जुगाड
जुगाड


" नको रे गोप्या ", " तू राहु दे "
असे तुम्ही त्याला किती जरी म्हटले तरी गोपाल ते काम करणार म्हणजे करणारच मग त्यात तुमचे नुकसान होवो अथवा तुम्हाला कितीही मनस्ताप तो आपला निरागस चेहरा व त्यावर तेवढेच निरागस हास्य घेवून पुन्हा तुमच्या समोर येवून उभा राहणार....
त्याने केलेली मदत कधी फायदयाची तर कधी खूपच तोटयाची रहायची. गावात मात्र सगळयांच्या तोंडी एकच नाव गोपाल अर्थात सर्वांचा ( ना ) आवडता गोपाल. जेमतेम चौथीत शिकणारं पण सारा गाव व माणसं तोंडपाठ.
गावात कोण आलं, गेलं, मेलं, आजारी, उधारी सारं सारं त्याला माहित. गावाचा एफ एम च म्हणा हवं तर... त्याला काहीही विचारा अगदी न थकता सगळं सांगणार. कोणाची माहिती काढुन आण म्हटलं तरी आणणार अगदी होल अॅण्ड सोल बरं...
त्याचं डोकं चालायच भारी टायर ट्युब पंम्पचर झाल्यावर ते पंम्पचर काढण्यासाठी फेविकॉल का नाही वापरायचा ? हा त्याला सदा सतवनारा प्रश्न. त्याचा हा सल्ला त्याने बऱ्याच जनांना देवून पाहिला पण " गोप्या पळ इथनं " हेच ऐकणे त्याच्या नशिबी होतं. मोठी माणसं आपलं का ऐकत नाही म्हणून तो स्वतःवर देखील चिडायचा.
कोणाचे कोणते काम फुकटात करायचे नाही. किमान दुकानातुन पाच रुपयाचा बिस्कीट पुडा तरी घ्यायचा हा त्याचा संकल्प. मग कोणी मदतीला बोलवो अथवा न बोलवो हा आपला मदतीला सर्वांत पुढेच. कोणाच्या पत्रावर चढणे असो. दळण आणणे . पाणी जार ग्रामपंचायतीतून आणणे सर्व काम अगदी हसत हसत पूर्ण...
गोपाल नाव आणि भोळा निरागस चेहरा त्यामुळे त्याचा कितीही राग आला तरी गाव त्याच्यावर जेवढा रागवायचा तेवढे प्रेम ही करायचा. त्याला जीव लावायचा.
शाळेत आनंदनगरीची घोषणा झाली आणि गोपालची जुगाड करण्याची धावपळ सुरू झाली.बाजारचा एकच दिवस मधे होता. शाळेतील बाईंनी सांगीतलेलं आणि गोप्याच्या डोक्यात घुसलेल भेळ बनवायचे एकदम फायनल झालेलं.
मुरमुरे आणि चिवडा बाजारातुन विकत आणने गरजेचे होते. प्रत्येकाकडे जावुन पुढे तुमचे करणारे कामे याची यादी वाचून त्याने गोड गोड बोलुन मुरमुरे व चिवडा प्रत्येकी एक किलो एवढे पैसे जमा सुध्दा केले. पुढची पायरी होती ते मुरमुरे व चिवडा बाजारातुन विकत आणने. बाजाराचा गाव चार एक कि.मी. दूर होता.
शाळेच्या खिचडी शिजवणाऱ्या आत्या त्यांच्याशी लाकुड फाटा शाळेत आणून टाकत बाजारातुन मुरमुरे व चिवडा आणण्यास कबुल केले.... मोठं काम झालं होतं... प्रत्येक मित्रांच्या घरी जावून परिश्रमाने १ - १ कांदा जमा केला. कारण सांगीतले होते आम्हाला ठसा चित्र काढायचे आहे त्यासाठी कांदा हवा... आम्हाला शाळेत लिंबू शरबत बनवायाचे म्हणून काकुंच्या घरासमोरील लिंबोनिचे चांगले मोठे पिवळे रसाळ लिंबू तोडून घेतले... चाकूसाठी त्याला जास्त प्रयत्न करावे लागले नाही , शाळेच्या ऑफीस मधील कटर त्याने आधिच काबीज केले होते.... इतर मुलं आई - बाबांना विविध पदार्थ बनवण्यासाठी हट्ट करत होते... मात्र गोप्या विदाऊट टेंशन होता.
आनंद नगरीचा दिवस उजाडला. गोप्याने आपल्या स्टॉल साठी शाळेतील रिकामे पोते अंथरूण मोक्याची जागा धरली आणि शाळेच्याच रद्दी पेपरचा पुडी बांधण्यासाठी वापर करत मोठ मोठ्याने आवाज दात ग्राहकांना आकर्षित करायला लागला.
" या या या , गोपालची भेळ ती खा ", असं म्हणत सर्व भेळ त्याने विकली देखील... आणि.... जेंव्हा हिशोब झाला तेंव्हा.... गोपाल ने सर्वाधीक २५० रु. नफा मिळवला होता. त्याचा खर्च...... त्याचा मात्र......झाला होता जुगाड....