Nagesh S Shewalkar

Drama Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Drama Comedy

कुणाचा मोबाईल कुणाच्या हाती!

कुणाचा मोबाईल कुणाच्या हाती!

10 mins
2.1K


दुपारचे साडेचार वाजत होते. कपातला चहा संपवून अजय म्हणाला,

"व्वा! काय चविष्ट चहा झालाय."

"एरवी काय कोपीष्ट चहा होतो का? हिणवायला तेवढे जमते. चार दिवसांत चहा करत आहात तर केवढ कौतुक! बाप रे! मला कोण नवाजी तर घरचाच बुवाजी!"

"पण तसं नवाजता तरी आलं पाहिजे ना? तुला आयता चहा करून दिला, एका शब्दाने तरी मला नवाजलेस का?" अजयने विचारले.

"दीड वर्ष झाले लग्नाला. दररोज किती वेळा चहा ढोसला असेल पण कधीतरी तुम्ही 'छान...बरा...' असे म्हणालात का? मग दुसऱ्याकडून अपेक्षा का करावी? जे पेराल ते उगवेल...." राणी बोलत असताना तिच्या पोटावर ठेवलेला भ्रमणध्वनी वाजला.

"बाळ, पोटातून रिंगटोनचा आवाज करतेय की?" असे विचारत अजयने राणीच्या पोटावर ठेवलेला मोबाइल उचलला. त्यावर त्याच्या मेहुणीचे नाव पाहून 'ऑन' करून तो म्हणाला,

"बोल. सोनुमावशी, बोल गं..."

"कोण बोलतंय?" तिकडून असमंजपणे सोनूने विचारले.

"म्मी की नाही, तुझ्या ताईच्या पोटातले बाळ बोलतोय.."

"अच्छा! भाऊजी आहात तर! काय चाललंय?"

"दुसरे काय चालणार? तुझ्या बहिणीची सेवा बजावतोय. आत्ता चहा करून दिलाय. नऊ महिने तीन दिवस वाढलेल्या पोटावर..."

"काय भाऊजी, नाही म्हटलं एक-एक दिवस मोजताय. फार घाई झाली वाटते. ताईचा मोबाइल तुम्ही का उचललात?"

"तेच तर सांगतोय ना, कपबशी उचलत असताना फोन वाजला. मी उचलला. ठीक आहे. बोल बुवा तुझ्या ताईशी..." असे म्हणत त्याने मोबाइल राणीजवळ दिला आणि तो स्वयंपाकघरात गेला. चहाचे कप, भांडी विसळून, दूध फ्रीजमध्ये ठेवून तो पुन्हा बैठकीत आला.


बहिणींच्या गप्पा सुरू होत्या. त्यांच्या गप्पा लवकर संपणार नाहीत हे ओळखून अजयने टीव्ही लावला. त्याचा आवाज ऐकून राणी म्हणाली,

"आवाज बंद करा हो. ऐकू येत नाही." अजयने चरफडत आवाज बंद केला आणि मूकचित्रे पाहायला सुरुवात केली.

कर्मधर्मसंयोगाने एका वाहिनीवर एक मालिका चालू होती...

मालिकेतील दोन मैत्रिणी खूप वर्षांनी अचानक भेटल्या होत्या. एका मैत्रिणीचा पती तिच्यासोबत होता. त्याच्या दोन्ही हातात सामानाने भरलेल्या अवजड पिशव्या होत्या. दुसरी मैत्रीण गर्भवती होती. बोलता-बोलता पाच-दहा-पंधरा-वीस मिनिटे झाली परंतु त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. पती बिचारा कंटाळला होता. त्याचे दोन्ही हात दुखत होते, कळ लागत होती. तो सारखा पिशव्यांची अदलाबदल करत होता. मधूनच एखादी पिशवी जमिनीवर टेकवत होता. तशी त्याची बायको ओरडली,

"अहो, कसे सांगावे तुम्हाला? रस्त्यावर पिशव्या खाली ठेवता काय? आज सकाळीच पिशव्या धुतल्या आहेत. घासघासून हाताला लागलेली कळ अजून तशीच आहे..."

"अगं, पण त्यांच्याही हाताला कळ लागतेय..." मैत्रिणीने सांगण्याचा प्रयत्न केला.

"जाऊ दे गं. आपण दोन मिनिटे बोलतोय तर यांना देखवत नाही. ह्यांच्या मित्राशी दोन-दोन तास बोलताना यांना त्रास होत नाही का?" म्हणत दोघी पुन्हा बोलण्यात दंग झाल्याचे पाहून पती त्याच्या पत्नीजवळ गेला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला

"डार्लिंग, थँक्स हं. कसे आहे तू तर आत्यंतिक सुंदर आहेसच. तुझ्याइतकी नसेल पण तुझी मैत्रिणही खूप सुंदर आहे. तिला इतक्या जवळून पाहण्याची, तिच्या सौंदर्याचे मनसोक्त निरीक्षण करण्याची संधी..."

त्याचे बोल ऐकून जिथे पत्नीच्या अंगाचा तीळपापड झाला तिथे ते बारीक आवाजातील बोल ऐकून मैत्रीण मनोमन सुखावत असताना त्याच्या बायकोने तिचा निरोप घेतला. स्वतःची युक्ती सफल झाल्याचे पाहून तोही बायकोच्या मागोमाग निघाला... ते दृश्य पाहून अजय हसू लागला. ते ऐकून फोनवर बोलायचे थांबून राणी म्हणाली,

"केला ना तुम्ही आवाज मोठा आणि वर हसताय. काय झाले?"

"काही नाही गं..." म्हणत अजय राणीजवळ आला आणि तिच्या भ्रमणध्वनीचा स्पीकर ऑन करून करत असताना सोनूने विचारले,

"ताई, काय झाले गं? "

"काही नाही गं सोनूमौशी, मला की नाही, पोटात राहून राहून खूप भूक लागली गं. तू नंतर फोन करतेस का गं? प्लीज!"

"हो रे, माझ्या राजा..." म्हणत तिकडून सोनूने फोन बंद केला. तसा अजय पुन्हा जोरजोरात हसत असल्याचे पाहून राणीही हसू लागली. तसा अजय राणीच्या पोटाजवळ चेहरा नेत म्हणाला,

"बाळा, बघ. कशी विकेट घेतली तुझ्या मावशीची. तुझी आई आणि मावशी गप्पांच्या नादात हेही विसरल्या की तू अजून पोटातच आहेस. भूक लागल्याचे सांगशील कसा? दे टाळी", असे म्हणत टाळी देण्यासाठी अजयने हात वर नेला. तो आपल्या पोटावरच टाळी मारणार अशी भीती वाटून राणी गडबडीने उठत असताना तिला बसवून सात मजली हास्य करत अजय म्हणाला,

"पुन्हा विकेट घेतली. अगं, मी पोटावर हात मारीनच कसा? तुमच्याप्रमाणे मी काही गप्पात गुंग झालो नव्हतो."

"तुम्ही असे आहात ना?" राणी लटक्या रागाने म्हणाली.

"बाळा, तुला असे म्हणजे कसे माहिती आहे का रे?"

"मस्करी बस करा. आपल्याला दवाखान्यात जायचे आहे. विसरलात का?"

"ते कसा विसरेन? बघ. फाइल पण काढून ठेवली आहे. तू हळूच खाली उतर. फ्रेश हो. तयार हो. नंतर दवाखान्यात गर्दी वाढते."

राणी हळूहळू न्हाणीघरात गेली. त्या दोघांच्या लग्नाला दीड वर्ष होत होते. हो-नाही म्हणता शेवटी राणीला गर्भ राहिला. शहरातील प्रसिद्ध स्त्री डॉक्टराने तिला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. घरातील सगळ्या कामांना बाई असली तरीही लहानसहान बरीच कामे असतात, ती कामे अजयला करावी लागत. दोघांच्याही घरी चार-सहा महिने येऊन राहण्यासारखे कुणी नव्हते. विभक्त कुटुंबामुळे जो तो स्वतःच्या विश्वात रममाण असे. आपसातील प्रेम कमीकमी होत जाते. एकत्र असले म्हणजे छोट्या-मोठ्या सुखदुःखात एकमेकांना मदत होते. अशा प्रसंगातून प्रेम, माया अशा बाबी वाढत जातात. नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते...


"चला हो. मी तयार झाले," राणी बाहेर येत म्हणाली.

"एवढ्या लवकर?" अजयने विचारले.

"अहो, दवाखान्यात जायचं आहे. लग्नाला वगैरे जायचे नाही."

"हे तुझ्या लक्षात आले हे माझे नशीब.."

"चला. पुन्हा गर्दी वाढली तर माझ्याच नावाने शंख कराल."

पंधरा वीस मिनिटांत ते दवाखान्यात पोहोचले. तिथे भरपूर गर्दी होती. त्यांचा क्रमांक लागण्यासाठी तास-दीड तास लागण्याची शक्यता होती. नाइलाजाने दोघे बसून राहिले. तिथे अनेक स्त्रिया अवघडलेल्या, उत्सुकतेपोटी, आशावादी अवस्थेत त्या दिव्यत्वाला सामोरे जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. 'इथे गर्भपात, गर्भलिंगनिदान केले जात नाही.' अशी रंगीबेरंगी मोठी पाटी लावली असली तरीही सारे आबादीआबाद होते. त्यांना बसून पंधरा-वीस मिनिटे झाली. परंतु बाहेर कुणी आले नव्हते किंवा आत कुणाला सोडले नव्हते. अजयने स्वागतिकेकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, "साहेब, गर्भपाताची क्रिया चालू आहे."

"कुणाचा?" अजयने विचारले.

"आहे एक, श्रीमंत घरची मुलगी... कुमारिका!"

"अहो, पण ही पाटी..."

"पाटी लावावी लागते आणि ह्या गोष्टीही कराव्या लागतात. ज्यांच्या जीवावर हा दवाखाना चालतो त्यांच्यासाठी काही वेळेला नियम बाजूला ठेवावे लागतात."

"या नियमालाही अपवाद आहेच तर..." असे म्हणत अजय हसतहसत राणीजवळ येऊन बसला. राणी तिच्या शेजारी बसलेल्या एका स्त्री सोबत हलक्या आवाजात बोलत होती.

"का हो कितवा महिना?" शेजारणीने विचारले.

"नऊ पूर्ण झाले. तुमची कितवी खेप आहे?" राणीने विचारले.

"दुसरी वेळ आहे. सातवा लागलाय?"

"पहिले काय आहे?" राणीचा पुढचा प्रश्न

"मुलगा. तीन वर्षांचा."

"बरेच अंतर आहे की."

"ठेवलेय झाले." ती बाई म्हणाली.

"पहिल्या वेळी सीझर झाले होते?"

"ती एक कहाणीच आहे."

"ती कशी?" राणीने उत्सुकतेने विचारले.

"त्याचे काय झाले, पहिल्या वेळीही यांच्याकडेच इलाज सुरु होता. सहाव्या महिन्यापासून डॉक्टरांनी 'सीझर' करावे लागेल अशी सूचना प्रत्येक वेळी दिली. त्यांनी सांगितले की आपलीही मानसिकता आपोआप तयार होते. योग्य वेळी नववा महिना लागला. त्या रात्री नऊ वाजता मला बराच त्रास होऊ लागला. ताबडतोब दवाखाना गाठला. तोपर्यंत त्रास खूप वाढला. डॉक्टरांनी तपासले. सीझर करावे लागेल म्हणून एक इंजेक्शन दिले. नर्सला म्हणाल्या,

"बारा वाजता सिझर करु. तयारी करा." डॉक्टर निघून गेल्या. सोबत सासूबाई होत्या. त्यांना वेगळाच संशय आला. त्यांची तळमळ सुरू झाली. त्यावेळी इथे जी नर्स होती ती आमच्या घराजवळ राहात होती. तिला सासूबाई म्हणाल्या,

"असे कसे होते? घरी तर कळा जोरात येत होत्या. मला तर वाटले दवाखान्यात यायच्या आधी रस्त्याने तर होणार नाही? हिची नॉर्मल डिलेवरी होणार असताना सीझरची गरजच काय?" सासूबाईंचा चढलेला आवाज ऐकून त्या नर्सने सांगितले की, डिलीवरी नॉर्मलच आहे. डॉक्टरांनी मुद्दाम इंजेक्शन दिले आहे. सीझर करून लुटायचा धंदा झालाय यांचा. त्या नर्सने मला पुन्हा दुसरे इंजेक्शन दिले. विसाव्या मिनिटाला मी बाळंत झाले..."

"नंतर डॉक्टर काय म्हणाल्या?"

"काय म्हणणार? सासूबाई आणि ह्यांनी चांगलेच फैलावर घेतले. पोलिसात जाण्याची धमकी देताच डॉक्टर पाया पडली. सारा खर्च माफ करते म्हणाली."

"अगं बाई, काय हा भयानक प्रकार... अहो, ऐकलंत का?" म्हणत राणी अजयकडे वळल्याचे पाहून अजय गडबडीने म्हणाला,

"नाही बुवा, मी यांचे सीझर प्रकरण ऐकले नाही."

"ते जाऊ द्या हो. डॉक्टर सीझरबद्दल काही म्हणाल्या तर पटकन हो म्हणू नका. थोडी वाट पाहू असे म्हणून हलकेच सिस्टरला पटवा..."

"काय? तू टेबलवर तळमळत असताना मी सिस्टरला पटवून तिच्यासोबत मजा..."

"चूप! उगाच काहीतरी बरळू नका. त्या सिस्टरला पाच-दहा रुपये देऊन तिच्याकडून खरीखरी माहिती काढून घ्या..."

"बरे...बरे...." अजय म्हणाला...


दवाखान्यातील एका बाकड्यावर तान्ह्या मुलासह तपासणीसाठी आलेल्या एका स्त्रीचे बाळ सारखे रडत होते. जमलेल्या सर्वांचे लक्ष त्या बाळाकडे आणि पर्यायाने त्या तरुणीकडे जात होते. ती नवमाता सर्वांसमोर त्याला पाजायला लाजत होती. सोबत आणलेली दुधाची बाटली त्याच्या तोंडात देत होती. ते बाळ क्षण-दोन क्षण शांत होई परंतु त्या प्रकारातला फोलपणा लक्षात आला की, पुन्हा नव्या जोमाने भोकाड पसरत होते. त्याला समजावण्याचे अनेक प्रकार झाले. परंतु त्याची भूक वेगळीच होती. ते शांत होत नाही हे पाहून समोरच्या बाकड्यावर बसलेली एक वयस्कर बाई कणखर आवाजात म्हणाली, "अग, ए पोरी..." 

त्या बाळाच्या आईसह सर्वांनीच तिच्याकडे पाहिले

तशी ती बाई पुढे म्हणाली, "अग, पोरी त्याची भूक दुसरीच आहे. त्याची भूक अशाने भागायची नाही. त्याला पदराखाली घे आणि कोंब त्याच्या तोंडात. मग बघ कसं गप होते ते." हे बोलणे ऐकून सारे जण खो खो हसत सुटले...


बसून बसून कंटाळलेला अजय बाहेर आला. दवाखान्याच्या परिसरात असलेल्या औषधांच्या दुकानात तो गेला. नेहमीच जात असल्यामुळे दुकानदारासोबत चांगली ओळख झाली होती.

"या साहेब. आज बराच वेळ लागतोय."

"हो ना. गर्भपात चालू आहे.."

"साहेब, पहिलीच वेळ आहे ना? तर मग पुन्हा एकदा विचार करा. शिवाय वहिनींना..."

"अहो..अहो..गर्भपात आमचा नाही तर डॉक्टर गर्भपात..."

"काय? मॅडम स्वतः..."

"तसे नाही हो. नीट ऐकून तर घ्या. तुमचे कसे होतेय माहिती आहे का, कुणी लग्नाची पत्रिका घेऊन आले तर तुम्ही विचाराल, बारशाची पत्रिका आणलीत का? कधी आहे, तुमच्या नातवाचे बारसं? अहो, मी सांगत होतो की, एका पेशंटचा गर्भपात सुरु आहे आणि तुम्ही तर..."

"अच्छा! अच्छा!! असे आहे का?" दुकानदार हसत म्हणाला आणि अजय दवाखान्यात परतला. डॉक्टरांनी रुग्ण तपासणी सुरू केली होती. अजयच्या लक्षात आले की, राणी बरीच गंभीर झाली आहे. त्याने विचारले,

"का गं काय झाले?"

"काही नाही हो." राणी म्हणाली.

तितक्यात सिस्टरने अजय-राणीला ग्रीन सिग्नल दिला. दोघेही आत पोहोचले. डॉक्टरांनी राणीला टेबलावर झोपवले. तपासणी करून डॉक्टर म्हणाल्या,

"गुड! तुमची आणि बाळाची कंडिशन चांगली आहे. दोन-तीन दिवसांत डिलेवरी होईल."

"डॉक्टर, तुम्ही मागे सीझरबद्दल म्हणत होता. ते टाळता येणार नाही का?" राणीने विचारले.

डॉक्टर काही उत्तर देणार तितक्यात त्यांचा मोबाइल खणखणला. त्या म्हणाल्या,

"बोला. डॉक्टर, बोला. अहो, तसे नाही हो. भूल देण्यात तुम्हीच पटाईत आहात. मग ती पेशंटला द्यायची असो की, एखाद्या नवतरुणीला... तुमच्याशिवाय कुणाला बोलावते काय? काय म्हणता फिस वाढवायची? ठीक आहे. वाढवा. अहो, असे काय म्हणता, मला कुठे माझ्या खिशातून द्यायचेत? इकडे पुण्याला सुटून तिकडे साताऱ्याला दान करायचे आहेत..."

डॉक्टर फोनवर व्यस्त असल्याचे पाहून राणी विजयला म्हणाली, "अहो, सीझर नकोच म्हणून सांगा."

"अग पण..."

"ही अशी कच खाऊ नका. डॉक्टर बाईने डोळे फिरवले, मान हलवली, बोटभर केसांना झटका दिला.

मधाळ आवाजात बोलू लागली की, ''भुलून जाऊ नका."

"काय म्हणतो पेशंट?" डॉक्टरांनी विचारले.

"काही नाही. ते सीझर नको म्हणतीय."

"तसे काही नाही. घाबरून जाऊ नका. तुम्हाला इंजेक्शन देऊन भूल दिल्या जाते. काही कळत नाही..." बोलत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. 

"डॉक्टर, बोला. नाराजी? तुमच्यावर? कसं शक्य आहे? पेशंटच्या सर्व तपासणी करून घ्यायला तुमच्याकडेच पाठविते ना? अगदी एखाद्या पेशंटला तपासणीची गरज नसताना पाठवतेच की. अच्छा! कालची केस म्हणता होय? त्याचं काय आहे, त्यांचा सारखा लकडा होता म्हणून दिली एक केस. नाही हो नाही. दोन-तीन दिवसांत सात-आठ सिझर आहेत. हो...हो...नक्की...." असे बोलत डॉक्टरने फोन बंद करून समोरची वही ओढली. त्यावर काहीतरी लिहिले आणि तो कागद अजयकडे देत म्हणाल्या,

"उद्या सकाळी उपाशीपोटी या तपासण्या करून घ्या. घाबरू नका. सगळं व्यवस्थित होईल. या."


अजय-राणी घरी पोहोचले. घामेजलेली, दमलेली राणी पलंगावर कलंडली. थोडासा दम ठीक झाल्यावर म्हणाली,"अहो, पाणी द्या ना प्लीज..." अजय लगेच पाणी घेऊन आला. पाणी पिऊन राणी म्हणाली, "आपण डॉक्टर बदलू या. या डॉक्टर बाईवर माझा विश्वास राहिला नाही. ऐकलंत ना फोनवर कशी बोलत होती ते...." बोलता बोलता राणीचा चेहरा बदलला. ती हलकेच कण्हू लागली. चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या.

"आ...आई ग..आ..."

"काय झाले राणी?" अजयने तिचा हात हातात घेऊन विचारले.

"प..प..पोटात दुखतंय हो..."

"थांब. घाबरू नकोस. दवाखान्यात जाऊ या."


दहा मिनिटांत अजय राणीला घेऊन दवाखान्यात पोहोचला. जाताना राणीने तीन तीन वेळा बजावले, "हे बघा. नीट ऐकून घ्या. माझे काही बरेवाईट झाले आणि बाळ चांगले जन्मले तर तुम्ही दुसरे लग्न करा. तुमच्या हातून बाळाचे चांगले पालनपोषण होऊ शकत नाही. मागच्या काही दिवसांत मी बघितली तुमच्या कामाची तऱ्हा. घरातील कामे करणे हा तुमचा पिंड नाही. थांबा बोलू द्या. सावत्र का असेना पण त्याला आईचे प्रेम मिळेल. वाटल्यास लग्नापूर्वी नसबंदी करून घ्या. म्हणजे तिला लेकरू होणार नाही..." राणीचे बोल ऐकून अजयला हसावे की रडावे की तिची चिंता करावी हे समजत नव्हते.


दवाखान्यात पोहोचल्यावर ताबडतोब राणीवर औषधोपचार सुरु करण्यात आले. डॉक्टर लगेच आल्या. त्यांना पाहताच राणी म्हणाली, "डॉक्टर, प्लीज, सीझर नको हं..."

"हे बघा. तुम्ही शांत रहा. ऐका. गरज नसताना मी सीझर कशाला करु?" तितक्यात त्यांच्या मोबालवर कुणाचा तरी फोन आला. परंतु डॉक्टरांनी तो बंद करून ठेवून दिला...

अजय बाहेर उभा होता. त्याचा चेहरा चिंतायुक्त होता. साधारण अर्ध्या तासानंतर त्याच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आल्या. समोर उभा असलेल्या अजयला पाहून म्हणाल्या, "अभिनंदन! मुलगा झालाय. दोघेही एकदम उत्तम आहेत."

"थँक्स, डॉक्टर, थँक्स!" अजय अत्यंत आनंदाने म्हणाला.

"अगं, माझा मोबाइल आण..." असे नर्सला सांगत डॉक्टर तिची वाट बघत थांबल्या. दोन-तीन मिनिटात नर्सने परत येऊन 'सापडत नाही' असा निरोप दिला. ते ऐकताच डॉक्टर स्वतः शस्त्रक्रियेच्या दालनात गेल्या. सर्वांनी मिळून मोबाईल शोध शोध शोधला. परंतु परिणाम शून्य. 

"डॉक्टर, तुमचा नंबर सांगा..." असे म्हणत अजयने डॉक्टरांनी सांगितलेला नंबर जुळवला. दुसऱ्याच क्षणी मोबाईलची घंटी वाजू लागली. सारे त्या आवाजाच्या दिशेने धावले. तो आवाज राणीला आणि तिच्या बाळाला ठेवलेल्या खोलीतून येत होता.  

"ड...ड..डॉक्टर.. .मोबाईल.... बाळांतीण..."

"शस्त्रक्रिया चालू असताना मला एक फोन आला होता. तो बंद करून मी ठेवला. पण कुठे? माय गॉड! राणीच्या प..प..पोटात तर...."

"ह...हे काय डॉक्टर? राणीच्या पोटात? डॉक्टर, तुम्ही पेशंटच्या जीवाशी खेळत आहात..."

"मिस्टर अजय, प्लीज शांत व्हा..." डॉक्टर सांगत असताना बाहेरचे अनेक लोक त्या खोलीत आले. येणारा प्रत्येक जण एक ठराविक प्रश्न विचारत होत,"काय झाले?"

"आत्ता जी डिलेवरी झाली ना तेव्हा..."

"काय झाले? बाळ गेले की बाई?"

"तसे काहीही झाले नाही. डॉक्टरांचा मोबाइल बहुतेक बाईच्या पोटात..."

"हे असेच झालेय हो. फारच निष्काळजीपणा झालाय हो."

"पण मी म्हणतो डिलेवरीसारख्या महत्त्वाच्या वेळी मोबाइल तिकडे न्यावाच कशाला?"

"हल्ली या डबड्याचे वेड फारच झाले आहे हो..." एक व्यक्ती म्हणत असताना त्याच्या खिशातील मोबाइल वाजला तशी ती व्यक्ती ओशाळल्या चेहऱ्याने बाहेर गेली.

"कुठेही पहा. कुणाजवळही मोबाइल आहेच. हे..हे...मोबाइलचे वेड असेच राहिले ना तर एक दिवस जन्मलेलं पोर मोबाइल मागेल."


"डॉक्टर, आता पुढे काय?" चिडलेल्या अजयने विचारले.

"मि. अजय, शांत व्हा. काहीतरी मार्ग निघेल..."

"काय मार्ग निघणार? आता पुन्हा... म्हणजे..." असे म्हणत अजयने तो क्रमांक पुन्हा जुळवला. आवाज पलंगावरील राणीच्या एका बाजूने येत होता. नर्स पलंगाजवळ गेली. अंदाजाने तिने मोबाइल कुठे वाजतोय ती जागा हेरली. नर्सने बाळाच्या अंगावरील पांघरूण बाजूला केले. ती आनंदाने ओरडली,

"सापडला. मोबाइल सापडला."

"कुठे आहे?" अनेकांनी एकदम विचारले. 

"हे..हे..जन्मलेलं पोट्ट हातात घट्ट धरून झोपलंय..." नर्स म्हणत असताना प्रत्येकाने बाळाकडे पाहात 'आ' वासला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama