डिअर डायरी (दिवस ७ वा)
डिअर डायरी (दिवस ७ वा)


कोरोनाचा पहिला रुग्ण (पेशंट झिरो) सापडला, द वॉलस्ट्रीट जर्नल या जगप्रसिद्ध माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, वेई गुईझियान या ५७ वर्षीय महिलेला सर्वप्रथम कोरोना व्हायरसची लागण झाली होती. वुहान शहरातील सी फुड मार्केटमध्ये ही महिला झिंगे विकण्याचे काम करत असे. मागील वर्षी १० डिसेंबर रोजीच तिला या व्हायरसची लागण झाली होती. विशेष म्हणजे महिनाभर उपचार घेतल्यानंतर जानेवारीत ती यातून पूर्णपणे बरीदेखील झाली. मात्र, तिच्यापासून झालेला हा संसर्ग पुढे वाढत गेला आणि सर्व जगाला या व्हायरसने आपल्या कवेत घेतले. आजघडीला 'कोविड - १९' मुळे साडेसहा लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत.
अमेरिकेतील एक युवक १५ जानेवारी २०२० रोजी चीनच्या वुहान प्रांतातुन आपली सहल संपवून वॉशिंग्टन राज्यात परतला. २ दिवसांनी ताप आला आणि श्वास घ्यायला त्रास झाला. ५ दिवसांनी अमेरिकेच्या 'सीडीसी' म्हणजेच 'रोग नियंत्रण केंद्राने' त्याला देशातील प्रथम कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण घोषित केले. फेब्रुवारी संपेपर्यंत अमेरिकेत रुग्णसंख्या ६५ वर पोहोचली होती. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याकडे 'हंगामी फ्लू' म्हणून दुर्लक्ष केले. आणि एका महिन्यात म्हणजे १५ मार्चपर्यंत हा कोरोना बाधितांचा आकडा ४,५०० च्या पलीकडे गेला.
बडया राष्ट्रांची ही दशा. भारतात मात्र अद्याप पहिला रुग्ण जाहीर झाला नाही. तरी परदेशातून आलेली गायिका कनिका कपूर हिची चौथी टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. राज्यात २०० वर तर देशात १००० वर संख्या पोहोचली आहे. मात्र उपचाराने बऱ्या होणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी असून थोडे आशावादी चित्र आहे.
मात्र सरकारने दिलेल्या मास्क, अप्रॉन, रेल्वे कोच, व्हेंटिलेटर यांच्या ऑर्डर पाहता मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते आहे...