Pandit Warade

Horror Romance Tragedy

3.0  

Pandit Warade

Horror Romance Tragedy

झपाटलेले घर - भाग-४

झपाटलेले घर - भाग-४

4 mins
232


    सुरेश आणि राधिका जेवण करून आराम करण्यासाठी बिछान्यावर पडले. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तिला तिचा प्रियकर भेटला म्हणून ती अतिप्रसन्न होती. तर या तरुणीशी आपला कुठलाही परिचय नसतांना आपण हिच्या सूचने नुसार का वागतोय? या प्रश्नाने विचलित झालेला सुरेश खूप थकलेला असूनही झोपू शकत नव्हता. म्हणून काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी ती त्यांची कहाणी सांगायला सुरुवात करते. .....


   लामणगावचे किसनराव पाटील. एक बडी श्रीमंत अशी असामी. गावचे मोठे सावकार. अडल्या नडलेल्या लोकांची मदत करणे. त्यांना त्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे, त्याला मजबूतपणे उभे राहता येईल इथ पर्यंत मदत करणे त्यांचा आवडता छंद. कर्ज फेडी साठी कधीही कर्जदारा मागे तगादा लावला नाही किंवा कधी जास्तीचे व्याज वसूल केले नाही. वेळ प्रसंगी व्याजात सूट देऊन कर्जमुक्तही करायचे. यामुळे गावात त्यांना मानणारा, त्यांचे मानणारा खूप मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा होता. गावातल्या ग्राम पंचायती मध्ये ते एकमेव बिनविरोध सदस्य असायचे. 


   किसनरावांचा एकुलता एक मुलगा शामराव. वडील गेल्यावर दुसऱ्याची अडचण ही आपली संधी मानत त्यांनी वडिलांचा सावकारकीचा धंदा स्वतःच्या हातात घेतला. अडलेल्या नडलेल्याला मदत करायची मात्र त्या बदल्यात जमिनीचा सात बारा किंवा वस्तू तारण ठेऊन घ्यायचा. त्याला ते तारण मुदतीच्या आत सोडून घेता येऊ नये अशी बिकट परिस्थिती निर्माण करायची आणि जमीन हडप करायची, वस्तू हडपायची. अशा पद्धतीने लवकरच त्यांची संपत्ती दाम दुपटीने वाढू लागली. मात्र किसनरावांच्या पाठीशी ठाम उभे राहणाऱ्या लोकां पैकी कोणीही शामरावांची साथ द्यायला कधीही तयार झाले नाहीत. बिनविरोध मिळणारे ग्रामपंचायत सदस्यत्व आता लाखो रुपये खर्चून पदरात पाडून घ्यावे लागायचे.


   शामरावांना लग्नानंतर पहिल्या बारा वर्षात पाच मुले झालीत. पण त्यातले एकही वाचले नाही. एक एक वर्षाच्या आत ते वारले. मालतीबाई शामरावांच्या पत्नीला ही गोष्ट मनाला फार लागून राहिली. शामरावांचे वागणे त्यांना बिलकुलच पटत नव्हते. त्या तशा बोलूनही दाखवायच्या, 

    "अहो, तुम्ही कर्जापायी किती तरी कुटुंबांची दुर्दशा केलीत, त्यांना देशोधडीला लावले. त्यांचा तळतळाट घेतला. तोच आता आपल्याला भोवतो आहे. लोकांच्या हडपलेल्या जमिनी परत करा. मागे सांभाळायला कुणी नसेल तर कुणा साठी कमावून ठेवायचे हे सारे ?" 


    मालतीबाईंचा सल्ला शामरावांना मानवणार थोडाच होता. डोक्यात शिरलेले गर्वाचे भूत उतरते थोडेच? रावणाला त्याची पत्नी मंदोदरीने सीतेला आदरपूर्वक सोडून देण्याविषयी किती आग्रहपूर्वक समजावले होते. परंतु त्याने कुठे ऐकले? सौंदर्याची लालसा कुठे सुटली? तसेच शामरावांची वित्ताची लालसा कधी सुटली नाही. मालतीबाईंची प्रकृती खालावत गेली. राधिका दोन वर्षाची झाली आणि त्यांनी अंथरूणच धरले. शामरावांनी दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च केले, परंतु पत्नीला वाचवता आले नाही. पत्नी गेल्या नंतर शामराव पुरते खचले. राधिकेचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न त्यांना सतावू लागला. या वयात लग्न करून मुलीला सावत्र आई आणणे योग्य नव्हते. खूप विचारा अंती गंगुबाईचे नाव डोळ्यापुढे उभे राहिले.


   गंगुबाई! शामरावांची बहीण. सख्खी नाही. तरीही ती बहिणच ठरली. त्याचे असे झाले होते, शामरावांच्या जन्मा नंतर त्यांच्या आईला कधीही मूल होणार नाही असे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले होते. किसनरावांना आणि पत्नीलाही मुलीची खूप हौस होती. भावाला एखादी बहीण असायलाच हवी असे दोघांचेही मत होते. त्यासाठी किसनरावांनी दुसरे लग्न करावे असा त्यांचा पत्नीने आग्रह सुद्धा केला होता. पण किसनरावांनी ते मान्य केले नाही. सवती मत्सराचा त्रास मुलांना होऊ नये हाच त्या मागचा उद्देश होता. कुठली तरी मुलगी दत्तक घेतल्या शिवाय इच्छा पूर्ण होणारच नव्हती. दोघेही मुलीसाठी झुरत होते. 


   मनापासून इच्छा असली की मार्ग आपोआप उपलब्ध होतो. असे जुने लोकं म्हणायचेत. ते त्यांचे अनुभवाचे बोल होते. दोघेही मनोभावे देवाची भक्ती करायचे. त्यांची साधना फळाला आली. एक दिवस किसनराव शेतातून घराकडे येत असतांना रस्त्याच्या कडेला एका झुडुपात जुनाट कपड्यात गुंडाळलेले लहान स्त्रीलिंगी बाळ त्यांना दिसले. त्यांनी आजू बाजूला बघितले, जवळपास कुणीही नव्हते. बाळ फार फार तर एखाद्या दिवसाचे असेल. किसनरावांनी ते बाळ हळूच उचलून घरी आणले. पोलीस पाटलाला कळवले. ही बातमी हा हा म्हणता गावात पोहोचली. सर्वजण त्यांच्या घरी गोळा झाले. आजूबाजूच्या गावातही ही बातमी पोहोचवली गेली. जेणे करून ज्याचे असेल ते घेण्या साठी येतील. परंतु ते परत नेण्या साठी थोडेच कुणी तिथे ठेवले असणार? कुणाच्या तरी पापाचे फळ असणार ते. कुणी तरी लांबून ते तिथे आणून टाकले असावे. 


   पोलीस पाटलाने सूचना दिलेली असल्यामुळे त्या स्थळी पोलीसही आले. घटनेचा पंचनामा केला. गावातल्या सर्वांनी पोलिसांना आग्रह करून ती मुलगी किसनरावांच्याच घरी ठेवण्याची परवानगी घेतली. जर कुणी हक्क सांगितलाच तर ती परत देण्याच्या अटीवर पोलिसांनी परवानगी दिली. 


   तेव्हा पासून ती किसन पाटलांची मुलगी म्हणून गावात ओळखली जाऊ लागली. तिचे नाव गंगू ठेवले गेले. गंगूने शामरावला खूप जीव लावला. शामराव मात्र तिला बहीण म्हणून मनापासून स्वीकारू शकला नाही. गंगू लहानाची मोठी झाली. यथावकाश लग्न होऊन सासरी गेली. व्यवस्थित संसाराला लागली. मात्र संसारसुख तिच्या नशिबात नसावे बहुतेक. पहिले पाच वर्षे तिला मुलबाळ झालेच नाही. मग पाचव्या वर्षी तिला एक मुलगा झाला. मुलगा एक वर्षाचा होण्या अगोदरच पतीचे निधन झाले. चार सहा महिने आई वडिलांकडे राहून ती वैधाव्याचे जीवन जगायला लागली. आई वडील गेल्यानंतर भाऊबीजे शिवाय माहेरी येणे बंद झाले. भावा कडून फारसी मदत होईल याची तिला अपेक्षा नव्हतीच. मुलगा सुजीत साठी ती कंबर कसून कामाला लागली. 


   शामरावांनी राधिकेसाठी गंगुबाईला सुजीतसह लामण गावला आणले. अर्धा एकर जमीन होती ती विकून तिचे पैसे गंगुबाईच्या नावे फिक्स करून ठेवले. गंगुबाई कायमचीच माहेरी आली होती. भावाच्या पाठीशी उभे राहून मुलाचे संगोपन करायचे होते. सुजीतचे शिक्षण राधिके सोबत सुरू झाले. सुजीत आणि राधिका एकमेकात चांगलेच रुळले. एकमेकांच्या साथीने त्यांचे शिक्षण चांगले सुरू झाले, दोघेही लवकरच शिक्षणात प्रगती करू लागले, लहानाचे मोठे होऊ लागले.


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror