतला आहे. पूर्ण विचारांती घेतला आहे. होय! आम्ही दोघेही पुन्हा दुसरे लग्न करणार आहोत." अमिता म्हणाली.

"मि. अभय, तुमची होणारी दुसरी पत्नी मिसेस अमिता यांच्यापेक्षाही सुंदर आहे?" अस्मिताने विचारले.

"मॅडम, मला वाटते प्रेम हे शारीरिक सौंदर्यावर नसते आणि नसावे! एक नजर पुरेशी असते. महत्त्वाचे हे की, सारे न्यायालयीन सोपस्कार लवकर व्हावेत. जास्त चर्चा न होता, मा. न्यायालयाचा

जास्त वेळ खर्च होऊ नये म्हणून आम्ही एकत्रपणे, एकाच वकिलामार्फत जात आहोत. तिथे वेगळी चर्चा, आरोप-प्रत्यारोप होऊ नयेत."

"मि. अभय, रागावू नका. खरेच तुम्ही दोघेही दुसरे लग्न करणार आहात तर मग हा अकरा महिन्यांचा संसार का थाटला? त्याचवेळी दोघांनी आपापल्या 'प्रिय' व्यक्तीशी लग्न का नाही केले?"

"वकिलसाहेब, असे आम्ही म्हटलय का की, आमच्या लग्नापूर्वी आमचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होते? अविवाहित असताना आमचे इतरत्र प्रेम होते? लग्नानंतर कुणी इतरांच्या प्रेमात पडतच नाही का? पडता येत नाही का?"

"मजेशीर आहे सारे. वकिलसाहेब, माझ्या समुपदेशनाचा या दोघांवर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. ठीक आहे. मि. अभय आणि मिसेस अमिता, एवढेच सांगेन, पुन्हा शांतपणे विचार करा. शक्य झाल्यास लग्न मोडू नका. कसे आहे. तुम्ही दोघे आत्ता येताना हातात हात घालून, हास्यविनोद करत आलात. त्यावरून तुमचे या क्षणीही अत्यंत मधुर संबंध आहेत हे नक्की. होणारा जोडीदार असा हसरा, खेळकर असेलच असे नाही ना! ओ के ऑल दी बेस्ट। " असे सांगून अँड.अस्मिता तिथून निघाल्या.

"ठीक आहे. या तुम्ही. मी पंजिका दाखल करतो..." वकील म्हणाले

   काही वेळात अभय-अमिता घरी पोहचले. तिथे अमिताचे आई-बाबा आले होते. चौघांचेही चेहरे विशेषतः दोघांच्याही आईचे चेहरे अत्यंत गंभीर होते.

"या, या, काय म्हणाले वकील?" पाटील यांनी विचारले.

"मियाँ-विवी राजी तो क्या करेगा काजी? त्यांच्या परीने त्यांनी आम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची डाळ शिजली नाही."

"मला एक सांगा, एकमेकांना समजून घेण्यासाठी, परस्परांचे स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यावेळी लग्नाचा मुहूर्त तीन महिन्यांनंतरचा निवडला होता ना?"

"हो ना. दिवस-दिवस भटकत होतात. रात्र-रात्र फोनवर बोलत होता आणि आता लग्नाला अकरा महिने होताहेत तरीही तुम्ही एकमेकांना ओळखू शकला नाहीत?" पाटलांनी विचारले.

"पाटीलसाहेब, लग्नाला तेहतीस वर्षे होताहेत परंतु अजून आम्ही सौभाग्यवतीला ओळखू शकलो नाहीत तर हे उण्यापुऱ्या चौदा महिन्यात काय ओळखणार?" मालतीचे बाबा म्हणाले.

"अहो, बस करा तुमचे विनोद. ही काय पीजे मारण्याची वेळ आहे?"

"तेहतीस वर्षात कधी आमचे टायमिंग जुळलेच नाही बाबा."

"व्याही बुवा, सर्व विवाहित पुरुषांचे टायमिंग असेच चुकते बघा. चालायचेच. वारंवार चुकतो तोच नवरा." पाटील म्हणाले.

"अहो, तुम्हीही सुरू झालात काय? वेळ काय? बोलताय काय?"

"मग काय करणार? ज्यांना स्वत:च्या निर्णयाचे वैषम्य वाटत नाही. जे घटस्फोटाचा अर्ज देऊन आल्यावर हनिमूनवरून परतल्यासारखे आनंदी आहेत तर मग आपण का दुःख मानायचे? त्यांना त्यांच्या निर्णयामध्ये आनंद वाटत असेल तर आपणही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायलाच हवे. जस्ट सेलीब्रेशन! होऊन जाऊ देत गोडाधोडाचे! 'आले आहेत विहीण-व्याही तर होऊन जावू देत भोजन शाही ।' कसे आहे, लग्न ठरले त्यावेळी पहिले भोजन व्याही भोजन दिले होते.

आता तोच संसार मोडतोय पुन्हा व्याही भोजन।' पाटील म्हणाले तसे दोन्ही व्याहासह अभय- अमिता खेचून हसले. हसता हसता अभय म्हणाला, 

"बाबा, तुम्ही गोडाधोडाचे जेवण करा की तांबडया रश्याचे करा. आम्ही दोघे आज बाहेरच जाणार आहोत. आणि हो आम्ही आजच दोघांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापायला टाकणार आहोत."

"घटस्फोट काय? लगोलगत्रलग्न काय?"

"आणि वर कडी म्हणजे दोघेही लग्नाच्या पत्रिका छापायला एकत्रच जात आहेत, आश्रर्य आहे."

"बाबा.दोघांच्याही लग्नपत्रिका सारख्याच असणार आहेत."

"आणि की नाही पप्पा, एकमेकांच्या निमंत्रण पत्रिकेवर विनीत म्हणून आम्ही आमचीच नावे टाकणार आहोत."

"म्हणजे?" असमंजसपणे पाटलांनी विचारले.

"त्याचे असे आहे बाबा, अमिताच्या लग्न पत्रिकेत विनीत म्हणून माझे नाव असेल म्हणजे 'माझ्या बायकोच्या लग्नाला यायचे हं।' असे मी विनवणार आहे." अभय म्हणाला.

"अमूच्या लग्न पत्रिकेत मी सर्वांनी या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करताना 'माझ्या नवऱ्याच्या लग्नाला उपस्थित राहायचे बरे।' असे छापलेले असेल."

"वा। छान | जगावेगळे नवरा-बायको आहात तुम्ही. अरे, पण तुमचे जन्मोजन्मीचे भावी साथीदार आहेत कुठे? आमचा जावई आणि आमचीच सून आम्हाला कधी भेटवणार आहात?"

"अरे, आज आपल्याकडे व्याहीभोजनाचा शाही योग आहेच तर त्या दोघांनाही बोलवा की."

"नाही, बाबा. ते आमचे जसे सिक्रेट आहे तसेचत ते सरप्राईजही आहे. डायरेक्ट आमच्या लग्नाच्या वाढदिवशी आणि नुतन लग्नाच्या दिवशीच त्यांची तुमच्यासह सर्वांसोबत भेट होईल." अभय म्हणाला.

"आणि हो, आमचे अजून एक सरप्राईज आहे म्हणजे माझ्या लग्नपत्रिकेवर फक्त माझे म्हणजेच वधूचेच नाव असेल. माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे म्हणजे वराचे नाव नसेल..."

"त्याचप्रमाणे माझ्या लग्नपत्रिकेवर माझ्या नवरीचे नाव नसेल. त्यामुळे त्या दोन्ही वधूवराची आणि तुमची भेट थेट मंगलकार्यालयातच होईल."

"अजून सरप्राईज..."

"आता आणखी काय? एकामागोमाग एक आश्चर्याचे धक्के देत आहात. प्रत्यक्ष देवानेही अशी नवरा - बायकोची जोडी पाहिली नसेल."

"आई, आमच्या दोघांचीही लग्नं एकाच मंगलकार्यालयात, एकाच दिवशी आणि एकाचवेळी होणार आहेत..."

"का..य? एकदाच?" पाटलांनी विचारले.

"एक-एक मिनीट... लग्नाच्या वाढदिवशीच लग्न करणार? अरे, पण त्यादिवशी अमावस्या आहे." पाटलीनबाई म्हणाल्या.

"काय फरक पडतो आई? मला सांग, आमच्या लग्नाचा मुहूर्त तू कमीत कमी दहा गुरूजींना आमच्या जन्मपत्रिका दाखवून काढला होता. काय झाले? मोडतेच आहे ना? ओ.के.।आम्ही तयार होऊन येतो." अभय म्हणाला आणि ते दोघे त्यांच्या खोलीकडे निघाले..

   त्याच सायंकाळी अभय-अमिता निमंत्रण पत्रिकेसाठी त्या दुकानात गेले. दुकानदाराने लग्नपत्रिकेचे विविध नमुने त्यांच्यासमोर टाकून विचारले,

"पत्रिकेवर छापायचा मजकुर किती आहे?"

"तसा कमीच आहे. म्हणजे कसे बघा, आम्ही पत्रिकेवर वधू वरांची नावे टाकण्याऐवजी केवळ वधुचेच नाव आणि दुसऱ्या पत्रिकेवर फक्त वराचेच नाव टाकणार आहोत."

"मी नाही समजलो. तुम्ही मजकुर दाखवला असला तर मग मला त्याप्रमाणे पत्रिका दाखवणं सोपं झालं असतं."

"असे म्हणता? ठीक आहे. द्या. कागद-पेन..."अमिताकडे पाहून अभय म्हणाला. दुकानदाराने पेन आणि कागद देताच काही क्षणात दोघांनी मिळून मजकुर तयार केला. त्या मजकुरावरून नजर टाकत असताना दुकानदार आश्चर्याने त्या दोघांकडे पाहात खुर्चीवर बसला आणि म्हणाला,

"हे-हे-काय? त-त-तुम्ही दोघे..."

 "आम्हा दोघे नवरा बायको आहोत..."

"काऽय? म.. म.. मग लग्न कुणाचे आहे?"

"आमचे दोघांचेही. म्हणजे आम्ही एकमेकांना घटस्फोट देऊ लग्न करणार आहोत." अभय म्हणाला

"अजबच आहे. साहेब, तीस वर्षे झाली, लग्नपत्रिका छापण्याचा व्यवसाय करतो. कालामानाप्रमाणे आमच्या व्यवसायतही बरेच चमत्कारिक बदल झाले. पण हे-हे-असे म-म्हणजे चक्क नवरा-बायको एकमेकांच्या दुसऱ्या लग्नाच्या पत्रिका छापायला एकत्र मिळून येतात... ठीक आहे. पत्रिका वाचतो...

स.न.वि.वि.

कळविण्यास अत्यानंद होतो की,माझी बायको सौ. अमिता हिचे लग्न दि.३० जानेवारी रोजी सकाळी ठीक १०- ३० वा. संपन्न होत आहे. आपण या सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती.

कार्यस्थळ - मेडिकल सदन.

स्वागतेच्छुक, अमित! 

नोट- माझ्या बायकोच्या लग्नाला यायचं हं... अमित!

"मला सांगा ह्यात नवरदेवाचे नाव कुठे आहे?"

"तेच तर सरप्राईज आहे ना. नवरदेवाचे नाव आणि त्याचे दर्शन थेट व्यासपीठावरच होणार आहे. काय आहे, लग्नाची तीच-तीच पद्धत, तेच-तेच सोपस्कार हे सारे आता कंटाळवाणे होऊ लागलेय हो. लग्न सोहळ्याचा एका वेगळ्या प्रकाराने आनंद लुटता येतो हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे..." अभय दुकानदारासोबत बोलत असताना अमिताने तयार केलेल्या मजकुराचा कागद दुकानदारापुढे ठेवला. हातात घेत दुकानदार म्हणाला, "आता आणखी हे काय...

स.न.वि.वि.

कळविण्यास अत्यानंद होतो की, माझ्या नवऱ्याचे म्हणजे माझ्या जन्मोजन्मीच्या साथीदाराचे अभय याचे लग्न तीस जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या लग्न सोहळ्यास तुम्ही उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे. तर मग येणार ना माझ्या लाडक्या नवऱ्याच्या लग्नाला?

माझ्या नवऱ्याची बायको.... अमिता!

"अहो, हे.. हे.. काय? नवरा-बायकोचा घटस्फोट... समजले. नंतर वेगवेगळी लग्नं हेही समजू शकतो. पण एकाच दिवशी... एकाच वेळी... एकाच मांडवात .. क...कसं शक्यं आहे?"

"का शक्य नाही? आम्ही काही भांडणे करून, एकमेकांना मारहाण करून घटस्फोट देऊन लग्न करत नाहीत तर एकमेकांच्या मर्जीने, पसंतीने आणि एकमेकांच्या लग्नाचा आनंद लुटण्यासाठी लग्न करत आहोत..."

"धन्य आहे, तुमची..." दुकानदार बोलत असताना अचानक अमिता म्हणाली,

"अभ्भू, अजून एक आयडिया! काय करूया, ह्या दोन्ही पत्रिकांवर जिथे- जिथे आपली नावे आहेत ना तिथे-तिथे आपण आपापले आधार क्रमांक टाकूया.."

"आयला! अम्मे, ग्रेट आयडिया! माझ्या लक्षातच आले नाही. आधार क्रमांक टाकल्यामुळे 'लग्न कुणाचे?' हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहील."

"पोरांनो, एक काम करा, आधार कार्ड क्रमांक छापलेली पहिली पत्रिका तडक आपल्या पंतप्रधानांना पाठवून द्या..."

"अरे, व्वा! काका, भन्नाट सूचना आहे हो. कदाचित या आमच्या आगळ्यावेगळ्या सोहळ्यासर्वसाठी पंतप्रधान स्वतः उपस्थित राहतील..." अभय आनंदानं म्हणाला. 

"अय्या! किती छान! ये अभू, आपण की, नाही, पंतप्रधानांना आपल्या लग्नात ना मंगलाष्टक म्हणायला लावू..." असे म्हणत अमिता आनंदाने टाळ्या वाजवत असताना अचानक त्यांना 'स्स.. स्स' असा आवाज ऐकू आला.दोघांनी चमकून दुकानदाराकडे पाहिलं. तो म्हणाला,

"नाही. मी स्वप्नात नसल्याची खात्री स्वतःलाच चिमटा घेऊन करून घेतली. मला सांगा, तुम्ही या पृथ्वीतलावरचीच माणसे आहात ना? एवढी कशी डोकी चाललीत हो तुमची? एकापेक्षा एक बुद्धिवान माणसं पाहिली परंतु अशी... बरे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळेल?"

"कोणत्या?" अभय-अमिताने एकदम विचारले.

"असे म्हणतात की, दोन हुशार माणसे एकत्र राहू शकत नाहीत. एकत्र काम करू शकत नाहीत. तुम्ही तर..."

"अतिहुशार आहोत आम्ही. बरोबर?"

"अगदी बरोबर! बरे, तुम्ही या भागात अजून काही खरेदी करणार आहात का? किती वेळ लागेल?"

"कपडे खरेदी करणार आहोत. दोन-तीन तास लागतील."

"ठीक आहे. जातांना पत्रिका घेऊनच जा. किती-किती छापू?"

"इतक्या लवकर होतील? प्रत्येकी एक हजार छापा. पैसे.."

"जाऊ देत. तीस वर्षात खूप कमाई केली. हजारो माणसे भेटली. परंतु तुमच्यासारखी 'जंटल' जोडी नाही भेटली. प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाहायचा नसतो. मात्र एक नक्की. तुम्ही बोलावलं नाही तरी तुमच्या लग्नाला येणार म्हणजे येणार! जेवणासाठी मुळीच नाही तर तुम्हा दोघांमध्ये असलेले चांगले खेळीमेळीचे, मैत्रीचे संबंध तोडून निवडलेले नवीन जोडीदार कसे आहेत हे पाहण्यासाठी नक्की येणार.. " बोलताना दुकानदाराचे डोळे भरून आले असल्याचे दोघांनाही जाणवले....

    रात्री उशिरा दोघेही घरी परतले तेंव्हा अभयचे आई- वडील त्यांची वाट पाहात होते. खरेदीचे गठ्ठे पाहून पाटलांनी विचारले, "अरे, बापरे! एवढी अशी काय खरेदी केली?"

"बाबा, आमची लग्न आहेत हे विसरलात? त्याचीच ही सारी खरेदी आहे. बरे, मला एक सांगा, आधी कपडे बघता की लग्नाची कार्ड?" अभयने विचारले.

"कार्ड छापली? आधी लग्नाची कार्डच दाखव. माझ्या होणाऱ्या सूनेचे नाव तर कळेल.." पाटील बोलत असताना सौ. पाटील मध्येच म्हणाल्या,

"आणि मला माझ्या जावयाचे नाव समजेल. असे पाहताय काय, अमिता, सून असली तरी ती आपल्याला लेकीसारखीच होती ना, आता तर या दोघांनीही ते नातेच संपविले म्हटल्यावर अमिता आपली मुलगीच ना..."

"अरे, खरंच या.." पाटील बोलत असताना अभयने एक-एक कार्ड दोघांच्याही हाती दिले. ते पाहताच पाटलांनी विचारले,

"काऽय? माझ्या बायकोचे लग्न?"

"इश्श! अहो,हे काय भलतेच? माझे कसले लग्न..."

"बायकोबाई,हातातली पत्रिका वाचून तर बघा."

"हे काय, माझ्या नवऱ्याचे लग्न..."

"अरे वा, तू पण लावतेस माझे लग्न?" पाटलांनी विचारले.

"आई, बाबा अहो, आमच्या लग्नाची कार्ड आहेत. आम्ही एकमेकांच्या निमंत्रण पत्रिकेवर शुभेच्छुक म्हणून एकमेकांची नावे टाकली आहेत...म्हणजे आधार क्रमांक टाकले आहेत."

"हा काय प्रकार म्हणावा? वधूचे नाव कुठे आहे? दूरध्वनी क्रमांक.."

"नाही ग आई. तेही आधार कार्डाचे क्रमांक आहेत. कसे आहे, नाव, नाती तर काय जुळतातही अन् तुटतातही. म्हटलं आधी आधार क्रमांक जोडून घ्यावेत."

"वा! छान! अफलातून आहे कल्पना! कुणाचे, कुणाशी लग्न आहे समाजायला नको, लग्नघटिका जवळ येईपर्यंत सस्पेंस जारी! अरे, लग्नपत्रिकेतील गुण जुळावेत त्याप्रमाणे तुमचे आधार कार्डाचे क्रमांकही जुळालेत की. बघा ना. दोन्ही कार्डावरील सुरवातीचे चार अंक वेगवेगळे आहेत. परंतु नंतरचे आठ अंक मात्र सेम टू सेम..." पाटील सांगत असताना अमिता म्हणाली,

"अय्या खरेच की. इतके महिने आपले कसे लक्ष गेले नाही रे."

"अजून एक अफलातून योगायोग तुमच्या दोघांच्याही आधार क्रमांकातील अंकामध्ये आहे. सर्व बारा अंकांची बेरीज त्रेसष्ट... त्रेसष्ट आहे..."

"काय म्हणता बाबा..." असे विचारत अभयने दोन्ही कार्डावरील अंकांची बेरीज केली।आणि आश्चर्याने म्हणाला,

"आई शपथ! काय योगायोग आहे ना ... त्रेसष्ट!"

"म्हणून तर आपला घटस्फोट होतोय की काय..."

"अग, ते जन्मपत्रिकेनुसार ठरविले जाते."

"अहो आई, आता आधारकार्ड हीच जन्मपत्रिका झाली आहे."

"खरे आहे, अमिता! आणि हे काय छापलेत रे... आपण आपले आधारकार्ड दाखवूनच आत प्रवेश करावा. हाच आमच्यासाठी अमूल्य आहेर! कल्पना लै भारी!"      

"अहो, हे काय? कौतुक सोहळा आटोपता घ्या. त्यांनी लग्न पत्रिका छापल्या. खरेदीही सुरू केलीय, त्यांना चांगले सुनवायचे सोडूनन, त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करायचे सोडून तुम्ही त्यांची स्तुती करता? मला आतापर्यंत हा सारा विनोदाचाच भाग वाटत होता. आपला अभ्या तसा गमती आहे. त्याच्या डोक्यातून कधी काय खूळ निघेल..."


"आई...आई. तुला हे खूळ वाटतेय, विनोद वाटतोय?"


"हो, विनोदच वाटत होता. परंतु तुमची ही सारी तयारी पाहून मला वास्तवाची जाण झाली. अरे, एकमेकांचे पटत नाही, सतत वाद, भांडणे होतात, एकमेकांवर निष्ठा, प्रेम नसल्यामुळे...पुढे स्पष्ट सांगायचे तर नवरा-बायकोपैकी कुणा एकाचे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून घटस्फोट होतात हे ऐकले होते. परंतु एकमेकांमध्ये वाद होत नाहीत, भांडणे होत नाहीत, नवरा-बायको परस्परांना विरोध करत नाहीत अशा जगाला आदर्श ठरू पाहणाऱ्या कारणांमुळे घटस्फोट? नाही, हे मला पटत नाही. हे मी होऊ देणार नाही..." सौ.पाटील अचानक भावनाविवश झालेल्या पाहून पाटील म्हणाले,

"अग, ऐक तर..."

"काय ऐेकछ? अशी सद्गुणी, प्रेमळ, कुटुंबवत्सल सूनेला घराबाहेर काढायची म्हणजे? मला ऐक म्हणता? तुम्ही हे कसे काय पटवून घेता ह्याचे जास्त आश्चर्य वाटते मला. येणारी पोरगी अमितासारखीच सुलक्षणी असेल याची काय शाश्वती? अमिताच्या नखाचीही सर कुणाला येणार नाही महत्वाचे म्हणजे अमिताच्या पतीने,सासरच्या लोकांनी तिचा छळ केला, खूप त्रास दिला म्हणजे?"

"आई. असे काहीही होणार नाही..." अभय बोलत असताना त्याला थांबवून सौ. पाटील कडाडल्या, "चूऽप..! तछ एक शब्द बोलू नकोस. तुला वाटत असेल असा निर्णय घेऊन तू फारमोठा तीर मारतोय, एक क्रांती करतोय. अशी जगावेगळी कामगिरी केल्यामुळे तुला फार मोठा पुरस्कार मिळेल कदाचित भारतरत्न, पद्य किंवा ते नोबेल पारितोषिक मिळेल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. अमिता, खरे-खरे सांग. आमचे काही चुकले का ग? माझा काही त्रास,सासुरवास आहे का ग तुला?"

"आई. हे काय बोलताय तुम्ही? अहो, माझे लग्न होण्याच्या आधी माझी आई मला नेहमी छोटया-छोटया कारणावरून रागवायची, ओरडायची पण लग्नाला अकरा महिने झाले आहेत. परंतु तुम्ही कुणी मला एका शब्दानेही दुखवले नाही."

"म्हणून घटस्फोट घेतेस? मला.. या आईला सोडून जातेस?" सौ. पाटील भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या. अमिता त्यांच्या दिशेने निघाली असताना पाटील पुढे म्हणाल्या, 

"ठीक आहे. तुम्ही दोघे एकमेकांपासून, आमच्यापासून दुरावू नये असे मनापासून वाटते रे. एक सुचवते. बघा. पटतेय का? दोघांमध्ये भांडणे होत नाहीत हेच एक साधे कारण आहे ना? तर मग, तुम्ही दोघेही स्वभाव बदलून बघा. गरज नसताना, मनाला पटलेले असतानाही समोरच्याचे मत खोडायला शिका. छोट्या-छोट्या कारणांवरून भांडायला-वाद घालायला सुरू करा. कसे आहे, ज्या जोडप्यांमध्ये वाद होतात, भांडणे होतात म्हणून घटस्फोट घेण्याच्या विचारात असताना त्यांना प्रत्येक जण एकच सल्ला देतो की, वादावादी करू नका. भांडू नका. तसाच मी तुम्हाला सल्ला देते, भांडा.संताप करा. एकमेकांवर रूसा..फुगा..."

"आई, काहीही झाले तरी आमचा निर्णय आता बदलणार नाही. खरेदीही झालीय. निमंत्रण पत्रिका छापून झाल्यात.."

"त्याने काय फरक पडतो? आत्ता तर छापून आणल्यात. अजून कुणाला दिल्या नाहीत. फाडून टाका. जाळून टाका. पण हा निर्णय बदला रे..." असे म्हणत सौ.पाटील सर्वस्व हरवल्यागत स्वत:च्या खोलीच्या दिशेने निघाल्या...

   नंतरचे दिवस झपाटल्याप्रमाणे गेले. अभय-अमिता एकमेकांच्या विचाराने जोरात तयारी करत होते. रोज सकाळी आई-बाबांसोबत चहा-फराळ करून दोघेही बाहेर जात असत. लग्न पत्रिकांचे वाटप, ठरलेली कामे करून दोघेही रात्री उशिरा घरी येत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या निमंत्रण पत्रिकेची भरपूर चर्चा होत होती. त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पाटील कुटुंबीय चहा-फराळाचा आस्वाद घेत असताना वर्तमानपत्र चाळणारे पाटील अचानक म्हणाले, 

"अरे, बघा तर. तुमच्या लग्न पत्रिकेची वर्तमानपत्रात बातमी आलीय. भरभरून कौतुक केले आहे..."

"कौतुकसोहळा करून झाला असेल तर काय लिहिले आहे ते वाचून दाखवता का?" सौ.पाटील यांनी विचारले. त्यांच्या आवाजावरून त्यांचा राग शांत झालेला दिसत नव्हता. पाटील यांनी ती बातमी सर्वांना मोठ्याने वाचून दाखवली. त्यांचे वाचून होताच अभय-अमिताने एकमेकांना टाळी दिली. परंतु पाटीलबाईंचा मुड पाहून सर्वांनी त्या विषयावर चर्चा करण्याचे टाळले. चहा-फराळ होताच अभय-अमिता बाहेर जायची तयारी करत असताना अभयच्या भ्रमणध्वनीवर अनोळखी क्रमांकाने बांग दिली. भ्रमणध्वनी करणारी ती व्यक्ती एका वाहिनीवरून बोलत होती आणि त्या व्यक्तीला अभय अमिताची मुलाखत घ्यायची होती. परंतु अभयने त्या गोष्टीला ठामपणे नकार दर्शवला...

  असे करता-करता शेवटी तो महत्त्वाचा दिवस उजाडला. दोन्ही घरातील सदस्य सकाळी लवकरच कार्यस्थळी पोहचले. नियोजित वेळ जसजशी जवळ येत होतो तसतसे एक-एक करीत निमंत्रितही पोहचत होते. कार्यस्थळाच्या भव्य प्रवेशद्वाराजवळ दोन मोठे फलक सर्वांचे लक्ष घालून घेत होते. कार्यस्थळ शहरातील मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे त्या रस्त्यावर भरपूर वर्दळ होती. लोक समोरून जाताना काही क्षण वाहने थांबवून त्या फलकांवरील मजकुर वाचूनच पुढे जात होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस असलेल्या फलकावर, 'माझ्या बायकोच्या लग्न-सोहळ्यात आपले हार्दीक स्वागत !' मजकुराजवळच अभयचे नमस्कार करीत असलेले छायाचित्र होते. तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूसही तसाच फलक होता. फरक एवढाच की, या फलकावर अभिवादन करणारा अमिताचा फोटो होता आणि लिहिले होते, 'माझ्या नवऱ्याच्या विवाह समयी आपले मंगलमय स्वागत!

  कार्यस्थळी आत प्रवेश करताना प्रत्येकाचे आधारकार्ड पाहून कार्यस्थळी आत प्रवेश मिळत होता. लग्न समयास बराच अवधी शिल्लक असला तरी कार्यस्थळाचे तिन्ही मजले खचाखच भरले होते. व्यासपीठाची सजावट अत्यंत मनमोहक, आकर्षक अशी केली होती. व्यासपीठाच्या शेवटी एक मोठा रंगीबेरंगी पडदा लावला होता. उजव्या बाजूला असलेल्या डायसजवळ अभयचे बाबा पोहचले. ते मानईकवर 'हॅलो' म्हणताच सर्वांचे लक्ष तिकडे गेले. सर्वत्र चालू असलेल्या चर्चा दुसऱ्याच क्षणी थांबल्या. पाटील म्हणाले.

"या आगळ्या वेगळ्या मंगलमय सोहळ्यात आपले सर्वांचे स्वागत ! मी यासाठी आपल्यासमोर उभा आहे की, आत्ताच आपल्या माननीय पंतप्रधानांचा संदेश प्राप्त झाला आहे. तो बघा...." असे म्हणत पाटलांनी व्यासपीठाच्या शेवटी असलेल्या रंगीबेरंगी पडद्याकडे इशारा करताच पडदा बाजूला झाला. दुसऱ्याच क्षणी मा.पंतप्रधानांचा हसतमुख चेहरा समोर आला. पंतप्रधान म्हणाले, 

'अभय-अमिता यांच्या लग्नाच्या वेगवेगळ्या पत्रिका मिळाल्या. त्या पत्रिका पाहून 'आधार' योजनेचा असाही उपयोग करण्यात आला हे बघून खूप आनंद झाला. अभय आणि अमिता यांच्या कल्पकतेला माझा सलाम ! या प्रसंगी मी माझे आधार कार्ड दाखवून त्यांना आधारमय शुभेच्छा देतो...' असे म्हणत पंतप्रधानांनी स्वत:चे आधार कार्ड दाखविले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला...

  लग्नाचा शुभ समय होत असताना व्यासपीठावर अभय-अमिताचे आगमन झाले. दोघांनीही हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले. लोकांनी टाळ्यांचा प्रचंड गजर करून त्यांचे स्वागत केले. दोघे डायसजवळ येऊन उभे राहिले. अभय म्हणाला, 

"धन्यवाद! जीवनातील या मंगलसमयी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही उभयता सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो. तुम्हा सर्वांना प्रतिक्षा असेल ती आमच्या नियोजित वधू वरांची..."

तितक्यात अमिता म्हणाली. "आमच्या या आगळ्यावेगळ्या लग्नाच्या पत्रिका पाहून त्यावर भावी वधू- वरांची नावे न दिसल्यामुळे सर्वांची उत्कंठा वाढलेली आहे. शिवाय आम्ही दोघे आमच्या मित्र-मैत्रिणीशी एकाच ठिकाणी,एकाच मुहूर्तावर लग्न करणार आहोत हे समजल्यावर सर्वांची उत्सुकता खूपच वाढली असेल..."

"आपली उत्सुकता जास्त वेळ न ताणता मी नम्रपणे सांगू इच्छितो की, गत्वर्षी आजच्या दिवशी, याचवेळी, याच स्थळी आपणा सर्वांच्या साक्षीने आमचा विवाह संपन्न झाला होता.."

"त्या दिवसानंतर, लग्नानंतर आमच्या दोघांमध्ये पती-पत्नी पेक्षाही घट्ट मैत्रीचे नाते गुंफले गेले. जसजसे दिवस जात होते, तसतसे हे मित्रत्वाचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले.."

"पती-पत्नीपेक्षा मित्र-मैत्रीण म्हणून अधिक जवळ येत गेलो. प्रियकर-प्रेयसी या नात्याने आम्ही एकमेकांवर नव्याने प्रेम करीत गेलो...."

"आणि म्हणून आम्ही ठरवले की, आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस... प्रियकर-प्रेयसी यांच्या विवाहाने साजरा करूया..."

"या ठिकाणी दोन सोहळे संपन्न होणार आहेत. पती-पत्नी म्हणून आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस...लग्नानंतर आम्ही प्रियकर-प्रेयसी म्हणून वावरलो. ते आगळेवेगळे क्षण अनुभवले. म्हणून आमच्यामधील त्या प्रियकर-प्रेयसीचा विवाह म्हणजेच अभय-अमिताचा विवाह आपल्या साक्षीने संपन्न होणार आहे..." अभय बोलत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची आई..सौ.पाटील पळत-पळत व्यासपीठावर आल्या आणि त्यांनी अमिताला घट्ट आलिंगन दिले. त्या दोघींच्याही डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या...  


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy