झपाटलेले घर (भाग-२)
झपाटलेले घर (भाग-२)
बाहेरून जीर्ण दिसणारे ते घर आतून एक प्रशस्त राजवाडाच होते. सुरेश आत गेल्या नंतर बघतच राहिला. हंड्या झुंबर लावलेला, रंगीतसे प्रकाश दिवे लावून सजवलेला एक प्रशस्त हॉल. मध्यभागी काचेचा टेबल, भोवताली आरामदायी खुर्च्या, भिंती शेजारी मऊमऊ गादी आणि वरती नक्षीदार मऊ रेशमी आच्छादन असलेला सोफा हे सारे काही हॉलची श्रीमंती दर्शवित होते. एका बाजूला फक्त काचेच्या खिडक्या, त्यावरचे रेशमी पडदे त्या घरातील गृहिणीच्या कलेची साक्ष देत नाजूकशी हालचाल करत होते. पडदा बाजूला केल्यावर बाहेरचे दृश्य मनाला मोहित करत होते. उंच उंच नारळाची झाडे बाजूच्या समुद्र बाजूने येणाऱ्या वाऱ्याने वाकलेले, जणू हॉलमध्ये काय चालले आहे ते बघण्यासाठी वाकून खिडकीतून डोकावत होते.
ही सारी श्रीमंती, तो बडेजाव सुरेश मंत्रमुग्ध होऊन न्याहाळत होता, तेवढ्यात...
"सरकार, एवढं काय न्याहाळता गरीबाच्या झोपडीला?" राधिकाच्या आवाजाने तो भानावर आला.
"अं? हो! काही नाही! सहजच. हे आपलंच का सारं? एवढं सुंदर दृश्य आहे की नजर हटतच नाही." त्याने ओशाळत उत्तर दिले.
"एवढं टक लावून बघितल्यावर एखादे वेळी दृष्टही लागायची ." राधिका.
"दृष्ट लागण्यासारखंच वैभव आहे हे. पण हे सारे काय आहे? मला काही लक्षात येईना." सुरेश विचारता झाला.
"सुजीत, सारे काही एवढ्यातच विसरलास?" राधिकाचा लाडिक प्रश्न.
"सुजीत? कोण सुजीत? अगं मी तर सुरेश आहे?" गोंधळून त्याने प्रतिप्रश्न केला.
"असं रे काय करतोस सुजीत? अरे मी तुझी राधिका. तुझी प्रेमिका. मी तुझी राधा नि तू माझा सखा कृष्ण, सुजीत. आपण एकमेकांमध्ये गुंतलो होतो की, राधाकृष्णाचीच जोडी." तिचे खुलासे वजा उत्तर.
"मला काहीच उमजेनासं झालंय सारं. जरा सविस्तर सांगाल का?" गोंधळून सुरेशने विचारले.
"मला तू अहो जाहो का म्हणतोयस? मी तुझी राधिका नाही का? आपण एकमेकांच्या प्रेमात गुंतलो, एकमेकांशिवाय जगणे आपल्याला मुश्किल झाले होते. तशा आणाभाकाही घेतल्या होत्या, जन्मोजन्मी एकत्र राहण्याच्या. एकाच जन्मात विसरलास?" ती त्याची आठवण ताजी करण्याचा प्रयत्न करत होती. पण सुरेशला मात्र काहीच आठवत नव्हते.
"मला स्पष्ट करून सांगाल का हे काय चाललं ते? तुम्ही कोण आहात? हा राजवाडा कुणाचा? या राजवाड्यात आणखी कोण कोण राहतात? मला इथे कुणी आणि का आणले? नुसता गोंधळ सुरू आहे डोक्यात माझ्या. लवकर नाही कळले तर नक्कीच वेडा होईल मी." सुरेशने अनेक प्रश्न तिच्या समोर ठेवले.
"एवढे सारे प्रश्न एकदाच विचारले. उत्तर कसे आणि केव्हा देणार? आणि आता अपल्याकडे वेळही नाही तेवढा. मी तुला सारे सविस्तर सांगेन. माझ्यावर विश्वास ठेव. मी इथे तुझ्या प्रतीक्षेत एकटीच राहते. कधीची वाट पाहत होते तुझी. तू आलास, माझी तपश्चर्या पूर्ण फळाला आली. जाऊ दे. भूक लागली असेल, मी स्वयंपाक करते. जेवण करून आराम करू. बोलू आपण सकाळी निवांत. आपला दोघांचा हा वाडा बघून घे. तोवर आत्ता जेवण तयार करते." असे म्हणून ती लगेच स्वयंपाक घराकडे वळली. तोही आज्ञाधारक मुला सारखा वाडा बघायला निघून गेला.
हॉल तर बघितलाच होता. स्वयंपाक घरात डोकावल्या बरोबर तिने त्याला तिकडे येण्यास मज्जाव केला. मग त्याने शयन गृहाकडे मोर्चा वळवला. शयन गृहात गेल्यावर तर तो अगदी दंग झाला. ते शयनगृह एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधल्या सुसज्ज खोलीप्रमाणे सजवलेले होते. मध्यभागी दिवाण, त्यावर मऊमऊ गादी, रेशमी बेडशीट, दोन उशा, समोर टीव्ही, साउंड बॉक्स, रंगी बेरंगी फुलांचे गुच्छ. रंगीत दिव्यांचे झुंबर. खजुराहोमधील शिल्पांचे भिंतीवर रेखाटलेली रेखाचित्रे. हे सारे बघायला त्याला बराच वेळ लागला. तोवर राधिका त्याला बोलवायला जवळ येऊन उभी राहिली होती.
"झालं का बघून सारं? बघून झालं असेल तर जेवायला वाढायचं का? चल आपण जेवण करून घेऊ." असं म्हणून ती माघारी फिरली. तो ही भारावल्या प्रमाणे तिच्या मागे फिरला.
दोघेही भोजन गृहात आले. मध्यभागी एक टेबल मांडलेला होता. समोरा समोर दोन खुर्च्या, टेबलवर जेवणाचे सर्व सामान मांडून ठेवलेले होते. ते सर्व पदार्थ पाहून सुरेश अचंबित झाला. 'एवढे सारे पदार्थ हिने कधी बनवले असतील.' त्याला विचार पडला. दोन तीन भाज्या, पुरी, गोड भात, वरण, आमटी, यांच्या बरोबर शिऱ्याच्या खमंग वासाने त्याची भूक खवळली. दोघेही जण आपापल्या खुर्चीवर बसले. तिने दोघां साठी ताट केले. दोघांनी जेवण सुरू केले. गप्पा करत करत जेवण झाले. प्रवास करून आलेला असल्या मुळे आणि पोटभर जेवण झाल्यामुळे सुरेश सुस्तवल्या सारखा झाला. कधी एकदा अंथरुणा वर पडतो असे त्याला झाले.
तिने शयनगृहात मंद स्वरात सिने संगीत लाऊन दिले. मंद मंद दिवे लावून दिले आणि आवरा आवर करण्या साठी किचनमध्ये घुसली. सर्व सामानाची आवरा आवर झाल्यावर दोन ग्लास दूध मसाला आणि केशर घालून तयार केले. दोन्ही ग्लास घेऊन ती शयन गृहात शिरली. सुरेश संगीत ऐकत पहुडला होता. डोळ्यावर झापड आलेली होती. हलकासा आवज देऊन तिने त्याला उठवले. दोघांनीही दूध घेतले आणि बिछान्यात लवंडले.

