काखेत कळसा गावाला वळसा
काखेत कळसा गावाला वळसा
काखेत कळसा गावाला वळसा
" लक्ष्मी sss", लक्ष्मीच्या पाठीवर जोरात दणका देत लक्ष्मीची आई ओरडत होती.....
लक्ष्मी च्या आईचा आवाजही तसाच होता. सर्व गाव तीच्या आवाजाने दणाणून जात होता. सर्व गाव हे आपल्या वाईटावर आहे असा तीचा समज झालेला.... काहीही घडले की सर्व गावाला दोष देत बसायची... लोकांना सुरवातीला थोडा त्रास वाटला मात्र आता तीची सवय माहित झाल्याने गावही सर्व कामधंदा सोडून तीचे गऱ्हाणे ऐकण्यास जमत होता....
आता आज नविन काय गावाच्या नावे उध्दार होणार ? म्हणून नेहमी प्रमाणे लोक तीच्या घराच्या बाजूला जमू लागले. जसे लोक जमायला लागले तसे लक्ष्मीच्या पाठीवरचे दणके आणि लक्ष्मीचे आरडने वाढले....
मंगळवारच्या बाजारातून नवी पाण्याची बॉटल आणून दिली कालच शाळेत नेली आणि हारवलीस का गधडे. डाव्या हाताने पोरीचा दंड धरून पोरीला खदाखदा हलवत चौथीत शिकणाऱ्या लक्ष्मीचा थरकाप उडत होता... कोणत्या मेल्याने चोरली महया लेकीची बॉटल , कधी भलं होणार नाही त्याचं... मास्तरच लक्ष नाय का पोरांकड ... हेच शिकवतेत का शाळेत... ह्यो गावच लय
चोट्टा हाय... गरीबाची बॉटल चोरली... नाही भलं होणार त्याचं... कोणत्या पोरानं चोरली असन त्यानं गप गुमानं देवून टाका माझ्या लक्ष्मीची बॉटल...
तुला अक्कल नाही का ... बॉटल संभाळून ठेवायची... गधडे... असं म्हणत पुन्हा एक दणका लक्ष्मीच्या पाठीत बसला... तशी लक्ष्मी पाठीत वाकली आणि तीचा आवाज आत दबल्या गेला....
काहुन मारती व महया नातीलं.... असं म्हणत लक्ष्मीच्या आजीनं नातीला आपल्या पदरात घेतलं... माझी गुणाची बाय ती... तीचे डोळं पुसत आजीनं पाठीवरून मायेनं हात फिरवला.... चाल शाळेत ... कुठय तुझं दप्तर ?... आजी विचारत होती.
लक्ष्मीने खूणेनं दाखवलं... आजीने लक्ष्मीच्या पाठीवर दप्तर देण्यासाठी दप्तर उचललं..... तीच्या पाठीवर दप्तर देता देता आजीच्या हाताला काहीतरी लागलं... दप्तर उघडून हात आत घातला आणि......
हात बाहेर काढला तर.... आजीच्या हातात नविन बॉटल होती....
" लक्ष्मीsss" आता आजीची बारी होती.... लोक मात्र काखेत कळसा गावाला वळसा म्हणत गालातल्या गालात हसत आपआपल्या घराकडे निघाली...