ज्याचा शेवट छान ते सारेच छान
ज्याचा शेवट छान ते सारेच छान
काही नाटकांची नावं गुंफून छोटंसं स्कीट करण्याचा माझा प्रयत्न!
'भरत आला परत'.अर्थात हे होणारच होतं.
'तो मी नव्हेच'असं म्हणून जबाबदारी टाळता नाही येत. शेवटी भावाभावांचे
'हे बंध रेशमाचे' असतातच.
त्या दिवशी,'दादा एक गुड न्यूज आहे' असं म्हणत मनोज भरतपाशी आला आणि मोबाईलवर एका मुलीचा फोटो झूम करत भरतला दाखवत म्हणाला ही
'लग्नाची बेडी'मला अडकवून घ्यायची आहे.
फोटो बघताच भरत हादरुन गेला.त्याची
'प्रियतमा'पण तीच तर होती.त्याच्या 'सौजन्याची ऐशी तैशी'होऊन तळपायाची आग मस्तकाला पोचली आणि तडकाफडकी त्याने हे'घर श्रीमंताचे'सोडले.
संतापाच्या भरात तो आपल्या प्रेयसीला उद्देशून 'यू मस्ट डाय'असं बरळत होता.अर्थातच त्याची तेवढी हिम्मत झाली नाही.'अ परफेक्ट मर्डर' वगैरे फक्त कथा-कादंबऱ्यातच असतं. शिवाय तिच्याबरोबर त्याने 'चार दिवस प्रेमाचे' घालवले होतेच की, त्यामुळे तिच्यावर प्रेम होतंच.शेवटी तिला 'अखेरचा सवाल' करावा म्हणून तो तिच्या घरी गेला.तिने ह्याचे सगळे आरोप ऐकून घेतले आणि 'मला काही सांगायचंय' एवढंच बोलली.तिच्या धाकट्या बहिणीला तिने हाक मारुन बोलावलं.
'खरं सांगायचं तर' सगळा केवळ 'संशयकल्लोळ' होता.मनोजची प्रेयसी हिची धाकटी बहीण निशा होती.त्या दिवशी गडबडीत त्याने ह्या दोघींच्या एकत्र फोटो मधला निशाचा फोटो झूम करायच्या ऐवजी भरतच्या प्रेयसीचा,दिशाचा फोटो दाखवला.फोटो बघून भरत एवढा चिडला होता की त्याने निशाच्या ऐवजी दिशा हे नाव ऐकलं आणि रागाच्या भरात घर सोडलं.निशाने घरी मनोजची ओळख 'नाथ हा माझा' अशी करुन दिल्यावर दिशाला बघून मनोजच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि त्याने ह्या दोघींनाही सगळं सांगितलं. आता 'ऑल लाईन क्लिअर' झाल्या.पुन्हा 'मनोमिलन' होऊन भरतच्या
'एका लग्नाची गोष्ट' सुफळ संपूर्ण झाली.
"कुर्यात सदा मंगलम्"
