Poonam Wankar ( पूरवा )

Classics

4.0  

Poonam Wankar ( पूरवा )

Classics

जीवन से भरी तेरी आँखें

जीवन से भरी तेरी आँखें

7 mins
257


          सकाळी सकाळी हॉस्पिटल ला जायला निघालो. मधेच ट्रॅफिक जाम झालं. इतकं ट्रॅफिक सुटत पर्यंत साधारण वीस मिनिटे तरी लागलीच असती. पल्लू म्हणजेच पल्लवी माझी लाडकी बायको. अहो..! रुसून बसली होती ना! खर तर, माझ्यामुळेच आज तिलाही कॉलेज ला जायला उशीर झाला. त्यामुळे जरा चिडली होती. आता बायको चिडली म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, नवऱ्याने शांत बसाव... म्हणजे युद्ध टाळता येत...! खर तर आज तिला पहिलं लेक्चर घ्यायचं होत. पण माझ्यामुळे जरा उशीरच झाला. त्यामुळे स्वारी जरा चिडली होती. मी हळूच गाडीतील एफ. एम. ऑन केला. सुंदर गान लागलं..


"ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं

इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं

ये आँखें ..."


             माझ्या पल्लुचे डोळे देखील खूप सुंदर आहेत. मावळत्या सूर्याच्या तांबड्या छटा असलेले तिचे पाणीदार डोळे! जणू काही अख्ख ब्रम्हांड तिच्याच डोळ्यात सामावलय. पहिल्यांदा तिला पाहिलं त्याच क्षणी तिच्या डोळ्यांच्या प्रेमात पडलो होतो मी. आणि अजूनही त्यांच्याच प्रेमात आहो. तिच्या डोळ्यात पाहिलं की दिवसभराचा थकवा, दिवसभरात होणाऱ्या सर्जरी, या साऱ्यांचा क्षिण एका क्षणात निघून जातो.


             इतक्यात विंडो च्या काचेवर ठक ठक ऐकू आली. मी काच खाली केली एक लहानशी चिमुकली हातात गुलाबाची फुलं घेऊन उभी होती. मला लगेच म्हणाली, " काका, गुलाबाचं फुल घ्या ना!" " नको ग बाळा, मला नकोय फुलं . मी आता कामावर चाललोय. फुल घेऊन काय करणार?" मी म्हणालो. " अहो काका ! काकूंना द्या ना ! त्या खुश होतील! " ती हसत हसत म्हणाली. तीच ते निरागस हसू बघून आम्ही दोघेही हसू लागलो. चला..., त्या मुलीमुळे का होईना; ... अहो! बायको हसली माझी! ... मी लगेच खिशातून शंभर ची नोट काढली आणि होती नव्हती तिच्या जवळची सगळी फुले घेतली आणि पल्लवी ला दिली. त्या फुलांमुळे पल्लवीच्या ओठांवरल्याही कळ्या उमलल्या.


              "काय ग चिमणे? तुझ नाव काय? कुठे राहतेस? आणि शाळा शिकत नाहीस का तू? " पल्लवी ने त्या मुलीला विचारले. "

"माझं नाव मिनी. त्या रस्त्यापलीकडल देऊळ दिसते ना? मी तिथेच वस्तीत राहते. माझे आई बाबा रस्त्यावर अपघातात गेले दोन वर्षांपूर्वी. आज्जी आहे घरी, पण तिही थकली आता. तिच्या औषध पाण्याला पैसे लागतात ना! म्हणून ही फुल सकाळच्या वेळी विकते. दिवसभर तिथेच देवळा जवळ काकाच्या दुकानात बसून हार बनवायला मदत करते त्याला. सरकारी शाळेत जाते. पण आठवड्यातून एकदा. मैत्रिणी सांगतात शाळेचा अभ्यास. मी मन लावून करत असते. मला ना मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे. त्यासाठी मी खूप मेहनत करणार. माझ्या वस्तीच्या लोकांसाठी मला डॉक्टर व्हायचंय. माझा बाबा पण म्हणायचा, 'काही झाल तरी, खूप मेहनत करीन आणि माझ्या मिनीला डॉक्टर बनविन.' त्याच स्वप्न मला पूर्ण करायचं आहे."


                मिनीच हे बोलण ऐकुन आम्ही दोघेही शांत झालो होतो. इतक्यात हॉर्न च्या आवाजाने कानठळ्या बसल्या. रस्त्यावरच्या दिव्यांनी ग्रीन सिग्नल दिलं होतं. तिथून पुढे निघालो. पल्लू ला कॉलेज मध्ये सोडून मी पुढे हॉस्पिटल ला पोहचलो. आज कुठल्या इमर्जन्सी केसेस किंवा कुठल्या सर्जरी नव्हत्या. त्यामुळे मी राऊंड वर जाऊन सगळ्या पेशंट चा फॉल अप घेतला.


            कधी अस होत नाही पण आज पहिल्यांदाच मला हॉस्पिटलला निवांत मिळाली. पण कोण जाणे त्या मिने चे विचार राहून राहून मनात येत होते. मिनी ने मनाच्या खोल तळापर्यंत जाऊन तिच्या शब्दांच्या खुणा सोडलेला होत्या. इतक्यात फोन वाजला. साधारणतः संध्याकाळी चार वाजताची वेळ असेल . "हॅलो! " मी काही विचारणार तोच पुढून डॉ. अजय बोलले,

" डॉ. सुनीत प्लीज जरा खाली या! एक इमर्जंसी आहे. एक्सिडेंट ची केस आहे."


             मी तातडीने खाली उतरलो. Stretcher वर एक लहान मुलगी होती रक्ताने तिचा चेहरा माखला होता. जराही विलंब न करता मी लगेच तिला ओटीमध्ये घ्यायला सांगितल. सिस्टरने तिचा चेहरा कॉटनने क्लीन केला. बघतो तर काय ! सकाळी गुलाबाच्या फुलाप्रमाणे खळखळून हसणारी मिनी रक्ताच्या थारोळ्यात निपचित होऊन पडली होती. तिच्या हातापायाला जबर दुखापत झाली होती. गाडीच्या फुटलेल्या काचा तिच्या चेहऱ्यावर जाऊन खुपसल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. अचानक मला वेगळीच शंका आली. मी लगेच टॉर्च घेऊन तिच्या दोन्ही डोळ्यात पाहिलं. काचाचे बारीक कण तिच्या डोळ्यात देखील जाऊन रुतले होते. सकाळी मिनी ने तिच्या घरची परिस्थिती सांगितलीच होती. त्यामुळे कुणाचीही वाट न बघता माझ्या रिस्क वर मी तिला ऑपरेट केलं. तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात खूप सूक्ष्म असे काचेचे तुकडे असल्या मुळे ते सर्व काढताना बराच वेळ लागला. या अपघातामुळे मिनीच्या दोन्ही डोळ्यांचा कॉर्निया पूर्णपणे डॅमेज झाला होता.


             कॉर्निया हा डोळ्याच्या बाहेरील बाजूचा एक महत्वाचा भाग असतो. ज्याची रचना डोळ्याच्या बाहेरील बाजूने पारदर्शक काचेसारखी असते. काळ्या अथवा तपकिरी रंगाचे बुब्बुळ म्हणजे या कॉर्नियाच्या मधील एक पडदा असतो. डोळ्यांच्या लेंसवर पडणारा प्रकाश रेटीनावरुन परावर्तीत होतो व त्याचा संदेश मेंदूकडे पाठवला जातो. ज्या द्वारे आपल्याला एखादी प्रतिमा समजते. या क्रियेमध्ये कॉर्नियाचे काम डोळ्यांवर प्रकाश केंद्रित करणे हे असते. त्यामुळे जो पर्यंत एखादा डोनर मिळणार नाही तिच्या आयुष्यात अंधार राहणार होता. नातीचा अपघात झालाय हे ऐकुन तिच्या आजीची ही प्राणज्योत मावळली होती.

                तिचा मानलेला काका, त्यानेही हात वर केले. म्हणतात ना, "सगळ्या गोष्टींचे सोंग करता येतात पण , पैशाचं सोंग करता येत नाही."

                

                 ज्या इवल्या इवल्या डोळ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होत, त्या डोळ्यांपुढं अंधार साचला होता. कधी नव्हे ते पहिल्यांदा माझं मन सुन्न झालं होतं. सायंकाळी घरी गेल्यावर सारी हकीकत पल्लवी ला सांगितली. तिचेही डोळे नकळत गळू लागले. सकाळी त्या चिमण्या मिनीची स्वप्न ऐकुन, तिची जिद्द बघून आम्ही दोघेही तिच्यात हरवून गेलो होतो. त्यात तिच्या डोक्यावरून मायेचं छत्र देखील नियतीने हिरावून घेतलं होत.

             "सुनीत.., ऐक ना! मिनी का कधीच नाही का रे बघू शकणार?" पल्लु ने विचारले. "

             "का ? का नाही बघू शकणार ती ? नक्कीच बघू शकेल. तिच्या कॉर्नियाचा फक्त बाहेरील थर डॅमेज झालाय . Lamellar Corneal Transplant केल्याने ती परत आधिप्रमाने बघू शकेल. " मी तिला सांगू लागलो.

"ओके, मग यात खर्च किंवा रिस्क खूप मोठी आहे का?" पल्लू ने विचारल.

"नाही ग..! खूप काही खर्च नाही . अगदी २५ ते ३० हजारांमधे होऊन जाईल. हो पण हे डोनर वर देखील अवलंबून असत. " मी म्हणालो.

पल्लवी : "सुनीत.., एक म्हणू का तुला ? म्हणजे सहज डोक्यात आलं."

सुनीत : "हो, बोल ना!"

पल्लवी : "आपण करू या का रे हा खर्च. तिच्या अंधाऱ्या आयुष्यात परत उजेड करू या ना! आपल स्वतःच बाळ असत तर आपण केलंच असत ना! शिवाय आपण हे सगळ बेअर करूच शकतो ना!"


                आज पहिल्यांदा पल्लवीच्या स्वरात बाळ नसल्याची खंत होती. ती आई होऊ शकत नव्हती. तिला गर्भाशय नसल्या कारणाने ती कधीही आई होऊ शकणार नव्हती. पण अगदीच लहान पणापासून माझं तिच्यावर प्रेम होत. त्यामुळे मी तिला लग्नासाठी प्रपोज केलं. तेव्हा तिने मला नकारच दिला होता. पण एक अवयव नसल्याने माणसाचं आयुष्य संपत नसत. मी तिला खूप समजावलं. माझे आई वडील ही खूप समजदार होते. त्यांनी ही तिला समजावलं....,


"आपल बाळ नाही म्हणून काय? आपण एखाद बाळ दत्तक घेऊ या ना!" हे माझ्या आईचे बोल ऐकून तिच्या मनाला खूप मोठा आधार मिळाला होता.

सुनीत: " हो पल्लू, आपण नक्कीच करू शकतो. मी उद्याच eye bank शी कॉन्टॅक्ट करतो. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण करू या."

               दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लू देखील माझ्याबरोबर हॉस्पिटलला आली. एरव्ही कधीही सुट्टी न घेणारी ती पण कोण जाणे तिने त्या दिवशी सुट्टी टाकली. आम्ही हॉस्पिटल ला पोहचलो तेव्हा मिनीच्या रूम मधून गोंधळ ऐकू येत होता. आम्ही दोघंही धावत तेथे पोहचलो. सिस्टर तिला औषधी देण्याचा प्रयत्न करत होत्या. मी सिस्टर ला बाहेर जाण्याचा इशारा केला.

मी: " मिनी , बाळा काय झालं ? औषध का नाही घ्यायची ? तुला लवकर बर व्हायच आहे ना ? मग औषध घ्यायला नको का?"

मिनी : " कोण..? गाडी वाले काका!! हे तुम्हीच आहे ना ? "

पल्लवी : " अरे वाह! मिनी तू काकांचा आवाज बरोबर ओळखला ."

मिनी : " अरे .. ! काकू तुम्ही पण.. तुम्ही पण आलात. " पण , तुम्ही दोघं इथे कसे ?"

मी : " बाळा , आता तू जिथे आहेस ना ! मी याच हॉस्पिटलला डॉक्टर आहे. "

           माझे हे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकले.

मिनी :  " काका.., मी परत कधीच नाही का बघू शकणार? माझ्या डोळ्यांवरील पट्टी नाही का उघडणार कधीच? सांगा ना काका..??"

पल्लवी : " अग मिनी, तू शांत हो बर बाळा आधी.! कोण म्हणाल तुला.. की तू बघू शकणार नाही म्हणून..? तू लवकरच तुझ्या या सुंदर डोळ्यांनी आधी सारखं बघू शकणार आहेस. पण त्यासाठी तुला सगळ्या औषधी, जेवण नीट घ्यावं लागेल ना!!"


               पल्लवी मिनीला जवळ घेऊन समजावू लागली. आज पल्लवी जणू काही मिनिची आईच आहे अशी तिची काळजी घेत होती. ते काही दिवस पल्लवीने मीनिची खूप काळजी घेतली. तिचं खाणं पिणं , तिच्या औषधी या सगळ्यांकडे तिच व्यवस्थित लक्ष असायचं. मिनी ही आता मागच सगळ विसरून पल्लवी सोबत जुळून गेली होती. काही दिवसातच मला eye bank कडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. मिनिसाठी कॉर्नियाची व्यवस्था झाली. आणि दोन दिवसात मिनीच Lamellar Corneal Transplant यशस्वीपणे पार पडलं.


                आज मिनीच्या डोळ्यांवरील पट्टी उघडणार होती. मी सहज तिला म्हणालो,

" मिनी, तुला तुझ्या नव्या डोळ्यांनी सर्वात आधी कुणाला बघायचं आहे? "

" काका.., मला माझी आई बघायची आहे!" ती शांतपणे म्हणाली.

                आम्ही दोघेही स्तब्ध झालो. कारण तिचे आईवडील ती लहान असतानाच तिला सोडून गेले होते.

मिनी : " मी आजारी असताना जिने माझी काळजी घेतली, मला हाताने भरवल, रात्री अंगाई गाऊन निजवल ! मला ती आई सर्वात आधी बघायची आहे!"


             मिनी हे सगळ पल्लवी विषयी बोलत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मिनीला खूप जवळ घेत तिचे पापे घेतले. मिनी ही तिच्या कुशीत शिरून शांत झाली. त्या दोघींना बघून माझे ही डोळे कधी गळायला लागले मला कळलंच नाही. मी आणि पल्लू ने मीनीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर आमचं कुटुंब एक सुखी कुटुंब झाल. मिनी खूप हुशार आणि जिद्दी होतीच. तिची जिद्द , तिची चिकाटी , या साऱ्याच फळ तिला आज मिळालं होत. तीच डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. आणि ठरवल्या प्रमाणे ती तिच्या वस्तीच्या लोकांची मनोभावे सेवा करत होती. आम्ही दोघेही तिच्या कडे बघून नव्याने जगू लागलो. तिच्या डोळ्यात पाहिलं की एकच गाणं आठवतं.....

                  "जीवन से भरी तेरी आँखें

                  मजबूर करें जीने के लिए...!!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics