"काही मंतरलेले दिवस"
"काही मंतरलेले दिवस"
(प्रस्तावना)
काही दिवस असतात आईच्या कुशीत शिरायचे, काही खेळत बागडत आपल्याच् विश्वात रमायचे, काही शाळेचे आणि मग कॉलेजचे, काही करियर घडवायचे तर काही स्ट्रगल करून स्वतःला सिद्ध करायचे, काही दिवस संसारात नि मुलांमध्ये जगायचे, काही जवाबदाऱ्या निभवायचे आणि काही सुवर्ण दिवस तरुणाईत झिंगायचे व प्रेमात हरवायचे. पण काही खास राखीव दिवस असतात देवाचे देणे "मंतरलेले दिवस"!.. ते 'मंतरलेले दिवस' असतात 'मैत्रीचे', मित्रमैत्रिणीं सोबत घालवलेल्या क्षणांचे!!! अश्या क्षणांने प्रेरित केलं माझ्या लेखणीला. आणि मी आवड म्हणून कविता लिहिणारी चक्क पैरग्रैफ च्या पैरग्रैफ लिहायला लागले. कधी त्यांच्या सोबत घालवलेल्या मस्त वेळेचं वर्णन म्हणून तर कधी त्यांच्या आठवणीत हरवले म्हणून. मग त्यांच्या वाढदिवसाला त्यांना खास शुभेच्छा द्यायच्या म्हणून. आणि मग वेडच लागले मनात येणाऱ्या विचारांना शब्दात उतरवायचे.......
"रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असंही काही नाही;
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री
आणि तुला याची जाणीव असणं
ही झाली मैत्री."
हे तुमच्या वाचण्यात आलंच असेल. आणि तुम्ही अनुभवलं देखील असेल. मैत्री म्हटलं की सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. मैत्री म्हटलं की कृष्ण-सुदामा ची आठवण. मैत्री म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू. आणि मैत्री म्हटलं की भरभरून सांगायला खूप काही. आता तर गेल्या काही वर्षात धुमाकूळ घातलेल्या गेट-टू-गेदर्स ने अजून उल्हास उफाळलाय लिखाणाचा. मी पण तेच शेअर करणार आहे पण जरा हटके! मैत्रीच्या प्रेरणेतून उदयाला आलेली माझी दहा भागांची सिरीज "काही मंतरलेले दिवस".......
(एक)
आयुष्यातील विशिष्ट काळातले विशिष्ट दिवस येतात आणि सरतात आणि परत कधीच येत नाहीत. बालपणी वाटतं आपण लवकर लवकर मोठठं व्हावं, मग मोठ झाल्यावर वाटतं बालपण किती छान होतं. तरुणपण कधी सुरकन सरलं कळतही नाही. त्याची जाणीव होते ती म्याचुअर्ड झाल्यावर जवाबदाऱ्या सांभाळताना. ह्या प्रगल्भतेच्या उंबरठ्यावर चाहूल लागते ती सर्वात कठीण अश्या दिवसांची, म्हातारपणाची. (उतरत्या वयाचा उत्तरार्ध ही देखील खरं तर मनाची एक अवस्थाच असं मला वाटतं.) पण तरीही आयुष्य खूप सुंदर आहे. कारण काही खास राखीव दिवस असतात देवाचे देणे "मंतरलेले दिवस"!.. हे कायम असतातच, त्याला विशिष्ट काळाची, अमक्या वयाची किंव्हा तमक्या कारणांची बाधा नसतेच. हे नातंच मुळी वेगळं, रक्ताचं नसूनही सगळ्यात जवळचं. आयुष्याच्या वळणांवर नवनवीन मित्र भेटत जातात. मैत्री जुळते, काही दुरावतात काही कायमचे आयुष्याचा भाग बनतात. रोजच्या आयुष्यात त्यांचं स्थान असो वा नसो आपल्या हृदयात त्यांचं स्थान कायम असतं. म्हणूनच त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्या सोबत असताना बाकी सगळं विसरून स्वतःला अनुभवता येतं. परत लहान होता येत नि परत तरुण होता येतं. मनसोक्त खिदळता येतं, बुजूरुगीचा मुखवटा काढून दिलखुलास हसताही येतं नि मनमोकळं रडताही येतं. खांद्यावर हात ठेऊन हुंदडताही येतं नि हातात हात घेऊन टहेलताही येतं. गाता येतं नाचता येतं, जे जमत नाही तेही करता येतं. आणि आपण आहो तसं वागता येतं. ज्यांच्या सोबत लहानाचे मोठे होत गेलो त्या सवंगड्यांसोबत तर वेडं होऊन खुलून जगण्याची सर कशालाच नाही. म्हणून कितीही छान, परफेक्ट चाललं असलं तरी त्यांना भेटण्याचा मोह काही सुटत नाही. आणि भेटीनंतर पडलेल्या भुरळ चा नशा उतरावासाही वाटत नाही.......
आता हेच बघा ना... .. .
(दोन)
रविवार सकाळ साठी सगळ्यांनीच पहाटेचा अलार्म लावला. लवकर पोहोचायचं होतं ना डॉ. मोदी रिसोर्ट ला. पण निटशी झोप लागलीच कुठे उत्साहाच्या भारात. शुक्रवार संध्याकाळपासूनच् वेध लागले होते gt चे. तिकडे वेळेवर कॅन्सल झालेल्यांची होणारी घालमेल आणि इकडे जाणाऱ्यांची लगबग. काही मनाने सोबत आणि काही गाडीत सोबत असे पोहोचलो आणि मग सोहळा सुरु झाला. आनंद सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर दिसत होता आणि हळूहळू उत्साह ओसंडून वाहायला लागला. कुणाची फोटो काढायची धडपड तर कुणाची काढून घ्यायची. पण आनंदाचे हे ताजे क्षण टिपण्याचा सगळ्यांचाच अट्टाहास होता जणू. काय ते प्रत्येक गोष्टीला हासणं, कसं बरं नकळत घडतं. एरवी महाग असलेलं हसू इतकं कसं परवडायला लागतं. सत्कार, केक कटिंग, गेम नि गिफ्ट्स, गाणे, कविता, शाळेतले किस्से, खाणं खिलवणं, हळदी-कुंकू देखील, सगळंच मस्तीत. अन् सगळीच नुसती धमाल. भरभरून मौज आपल्या पदरात वेचायचीय ह्यानेच सारे भारावलेले. वेगवेगळ्या वाटेने प्रवास करून घडलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र जमल्या. काही पहिल्यांदाच भेटलेले काही तब्बल पंचवीस वर्षांनी, पण अनोळखी पणाचा लवलेशही नाही. एकाच बगिच्यातली फुलं एका गुलदस्त्यात माळल्यावरचा दरवळ हा. लडिवाळ घटिकांचा सबंध दिवस कुठल्याश्या परीच्या जादुई कांडीने मंतरलेला सगळ्यांना मंत्रमुग्ध करतो. संपू नये वाटत असला तरी निरोपाची वेळ आणतो. हसत खेळत पाखरं घरट्यात परतावी तसं खूप काही (जे शब्दात मांडता येणार नाही ते) मनाच्या पोटलीत बांधून आणतो. परत कधी असा मंतरलेला दिवस उजाडेल अशी वाट बघत परत नव्या स्फूर्तीने कामाला लागतो. असे असतात हे मित्रांसोबतचे ”काही मंतरलेले दिवस"!!!
हा दिवस येणार म्हंटलं कि अक्षरशः वेध लागतात... .. .
(तीन)
एकदम सार्थक उपमा दिलीय कवीने संसाराला 'लोणचं' म्हणून, तिखट ,गोड, खारट, आंबट, तुरट अश्या कैक पैलूंचं मिश्रण! सगळ्या घटकांचा समतोल साधला कि छान मुरतं आणि चविष्ट लागतं मग. त्यातही आंबट-गोड लोणच्याची चव जास्तच लुभावणी आणि जितकं जुनं तितकं अप्रतिम लागतं ते काळं लोणचं. नाही का?... संसरातला हा आंबट-गोड खट्याळपणा म्हणजे 'मैत्री'!, जीच्यामुळे आयुष्याला लज्जत येते. कुणाला नको असेल ही?, गरज असते ती ह्याचा आस्वाद घेता येण्याची. मान्य, जवाबदारीच्या रिंगणात नियम तोडून मैत्रीला प्राधान्य देणं शक्य होत नाही पण जुन्या मुरलेल्या निखळ मैत्रीला आयुष्यात दुसरा तोड नाही. कधीकधी हे कळेपर्यंत खूप वेळ झालेला असतो आणि कधी तर चव न चाखल्याने कळतही नाही कि आपण कशाला मुकतोय. खरंय कि आयुष्यात कुणावाचून अडत नाही पण आयुष्य कुणासाठी थांबतही नाही. त्याची लज्जत वाढवायची कि ते सपक जगायचं ही ज्याची त्याची व्ययक्तिक निवड आहे. ज्याला मोह पडत नसेल "मंतरलेले दिवस" अनुभवण्याचा असा नामानिराळा एखादाच आणि ते मनमुराद अनुभवता येतं असे तुरळकच. आणि इथे तर चक्क अश्या काही जणांचा एक ताफाच् माझ्या वाट्याला आलाय, खरच किती नशीबवान आहे ना मी!! तुमच्या प्रेमाने भारावून न जाणं ह्या वेडीला शेवटच्या क्षणापर्यंत जमणार नाहीय.......
आठवनीं डोळ्यासमोर तरळू लागतात अलगतच्... .. .
(चार)
..... बरोबर म्हंटलस "मनु" कि मी भूतकाळात रमते. म्हणून भूतकाळातले क्षण परत परत जगते, चांगले पण आणि वाईट पण. वाईट क्षणांची सल बोचत राहते म्हणून मी आज अशी असावी. त्यावर बोलण्याची हि वेळ नाही. पण सोबत चांगल्या आठवणींची पोटली आहे म्हणून श्रीमंत असल्यासारखं वाटतं, त्यात खास आठवणी म्हणजे तुम्हां सर्वांच्या, त्यातही खासम खास म्हणजे तुझ्या खंबीर सोबतीच्या. देव करो आणि हि गट्टी कधीच न संपो, अगदी यमसदनी ही.
हो, आठवते ना ती आपली पहिली भेट... धो धो पाऊस, तू सायकल वर आणि मी लुना वर. दोघीही स्पीड मॅच करत नि चिंब भिजत कॅम्प रोड वरून सुसाट जातोय. त्यावेळी एवढच माहित होतं कि आपण इलेक्ट्रॉनिक्स ला सोबत आहोत. पण एव्हडी ओळख पुरेशी होती नाही? घरी पोहोचलो. तुला माझा पंजाबी ड्रेस दिला बदलवायला, समोर हिरवं प्रिंटेड पॅचवर्क असलेला. जेवायला बसलो, तर तुझी नावडती भाजी, भेंडीची भाजी. पण भूक अशी सप्पाटून लागली होती आपल्याला कि जेवलीस तू. मग म्हणाली कि भेंडीची भाजी तर छान लागते, अजिबात चिकट नाही लागत. पाऊस थांबेस्तोवर अजून ओळख वाढली तसं ठरलं कि सकाळी तू माझ्या घरी येणार आणि मग आपण सोबत कॉलेज ला जाणार, आणि सुरु झालं तुझी वाट पाहणं फाटकात रोज सकाळी. बिलिव्ह मी, अजूनही तशीच आतुरतेने वाट पाहते जेव्हा तू येणार असतेस. अजूनही तुझं जाणं आवडत नाही मला. खळखळणारा झरा नदीत मिसळतो तेव्हाच त्याला नदीची खोली कळते. कदाचित म्हणून तू मला माझ्याहूनही जास्त ओळखतेस. पण खरं सांगायचं तर मी कुणाचा आधारस्तंभ असण्या एव्हडी सक्षम नाही, हे "मंतरलेले दिवस" माझा आधारस्तंभ आहे आनंद वेचण्याकरिता. म्हणून साठवणुकीत आहेत तुमच्या आठवणी. तुझ्या तर अजून अनेक रम्य आठवणी माझ्या मनाच्या कुपीत घर करून आहेत आणि सदैव तिथेच त्यांचं स्थान राहील. हे सत्य स्वप्न नाही ना ग? तेव्हा ध्यानीमनी नव्हतं, आपल्या मैत्रीचा प्रवास अखंड सुरु राहणार आहे आणि दिवसागणिक अधिक घट्ट होणार आहे. इतका कि तुझी सोबत जराही सैल पडली तर असह्य होतं. मैत्रीच्या कट्ट्यावर तुझ्याशिवाय जमकट्टा मी इमॅजिनही नाही करू शकत मनू.......
एक प्रकारचा जोम संचारतो जणू काही... .. .
(पाच)
बस्स करा बे!, आता चाळीशी उलटली तरी काय एकमेकांना कारणं देता. समोरच्याला explaination देताय कि स्वतःलाच् समजवताय? मुरलोय आता संसारात आणि कळून चुकलंय कि 'घरोघरी मातीच्या चुली!' संसार म्हणजे रहाटगाडगं आहे, तुमचा आमचा सेम आहे. त्यात पडणाऱ्याला काय चुकलंय कि तुम्ही वेगळं असं काही सांगाल?, आणि समोरचा काय रामबाण उपाय सांगणार कि तुम्ही त्यातून निराळे होऊ शकाल? मग कशाला विनाकारणचा खटाटोप झाकली मूठ न उघडू देण्याचा?... होतंय ना मन काही क्षण हे सगळं झुगारण्याचं? समजून उमजून मांडावासा वाटतोय ना खेळ सवंगड्यां सोबत? एरवी कर्तव्याच्या चौकटीत धावताना नाही ना करत सिमा पार?, मग एखाद वेळेस ती मोडली तर गुन्हा होईल का? आणि जर असेल गुन्हा तर गुन्हा सही!, कुणाला ठाऊक आयुष्यभर तारेवरची कसरत करून स्वर्ग लाभला तर तिथेही स्वतःला इतरांसाठी prove करावं लागणार नाही. कमीत कमी नरकात तुमच्या सारखे 'दोस्ती' चा गुन्हा करणारे तुमचे कमिने दोस्त तरी सोबत असतील. त्यांना तुमच्या कडून एकच अपेक्षा कि कधीतरी धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ चोरून तुम्ही त्यांच्या सोबत मस्तीत घालवावा. बाकी तुमचा व्याप तुम्हालाच सांभाळायचा आहे, म्हणून तुमचं तुम्हालाच ठरवायाचं आहे राजेहो. तुमच्याच आयुष्यातले तुमच्या हक्काचे "काही मंतरलेले दिवस" तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काढायचे आहे कि नाही आणि कसे. पण एव्हडं मात्र पक्क कि मनापासून इच्छा असेल तरच हे जमेल, नाहीतर 'ये रे माझ्या मागल्या' करत एकमेकांना miss करण्याशिवाय दुसरं काही होणे नाही... मग नंतर म्हणू नका बे कि आधी का नाही सांगितलं हे!!!
आणि तो दिवस उजाडतो... .. .
(सहा)
रणरणत्या उन्हात दिवस घालवल्यावर, रात्री स्विमिन्ग पूल मधल्या गारव्या पेक्षा ही खदखदणाऱ्या हास्यकल्लोळ्याची उब लोभस वाटली... भेटीनंतर प्रवासाच्या थकव्या पेक्षा उत्साहाचा जोम भारदार होता. फोटोज काढतांना पोजेस पेक्षा चेहेऱ्यावरचे नॅचरल एक्स्प्रेशन्स जास्त सुंदर उमटलेत. जेवणाच्या मेस वरच्या शाही पदार्थां पेक्षा थट्टा-मस्करी ची लज्जत जास्त भाव खाऊन गेली. रटाळ शॉपिंग च्या तणावा पेक्षा त्याची लगबग चक्क स्फुर्ती देणारी होती... सायंकाळचा सूर्यास्त नि त्याच्या केशरी छटां पेक्षा हर्षोदयाचा इंद्रधनू जास्त रंगीत दिसत होता... चिल्ड बिअर सोबत चकण्या पेक्षा पाचकळ गप्पा जास्त चमचमीत लागत होत्या आणि वायफळ गप्पांच्या नशेची झिंग बिअर पेक्षा जास्त चढत होती... एरवी हावी झाला असलेल्या मोबाईल पेक्षा म्युझिक, डान्स, कराओके, थ्री-कार्ड्स, रम्मी, बिगफुल जास्त आनंद देत होते... ढाब्याच्या चवदार जेवणा पेक्षा चेंगडबाजी ने भूक शमवली होती, वरून एकमेकांना 'थोडं तर खाऊन घे' च्या आग्रहाचा कॉम्प्लिमेंटरी डेझर्ट... समोर दिसणारा नटवरी चंद्र नि मनमोहक चांदणं पेक्षा नटखट मस्ती नि लॉंग ड्राईव्ह ची मौज जास्त आकर्षक होती... रात्रीच्या आठ तासाच्या गाढ झोपे पेक्षा सहवासाचं निवांत लोळण जास्त तजेला देणारं होतं... डिस्परशन च्या दुःखा पेक्षा निरोपाची मिठी सुखद होती... आजचा "मंतरलेला दिवस" शब्दांच्या कुंपणात घेरता येणार नाहीय कारण भावनांची पाखरं अजूनही सैर-भैर उडताहेत ना. जी मांडली तीही सगळी विधानं थोडी वेड्या सारखी वाटतील, पण खरी आहेत. हो ना?, रोजच्या आयुष्यात ह्याला स्थान नाही म्हणून ही खोटी ठरवता येतील?. काश$$$ हे सत्य रोज जगता आलं असतं........
माझी लेखणी परत सळसळायला लागते... .. .
(सात)
"मी मला भेटते. मी माझ्यात हरवून मलाच सापडते. मी माझ्या साठी जगते. मी चा शोध वगैरे घेणे नाही, 'मी' पणा झुगारून स्वतःला अनुभवते." सगळं आपसूकच् घडतं... ह्याचा किमयागार "मंतरलेले दिवस"!! हो, मागे म्हटल्या प्रमाणे आयुष्यातले काही खास राखीव दिवस, देवाचे देणे, 'मंतरलेले दिवस' म्हणजे जुन्या मित्रमैत्रिणीं सोबतचे क्षण. जगाचा विसर न पडता मुक्त पणे हसता येऊ शकतं ह्याचा प्रत्यय... पोट धरून डोळ्यातून पाणी येईस्तोवर हासणं, वेड्यासारखं गाणं आणि नाचणं, फुलपाखरा सारखं खेळणं-बागडणं, अर्ध अर्ध वाटून खातानाही पूर्ण पणाचा आनंद होणं, असं खूप काही,.. जरी सैर-भैर उडणारी भावनांची पाखरं हळूहळू स्थिरावत असली तरी आजही सगळं शब्दांच्या कुंपणात घेरता येणारच नाही मला... कुणी मला जज् करणार नसतं, कुणी मला टोकणार नसतं, कुणी माझ्या कमी पणावर नाराज होणार नसतं, मी आहे तसच् मला स्वीकारलेलं असतं, मला हवं तसं व्यक्त होता येतं. कुठल्या नात्यात बांधण्याची गरज नाही कि रोजनिशीच्या सोपस्काराची अपेक्षा नाही, कुठल्या औपचारीकतेचा पगडा ही नाही. बस्स, वेळात काढलेला थोडा वेळ, मग वेळेचं भान हरपून क्षण अन् क्षण आटोक्यात आणताना अलार्म वाजू नये असं वाटायला भाग पाडतो. स्वप्नवत वाटणारा हा काळ सत्यात आणण्याची कला 'मैत्रीला' बखूब येते. शब्द अपुरे पडत आहेत, पण पुनः पुन्हा ह्या कलाकाराला वाखाणण्याचा मोह काही आवरत नाही.......
ठरवून लिहिता येत नाही मला, जेव्हा क्लिक होतं तेव्हा सुचेल तसं कम्पोज करून लिहिण्याचा चा आनंद घेते... .. .
(आठ)
लोग संदूकेँ जमा करते हैं और मैं अपनी एकही पोटली संभाले हुए हूँ। लोगों के पास उन्हें गिनने तक का वक़्त नहीं और मैं बीते लम्हों को ही बार बार जीती हूँ। पता नहीं वो अमीर हैं या मैं गरीब!!..... दुनियादारी में अपनी ही दुनियाँ खो जाती हैं और भरी दुनियाँ में जब अकेला महसूस हो तब दोस्तोँ में ही दुनियाँ नज़र आती हैं। दिल के रिश्तें जैसे मेरी पूंजी और अहसास मेरा एक अटूट हिस्सा लगता है। मुझे यक़ीन है के अगर वक़्त ख़र्च कर सको तो सौदा किफ़ायती होगा, इन लम्हों का पिटारा सोना-चांदी, जड़-जवाहरातों से भी मूल्यवान लगेगा। पिटारे से धुॅंधली सी बाहर आती एक एक करके यादें अहसास बनती पाओगें। पर हर किसीके बस की बात कहाँ कि जिंदगी यूँही अहसासों के नाम ज़ाया करें। और भी बहोत क़ुछ ज़रूरी होता हैं, लक्ष्य, उद्देश्य, अर्थ, उपलब्धि या फिर ज़िम्मेदारी। मैं क्यूँ नहीं जोड़ पाती हूँ इनको पूर्ति से, सफलता को संतुष्टि से और क़ाबिलीयत को खुशियोँ से। पता नहीं दुनियाँ सही हैं या मैं ग़लत!!.......
मुझे ये अहसास सुख और आनंद की अनुभूति देता हैं। इसीलिए इन जज़्बातों को मैं लब्ज़ों का रूप देके आपको शाब्दिक अभिव्यक्ति का अनुभव देने की चेष्टा करती हूँ। कितनी बावली हूँ ना मैं?!... .. .
(नऊ)
परमेश्वराच्या लीला अनाकलनीय, त्याच्या मनी काय त्यालाच ठाव! नेहमी कुतूहल वाटतं त्याची किमया बघून कि आयुष्याचा प्रवास घडवताना एक एक व्यक्ती जोडत जातो नि जीवनाची गुंतन रचून पकड मजबूत करत जातो. असं म्हणतात कि पती-पत्नी च्या जोडया वरूनच् बनवून पाठवतो. मग रक्ताच्या नात्याशिवाय नाळ जोडल्या जाणाऱ्या मैत्रीच्या नात्याचं काय?, कधी अजाणते पणीही गुंफल्या जाते आणि नकळतच घट्टही होते. उकलता येणे कठीणच् कि परस्परविरोधी दोनाच्या मैत्रीत कुठला बरं धागा असेल!? पण ह्या रेशीमगाठींचं गूढ कुणाला उलगडलय आजवर, तर मग नुसतं अनुभवायचं भरभरून हे स्नेह. गोळा करत राहायचे "मंतरलेले दिवस" आपआपल्या झोळीत. कधीतरी उबडायची आणि पसरलेल्या आठवणींचा पसारा एक एक करून परत सावडायचा. त्यातली एखादी जुनी मैत्री खुलून कधी तरूणानुभव देऊन जाते. तर कधी कौतुक करून आत्मविश्वास देऊन जाते. आणि कधी डोळ्यातून टप टप करून मन हलकं करून जाते. मग कपाटाच्या मागच्या कोपऱ्यात परत तिच्या जागेवर सांभाळून ठेऊन द्यायचा हा अनमोल ठेवा... आज परत एकदा हृदयाच्या मैत्रीच्या कप्प्यात जम करून बसलेल्या तुमच्या आठवणींशी भेट घेतली नि रमले ना त्यात म्हणून तर हे सुचलं. भेट, कधी निवांत तर कधी धावत पळत का होईना पण मैत्रीचा ओलावा त्यांनी कोरडा पडू दिला नाही. अधिक दुर्लभ झाली असली तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आयुष्याच्या उदास क्षणांवर मैत्रीची फुंकर घातल्या जाते ना तेव्हा आपल्याला प्रफुल्लित करून जाते.......
मैत्रीचा हा लडिवाळ दिलखुलास स्वभाव पचवणं तसं कठीणच. तुम्हाला अजीर्ण तर नाही होत आहे ना ह्या मैत्र पक्वान्नाने? काळजी करू नका, पुढचा शेवटचाच भाग... .. .
(दहा)
विश्वास,.. कुठल्याही नात्याची मूलभूत नींव! विश्वास, भरवसा, ट्रस्ट, बिलीफ, अश्या कुठल्याही शब्दात तो मांडता येत नाही तर भावनेतून पोहोचतो. जिथे गैरसमज ची पाल ही चुकचुकत नाही, तिथे भक्कम पायव्यावर उदयाला येतं एक सुंदर निर्मळ नातं. अव्यक्त राहूनही कधी कधी दोन जीव अलवार एकमेकांशी जोडल्या जातात. आणि खुलता कळी खुलेना होणारे देखील आपसूकच् एकमेकात मनमोकळं खुलतात. त्यांना ओढ लागते ती कधी न संपणाऱ्या गप्पांची. मग शेरिंग च्या मलमल वर विणल्या जाते निखळ मैत्री! दिल, दोस्ती वर दुनियादारी भारी पडत असली तरी मैत्रीसाठी वेळ चोरून काढतो की नाही आपण?! अशीच नाही काही दोस्ती-यारी ची रेशम-गाठ ह्या दुनियादारी च्या ऐरणीत कडी दर कडी तासून साखळदंडात मजबूत होत..... प्रत्येकाला असा एक तरी मित्र असावा, आरश्या सारखा निरभ्र. तुमचे गुण व अवगुण दोन्हीं व्यक्त करून दाखवणारा. कृष्णा सारखा गुणांची जाणीव करवून, सारथी बनून सोबत करणारा. आणि कर्णा सारखा अवगुण दाखवूनही, लढवय्या बनून सोबत करणारा. मुळात मैत्री आपल्याला आपण जसं आहोत तसं गुण अवगुण सहित स्वीकारत असतेच. म्हणून ती कायम आपल्याला बेटर बनवण्यात सोबत करत राहते. आणि त्यात ती स्वतः देखील घडत जाते, कळत नकळत..... तसं तर आयुष्यातील चढ उतार आपल्याला घडवत असतात. तसंतसं वर्षागणिक आपल्यात बदल होणे स्वाभाविक असते. पण त्यातही ही मैत्री आपल्यातील चार्म मात्र अबाधित ठेवते..... कसा आणि किती किती वर्णावा जादू हिचा?! भारावून टाकतात हे "काही मंतरलेले दिवस", नि लिहायला बसले की लिहीतच सुटते मी. तुम्ही तो अत्याचार सहनही करता म्हणा. पण मैत्रीला सजवायला शब्दसुमनांचा वर्षाव करण्यात जो आनंद मिळतो ना तो मात्र काही शब्दात मांडता येत नाही. खरं तर मैत्री शब्दांपल्याड! खूप साऱ्या शब्दसमुहातही न व्यापणारी आणि तोकड्या अक्षरांतही खूप सारं बोलून जाणारी. मग कधी तरी अव्यक्त आभास लाही भावना पोहोचवू देत.......
