झपाटलेले घर - भाग-३
झपाटलेले घर - भाग-३
एखाद्या कळसूत्री बाहुली सारखा सुरेश त्या सुंदर तरुणीच्या (राधिकेच्या) सूचनांचे पालन करत होता. तिने गेट उघडले. "या" म्हणताच तो निमूटपणे तिच्या मागे गेला. स्वयंपाक होईपर्यंत वाड्याचे निरीक्षण केले. जेवण केल्यावर तिने सांगितल्या नुसार दूध घेतले. गाडीतून रात्री वापरण्याचे कपडे आणून बदलले आणि तो अंथरुणात पडला. प्रवासाचा थकवा, पोटभर सुग्रास जेवण यामुळे तो मस्त सुस्तावला होता, परंतु शरीर जरी थकलेले असले तरी गोंधळलेल्या मनामुळे त्याला झोप येत नव्हती.
बाजूला राधिका मात्र अतिप्रसन्नतेने पहुडली होती. मिलनातूर राधिका सुरेशच्या पिळदार शरीराला न्याहाळत होती. आज खूप खूप वर्षांनंतर तिला तिची मनोकामना पूर्ण करता येणार होती. कधी एकदा त्याच्या उबदार अशा कुशीत शिरते असे तिला झाले होते, परंतु त्याच्या मना विरुद्ध काही करायला तिचे मन मुळीच धजावत नव्हते. म्हणून तीही निवांत पणे त्याला न्याहाळत पडली होती. अधून मधून तोही तिच्याकडे बघत होता. हे सारे गौडबंगाल काय आहे? हा एकच प्रश्न त्याला झोप येऊ देत नव्हता.
कदाचित तिने त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले असावेत. ती त्याला हळूच म्हणाली, "सुजीत, खरंच का रे तुला काहीच आठवत नाही? विसरलास आपल्या दोघांच्या प्रेमाचे गोड गुपित? विसरलास त्या मळ्यातल्या नदीकाठच्या भेटी? त्या भेटीत रंगवलेली सुखी संसाराची सुखस्वप्ने? जन्मो जन्मी एकत्र राहण्याच्या घेतलेल्या त्या आणाभाका? आकाशातील चंद्र, तारे, तारका तोडून आणण्याची भाषा? एका जन्मातच सारे काही विसरलास? "
"हे बघा,..."
त्याला मध्येच अडवत ती म्हणाली, "थांब, कृपा करून मला अहो जाहो करू नकोस, मला लाजवू नकोस. मी तुझ्यापेक्षा मोठी नाहीय, किंवा मी कुणी परकीही नाहीय. मी तुझीच प्रेयसी राधिका. शामरावांची एकुलती एक मुलगी, ज्यांना सारे गाव *बाबा* म्हणत असत. एकुलती एक असल्या मुळे बाबांची लाडकी होते. तुझ्या घरच्या गरीब परिस्थिती मुळे बाबांना तू पसंत नव्हतास. पण मला मात्र खूप आवडत होतास, आणि माझ्या वरील प्रेमामुळे ते मला अडवू शकत नव्हते." ती त्याला मागचे सारे आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होती.
"पण मला कसं काहीच आठवत नाही मग? माझ्या जन्मापासून आजपर्यंत माझ्या आयुष्यात तुझी माझी भेट झाल्याचे मला अजूनही आठवत नाही." सुरेशचा प्रश्न.
"सुजीत, आपली मैत्री, आपले प्रेम तुझ्या या जन्मातले नाहीच तर तुला आठवेल कसे? ईश्वराने माणसाला स्मृती आणि विस्मृतीची फार मोठी देणगी दिलेली आहे. मागच्या जन्माच्या गोष्टी पुढच्या जन्मात आठवत नाही हेच चांगले आहे, नाहीतर जगणेच कठीण होऊन जाईल. जाऊ दे. आपल्या प्रेमाचा तो इतिहास फार मोठा आहे. तेवढे सारे एका रात्रीत नक्कीच सांगता येणार नाही. तू फार मोठा प्रवास करून आलेला आहेस, थकला असशील, झोप आली असेल, झोप आता." तिच्या या उत्तराने तर तो आणखीच गोंधळला.
सुरेशच्या डोळ्यात झोप मावत नव्हती, परंतु मनात चाललेल्या गोंधळा मुळे तो झोपू शकत नव्हता. तो जस जसा विचार करत होता तस तसा आणखी गोंधळत होता. __त्याला आठवत होतं, त्याच्या आईने सांगितलेलं ते त्याचं जन्मगाव *धांदलगाव*. तिथल्या शाळेत झालेलं त्याचे शिक्षण. त्याच शिक्षणाच्या जोरावर त्याला जिल्ह्याच्या शहरात मिळालेली चांगल्या पगाराची नोकरी. नोकरीत कमावलेला पैसा. तिथे बांधलेले त्याचे घर, त्याची दोन मुले, त्याची पत्नी मानसी. मुलांचे शिक्षण होऊन तेही चांगले नोकरीला लागलेले. सर्व काही आलबेल चालू. नोकरीतून निवृत्त होऊन मावशींच्या गावाला निघालो होतो. या पूर्ण आयुष्यात ही तरुणी मात्र कधीच आलेली नाही. मग आताच ही तरुणी कशी भेटली. आणि तिला, मावशीचे गाव कुठे राहिले?, किती लांब राहिले? हे विचारायचे सोडून आपण तिच्या सोबत तिच्या घरी मुक्कामाला थांबलो. ही सुंदर तरुणी, आपण जरी निवृत्त झालो असलो तरी अजून मन मात्र तरुणच असलेले, या घरात दोघांशिवाय तिसरं कुणीही नाही. तिचे ते लाघवी बोलणे, मादक सौंदर्य, ती आपल्यावर दाखवत असलेलं प्रेम, हे सारं खरं असेल का? असलं तरी या वयात हे शोभण्या सारखं आहे का? हे काही बरोबर नाही. यातून कशी सुटका करून घ्यावी?'_ या साऱ्या प्रश्नांचा गुंता त्याला झोप येऊ देत नव्हता. तो उठून बसला, स्वतःशीच विचार करत बसला. मनाचा हिय्या करून हळूच तिला म्हणाला,
"हे बघ राधिका, तू म्हणतेस म्हणून मी तुला 'राधिका' नाव घेऊन असं एकेरी बोलतोय. तू जी कुणी आहेस ती असशील. पण तुझे वय काय? माझे वय काय? मी आता नोकरीतून निवृत्त झालो आहे. मला पत्नी आणि दोन मुले आहेत. घरदार, संपत्ती जेवढ्यास तेवढी पुरेशी आहे. त्यावर डोळा ठेऊन बोलणाऱ्यातली तू नाहीस याविषयी माझ्या मनात खात्री आहे. पण मला वाटते, तुझा काही तरी गैरसमज झालेला असावा. तू म्हणतेस तसा तुझा आणि माझा काही संबंध असेल असे मला तरी वाटत नाही. आणि मला हे सारे समजल्या शिवाय शांत झोप येऊ शकणार नाही. तू खरंच कोण आहेस? आणि माझ्याच का गळ्यात पडते आहेस?" त्याने अगदी अगतिक होऊन तिला प्रश्न केला.
"हे बघ सुजीत, तू म्हणतोस तशी मी तुझ्या गळ्यात पडत नाहीय. तुला तसे वाटणे साहजिक आहे, ते सारे खरे आहे. तसेच मी म्हणते तेही खरंच आहे. माझा कुठलाही गैरसमज झालेला नाहीय. मला १००% खात्री आहे, तू माझाच आहेस, माझ्या नशिबाने माझ्या पासून दूर गेलेला माझा सुजीत तूच आहेस. मला एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षे नंतर आज मिळालास, मी आता तुला पुन्हा सोडू शकत नाही. मात्र तुला सर्व काही सांगून निःशंक झाल्या शिवाय मी तुझ्या शरीराला स्पर्शही करणार नाही. किंवा कुठल्याही प्रकारची माझी इच्छा तुझ्यावर लादणार नाही. माझ्या विषयी मनात कुठलीही शंका बाळगू नकोस. तुला ज्या काही शंका वाटत असतील, निःसंकोचपणे विचार, मी उत्तर देण्यासाठी उत्तरदायी असेन." असे म्हणत तिने त्याची आणि तिची प्रेम कहाणी सांगायला सुरुवात केली...
(क्रमशः)

