किमयागार भाग ६
किमयागार भाग ६
सूर्याकडे पाहून त्याने अंदाज बांधला की तो दुपारपर्यंत तरिफाला पोहोचेल. तेथे गेल्यावर तो आताचे पुस्तक बदलून एक जाड पुस्तक घेणार होता. वाईनची बाटली भरून घेणार होता. दाढी करणार होता व केस पण कापणार होता. व्यापाऱ्याच्या मुलीला भेटण्याची तयारी करायची होती. आणि दुसरा कोणी मोठा कळप असलेला मेंढपाळ तिचा हात मागण्यासाठी गेला असेल अशा शक्यतेचा तो विचार पण करू इच्छित नव्हता.
स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता मनाला एक नवीन उत्साह देत असते. त्याने आकाशाकडे बघितले व चालण्याचा वेग वाढवला. अचानक त्याला आठवले की तरिफा मध्ये एक म्हातारी स्त्री आहे जी स्वप्नांचा अर्थ सांगते.
म्हातारी त्याला घरातील मागच्या खोलीत घेऊन गेली . खोलीच्या दरवाजाला एक रंगीत पडदा होता. त्या खोलीत एक टेबल , दोन खुर्च्या होत्या व भिंतीवर प्रभू येशू चा फोटो लावला होता. म्हातारी एका खुर्चीवर बसली त्याला पण बसण्यास सांगितले. खुर्चीवर बसल्यावर तिने त्याचे दोन्ही हात हातात घेतले व ती हळू आवाजात प्रार्थना करू लागली. ही प्रार्थना जिप्सी लोकांच्या प्रार्थने प्रमाणे होती. त्याला प्रवासात अनेक जिप्सी भेटले होते. जिप्सी लोक पण प्रवास करत असतात पण त्यांच्याकडे मेंढ्यांचे कळप नसतात. लोक म्हणत असतं की जिप्सी लोकांचे जीवन दुसऱ्यांना फसवण्यात जात असते , काही लोक तर म्हणत की त्यांची सैतानाशी मैत्री असते व ते मुलांना पळवून नेतात व त्यांना गुलाम बनवतात. लहान असताना त्याला नेहमीच मुले पळवून नेणाऱ्या जिप्सींची भीती वाटत असे, आणि आताही त्या म्हातारीने हात हातात घेतल्यानंतर त्याच्या मनात एक भीतीची शिरशिरी आली, त्याला आपण घाबरलो आहे हे तिला कळू द्यायचे नव्हते. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली ' वा छान'. तो जरा बावरला. त्याचे हात थरथरले आणि ते त्या म्हातारीला कळू नये म्हणून त्याने आपले हात तिच्या हातातून झटकन काढून घेतले. तो म्हणाला की ' मी तुला हात दाखवायला आलो नव्हतो '. खरेतर त्याला आता तिथे येऊन चुक केल्यासारखे वाटत होते. त्याच्या मनात आले की तिचे पैसे देऊन निघुन जावे, आपण उगाचच त्या परतपरत पडलेल्या " स्वप्नाला " महत्व देत आहोत असेही त्याला वाटले.
