जत्रा
जत्रा
बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिनेमागृह, हॉटेल्स, मॉल्स अशा अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जनसमुदाय एकत्र येत असतो. त्यातलेच एक स्थळ म्हणजेच 'जत्रा 'हे होय.
अशा या जत्रेचे आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. अशीच एक जत्रा म्हणजे नांदेड जिल्ह्यातील, लोहा तालुक्यातील माळेगाव येथील श्री .खंडोबाची जत्रा होय. या जत्रेमध्ये लहान मुले आणि वयस्क मंडळीही खरेदी करण्यासाठी फार रमून जातात. या जत्रेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी आकाश पाळणा, विविध प्रकारची झुले, घोडेस्वारी, उंट सवारी, बंदुकीने फुगे फोडण्याचा खेळ, छोट्या मोटार कार अशी विविध प्रकारची खेळण्याची साधने असतात. वयस्कर लोकांसाठी खरेदी करण्यासाठी जीवनोपयोगी वस्तूंची दुकाने असतात. श्री खंडोबाच्या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बैलांचा बाजार असतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या जत्रेत सहभागी होतात. निरनिराळ्या खाऊची दुकाने ,छोटी-छोटी हॉटेल्स , आईस्क्रीम, गुपचूप, भेळपुरी हात गाड्या, प्रसादाची दुकाने याने जत्रेचा परिसर अगदी गजबजून जातो. अनेक लोक कपडे, चादरी, चटया, घोंगडी, भांडी अशा विविध प्रकारच्या गरजेच्या वस्तू जत्रेमध्ये खरेदी करतात. या जत्रेचे आकर्षण म्हणजे 'लावणी शो' होय. त्याचप्रमाणे या जत्रेमध्ये कृषी प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती दिली जाते. विविध प्रकारची बी-बियाणे, खते यांची माहिती दिली जाते आणि ते विक्रीसाठी ठेवले जातात. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पसंतीची जत्रा ठरते.
वरील प्रकारची श्री. खंडोबाची यात्रा ही माझ्यासाठी बालपणापासून आकर्षणाचा भाग बनलेली असून मी माझ्या दोन मुलांना घेऊन जत्रेचा आनंद लुटते.
