लेखक व्हायचंय मला
लेखक व्हायचंय मला
सकाळचे आठ वाजत होते. विनोद एक आळस देत जागा झाला. समोरच्या भिंतीवर लावलेल्या मराठी विनोदी लेखकांच्या फोटोकडे पाहत त्याने मोठ्या भक्तिभावाने हात जोडले. नंतर शेजारी पडलेला भ्रमणध्वनी उचलून त्यावर विविध माध्यमातून आलेले संदेश वाचायला सुरुवात केली. काही संदेश वाचताना तो मनाशीच हसू लागला. नुकतीच बारावीची परीक्षा संपल्यामुळे विनोद तसा प्रसन्न अवस्थेत होता. अभ्यासाचे दिवस असताना त्याला सकाळी उशिरापर्यंत झोप येत असे. कुणी ना कुणी त्याला सारखे उठवत असे. परीक्षा संपली आणि त्याची झोप उडाली. रात्री उशिरा झोपला तरीसुद्धा त्याला सकाळी लवकर जाग येऊ लागली आणि मग नंतर पुन्हा झोप लागायची नाही.
विनोदने अंथरूण सोडले. उठल्याबरोबर पुन्हा एकदावाळी त्याने भिंतीवरच्या तमाम मृत आणि जीवित असलेल्या विनोदकारांच्या फोटोंना भक्तियुक्त अंतःकरणाने नमन केले आणि मनात म्हणाला, ' हे विनोदी साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट तुम्हाला वंदन! माझी बारावीची परीक्षा संपलीय. निकाल लागायला दोन महिने लागतील. हे माझ्या आदर्शांनो, मला आशीर्वाद द्या. सुट्ट्यांच्या कालावधीत माझ्या हातून शे-पन्नास उत्तम, खदखद हसवणाऱ्या विनोदी कथांची निर्मिती होऊ द्या. मी जास्त वेळ वाया घालवणार नाही. कारण एकदा का कंटाळा अंगात शिरला की काहीही होत नाही. त्यामुळे मी आजच... आत्ता विनोदी कथा लिहायला सुरुवात करणार आहे. आलोच. झटपट सारे आटोपतो आणि लिहितो...' म्हणत विनोद मोठ्या उत्साहाने खोलीबाहेर पडला. दिवाणखान्यात त्याचे वडील वर्तमानपत्र वाचत होते. विनोदला पाहताच म्हणाले,
"अरे, वा! विनोदराव, तुम्ही कुणीही न उठवता उठलात. विनोदच म्हणायचा की..."
"तुमचे बाष्कळ विनोद पुरे करा हं. बारावीचे टेन्शन नुकतेच दूर झालेय शिवाय रात्रीचा उशिराचा अभ्यासही बंद झाल्यामुळे लवकर झोपून लवकर उठत असेल बिचारा..." आई म्हणाली.
"चांगलेच आहे की, लवकर निजे, लवकर उठे तया उत्तम आरोग्य मिळे." त्याचे बाबा बोलत असताना त्याने तिथे असलेले एक वर्तमानपत्र उचलले. त्यावर नजर टाकत असताना एका बातमीने त्याचे लक्ष वेधले. ती बातमी वाचून तो मनाशीच म्हणाला,
'वा! शुभशकून! विनोदी कथा लिहिण्याचा विचार पक्का होत असताना विनोदी लेखकांची कार्यशाळाही आयोजित झालीय. घराजवळच आहे कार्यशाळा, तीन दिवसांच्या कालावधीत खूप काही शिकता येईल.'
काही वेळात तयार झालेला विनोद आईला 'आत्ता आलो' असे सांगून आयोजकांकडे पोहचला. तिथे साठी गाठलेली व्यक्ती बसलेली होती. ते कार्यालय अगदीच छोटे होते. 'खोली लहान, पसारा महान!' अशी अवस्था होती.
"सर, थोडी माहिती हवी. विनोदी कार्यशाळेची..."
"अहो, विनोदी कार्यशाळा नाही तर विनोदी लेखकांची कार्यशाळा आहे."
"सॉरी! मला त्यामध्ये सहभागी व्हायचे आहे."
"तुम्ही काय लिहिता? विनोदी कविता, चुटकुले, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, चारोळी,
व्यक्तिचित्रण..."
"नाही. तसे मी काहीही लिहिलेले नाही परंतु विनोदी कथा लिहाव्या म्हणतोय."
"वा! चांगला विचार आहे. कसे आहे, आमचे हे शिबिर ज्यांच्या नावावर एखादे विनोदी पुस्तक आहे किंवा ज्यांचे लिखाण वर्तमानपत्र, साप्ताहिक, दिवाळी अंकांमधून प्रकाशित होत असते अशाच विनोदी लेखकांसाठी आहे."
"कसे आहे काका, सुरुवात केल्याशिवाय वर्तमानपत्रात येईलच कसे? आणि त्याशिवाय पुस्तक प्रकाशित होईलच कसे? लग्न झाल्यावरच मूल होईल ना?"
"वा! छान! विनोदी लेखक होण्याची पात्रता दिसते आहे."
"काका, माझी खूप इच्छा आहे हो. प्लीज, मला प्रवेश द्या ना. जी काही फीस असेल, वाटल्यास डबल फिस भरेन मी."
"प्रश्न तो नाही तर नियमाचा आहे. शिवाय संख्याही मर्यादित आहे. आधीच कोरम फुल्ल झालाय."
"जमणारच नाही का? बरे, काका मला एक सांगा, या शहरात कुणी मला मार्गदर्शन करेल का? किंवा विनोदी लिखाणासाठी कुणी माझी शिकवणी घेईल का?"
"वा! एका मागोमाग एक विनोद करतोस. तुझ्यामध्ये नक्की विनोदी लेखक होण्याची क्षमता आहे. अं हं... तरीही शिबिरात प्रवेश मिळणार नाही. तू म्हणतोय तसे ट्युशन, स्पेशल क्लास किंवा विनोदाचा कोर्स असा कोणताही फार्स माझ्या माहितीत नाही. हो... हास्यक्लब आहे परंतु तिथे केवळ हसणे विकत मिळते. बरे, मला एक सांग, तुझ्या जवळपासचे कुणी लेखक आहे का?"
"नाही ना, कुणीच नाही."
"अवघड आहे. कसे आहे, आपल्या जवळचे कुणी लेखक असले ना, की मग त्यांचा 'गॉडफादर' म्हणून उपयोग करून साहित्य वर्तुळामध्ये प्रवेश करणे सोपं जाते... एक सांग, तुझे घर कितव्या मजल्यावर आहे?"
"अहो, आमचा फार मोठ्ठा बंगला आहे. आजूबाजूसही बंगलेच आहेत."
"मग तुझे लेखक होणे अवघड आहे. कसे आहे, चाळीतली घरे कशी जवळजवळ असतात, फ्लॅटचेही तसेच असते. त्यामुळे होते काय तर, नको त्यावेळी शेजारच्या घरात डोकावता येते, दाराला कान लावून आतील बोलणे ऐकता येते. असे चोरून पाहिले, ऐकले की ते लिखाणात उतरवता येते. गर्दीच्या ठिकाणी राहिले म्हणजे ना आपल्या साहित्यास अनोखे धुमारे फुटतात." ती व्यक्ती विनोदशी चर्चा करत असताना तिथे आलेला माणूस म्हणाला,
"मी अन्नपूर्णा केटर्स करून आलो. थोडा वेळापूर्वीच.."
"हो... हो...बसा. तेव्हा यंग मॅन, सॉरी! मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. तुझ्या विनोदी लिखाणास खूप खूप शुभेच्छा!" विनोदला त्या व्यक्तिने निरोप देताच विनोद बाहेर आला. मोटारसायकलला किक् मारता मारता त्याला काही तरी सुचले. तो गाडीवर बसून राहिला. काही वेळानंतर अन्नपूर्णा केटर्सचा माणूस बाहेर आला. विनोदच्या मोटार-सायकलजवळ असलेल्या स्कुटीवर बसून तो निघाला, तशी विनोदने स्वतःची गाडीही त्याच्या मागे काढली. काही वेळानंतर त्या माणसाने स्कुटी एका दुकानापुढे उभी केली. 'अन्नपूर्णा केटर्स' अशी पाटी असलेल्या दुकानात शिरला. त्याला पाहताच तो माणूस म्हणाला,
"मला वाटते, आपण आत्ताच भेटलो होतो."
"हो. त्या कार्यशाळेच्या ऑफिसमध्ये आपली भेट झाली होती."
"बोला. काय कार्यक्रम आहे? कुणास साडी नेसवायची? कुणाचे बारसे? वाढदिवस ? साखरपुडा? लग्न? बारशाचा कार्यक्रम ?"
"नाही. कार्यक्रम काहीच नाही. कसे आहे, मी बारावीची परीक्षा दिलीय. म्हटल, सध्या काही काम नाही."
"म्हणजे नोकरी पाहिजे? यापूर्वी कोणत्या केटरर्सकडे काम केलेस का? पण तू तर चांगल्या घरचा दिसतोस..."
"नोकरी... काका, आत्ता तुम्ही ज्यांचे काम घेतलेत ना तिथले शिबिर मला करावयाचे आहे. परंतु..." म्हणत विनोद सारी माहिती थोडक्यात सांगितली.
"अच्छा! बरे, मी काय करू शकतो?" त्या माणसाने विचारले.
"तीन दिवसांसाठी तुम्ही मला नोकरी देऊ शकाल का?.. बिनपगारी!"
"पण त्यामुळे काय होईल ?"
"तिथे पाणी देणे, चहा देणे, नाष्टा देणे, जेवण देणे ही कामे करताना जे काही कानावर पडेल ते मला माझ्या लेखनासाठी उपयोगी येईल?"
"वा! भारी मेंदू आहे तुझा. ठीक आहे. तुझी धडपड, तळमळ पाहून मी तुला तीन दिवस काम देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमची कामे वाटतात तेवढी सोपी नसतात. जर काही नुकसान..."
"मी सारी नुकसानभरपाई देईन. वाटल्यास थोडी रक्कम जमा...”
"त्याची गरज नाही. ये." दुकानदाराने हो भरताच विनोद मोठ्या उत्साहाने बाहेर पडला. घरी जात असताना एका फुलांच्या हाराच्या दुकानाने त्याचे लक्ष वेधले. मनोमन आकडे जुळवत त्याने पंधरा हार विकत घेतले. बाजूच्या दुकानातून अर्धा किलो पेढे घेऊन तो घरीच पोहचला. सामानासह विनोद पाहून वडिलांनी विचारले,
"काय आणलेत चिरंजीव?"
"बाबा, हार-पेढे आणलेत!"
"आँ! आत्ताच परीक्षा संपलीय आणि हे सारे? बोर्डात पहिला येण्यासाठी काही सेटिंग तर केली नाहीस ना?"
"बाबा, प्लीज! मला विनोदी लिखाण करायचे आहे."
"ते खूळ अजून डोक्यात आहेच का? मला वाटले, ती भुतावळ आणून भिंतीवर लटकवलीत.. हजारो रुपये खर्च करून तेव्हा..."
"मी आजपासूनच लिखाणाचा श्रीगणेशा करणार आहे. सर्व विनोदी लेखकांचे आशीर्वाद असावेत म्हणून त्यांच्या फोटोला हार घालून पेढ्याचा नैवेद्य दाखवणार आहे. आलोच मी. जेवणाच्या आधी हार घालून संकल्प सोडतो..." असे म्हणत विनोद त्याच्या खोलीत जाताना गुलाल, उदबत्ती, काडीपेटी घेऊन गेला. हार घातले. पेढेसमोर ठेवून त्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवून हात जोडून भक्तिभावाने म्हणाला,
'हे महाराष्ट्राच्या विनोद वीरांनो, तुम्ही आजपर्यंत आमच्यापर्यंत सर्वांसाठी विनोद पोहचवला आहे. आपण सारेच माझे आदर्श आहात. मी आपणा सर्वांना मनोमन गुरू मानतो. माझ्यासाठी तुम्ही सर्वजण गुरू द्रोणाचार्य सम आहात. मी एकलव्य आहे का नाही, स्वतःला तुमचा शिष्य सिद्ध करेन का नाही ते माहिती नाही परंतु त्याच एकलव्य निष्ठेने मी आपले शिष्यत्व पत्करले असून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सुरुवात करतो आहे. कृपया मला, माझ्या लेखनास भरपूर आशीर्वाद द्या...' म्हणत विनोदने फोटो समोर चक्क साष्टांग दंडवत घातले. तितक्यात त्याच्या आईचा आवाज आला, "विनोद, काय करतोस? जेवायला येतोस ना?"
"आलो..." असे म्हणत विनोद स्वयंपाक घरात शिरला. तिथे त्याचे आई-बाबा त्याची वाट पाहात होते. विनोदने दोघांनाही पेढा देऊन त्यांचा पदस्पर्श केला. तशी आई आश्चर्याने त्याच्याकडे, कधी त्याच्या वडिलांकडे पाहत असताना वडील म्हणाले,
"आज आज आपल्याकडे एका विनोदी लेखकाचा जन्म झाला आहे."
"म्हणजे?..."विनोदच्या आईने आश्चर्याने विचारले.
"आई, मी आजपासून लेखनाला सुरुवात सत्कार करणार आहे."
"म्हणजे लेखनाचा भुंगा अजूनही वळवळतोच का?"
"अग, लिहू दे त्याला. काय होईल, त्यामुळे तरी हा दिवसभर घरी टिकून राहील. उंडरणार नाही गावभर..." त्याचे बाबा म्हणाले.
जेवता-जेवता विनोद चिंतन सुरू केले, 'काय लिहावे? विनोदीच लिहावे का? जमेल का आपल्याला लेखन? आजकाल दुःखी करणारे, रडवणारे प्रसंग, घटना का कमी घडतात? त्यात आपण आपल्या लेखनाची भर का टाकावी? विनोदी वाचून वाचकांच्या मनावरील ताण काही काळ तरी दूर होऊन त्यांच्या जीवनात क्षण दोन क्षणांचा आनंद तरी निर्माण करता येईल. आपल्या लिखाणाचा बाज 'आनंद रोख, दुःख उधार' असाच ठेवायचा. काय लिहावे ? कथा? कविता? चारोळी? कादंबरी? प्रत्येक लेखकाच्या साहित्याची सुरुवात म्हणे कवितेनेच होते.आपण हा पायंडा मोडावा? डायरेक्ट दीर्घ विनोदी कथा किंवा कादंबरी वाचक दरबारी पाठवावी. नको. तूर्तास लघु विनोदी कथा लिहावी. कथेला शीर्षक काय द्यावे? आधी कथेतील पात्रं ठरवावीत. पहिल्या कथेमध्ये फार तर तीन व्यक्तिरेखा साकाराव्यात. पात्रांची गर्दी असली म्हणजे नुसता गोंधळ उडतो. हा प्रयोग यशस्वी झाला म्हणजे मग शंभर पात्रांची एक अस्सल विनोदी कादंबरी लिहूया. बरे, कशावर लिहावी कथा? विषय.. काय म्हणतात ते कथाबीज ते कसं निवडावं? ते कसे सापडेल? कुठं सापडेल ? इतर अनेक क्षेत्रात जसे तयार साहित्य मिळते तसे कथाबीज बाजारात मिळणार नाही. आपली स्थिती ना, आधी शीर्षक की आधी कथाविषय म्हणजे ते म्हणतात ना. 'आधी कोंबडी की आधी अंडे अशी झालीय...'
"अरे विनोद, काय चाललेय ? जेवणातही लक्ष नाही तुझे."
"अग, तो नक्कीच लेखनाचा विचार करत असणार. असे काही झोकून दिल्याशिवाय, जगाला विसरल्याशिवाय लेखन सुचत नाही ग..." त्याचे बाबा मंदमंद हसत म्हणाले. त्यानंतर काहीही न बोलता विनोदने जेवण आटोपले आणि तो खोलीत निघून गेला. खोलीत गेल्याबरोबर त्याने पुन्हा एकदा सर्व फोटोना नमस्कार करून बारावीचे कोरे असलेले रजिस्टर आणि पेन घेऊन लेखनासाठी बसला. काय लिहावे? कुठून सुरुवात करावी? कशा-कशाचे, कुणा-कुणाचे वर्णन करावे?' या विचारात तो खुर्चीवर मान टेकवून बसून राहिला आणि दुसऱ्याच क्षणी झोपेने त्याच्या साऱ्या आशेवर पाणी फेरले. एखाद्या मिलनोत्सुक प्रेयसीने आपल्या प्रियकराला कवेत घ्यावे तसे झोपेने विनोदला कवेत घेतले...
सायंकाळचे पाच वाजत होते. विनोद खूप वेळापासून बाहेर आला नाही म्हणून त्याची आई त्याच्या खोलीत गेली. विनोद अवघडलेल्या अवस्थेत खुर्चीवर झोपल्याचे पाहून आई मनाशीच म्हणाली, 'बारावीचा अभ्यास करून करून पोरगं थकलय...विनोद...ऐ...विनोद...'
"क...क...काय?" जागा होत विनोदने विचारले.
"बाळा, बघ किती अवघडत झोपलास रे? पलंगावर तरी झोपावे?"
"अग, लिखाण सुरू करावे म्हटले तर चक्क डोळाच लागला."
"हे बघ, सध्या लेखना-बिखनाचा विचार करू नकोस. नववीपासून चार वर्षे अभ्यासात गेली. वाटत नाही पण मन, शरीर दोन्ही थकते. असे कर, चांगली चार-आठ दिवस विश्रांती घे आणि मग विचार कर. चल. चहा टाकते. बाबा, वाट पहाताहेत." चहा पिऊन होताच विनोद मित्रांना भेटायला गेला.
सारे मित्र प्रसन्नावस्थेत दंगा-मस्ती करत होते. विनोद त्यांच्यामध्ये मिसळला परंतु त्याचे मन कायम लेखानाचाच विचार करत होते. एका मित्राने विचारले,
"का रे विनी, कसला विचार करतोस? तू शरीराने इथे आहेस पण मनाने मात्र..."
"का रे विन्या, कुणी पटवली की काय?"
"नक्की तसेच असणार आणि ती जी कुणी असेल ती सुट्या लागताच माहेरी गेली.. आय मिन तिच्या गावी गेली असणार म्हणून विनीची झोप उडाली असणार."
"अरेरे! बिच्चारा विनोद!"
"अबे चूप! विनोद नेहमी टवटवीत असतो, सर्वांना खळाळून हसवतो. विनोद कधीही बिच्चारा नसतो."
"ये चूप! मी लिहिण्याची सुरुवात करतोय. अरे पाहताय काय, मला लेखक व्हायचं आहे.. विनोदी लेखक.. . "
"विन्या, फार अवघड काम बरे. मी परवाच कुठे तरी वाचलय, की एखादेवेळी कुणास रडवणे फार सोप्पे काम आहे पण हसवणे भारी अवघड..."
"एक सांग, विनोदी म्हणजे नक्की काय लिहिणार? कविता, कथा, कादंबरी की नाटक?"
"तोच तर विचार सुरू आहे." विनोद म्हणाला आणि ती चर्चा तिथेच थांबली. काही वेळाने सातच्या सुमारास विनोद घरी परतला. त्याचे बाबा बाहेर गेले होते. आई स्वयंपाक करत होती. विनोदने टी.व्ही. लावला. बातम्यांची वाहिनी सुरू होती. एका पुस्तक प्रकाशनाचे वृत्त चालू होते. विनोद स्वतःचे आदर्श मानत असलेले लेखक बोलत होते. ते म्हणाले,
"नवोदित लेखकांनी प्रत्यक्ष लेखनास सुरूवात करण्यापूर्वी खूप वाचले पाहिजे. खूप वाचन केल्यामुळे मनाची वैचारिक बैठक पक्की होते आणि मग सकस,सशक्त लेखनास मदत होते..." विनोदच्या मस्तिष्कात ते वाक्य शिरले. तो पटकन उठला. खिशातील पाकीट बघितले. दोन-तीन हजार रुपये होते. त्याचे वडील सरकारी कार्यालयात मोठ्या पदावर असल्यामुळे पैशाला काही कमी नव्हती. विनोद एकटाच असल्यामुळे तो मागेल तेवढा पैसा मिळत होता. अर्थात, विनोदही वायफळ खर्च करत नव्हता. काही क्षणात तो एका दुकानात पोहचला. त्याच्या आवडत्या विनोदी लेखकांची बरीच पुस्तके खरेदी करून तो घरी परतला...
नंतरच्या दोन-तीन दिवसात त्याने ती सारी पुस्तकं वाचून काढली. चौथ्या दिवशी विनोदी लेखकांचे शिबीर होते. तो सकाळीच अन्नपूर्णा केटर्स मध्ये गेला. त्याला पाहताच मालक म्हणाला, "आलास का? अरे, मोठ्या घरचा पोरगा तू आणि हे वेटरचे काम करणार?"
"काका, त्या मोठ्या लेखकांचा सहवास मिळणार असेल ना तर मी त्या शिबिराच्या ठिकाणी झाडझुडीचे कामच काय पण लेखकांचे बुट-चपलाही पॉलिश करीन..."
"धन्य आहे रे, पोरा तू...घे...घाल." म्हणत त्यांनी त्यांच्या कंपनीचे कपडे विनोदसमोर ठेवले. काही क्षणात ते कपडे अंगावर चढवून त्याने आरशात पाहिले. क्षणभर त्याने स्वतःलाच ओळखले नाही. इतर मुलांसोबत विनोदने सामानाची जमवाजमव सुरू केली आणि टेम्पोत बसून तो शिबिर स्थळी पोहचला...
शिबिरासाठी एक-एक लेखक येत होते. त्या हॉलमध्ये जायची विनोदची तगमग, तळमळ वाढली. काही वेळाने त्याच्या मालकाने त्यास पाणी घेऊन जाण्यास सांगताच विनोदला प्रचंड आनंद झाला. एका ताटामध्ये पाण्याने भरलेले ग्लास घेऊन तो तिथे गेला. व्यासपीठावर भाषण करणाऱ्या व्यक्तिला पाहताच विनोद आनंदविभोर झाला. कारण ते लेखक त्याचे आदर्श होते. भिंतीवर लावलेल्या त्यांच्या फोटोला तो दररोज नमस्कार करत असे. ते म्हणाले,
"मित्रांनो, विनोदी लिखाण करायचे असले, विनोदी लेखक म्हणून नावारुपास यायचे असेल तर लग्न करणे आवश्यक आहे. जो बायकोवर आणि बायकांवर विनोद करतो तो प्रचंड लोकप्रिय होतो. त्याची पुस्तके धडाघड संपतात. तुम्ही बघा, आजवर जे कुणी विनोदी लेखक झाले आहेत त्यांनी हमखास महिलांवर लेखन केले आहे. शिवाय राजकीय व्यक्तिंवरही खरपूस लेखन केले आहे..." ते ऐकून जमलेल्या लेखकांमध्ये हास्याची खसखस पिकली आणि टाळ्यांचा नाद सुरू झाला. ते सारे ऐकून पाहून विनोद स्वतःला विसरला. एका वेगळ्याच उर्मीने, स्फूर्तीने विनोदने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करताच त्याच्या हातातले ताट खाली पडले...
त्या प्रकारामुळे मालकाने विनोदचा गणवेश उतरवून घेतला आणि त्याला त्याच क्षणी माघारी पाठवले. विनोदने खूप गयावया केली पण मालकाने त्याचे ऐकले नाही. विनोद अत्यंत उदास अवस्थेत घरी परतला. जेवण्यासाठी वाट पाहणाऱ्या आईला 'भूक नाही' असे सांगून तो खोलीत जाऊन पलंगावर पडला. परंतु मनःस्थिती बरोबर नसल्यामुळे त्याला झोप लागली नाही. शेवटी चारच्या सुमारास तो उठला. कसे तरी चार-दोन घास खाल्ले आणि टी.व्ही. लावून बसला. मनात मात्र विचारांचे वादळ घोंघावत होते,
'काय करावे ? खरेच का लग्न केल्याशिवाय म्हणजे बायको असल्याशिवाय विनोदी लेखन जमणारच नाही का? पण आत्ताच लग्न कसे करणार? कोण करू देणार? कोण पोरगी देणार?' विचारा-विचारात खूप वेळ गेला. त्याचे बाबा कार्यालयातून परतले. चहा घेताना त्यांनी सहज विचारले,
"काय मग विनोदवीर, झाली का लिहायला सुरुवात?"
"तोच तर विचार करतोय. बाबा, मी लग्न करू का?"
"लग्न? तुझे? अग, इकडे ये. बघ, आपले चिरंजीव खरेच विनोदी लेखक झालेत ग. काय मस्त विनोद..."
"बाबा, मी विनोद करीत नाही. खरेच विचारतोय, लग्न करू का?"
"ये विन्या, तुझी तब्येत तर बरी आहे ना?"
"आई, माझ्या प्रकृतीला काहीही झाले नाही. आज मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक विनोदी लेखक भाषणात म्हणाले की, विनोदी लेखक व्हायचे असेल तर लग्न करणे..."
"काय मस्त विनोद केलास रे. मी बाष्कळ विनोद म्हणणार नाही."
"बाबा, ते लेखक जेवढे सिरियस बोलत होते तेवढा मीही गंभीर आहे."
"लग्न म्हणजे बाहुला-बाहुलीचा खेळ वाटला का तुला? राहायला नाही छप्पर, म्हणे लग्न कर!" "बाळा, एक खरे सांग, कुण्या मुलीवर प्रेम.."
"नाही आई, तसे काहीच नाही."
"मग हे लग्नाचे खूळ तुझ्या डोक्यात शिरलेच कसे?"
"आई, मला लग्न करायचे म्हणजे करायचे."
"अरे, तुझे वय काय? शिक्षण व्हायचेय. नोकरीचा तर विचार नाही आणि लग्न करायचे म्हणतोस?"
"विन्या, तुला स्पष्टच विचारतोय, उद्या लग्न झाल्यावर बायकोची हौस-मौज, कपडेलत्ते, हिंडणे-फिरणे, खाणे पिणे... कसा भागवणार हा खर्च? तुझी स्वतःची कमाई काय? पोरीच्या बापाने मुलगा काय व्यवसाय, धंदा करतो असे विचारल्यावर आपण काय सांगणार? उचलतो मोबाईल लावतो कानाला, हेच सांगायचे का?"
"बाबा, एकदा का विनोदी लेखक झालो ना, की मग पैसाच पैसा. लेखकांची आणि त्यातल्या त्यात विनोदी लिहिणाऱ्यांची पुस्तके हातोहात खपतात, भरपूर मानधन, नफा मिळतो. महिना-दोन महिन्यात बंगला-कार सारे होते."
"अस्स? हे मला माहितीच नव्हतं. एवढं सारं सोप्पे असते ना तर मग लोकांनी कामधंदे केलेच नसते. घरोघरी लोक लेखकच झाले असते... विनोदी!"
"मग पाहायच्या का मुली? सांगता का आपल्या पाहुण्यांना? का वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवू?"
"विनोद, ह्या गमती, हे विनोद खूप झाले. तुला स्पष्ट?सांगतो, शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय, नोकरीला लागल्याशिवाय लग्नाचा विचार नाही. हा विषय पुन्हा नको..." बाबांनी त्यांच्याकडून तो विषय संपवला आणि ते खोलीत निघून गेले...
"आत्ता आलो..." असे आईला सांगून विनोदही बाहेर पडला.
"या. लेखकराव या. आज उशिराने आगमन का झाले? काय झालं, चेहरा सुकल्यासारखा का वाटतोय?" तो नेहमीच्या ठिकाणी पोहचताच एका मित्राने विचारले.
"विन्या, कुठवर आली लेखनाची तयारी? सुरुवात केली का?"
"नाही ना यार..." म्हणत विनोद त्यादिवशी घडलेल्या साऱ्या घटना मित्रांना सविस्तर सांगितल्या.
"लोच्या झाला की रे. बायकोशिवाय लेखक होता येत नाही म्हणजे अवघडच आहे."
"ये पण, काकांचेही बरोबरच ना. लग्न झाल्यावर मुलींचे चोचले काय कमी असतात ? प्रत्येकवेळी.. म्हणजे अगदी बायकोला दहा रुपयाचे चॉकलेट घेऊन द्यायचे म्हटलं तरी बापापुढे हात पसरावा..."
"तो नंतरचा प्रश्न रे. आजकाल मुलींच्या अपेक्षा का कमी आहेत? इंजिनियर, डॉक्टर मुलालाही सहजासहजी मुली पसंत करत नाहीत. फ्लॅट, बँकबॅलन्सची चौकशी करतात."
"मग काय आपल्या विनीला लग्न होईपर्यंत लेखक होता येणार नाही?"
"अरे, लग्न झाल्यावर तरी कुणास हसायला मिळते? ज्याला स्वतःला हसता येणार नाही तो इतरांना हसवणारे असे काय लिहिणार? अरे, असे पाहता काय? लग्नानंतर मुलगा नवरा म्हणजे हजबंड होतो, मान्य? आता हजबंड या शब्दाची मराठीतून फोड बघा...हस...बंद.. म्हणजे हसणे बंद..."
"वा! मला वाटते, आपल्या ग्रुपमध्ये विनोदी लेखकांची संख्या वाढत चाललीय."
"एक उपाय मला सुचलाय.. बिन्या, तुला सध्या बायकोची गरज काय तर... लेखनासाठी! अरे, मग एखादी पोरगी पटवून प्रेम कर तिच्यावर. हे बघा, प्रेयसी आणि बायको या एकाच नाण्याच्या दोन बाजू! आजची प्रेयसी, उद्याची पत्नी! एक तर मजाही मारता येईल आणि तुझ्या लेखनाचा श्रीगणेशा होऊन त्याला धुमारे फुटतात..."
"आयडिया तो कमाल की है यार!" एक-एक करत सर्व मित्रांनी त्यास दुजोरा दिला. काही वेळाने विनोदही घराकडे निघाला. रस्त्यात 'सुयोग्य वधू-वर सूचक मंडळ' अशी पाटी दिसताच क्षणभर विचार करून तो त्या कार्यालयात शिरला. तिथल्या सौंदर्यवतीने त्याचे करून म्हणाली,
"या... बसा... बोला..."
"म... म...मला नाव नोंदवायचे आहे."
"कुणाचे? भावाचे? बहिणीचे की अजून कोणाचे?"
"माझे स्वतःचेच..."
"काऽय? तुमचे? काय करता आपण?"
"नुकतीच बारावीची परीक्षा दिलीय."
"बारावीची? म्हणजे वय वीसच्या आतच असणार. कसे शक्य आहे? अजून शिक्षण व्हायचे आहे. नोकरी तर कोसो दूर आहे. अवघड दिसते..."
"माझ्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. माझे वडील एक सरकारी उच्चपदस्थ अधिकारी आहेत."
"ते बरोबर आहे. पण लग्न कुणाला करायचे आहे ? तुम्हाला की तुमच्या वडिलांना? आजकाल मुलीकडचे लोक मुलाची नोकरी, त्याचे बँकबॅलन्स, त्याचा स्वतःचा फ्लॅट यांची चौकशी करतात. मुलाच्या खानदानासंदर्भात फार कमी लोक विचार करतात."
"अहो, माझ्या वडिलांचे चार बंगले आहेत. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, मीच काय पण माझ्या मुलानेही बसून खाल्ले ना तरी बाबांचे बैंक बँलन्स संपणार नाही."
"बरोबर आहे. पण कसे आहे, सध्या माहितीच्या अधिकाराखाली नको-नको ती प्रकरणे बाहेर येऊन मोठमोठे अधिकारी त्यात अलगद सापडताहेत. तुरुंगात जाताहेत. तुमच्या वडिलांचे तसे झाले तर? तुमचे वडील जातील खडी फोडायला, त्यांची सारी मालमत्ता सील होईल आणि त्यांचे कुटुंब म्हणजे तुम्हीसुद्धा रस्त्यावर आला म्हणजे?"
"तसे काही होणार नाही. माझे वडील खूप हुशार आहेत.अहो, मला विनोदी लेखक व्हायचे आहे. त्यासाठी मला लग्न करावयाचे आहे." विनोद काहीसा काकुळतीस येऊन म्हणाला.
"म्हणजे तुम्ही बायको शोधत नसून तुमच्या लिखाणासाठी एक पात्र शोधत आहात. सॉरी! आम्ही तुमचे नाव नाही नोंदवू शकत. या तुम्ही..." म्हणत तिने समोरचे रजिस्टर ओडले. तिचा तो अंदाज पाहून निराश मनाने विनोद घरी परतला. जेवण वगैरे करून तो टीव्हीवरील सिनेमा पाहात
होता. त्या सिनेमामध्ये एक पात्र यंत्र मानवाचे होते. तो यंत्र मानव इतरांची सारी कामे विनासायास करत असल्याचे पाहून विनोद मनाशीच म्हणाला,
'अरे, आपणही एखादा यंत्रमानव आणला तर त्याच्याकडून आपण हव्या तितक्या विनोदी कथा, कादंबऱ्या लिहून घेऊ शकतो.' तितक्यात त्याच्या आईने आवाज दिला आणि त्याची तंद्री भंग पावली.
चहा घेताना विनोदला आठवले, त्याच्या मित्राने 'बायको नाही तर प्रेयसी बरी!' असा सल्ला दिला होता. आपली प्रेयसी कोण होऊ शकेल असा शोध त्याच्या मनात सुरू झाला. विनोदला जास्त मैत्रिणी नव्हत्या. चार-पाच मैत्रिणींचे चेहरे त्याच्यासमोर आले. त्यापैकी स्वाती नावाच्या तरुणीस त्याने दूरध्वनी लावला. तिकडून 'हॅलो' असा प्रतिसाद मिळताच विनोद म्हणाला, "हाय स्वीटी! काय चाललंय?"
"काय चालणार? धम्माल! नुसती मज्जाच मज्जा! खाना, पीना,सोना और मोबाइल पर उंगली चलाना। तुझे काय चाललेय?"
"बोअर होतय ग नुसते..."
"का रे, तुझी ती चांडाळचौकडी आयमिन मित्रमंडळी नाही का?"
"आहेत ग आहेत. सारे आहेत पण तरीही मन लागत नाही."
"हाऊ ज्योकिंग...."
"नाव विनोद असले तरीही पीजे नाही मारत. स्वीटी, खरेच सांगतो, मी तुला फार मिस करतोय ग. ये, भेटशील का उद्या परवा ?"
"विन्या, मस्करी नको. अरे, मी गावी आलेय. लगेच तिकडे येऊ? घरी काय सांगू?"
"मार ना यार, काही तरी बंडल. पण मला तुला भेटावेसे वाटते..." म्हणत विनोद सारे काही तिला
सांगून म्हणाला, "वाटल्यास आपण लग्न करू या, तुझ्या कपाळी, माझी टिकली..."
"विनोऽऽ द, हे भलतेच काय? अरे, आपले वय काय..."
"स्वीटी, पूर्वी तर नवरदेव-नवरी ८-९ वर्षांचे असताना त्यांचे विवाह होत असत आपण तर धोक्याची पातळी म्हणजे धोक्याचे सोळावं वरीस ओलांडलय. प्लीज! नाही म्हणू नकोस. प्लीज, स्वीटी, प्लीज.. आपण लग्न करूया. म्हणजे मग मला खूप खूप विनोदी कथा, कादंबऱ्या, नाटके सुचतील. ती पुस्तकरुपाने छापून येतील. मला भरमसाठ मानधन मिळेल..."
"विनोद, हा मूर्खपणा थांबव. तू माझा चांगला मित्र आहेस म्हणून मी इतका वेळ तुझी वायफळ बडबड ऐकून घेतेय, अदरवाइज आय विल कम्प्लेन पुलीस..." म्हणत स्वीटीने फोन बंद केला.
"स्वी... सेवा... स्वीटी... काय करावे आता? 'बाप लग्न करू आणि, प्रेयसी होकार देईना..." विनोद पुटपुटला.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादि कर्मे होताच विनोदने लेखकांच्या फोटोंना उदबत्तीने ओवाळले आणि हात जोडून म्हणाला, 'हे विनोदवीरांनो, मला एक बायको...तूर्तास एखादी प्रेयसी मिळवून द्या. म्हणजे तिच्या सान्निध्यात राहून मला एकापेक्षा एक विनोदी कथा सुचतील. मी तुमची मनोभावे प्रार्थना, सेवा करतोय. माझ्या पदरात प्रेयसीचे दान टाका. माझे पहिले पुस्तक मी तुम्हा सर्वांना अर्पण करेन... विभागून! पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी अभिषेक करेन. मला का एकदा बायको किंवा प्रेयसी मिळाली ना, तर हे आदर्शांनो मी पंधरा दिवस उपवास करीन..."
तितक्यात त्याच्या आईने आवाज देताच तो खोलीबाहेर आला. त्याचे आई-बाबा त्याचीच वाट पाहात होते. विनोदने लग्नाचा विषय काढल्यापासून त्याचे आणि बाबांचे बोलणे तसे बंदच होते. दोघेही कामापुरते बोलत असत.
"बाबा, ऑफिसला गेल्यावर माझ्या खात्यात दहा हजार रुपये टाका."
"का ऽ य? दहा हजार? एवढे पैसे?"
"अहो, असे दचकता काय ? तो म्हणतोय तर टाका ना. तो कुठे तुमच्या घामाची कमाई मागतोय. सरकारी काम नि दामच दाम! असे तुमचे ऑफिस. एखाद्या पार्टीकडून उकळा की जरा जास्त चुना लावून..." आई त्याच्या बाबांना बजावत असताना विनोदला मित्राचा फोन आला म्हणून तो खोलीत गेला.
"हल्लो, विन्या, अरे आठवण आहे ना, आज पक्याच्या बहिणीला पाहायला येणार आहेत. आपण सारे तिथे असणे आवश्यक आहे. ये..."म्हणत त्याच्या मित्राने फोन ठेवला. पाठोपाठ विनोदच्या डोक्यात विचार शिरला...
'प्रीती! पक्याची बहीण, या वर्षी बारावीला गेलीय आणि तरीही तिचे लग्न होतेय आणि मी तर बारावी झालोय. मग काय हरकत आहे माझे लग्न व्हायला? अरे, सॉलिड आयडिया! प्रीतीचे आणि माझे लग्न झाले तर. नक्कीच. दोघांच्याही घरी एकमेकांविषयी माहिती आहे पण हे घरी कळवावे कसे? कोण मदत करील ? अरे, असे आडून आडून काढायचे? सरळ प्रीतीलाच विचारू या. चला 'नेक काम मे देरी क्यूं?' शुभस्य शीघ्रम!' असे म्हणत विनोद प्रीतीला फोन लावला.
"हाय विनुदादा, तू येतोस ना इकडे..." प्रीती म्हणाली. तिच्या तोंडून 'दादा' शब्द ऐकताच विनोदची स्थिती 'सातवे आसमान से गिरा' अशी झाली.
"प्रीतुटली, हे काय विचारणे झाले? लगेच निघतोय. तुझ्यासाठी काही आणायचे का?"
"नाही रे. तू ये लवकर." म्हणत प्रीतीने फोन बंद केला...
प्रकाशकडे जात असताना रस्त्यावर बसलेल्या एका ज्योतिषाने त्याचे लक्ष वेधले. गाडी थांबवून तो त्याच्याकडे गेला. तो ज्योतिषी म्हणाला, "ये बाळा. बोल काय विचारायचे तुला?" "महाराज, मला विनोदी लेखक व्हायचे आहे. तो योग माझ्या नशिबात आहे का?" विनोद विचारत असताना त्या माणसाने त्याचा हात हातात घेतला. क्षणभर त्याचे निरीक्षण करून आनंदी स्वरात म्हणाला,
"बाळा, तुझा जन्मच मुळी लोकांना हसवण्यासाठी म्हणजे तू म्हणतो तसा विनोदी लेखक होण्यासाठी झाला आहे. पण एक अडचण आहे... "
"ती कोणती?" विनोदने चिंतायुक्त स्वरात विचारले.
"तुला लग्न होईपर्यंत वाट पाहावी लागेल. बायकोच्या पायगुणामुळे तुझ्या हातून अनेक कथांची निर्मिती होईल. शिवाय तुझ्या अनेक कथांवर सिनेमेही निघतील. पण लक्षात ठेव...आधी लग्न, मग लेखन!..."
प्रीतीचा कार्यक्रम संपला. पाहुणे 'निरोप देतो.'असे सांगून निघून गेले. प्रकाशचे सारे मित्र बराच वेळ तिथेच थांबले. हसी-मजाकच्या फेऱ्यांवर फेऱ्या झाल्या. विनोद काही क्षण सारे विसरला. घरी परतताना विनोदला पुन्हा तेच वधू सूचक मंडळ दिसले. तिथली सौंदर्यवती आठवली. तिला भेटून काही मार्ग निघतो का ते पाहावे या विचारास त्याने मोठ्या मुश्किलीने आत दाबले. तो घरी परतला. तो बराच बेचैन, अस्वस्थ होता. लिखाणाची तळमळ आणि तगमग त्याला शांत बसू देत नव्हती. दिवाणवर पडल्या पडल्या विनोदी कथांचे पुस्तक चाळत असताना राहून राहून त्याला एकच वाक्य आठवत होते, 'विनोदी लेखन करावयाचे असल्यास बायको पाहिजेच.' शिवाय त्या ज्योतिष्यानेही त्यास पुष्टी दिली होती. काय करावे? कुठून आणावी बायको? घरच्यांचा विरोध एक वेळ मोडून काढणे सोपे आहे परंतु, लग्नाचे काय ? कोण देईल आपणास मुलगी? बाबांचे म्हणणे त्याला कळत होते पण पटत नव्हते. त्यामुळे तो दोलायमान झाला होता. बायको नाही तर नाही पण प्रेयसीही त्याला मिळत नव्हती. प्रकाशकडून आल्यापासून त्याच्या मनःचक्षुसमोर राहून राहून ती वधूवर सूचक मंडळातील सौंदर्यवती येत होती. काय करावे? जावे का पुन्हा तिच्याकडे? करावी का तिची आराधना? वाटल्यास साताजन्माची पत्नी होऊ नकोस पण वर्ष-दोन वर्षासाठी प्रेयसी हो, मैत्रिण हो. अशी प्रार्थना तिला करावी का? उद्या मी स्थिर झालो, मोठ्ठा लेखक झालो, मानधनाचे धनादेश सातत्याने येऊ लागताच घरच्यांनी लग्नास परवानगी दिली तर प्रथम प्राधान्य तुला असे वचन तिला द्यावे का? त्यावेळी तिचा नकार असल्यास दुसऱ्या मुलीचा विचार करता येईल. भेटावे का तिला? नको. प्रत्यक्ष भेटीत नकाररूपी अपमान पदरात पाडून घेण्यापेक्षा अगोदर फोनवरच बोलूया. तिने रिस्पॉन्स दिला तर मग आहेत भेटी...रोजच! अशा विचारात विनोद वधू वर सूचक मंडळाचा फोन लावला. तिकडून त्या सौंदर्यवतीचा मंजुळ, मधाळ स्वर कानावर पडताच विनोद म्हणाला, "
"नमस्कार मॅडम, मी काल आलो होतो... "
"काल ? अच्छा! म्हणजे बारावी अॅटेन्ड बट वाँट टू मॅरी...बोला. आता काय काम काढले?"
"एकदा भेटायचे होते."
"या ना रविवार सोडून सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत..."
"कार्यालयात नाही. प्लीज, गैरसमज नको. पण आपण... कॉफी..."
"काऽय? शुद्धीवर आहेस का?"
"नाही. तसे नाही. आपण एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतो. शिवाय तुझी... तुमची इच्छा झाल्यास मी चांगला सेटल झाल्यावर आपण लग्नही करू..."
"व्हाऽ ट? एक मिनिट, तुझ्यासोबत मैत्री करण्याचा विचार करायला हरकत नाही. पण त्यापूर्वी मला एकदा तुझ्या वडिलांशी चर्चा करावी लागेल. नो-नो टेंशन घेऊ नकोस. तक्रार करणार नाही तर तुझी लेखक होण्यासाठी चाललेली धडपड, तळमळ पाहून मी त्याबाबत पर्यायाने तुझ्या लग्नाबाबत चर्चा करीन. कसे आहे, एखादेवेळी माझ्यासारख्या त्रयस्थाने सांगितल्यावर कदाचित तुझे बाबा कदाचित तसा विचार करू शकतील..."
"थँक्यू. थँक्यू! म..म. म्हणजे तुम्ही माझ्याशी..."
"बाळा, तुझ्या बाबांचा नंबर देतोस ना ?"
"हो.. हो..." म्हणत अत्यानंद झालेल्या अवस्थेत विनोदने बाबांचा क्रमांक सांगितला. फोन बंद करून विनोद विचार करू लागला, 'आता ही लग्न जुळवणारी बाबांना फोन करणार. तिचा होकार पाहून बाबा जास्त खळखळ न करता परवानगी देणार. चला. तूर्त एक प्रेयसी, मैत्रीण तर मिळतेय. तिच्या सान्निध्यात राहून नवनवीन कथा लिहिता येतील. वा! विनोदराव जमलं की हो. हे.. हे विनोद सम्राटांनो, हे... हे सारे तुमच्यामुळे जुळून येतेय. तुम्हाला शतशः नमन...'
नंतर दोन-तीन वेळा तो बाबासमोर येताच ते काही म्हणतील, तुझ्या मैत्रिणीचा फोन आला होता असे सांगतील. या आशेने त्यांच्याकडे पाहात होता. त्यांच्या भोवती घुटमळत होता परंतु तसे काही घडत नव्हते. त्यांचा भ्रमणध्वनी वाजताच त्याला वाटायचे, कदाचित तिचाच फोन आला असेल. फोनवर ती म्हणेल,
'विनोद कशाला बाबांना विचारायचे? त्यापूर्वी आपण भेटूया. मग त्यांच्याशी बोलू या.' पण तसे काही नसायचे. फोन तिसऱ्याच कुणाचा असल्यामुळे विनोद प्रचंड निराश होई...
त्यादिवशी सायंकाळी तो बागेत फिरायला गेला, मित्रांसोबत झालेल्या चर्चेत कुणीतरी म्हणाले होते की प्रेयसी मिळेपर्यंत, लग्न होईपर्यंत जरा बाहेर भटकत जा. बागेमध्ये जाऊन उगीच पोरींभोवती पिंगा घालत रहा. कदाचित तुझी लगट पाहून, तुझा आशियाना अंदाज पाहून एखादी पोरगी फसेल आणि तुझे काम फत्ते होईल. त्यामुळे तो काही दिवसांपासून बागेत जात होता. त्या दिवशीही तो बागेत पोहोचला. फिरणाऱ्या, हुंदडणाऱ्या मुलींभोवती घुटमळत असताना त्याचे लक्ष त्याच्यापासून थोड्या अंतरावर बसलेल्या एका युवतीकडे गेले आणि तो आश्चर्यात पडला. कुणाची तरी वाट पाहणारी ती मुलगी वधूवर मंडळातील तरुणी होती. मोठे घबाड हाती लागलेल्या अवस्थेत विनोद त्या रमणीच्या दिशेने निघाला. तिचे लक्ष विनोदकडे नव्हते. पावला-पावलाप्रमाणे अंतर कमी होत होते. काही क्षणात तो तिच्यासमोर जाऊन उभा राहणार तोच दोन मुली 'मम्मी... मम्मा..' असे ओरडत पळत आल्या. त्यांना पाहताच तिनेही आनंदाने हात पसरताच त्या दोन्ही मुली तिच्या कवेत विसावल्या. विनोद काय समजायचे ते समजला आणि भरल्या अंतःकरणाने, जड पावलांनी तो परत निघाला आणि पुन्हा कधीच त्या बागेकडे फिरकला नाही...
सकाळची वेळ होती. विनोद आणि त्याचे बाबा दोघेही वर्तमानपत्र वाचत असताना अचानक बाबा म्हणाले, "काय म्हणता लेखकराव? किती कथा लिहून झाल्या? अरे, खरेच विचारतोय. ही जाहिरात वाच. कथास्पर्धा आहे. म्हटल, एखादी कथा तयार असली तर दे पाठवून, चांगली एकाहत्तर, पन्नास नि पंचवीस हजारांची बक्षिसे आहेत. वाच...." म्हणत बाबांनी वर्तमानपत्र विनोदच्या हातात दिले. ती जाहिरात त्याने वाचली. अजून पंधरा दिवसांची मुदत होती. संपर्क क्रमांकासह पत्ताही होता. विनोद अतिशय आनंदित मनाने खोलीत आला. लेखकांच्या फोटोकडे पाहून म्हणाला,
'हे माझ्या दैवतांनो, आदर्शांनो, माझ्या परमपूज्य गुरूजनांनो, एक फार मोठी संधी आहे. अजून पंधरा दिवस आहेत. माझ्या हातून अशी एखादी भन्नाट विनोदी कथा लिहून घ्या. स्पर्धेत तिसरे बक्षीस मिळाले तरी माझे नाव सर्वत्र होईल. काहीही करा पण केवळ एक कथा माझ्या पदरात टाका. बोलता-बोलता विनोदचे लक्ष त्याच्याजवळ असलेल्या विनादी पुस्तकाकडे गेले. तो पुढे म्हणाला, 'हे माझ्या ऋषींनो, देवतांनो मी आत्तापासून तुमच्या या सर्व विनोदी पुस्तकांचे रोज पारायण करणार आहे. जोपर्यंत एखादा खळाळून हसवणारा विषय सापडत नाही तोवर मी हा पारायण सप्ताह चालूच ठेवणार आहे...'
लगेच विनोदने त्यातील एक कथासंग्रह उचलला. मोठ्या भक्तिभावाने त्यावर माथा टेकवून वाचन सुरू केले. झपाटून गेल्याप्रमाणे २-३ दिवस ती पुस्तके तो वाचत होता... अक्षरशः रात्री उशिरापर्यंत! तिसऱ्या दिवशी सकाळी सारी कामे आटोपून विनोद खोलीत आला. नेहमीप्रमाणे लेखकांच्या फोटोला गुलाल, फुलं वाहून उदबत्तीने ओवाळले. त्यातले एक पुस्तक उचलत असताना त्याच्या डोक्यात एक विचार आला तत्क्षणी त्याने हात जोडले आणि म्हणाला,
'मला सुचलेला विचार प्रत्यक्षात उतरवू का? त्यामुळे एक प्रचंड विनोदी कथा या साहित्य विश्वात जन्मणार आहे. तुमच्या पुस्तकांची पारायणं सुरू असताना हा विषय सुचला. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद समजून मी तो प्रत्यक्षात उतरवणार आहे...' असे म्हणत विनोदने पुन्हा साष्टांग दंडवत घातले. सारी पुस्तके एका रांगेत मांडली. त्या पुस्तकांची मनोभावे पूजा केली आणि मग मनात आलेल्या विचाराप्रमाणे काम करत गेला. त्यादिवशी रात्री बारा वाजेपर्यंत त्याचे काम सुरू होते. बारा वाजता काम हातावेगळे करून फोटोंकडे पाहत भक्तियुक्त अंतःकरणाने हात जोडले आणि तो अत्यंत समाधानाने झोपेच्या स्वाधीन झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला लवकरच जाग आली. उठल्याबरोबर त्याने रात्री पूर्ण केलेल्या लेखनावर नजर टाकली. वाचता-वाचता त्यात काही दुरूस्त्या केल्या. पुन्हा फोटोंकडे पाहून अत्यंत विनम्रपणे हात जोडून म्हणाला,
'धन्यवाद! आभार! देवतांनो, तुमच्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. तुम्ही एवढे सारे माझ्या पाठीशी असताना मी उगाच इकडे तिकडे भटकत होतो. 'धरण उशाला, कोरड का पडेल घशाला?' अशी माझी अवस्था. चला. पटकन प्रातःविधी उरकतो आणि हे सारे सुवाच्य अक्षरात लिहून काढतो. आलो. " म्हणत विनोद दिवाणखान्यात गेला. त्याला पाहताच बाबांनी विचारले,
"काय विनोदराव, रात्रीबराच वेळ जागा होतात..."
"बाबा, थँक्स! तुम्ही कथा स्पर्धेची जाहिरात दाखवलीत. भाग घ्यावा म्हणतो."
"काय म्हणतोस? अरे, पण कथा..."
"त्यासाठी तर रात्री जागा होतो ना, एक भन्नाट विनोदी कथा लिहिलीय. आता फेअर करतोय."
"अरे, वा! छान! पण कुणाची मदत.."
"काय करायची मदत? 'कशाला हवी बायको, कशाला हवी मैत्रीण, सोबत असतील लेखकनाथ तर
आपले हात जगन्नाथ!"
"वा! विनोद वा! याला म्हणतात स्पिरीट!" बाबा आनंदाने म्हणाले.
विनोदने ती कथा सुवाच्च, सुंदर अक्षरात लिहून काढली. ती कथा सर्व फोटोंच्या समोर ठेवून तिला हळद कुंकू-गुलाल-फुलं वाहून उदबत्तीने ओवाळले. कथा पाठवण्यासाठी अजून पाच-सहा दिवस हातात होते. विनोदने त्यांच्याकडे नेहमी पूजेस येणाऱ्या गुरूंना आईला फोन करायला लावला. गुरूंकडून चांगला दिवस, शुभ वेळ विचारून घेतली. गुरूंनी सांगितलेल्या दिवशी त्या कथेस लेखकांच्या फोटोसमोर ठेवले. मनोभावे नमस्कार केला. घरातील देवांना, आई-बाबांना नमस्कार करून विनोद कथास्पर्धा आयोजकांच्या कार्यालयात गेला. कथा त्यांच्या स्वाधीन करून, पोच घेऊन तो घरी परतला आणि आत्यंतिक समाधानात झोपी गेला...
साधारण पंधरा दिवसानंतर त्याला आयोजकांचा फोन आला. ते म्हणाले, "तुम्ही कथा स्पर्धेचे स्पर्धक आहात. उद्या आम्ही एक दिवसीय साहित्य संमेलन घेत असून याच कार्यक्रमामध्ये कथास्पर्धेचा निकाल आणि बक्षीसवितरण करणार आहोत. तेव्हा उद्याच्या संपूर्ण कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे."
दुसऱ्या दिवशी सकाळी विनोद लवकर उठला. स्नानादि कामे आटोपून तो तयार झाला. विनोदी लेखकांच्या फोटोंची मनोभावे, यथासांग पूजा करून पुष्पमाळा अर्पण करून पेढ्याचा नैवेद्य दाखविला. घरातल्या देवांची पूजा केली. देवांना, आई-बाबांना नमस्कार करून तो कार्यक्रमस्थळी पोहोचला. स्वागतकक्षात नावनोंदणी केली. स्पर्धकांची बसण्याची व्यवस्था वेगळी केली होता. तिथे तो बसला. भरपूर स्पर्धक होते. नियोजित वेळी कार्यक्रम सुरू झाला. एक- एक कार्यक्रम होत असताना जेवणाची वेळ झाली. जेवणाचा बेत उत्तम होता. भरपेट जेवून सारे पुन्हा मंडपात येऊन बसले. ज्याची प्रतिक्षा सर्वांना विशेषतः स्पर्धकांना होती तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. तोपर्यंत विजेते कोण आहेत हे कुणासही माहिती नसल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. तिसऱ्या क्रमांकाचे, दुसऱ्या क्रमांकाचे विजेते जाहीर झाले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. वेळ होती, प्रतिक्षा, उत्सुकता, अगतिकता होती... प्रथम क्रमांकाची! अधिक वेळ ताणून न धरता संचलन करणाऱ्या व्यक्तिचे बोल सर्वत्र घुमले,
"तर या कथास्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचा मानकरी आहे... विनोद..." ते नाव ऐकताच, ते नाव-व्यक्ती अपरिचित असतानाही सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झा प्रथम क्रमांक, एका हत्तर हजाराचा मानकरी कोण हे पाहण्यासाठी बरेच लोक जागेवर उभे राहिलेले असताना ज्यास हे बक्षीस जाहीर झाले होते तो मानकरी विनोद स्वप्नावस्थेत होता. स्वतःला वारंवार चिमटे घेत तो व्यासपीठावर गेला. बक्षीस प्रदान करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत, सुप्रसिद्ध आणि विनोदसाठी द्रोणाचार्य असलेल्या लेखकास व्यासपीठावर पाहून विनोदचा आनंद गगनाला भिडला. अर्वणनीय अशा वेगळ्याच स्थितीत त्याने ते बक्षीस स्वीकारले. त्या महान लेखकाचा पदस्पर्श करून तो व्यासपीठावरून खाली उतरत असताना अनेक तरुण तरुणींनी त्यास घेरले. त्यात कथास्पर्धेचे बरेच स्पर्धकही होते. कुणी हस्तांदोलन करत होते तर कुणी छोटी वही पेन पुढे करून 'ऑटोग्राफ प्लीज!' अशी विनवणी करत होते. त्यातल्या अनेक सुस्वरुप आणि विवाहयोग्य तरुणींच्या वहीवर विनोद लिहिले, 'लग्न करशील का?' त्याचा तसा संदेश हा त्याच्या विनोदी स्वभावाचा भाग समजून त्या तरुणी लाजत, खळाळून हसत दाद देत होत्या. तरुणाईच्या विळख्यातून बाहेर पडलेला तो विनोद
वाहिन्यांच्या जाळ्यात अडकला.
"तुझी ही पहिलीच कथा ना? एवढे मोठे पारितोषिक? कसे काय सुचले हे बीज ? सांगाल काय?"
"सांगतो, सारे सांगतो. आता बक्षीस मिळालेय तेव्हा काय कुणाची भीती? अहो, मुळात कथा माझी नाहीच. ही कथा म्हणजे चक्क एक कॉकटेल कथा आहे..."
"म्हणजे ? जरा स्पष्ट करून सांगा.."
"कथास्पर्धेत स्वतःचीच कथा असावी अशी अट नव्हती म्हणून मग मी माझ्याजवळ असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विनोदी लेखकांची पुस्तके बाहेर काढली. प्रत्येक पुस्तकातील एक-एक विनोदी घटना, विनोदी संवाद एकत्र गुंफले आणि त्यातून जन्मलेल्या साहित्यास नाव दिले... कॉकटेल! त्या संपूर्ण कथेमध्ये माझे एक अवाक्षरही नाही."
"अहो, आयोजकांनी कथा वाचली नसेल हे ठीक परंतु परीक्षकांचे काय? त्यांच्या कसे लक्षात आले
नाही?"
"बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू होताना परीक्षकांचा सत्कार झाला. कोण होते परीक्षक? एक त्रिपाठी, दुजे शर्मा आणि तिसरे निरूपम. तिघेही परप्रांतीय असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख झाला. मला सांगा, यांचे मराठी..." "
म्हणजे?"
"वाघाचे पंजे... येतो..." विनोद म्हणाला. मनात आणले तर सामान्य माणूस कित्ती मोठा सामाजिक विनोद गांभीर्यपूर्वक घडवून आणू शकतो हे सोदाहरण दाखवून विनोदने तिथून काढता पाय घेतला...
